प्रा. प. रा. आर्डे -

अलिकडेच अग्निहोत्र या फसव्या विज्ञानाने पुन्हा डोके वर काढले आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या मार्च महिन्यात एका कृषी अधिकार्यानेच आपल्या कार्यालयात अग्निहोत्राचा प्रयोग केला आणि पिकावर रोगराई येऊ नये आणि उत्पादन भरघोस व्हावे, यासाठी जिल्ह्यातील शेतकर्यांना उद्युक्त करण्याचा प्रयत्न केला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील एका धार्मिक संस्थेनेही जगभरात; विशेषत: जर्मनीतील वैज्ञानिकांनी अग्निहोत्रावर प्रयोग केले असून त्याचा विविध प्रकारे उपयोग होत असल्याचे सिद्ध झाले आहे, असा दावा केला आहे. अग्निहोत्र म्हणजेच ‘होमा’थेरपी. हा एक प्रकारे छोटासा यज्ञच आहे. तो कसा करतात? त्याचे दावे काय आहेत? आणि या दाव्यात विज्ञान काय आहे? हा या लेखाचा विषय आहे.
पिरॅमिडच्या आकाराचे तांब्याचे पात्र; त्यात अखंड तांदूळ भरायचे, यालाच ‘अक्षता’ म्हणतात. त्यावर गायीच्या शेणाच्या गोवर्या टाकायच्या, त्यावर गायीचे तूप सोडायचे आणि त्यात जाळ करायचा. ही क्रिया सूर्योदय किंवा सूर्यास्ताला करायची व त्यावेळी विशिष्ट मंत्र म्हणायचे या अग्निहोत्रामधून जो धूर निघतो, त्यामुळे भोवतालचे वातावरण शुद्ध होते. विविध प्रकारचे बॅक्टेरिया आणि जीवजंतू मरतात, असा अग्निहोत्रवाल्यांचा दावा असतो.
अग्निहोत्राचे दावे काय आहेत? 1) वातावरण प्रदूषणमुक्त होऊन शुद्ध होते 2) मंत्रोच्चाराने एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा वातावणात तयार होते. वनस्पती व फळावरील कीड नाहीशी होऊन त्यांची चांगली वाढ होते.
‘महाराष्ट्र अंनिस’चे सोलापूर येथील कार्यकर्ते दादा चांदणे यांनी अग्निहोत्राबद्दल प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्रातील माहितीची चिकित्सा करण्याचे ठरविले. त्यांच्या चिकित्सेचे निष्कर्ष खालीलप्रमाणे –
1) अक्कलकोटच्या (शिवपुरी) गजानन महाराजांच्या आश्रमाला स्वत: दोन वेळा भेट देऊन तेथील साधकांशी चर्चा केली व पुरावे मागितले. या साधकांचा वैज्ञानिकतेशी तर सुतराम संबंध नव्हता. पुरावे माहीतच नव्हते. गजानन महाराज दोन्ही वेळा उपलब्ध नव्हते.
2) पत्राने माहिती मागितली असता गजानन महाराज व वैदिक संशोधन करणार्या संस्थेने काहीच प्रतिसाद दिला नाही.
3) सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयामध्ये भरणार्या प्रदर्शनामध्ये पुरावे मागितले असता, नुसतीच वादावादी करण्यात आली व पुस्तके वाचण्याचा सल्ला देण्यात आला; पुरावे नाहीतच.
4) याच काळात माझ्या एका लेखामुळे बाबूरावजी पारखे यांनी माझ्याशी संपर्क साधला. पारखे यांनी चर्चेमध्ये अग्निहोत्र व त्याबाबतच्या माझ्या आक्षेपांना उत्तरे देण्यासाठी खालील पुरावे मांडले-
अ) फर्ग्युसन कॉलेजमधील रसायनशास्त्र विभागाच्या संशोधकांनी केलेल्या प्रयोगाचा दावा, याविषयी मी फर्ग्युसन कॉलेजला याबाबत पत्र लिहिले असता कोणतेही उत्तर आले नाही.
