स्त्रीजन्म म्हणोनी न व्हावे उदास…

शामसुंदर महाराज सोन्नर - 9892673047

महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीत वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. त्यात स्त्रीसंतांची कामगिरीही उल्लेखनीय आहे. या स्त्रीसंतांमध्ये जनाबाई यांची धिटाई खूपच ठळकपणे दिसणारी आहे. विशेषतः स्त्रियांच्या भावभावनांना त्यांनी आपल्या अभंगातून थेटपणे मांडले आहे.

समतेचा, बंधुत्वाचा आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणार्‍या वारकरी संप्रदायाचे अनेक वर्षे त्यांनी नेतृत्व केले.

गोदावरीच्या तीरावरील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड हे जनाबाईंचे जन्मगाव. ‘दमा’ आणि ‘करुंड’ या दांपत्याच्या कन्या असणार्‍या जनाबाई यांचे अभंग त्यांच्या बंडखोरीची साक्ष देतात. जनाबाईंचे आई व वडील पंढरपूरच्या विठ्ठलाचे परमभक्त होते. ते उभयता नियमित पंढरीची वारी करीत असत. पूर्वीच्या परभणी जिल्ह्यातील नरसी बामणी येथील दामाशेट हेही पंढरीचे वारकरी होते. पुढे त्यांनी आपले वास्तव्य पंढरपुरात केले, तेव्हा दमा आणि करुंडा यांनी जनाबाईला त्यांच्याकडेच ठेवले. दामाजीशेट यांच्या पोटी पुढे नामदेव महाराज यांचा जन्म झाला. जनाबाई संतशिरोमणी नामदेव महाराज यांच्या कुटुंबातील एक घटक बनल्या. त्या स्वत:ला ‘नामयाची दासी’ म्हणवून घेत असत.

तेराव्या शतकात कर्मकांडाचे स्तोम माजले, वर्णव्यवस्था भक्कम झाली. त्यात परकीय आक्रमकांनीही समाजाचे शोषण सुरू केले होते. तेव्हा संत नामदेव महाराज यांनी समाजातील सर्व जाती-धर्मांच्या लोकांना बरोबर घेऊन वारकरी संप्रदायाची उभारणी केली. त्यात स्त्रियांनाही सामील करून घेतले. पंढरपूरच्या वाळवंटात समतेचा झेंडा रोवला. वारकरी चळवळीत जात, धर्म, स्री-पुरुष या भेदाला थारा न देता सर्वांना एका छताखाली आणले. यात संत जनाबाई, मुक्ताबाई, सोयराबाई, निर्मळा, कान्होपात्रा आदी महिला संतांचा समावेश होता. यात जनाबाई या अग्रणी होत्या.

अगोदर कामधंदा सोडून भक्ती करावी, असे सांगितले जात होते. मात्र वारकरी संतांनी कर्म हीच भक्ती आहे, असा विचार रुजविला. हा विचार भक्कम करताना जनाबाई म्हणतात – मी कामधंदा सोडून नव्हे, तर दळताना-कांडताना भगवंताला आळवेल.

‘दळिता, कांडिता तुज गाईन अनंता’

वर्णव्यवस्था आणि त्या अनुषंगाने आलेली जातव्यवस्था जेव्हा भक्कम होती, तेव्हा सर्व जातीतील लोकांना पंढरीचा पांडुरंग अंगा-खांद्यावर खेळवतो. हे संत त्याची लेकर आहेत, हा विचार भक्कम करताना जनाबाई लिहितात-

विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळाचा मेळा ।

निवृत्ती हा खांद्यावरी, सोपाना हात धरी ।

पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताबाई ही सुंदर

गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी ।

बंका कडीयेवरी, नामा करांगुळी धरी ।

जनी म्हणे रे गोपाळा, करी भक्तांचा सोहळा ॥

संत जनाबाईंच्या नावावर असलेले एकूण सुमारे 350 अभंग सकल संतगाथेत मुद्रित केले आहेत. याशिवाय कृष्णजन्म, थाळीपाक, प्रल्हादचरित्र, बालक्रीडा, हरिश्चंद्राख्यान अशा रचना जनाबाईंच्या नावावर आहेत.

