अविनाश पाटील - 9422790610
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 31वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी कार्यकर्त्यांशी साधलेल्या संवादाचा संपादित वृतांत…
“आपल्यातले काही सहकारी, जे प्रत्यक्ष आरोग्यसेवेमध्ये आहेत आणि वेगवेगळ्या सामाजिक घटकांच्या – कष्टकरी, मजूर, परप्रांतीय – मदतीसाठी रस्त्यावर उतरले, त्यातलाच आपला एक मुंबईतला सहकारी, कार्यकर्ता राजू निरभवणे, जो आज आपल्यात नाही, त्याच्याबद्दलचा शोक या निमित्ताने मी व्यक्त करतो. मागील वर्षी आपण संघटनेची त्रिदशकपूर्ती साजरी केल्यानंतर 31 व्या वर्षापासून वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला ‘कार्याध्यक्षाचा संवाद’ म्हणून एक नवीन पायंडा सुरू करत आहोत. ज्या मध्ये संघटना म्हणून केलेल्या कामाचा, झालेल्या वाटचालीचा आढावा घेतला जावा, ऊहापोह केला जावा; आणि अर्थातच त्याबद्दल आपले कार्यकर्ते, त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतक, समविचारी, प्रायोजक, देणगीदार या सगळ्यांच्या प्रती एक नम्र कृतज्ञतेची भावना व्यक्त करावी; तसेच आपल्याला काय भवितव्य, संधी, आव्हाने आहेत, या सगळ्यांचा काही अदमास घेण्यासाठी आपल्याशी संवाद साधावा, हा देखील हेतू त्यामागे आहे. पण 30 वर्षांच्या वाटचालीचा एक धावता आढावा गेल्या त्रिदशकपूर्तीच्या निमित्ताने आपण आपल्या संघटनेच्या पातळीवर घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे; पण तो पुरेसा नाही, असं माझं मत आहे. याबाबत अजूनही बर्याच काही गोष्टी करणे आवश्यक आहे; ज्यामध्ये दस्तऐवज संकलन करणे, हे महत्त्वाचे काम आपल्याला अजूनही पूर्ण करता आलेलं नाही आणि ते जर आपण पूर्ण करू शकलो तर भविष्यामध्ये आपण संघटना म्हणून 30-31 वर्षांत काय काम केलं, हे जगासमोर अधिक नेमकेपणाने आणि त्यामागचे सर्व संदर्भ आकडेवारीसह आपल्याला मांडता येईल. म्हणून आपण असा विचार मांडतो आहोत की, आम्हाला आमच्या संघटनेचे- सामाजिक मूल्यमापन Social Impact Analysis करावयाचे आहे आणि तो प्रयत्न आपण आपल्या संघटनेच्या पातळीवर प्रयत्न सुरू केलेला आहे. त्या-त्या क्षेत्रातल्या सामाजिक विज्ञानाच्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून अभ्यासकांकडून पुढच्या काळात अधिक नेमका प्रयत्न करण्याचा आपला विचार आहे आणि त्यादृष्टीने काही संवाद नियोजन करणं सुरू आहे; पण त्यासाठी आपली पूर्वअट असणार आहे की, आपल्याला त्याबद्दल आवश्यक दस्तऐवज संकलन करायला पाहिजे आणि आपण आपलं 30 वर्षांचं दस्तऐवज संकलन काटेकोरपणे केलं तर मला खात्री आहे की, जगामध्ये अंधश्रध्दा निर्मूलनाच्या संघटित कामाचा जो वस्तुपाठ आपण उभा केला आहे, त्यासाठी ‘नोबल’ दर्जाचा पुरस्कार मिळू शकेल एवढं काम आपण केलेलं आहे, असं मला वाटतं आणि म्हणूनच आपण पुढच्या काळात जास्त गंभीरपणे नियोजन आणि प्रयत्न करू.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा हीरक महोत्सव सुरू आहे. आपणंही ‘भविष्यवेध 2025’चे जे चार टप्पे ठरवले होते, त्यामधल्या पहिल्या टप्प्यात आपल्या संघटनेला 30 वर्ष होणार म्हणून त्रिदशकपूर्तीनिमित्त आपण एक दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषद मुंबईत घेतली आणि राज्याचे दोन दिवसीय अधिवेशन घेतलं. त्यानंतर दुसरा टप्पा आपण 1 मे 2020 पासून राज्याच्या हीरक महोत्सवी वर्षात या राज्याच्या निर्मितीपासूनच्या वाटचालीमध्ये पुरोगामी आणि संत- समाजसुधारकांचा वारसा घेऊन जाणारं राज्य म्हणून त्याबद्दलचे तपशील वर्षभरात मांडावेत, असं आपण ठरवलं होतं; पण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आता ते काही घडू शकलेलं नाही; पण यामध्ये संघटनेच्या पातळीवर आणि संघटनेबाहेरच्या समविचारींबरोबर याबद्दल आपण संवाद साधतो आहोत. पण नंतरच्या टप्प्यात; कदाचित या वर्षाअखेरनंतर नवीन वर्षामध्ये आणि 1 मे 2021 च्या आत समविचारी संघटना संस्थांना घेऊन अधिक काही करता येईल का, याबद्दल आपण विचार करणार आहोत.