ब) भोपाळच्या गॅस दुर्घटनेबाबतचा दावा की, अग्निहोत्रामुळे लोकांचा जीव वाचला. याबाबत पत्रव्यवहार केला असता, हा दावा धादांत खोटा असल्याचे पत्र आले; पण त्या पत्रात ‘मृत्युंजय’ मंत्रामुळे या गोष्टी घडल्याचा दावा असल्याने नवाच विनोद झाला. या पत्राची प्रत मा. पारखे व गजानन महाराज, अक्कलकोट यांना पाठवली.
क) तेंग मिंग यांचे संशोधन. याबाबत त्या झेरॉक्सशिवाय कोणतीही माहिती (उदा. कोण, केव्हा, कधी इत्यादी) पारखे देऊ शकले नाहीत. त्यामुळे खरे-खोटेपणा ठरविता आला नाही.
ड) डॉ. भुजबळ, संशोधक कृषी विद्यापीठ (राहुरी/पुणे) यांचे आवळ्याच्या झाडावरील संशोधन – याबाबत मी कृषी विद्यापीठ व भुजबळांशी पत्रान्वये संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही काहीही उत्तर दिले नाही. पण पारखे यांनी निरोप दिला की, भुजबळ या विषयावर मला काहीही माहिती देऊ इच्छित नाहीत.
पारखे यांनी सातत्याने पुरावे दिले व ते सातत्याने निरुपयोगी ठरले. परंतु व्यक्ती म्हणून बाबूरावजी पारखे यांचा परिचय झाला. वादविवाद झाले. अगदी त्यांनी मला त्यांच्या कोन्हाळीच्या घरी एकदा बोलावून जेऊही घातले. त्यातून एकच लक्षात आले की, शहाण्या, कर्तृत्ववान व्यक्तीही चौकस असतातच, असे नाही. म्हणून अग्निहोत्राबाबतचे खोटे व लबाडीचे पुरावे पाठीराख्यांनी दिले. अग्निहोत्राचा पुरस्कार, प्रचार व प्रसार करणार्या मा. पारखे यांच्यासारख्या कर्तृत्ववान, उद्योगी, चिकित्सक, सुजाण, सुशिक्षित, प्रतिष्ठित, गजानन महाराजाच्या जवळचे नातेवाईक असणार्या व्यक्तीला चार वर्षांत एकही पुरावा देता आला नाही. ही वस्तुस्थिती काय दर्शविते?
पुण्यातील वनराई या संस्थेमध्ये अग्निहोत्राचा प्रयोग 2000 मध्ये करण्यात आला. ‘वनराई’चे प्रवर्तक प्रख्यात राजकारणी आणि समाजकारणी मोहन धारिया हे होते. वसंतराव परांजपे याने दक्षिण अमेरिकेतील पेरू, अॅरेझोना व ब्राझील; तसेच युरोपमधील स्पेन आणि हॉलंड या ठिकाणी अग्निहोत्राचे प्रयोग यशस्वी झालेत, असा दावा केला होता. त्यांनी मोहन धारिया यांना अग्निहोत्राचे महत्त्व पटवून दिले. भारत सरकारचे ग्रामीण विकास खात्याचे तत्कालीन मंत्री व्यंकय्या नायडू यांनी ‘वनराई’ला दि. 1 एप्रिल 2001 रोजी भेट दिली. त्यावेळी मोहन धारिया आणि व्यंकय्या नायडू यांच्या समोर वसंतराव परांजपे यांनी अग्निहोत्राचे प्रात्यक्षिक केले. मोहन धारिया यांनी अग्निहोत्राचा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर ‘वनराई’त काही गावात सुरू केला. ‘वनराई’तील या प्रयोगाबद्दल मी स्वत: वनराई संस्थेत काम करणार्या सध्याच्या एका अधिकार्यासोबत चर्चा केली. त्यांनी अग्निहोत्राचा प्रयोग ‘वनराई’मध्ये सपशेल फसला असून या प्रयोगातील दाव्यांना काहीही अर्थ नाही, अशी माहिती मला दिली.