संत जनाबाईंची भावकविता ही जशी भगवंताच्या प्रेमाने ओतप्रोत भरलेली आहे, तशीच सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारी आहे. संत जनाबाईंच्या जीवनातील अनंत अनुभूती त्यांच्या रचनांतून रेखाटल्या आहेत. संत नामदेवांवरील भक्ति-प्रेमभाव, संत ज्ञानदेवांविषयी असलेला उत्कट भाव, संत चोखोबांच्या भावसामर्थ्याचे अनुसरण; तसेच विठ्ठलाविषयीचा भक्तिभाव त्यांच्या काव्यात ओतप्रोत भरलेला दिसून येतो; वेळप्रसंगी देवाशी भांडायला पण त्या कमी करत नाहीत. ‘वात्सल्य, कोमल, ऋजुता, सहनशीलता, त्यागी वृत्ती, समर्पण वृत्ती, स्त्रीविषयीच्या भावना संत जनाबाईंच्या काव्यात प्रकर्षाने दिसून येतात. तत्कालीन संत ज्ञानदेव, संत नामदेव, संत सोपानकाका, संत गोरोबा, संत चोखा मेळा, संत सेना महाराज यांच्या कार्याची नोंद जनाबाईंनी आपल्या अभंगात करून ठेवलेली आहे. संत जनाबाईंचे बरेचसे अभंग ‘नामदेव गाथे’ मध्ये आहेत.

सर्व जाती-धर्मांतील लोकांना एकत्र करून उभारलेल्या भागवत धर्माचा विचार भारतभर पोचवण्यासाठी संत नामदेव महाराज यांनी संपूर्ण भारतभ्रमण केले. त्यातील बराच कालखंड नामदेव महाराज यांनी पंजाबमध्ये घालविला. ते पंढरपुरात नव्हते, तेव्हा जनाबाईंनी वारकरी संप्रदायाचे नेतृत्व केले. एखादी स्री सार्वजनिक जीवनात वावरू लागते, नेतृत्व करू लागते, तेव्हा पुरुषप्रधान व्यवस्थेला ते मानवणारे नसते. त्या स्रीच्या कर्तृत्वावर शंका घेता येत नाही, तेव्हा तिच्या राहणीमानावर बोट ठेवले जाते. नामदेव महाराज यांच्या अनुपस्थितीमध्ये जनाबाई वारकरी संप्रदायाचे नेतृत्व करू लागल्या, तेव्हा ’तुझा पदर डोक्यावर राहत नाही. तुला नेतृत्व करण्याचा अधिकार नाही,’ अशी त्यांची हेटाळणी केली जाऊ लागली. मात्र जनाबाई एवढ्या खंबीर होत्या की, त्यांनी तत्कालीन लोकांना अत्यंत रोखठोक शब्दांत सुनावले. जनाबाई म्हणतात-

डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईल मी

पदराच्या गोष्टी काय करताय? मी पदर खुशाल खांद्यावर टाकून भरल्या बाजारातून जाईल, असा इशारा जनाबाई देतात. त्यांना भजन आणि कीर्तन करण्यास मनाई करण्यात आली, तेव्हा तर थेट बंडच पुकारताना म्हणतात …

हातामध्ये टाळ खांद्यावरी वीणा, आता मज मना कोण करी

स्वतः अशा धीट असणार्‍या जनाबाई इतर स्त्रियांना धीर देताना स्रीजन्म म्हणोनी न व्हावे उदास असा संदेश देतात. जनाबाईंच्या अभंगातील एकंदर बंडखोरी पाहता स्रीवादी चळवळीच्या प्रणेत्या म्हणून जनाबाईंकडे पाहिले पाहिजे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]