पंधरा-वीस ठिकाणच्या कार्यकर्त्यांच्या सहभागाने आणि डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुढाकाराने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणून कामाची सुरुवात 1989 मध्ये झाली. त्या वेळेला कल्पना नव्हती की, हे काम किती वाढेल आणि किती विस्तारेल. आज अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम हे केवळ अंधश्रद्धा निर्मूलन एके अंधश्रद्धा निर्मूलन, म्हणजे देव-धर्माच्या नावाने चालणारी फसवणूक, दिशाभूल आणि शोषण इतक्यापुरते मर्यादित राहिलेले नाही. याच्या पलिकडे जाऊन आपण एकूणच मानवी जीवनातले शोषण, अंधश्रद्धा, अविवेक, अवैज्ञानिकता आणि छद्मविज्ञान या अंगाने देखील आपल्या कामाला विस्तारण्याचा प्रयत्न चालवलेला आहे आणि त्याच्यामध्ये अजून प्रचंड काम करण्याची गरज समाजवास्तवामध्ये आपल्याला बघायला मिळते.
आज कामाचा विस्तार हा केवळ महाराष्ट्रापुरता राहिलेला नाही. महाराष्ट्रामध्ये आपण जवळपास वीसेक विभागांच्या माध्यमातून कामाचा विस्तार करणारी संरचना तयार केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रश्नांना भिडण्याचा प्रयत्न करतोय. आताच्या टप्प्यावर असं म्हणता येऊ शकेल की, ‘अंधश्रध्दा निर्मूलन’ हे नाव आता आपल्या कामाचं एका शक्तिस्थान होतं; पण आता त्याची मर्यादा झाली आहे. कारण त्यापलिकडे जाऊन आपण अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठीचं पण काम करतो. त्यामुळे त्याचा विस्तार कसा करता येईल, हे आपल्याला विचारात घ्यावे लागणार आहे आणि त्या दृष्टीने गेल्या काही काळामध्ये, काही वर्षांमध्ये गेल्या दशकामध्ये आपण तसा विचार डॉ. नरेंद्र दाभोलकर हयात असताना पण आणि नंतरच्या काळात देखील केलेला आहे आणि त्या दिशेने आपण आपल्या परीने वाटचाल करतोय. त्रिदशकपूर्तीच्या कार्यक्रमामध्ये आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर एका अर्थाने आपल्या कामाची दखल घेतली गेली आणि त्याला मान्यता दिली गेली आहे. त्यानिमित्ताने आपल्याला अनेक पुरस्कारही मिळाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर असताना त्यांना व संघटनेला मिळालेले; तसेच त्यांच्या निर्घृण खुनानंतरच्या काळातल्या वाटचालीमध्ये राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील संघटनेला, कार्यकर्त्यांना मिळालेले अनेक पुरस्कार हे आपल्या कामाची आणि कार्यकर्त्यांच्या योगदानाची पोचपावती नक्कीच आहे. पण महाराष्ट्र राज्याच्या हीरक महोत्सवाच्या निमित्ताने आपण याची एक उजळणी करतोय की, महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारवारसांना पुढे नेण्यामध्ये जे योगदान दिलं, त्याच्यावर आम्ही दावा करू इच्छितो, ते मांडू इच्छितो, जनमानसापर्यंत ते पोचवू इच्छितो आणि लोकांनाही सांगू इच्छितो की, This is the right track – हा योग्य मार्ग आहे – समाजबदलाचा, समाजपरिवर्तनाचा, समाज अधिक प्रागतिक विचारांचा करण्याचा, कालसुसंगत करण्याचा.