अग्निहोत्राने पीक संवर्धन होते, असे परदेशात सिद्ध झाले आहे. हा परांजपे यांचा दावा कितपत खरा? विज्ञानाच्या पद्धतीनुसार एखादे नवे संशोधन प्रथमत: अन्य संशोधकांकडे चिकित्सेसाठी पाठविले जाते. त्यांनाही अनुकूल पुरावे मिळाले, तर ते संशोधन ‘लॅन्सेट’सारख्या जगप्रसिद्ध मासिकामध्ये प्रसिद्ध केले जाते. अशा महत्त्वाच्या संशोधनावर जगभरातील विविध विद्यापीठांतील कृषी संशोधकांनी पुन्हा प्रयोग करून त्याची खात्री करावी लागेल. विज्ञानाला हा मार्ग असा सामूहिकपणे सत्याकडे जाणारा असतो. या संदर्भात भारतातील कृषी विद्यापीठात अग्निहोत्राबद्दलच्या प्रयोगाची खातरजमा केलेली आढळत नाही.
कोकण कृषी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ या तीनही विद्यापीठांत अग्निहोत्राबद्दल प्रयोग केल्याचे ऐकिवात नाही. अग्निहोत्र जर उपयोगी असेल, तर या कृषी विद्यापीठांनी महाराष्ट्र सरकारला तशी शिफारस केली असती. सरकारने शेतकर्यांना पिकावरील कीड नाहीशी करण्यासाठी अग्निहोत्राची शिफारस केली असती आणि सरकारचे आणि शेतकर्यांचे कोट्यवधी रुपये वाचले असते; पण असे न होता वसंतराव परांजपे यांच्यासारखे एकांडे शिलेदार अग्निहोत्रासारख्या संशोधनाचे दावे करतात. त्याची किंमत शून्य आहे. कृषीविषयक अभ्यासक्रमातील कोणत्याही ग्रंथात अग्निहोत्राचा उल्लेख नाही. शेतीविषयक संशोधनाच्या शब्दकोषात असलेल्या उल्लेखात अग्निहोत्राचा अजिबात उल्लेख नाही.
कमाल म्हणजे अग्निहोत्राने केवळ शेतातील पिकावरील कीड नष्ट होत नसून आणखीही भलेमोठे दावे अग्निहोत्रवाले करण्यास कचरत नाहीत. अणुकेंद्रकातून उत्सर्जित होणार्या किरणांचे घातक परिणाम अग्निहोत्रामुळे दूर होऊ शकतील, असाही दावा ते करतात. या दाव्याचा आधार आहे, अग्निहोत्राच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र. या मंत्रामधून एक प्रकारची ऊर्जा उत्सर्जित होते. जी घातक अणुकिरणांना निष्प्रभ करतात, असा अग्निहोत्रवाल्यांचा दावा आहे. अग्निहोत्रामुळे दुष्काळी भागात पाऊस पडू शकेल, असाही दावा अग्निहोत्राचे समर्थक करतात. हे कसं काय? असे विचारले असता, असे वेदात लिहिलंय, असे ते सांगतात. याला अलिकडचा पुरावा द्या, असं म्हणताच जे वेदात लिहिले ते सत्य आहे, असा त्यांचा दावा असतो. विज्ञानाला केवळ ग्रंथप्रामाण्य मान्य नाही. ग्रंथातील विधानांना पुरावा हवा, असं वैज्ञानिक दृष्टिकोन सांगतो.