‘भविष्यवेध 2025’मधला पहिला टप्पा आपण पूर्ण केला. यशस्वीपणे त्रिदशकपूर्तीनिमित्ताने आपण एक दिवसाची आंतरराष्ट्रीय परिषद घेतली, मुंबईमध्ये राज्याचं त्रिदशकपूर्तीचं दोन दिवसांचं अधिवेशन घेतलं आणि ते अतिशय भव्य-दिव्य पद्धतीने घेतलं. ‘भविष्यवेध’मध्ये त्रिदशकपूर्तीनंतर दुसरा टप्पा 1 मे 2020 चा. कोरोना महामारीमुळे आपण त्याबद्दल प्रत्यक्ष काही कार्यक्रम करू शकू अथवा नाही, हे परिस्थिती निवळेल, बदलेल, लस येईल त्यानंतरच आपल्याला ठरवता येणं शक्य आहे. तिसरा टप्पा म्हणून जो आपण विचार केला होता की, 15 ऑगस्ट 2020 ला देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या 75 वर्षांच्या निमित्ताने ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा अंधश्रद्धा निर्मूलनाच्या विवेकी समाजनिर्मितीशी काय भावबंध आहे आणि त्याचे महत्त्व काय, हे आपण या निमित्ताने अधोरेखित करणे आवश्यक आहे. कर्मठ, विद्वेषी विचारांचे अधिष्ठान देऊन काम करणार्या विचारधारांकडून ध्रुवीकरण केले गेले आहे, त्याला अधिक मोकळं करणं, ते कसं करता येऊ शकेल, हे आपल्यापुढील आव्हान असणारं आहे आणि त्याच्यानंतरचा चौथा टप्पा म्हणजे 26 जानेवारी 2025, भारतीय संविधानाला होणारी 75 वर्षे. मला वाटतं, हा एक महत्त्वाचा टप्पा देश म्हणून आणि माणूस म्हणून जगाच्या दृष्टीने असणार आहे. जगामध्ये एक अतिशय महत्त्वाचं दस्तऐवज असणारं भारतीय संविधान आणि त्या भारतीय संविधानाच्या आधारावर या देशाचा कारभार 75 वर्षे चाललेला आहे, त्याबद्दलचं एक अवलोकन होणे अपेक्षित आहे. भारतीय संविधानाचा केवळ परिचय, ओळख, प्राथमिक माहिती, आकडेवारी आणि सणावळी एवढ्यापुरतं त्याची माहिती मर्यादा न ठेवता भारतीय जनमानसामध्ये त्याच्यामधल्या वैचारिक आशयाबद्दलचे एक आकलन विकसित करण्याची प्रक्रियापण आपल्याला पुढे चालवायची आहे. अर्थात, यासाठी समसंवादी विचारधारा, संघटना, संस्था, राजकीय पक्ष आहेत, त्यांना सोबत घेऊन पुढची वाटचाल करणे आवश्यक आहे आणि ती करत असताना मला हा आशावाद आहे की, विजय आपलाच होणार आहे. कारण आपण माणुसकीच्या, विवेकाच्या आणि मानवतेच्या बाजूने आहोत.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मी आता ‘महा. अंनिस’ म्हणू इच्छितो. कारण आपण आता फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, त्यामुळे ‘महा’ म्हणजे महान, मोठी म्हणून ‘महा. अंनिस’च्या 31 व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा सदिच्छा देतो –
जय महाराष्ट्र…. जय भारत…. जय जगत…. विवेकाचा आवाज बुलंद करूया…
धन्यवाद.
कार्याध्यक्ष संपर्क – 94227 90610
शब्दांकन : सुधीर निंबाळकर