प्रख्यात धर्मशास्त्र अभ्यासक आणि विचारवंत तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या ‘वैदिक संस्कृतीचा विकास’ या ग्रंथात अग्निहोत्राचा उल्लेख आहे. शास्त्रीजी लिहितात की, अग्निहोत्र ही ‘यातुविद्या’ आहे. यातुविद्या म्हणजे जादूगिरी. या जादूगिरीच्या मंत्राने ‘अथर्ववेद’ भरला आहे. ‘यातुविद्ये’चे दोन प्रकार 1) अर्थवन म्हणजे मनुष्यजातीस उपकारक ठरणार्या पवित्र जादूचे मंत्र. उदा. रोगनिवारक मंत्र 2) अंगिरस म्हणजे शत्रुत्वापोटी त्रास देण्यास उपयोगी पडणारे अभिचार मंत्र किंवा अमंगल जादू. अग्निहोत्र म्हणजे अग्निची पूजा करणारे कर्मकांड. हे कर्मकांड करणारे ते अग्निहोत्री पुरोहित. अग्निहोत्र करून पिकांवरचे रोग नाहीसे करणारे मंत्र म्हटले की ‘वनराई’ प्रकल्पात क्रांतिकारक सुधारणा होईल, असा याचा अर्थ. ही तर जादूगिरी झाली. अग्निहोत्र करून ‘वनराई’ प्रकल्पात उत्पादन वाढविण्याचे स्वप्न म्हणजे जादूगिरीचा अवलंब. ही तर उघड अंधश्रद्धा आहे. अग्निहोत्र ही अंधश्रद्धा असल्यानेच ‘वनराई’मध्ये अग्निहोत्र प्रकल्प सोडून देण्यात आला. अग्निहोत्राचा वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत आता समाचार घेऊया. अग्निहोत्रात तूप आणि तांदूळ जाळले जातात. ज्वलनाचे विज्ञान काय सांगते? कोणत्याही ज्वलन प्रक्रियेत हवेतील ऑक्सिजन शोषला जातो आणि कार्बन डायऑक्साईडचे उत्सर्जन होते. कार्बन डायऑक्साईड हा हवेचं प्रदूषण करतो; शुद्धिकरण नव्हे. त्यामुळे गावागावांत आणि शेताशेतांत अग्निहोत्र प्रयोग केले, तर हवा प्रदूषित होण्यास हातभार लागेल. म्हणून अग्निहोत्र हे फसवे विज्ञान आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अग्निहोत्राच्या वेळी म्हटले जाणारे मंत्र. हे मंत्र खालीलप्रमाणे –
अग्निहोत्र मंत्र – सूर्योदय:
सूर्याय स्वाहा, सूर्याय इदं न मम।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम।
अग्निहोत्र मंत्र – सूर्यास्त:
अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम।
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम।
अशा मंत्रांनी वातावरण ऊर्जाभारित होऊन रोगराई नष्ट होईल, याला वैज्ञानिक पुरावा नाही. ही केवळ धार्मिक वचनांची अर्थहीन भलावण आहे. मंत्राने भौतिक परिणाम साधतात, याचा पडताळा घेतल्याचे कुठेही आढळत नाही. अग्निहोत्र हे धड विज्ञानही नाही आणि नैतिकतेकडे नेणारा धर्मही नाही. धर्म आणि विज्ञान यांची अयोग्य भेसळ म्हणजे अग्निहोत्र.
अलिकडे भारतात विज्ञानातील सर्व काही आमच्या वेदात होते, असा प्रकार जोरदारपणे सुरू झाला आहे. आमच्याकडे पूर्वी टेस्ट ट्यूब बेबीचं तंत्र होतं, विमाने होती. न्यूटनचा गुरुत्वाकर्षणाचा शोध वेदामध्ये दिला आहे, अशा तर्हेचे दावे सुरू आहेत. याला विज्ञानाचे भगवेकरण असे म्हणता येईल. अग्निहोत्र हे असेच भगवे विज्ञान आहे. त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलेच बरे.