आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवर सामाजिक बहिष्कार टाकणार्‍या नंदीवाले समाजातील जातपंचांवर गुन्हा दाखल.

-

अंनिस’च्या प्रयत्नामुळे पलूस पोलीस ठाण्यात सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अथक प्रयत्नांमुळे महाराष्ट्रात सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 2016 पासून अमलात आला आहे. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला, कुटुंबाला समाजातून बहिष्कृत करणे हा गुन्हा आहे.

महाराष्ट्रातील नंदीवाले, काशीकापडी समाजातील काही तरुणांनी आंतरजातीय विवाह केला आहे. अशा 150 जोडप्यांना नंदीवाले जातपंचांनी समाजातून बहिष्कृत केले आहे. त्यांना समाजातील कोणत्याही सुख-दु:खाच्या कार्यक्रमात बोलावले जात नाही किंवा कोणीही त्यांच्याशी संबंध ठेवत नाहीत. अशा आंतरजातीय विवाह केलेल्या तीस जोडप्यांनी एकत्रपणे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, शाखा सातारा यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आणि त्यांच्यावरील सामाजिक बहिष्कार उठवण्याची मागणी केली. त्यानुसार ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी व पोलिसांनी नंदीवाले समाजातील जातपंचांशी संपर्क करून त्यांची मेढा (जि. सातारा) पोलीस ठाण्यात जून 2021 मध्ये बैठक बोलावली. या बैठकीमध्ये ‘अंनिस’ कार्यकर्त्यांनी सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार आता कोणालाही समाजातील वाळीत टाकता येत नाही. याची जाणीव करून दिली. तसेच पोलिसांनी पंचांना सामाजिक बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा पंचांनी सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे कबूल केले. त्यानुसार पंचांची पुढील बैठक 26 डिसेंबर 2021 रोजी कराड येथे होऊन या बैठकीतही राज्यातील आंतरजातीय विवाह केलेल्या कुटुंबांवरील सामाजिक बहिष्कार मागे घेत असल्याचे जाहीर केले.

परंतु नंदीवाले समाजातील काही जातपंचांनी सांडगेवाडी (ता. पलूस) येथे पुन्हा 9 जानेवारी 2022 रोजी जातपंचायत बसविली. या जातपंचायतीमध्ये त्यांनी कराड येथे जातपंचायतींनी घेतलेला निर्णय अमान्य करून या आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांवरील सामाजिक बहिष्कार सुरू ठेवणार असल्याचे जाहीर केले. पलूस येथील झालेला हा जातपंचायतीचा निर्णय सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार गुन्हा आहे. म्हणून इस्लामपूर येथील आंतरजातीय विवाह केलेले प्रकाश शंकर भोसले यांनी या कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला दि. 14 जानेवारी 2022 रोजी गुन्हा दाखल केला. यामध्ये जातपंचायतीचे पंच – 1) विलास शंकर भिंगार्डे (इस्लामपूर) 2) चंद्रकांत बापू पवार (इस्लामपूर) 3) शामराव श्रीरंग देशमुख (दुधोंडी), 4) अशोक शंकर भोसले (दुधोंडी), 5) किसन रामा इंगवले (जुळेवाडी, ता. कराड), 6) विलास बापू मोकाशी (नेहरूनगर, निमणी) या पंचांवर सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्यानुसार पलूस पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद झाला आहे.

हा गुन्हा नोंद करताना आंतरजातीय विवाह केलेले काही पीडित तरुण उपस्थित होते. स्वप्निल भिंगारे (खोपोली, रायगड), सागर जाधव (रत्नागिरी), सत्यवान पवार (भिवंडी), किरण भिंगारे (खेड), तुषार घोडेकर (भोर), स्वप्निल पानकर (सासवड), मारुती जाधव (महाड), विकी पवार (महाड), नेताजी भिंगारे (दिवा, ठाणे), राजेंद्र पवार (फलटण), संदीप भिंगारे (रोहा), संजय पवार (नालासोपारा), संदीप भोसले (निमणी) या सर्व जोडप्यांवर जातपंचांनी सामाजिक बहिष्कार टाकला आहे. यातील फिर्यादी प्रकाश भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित राहून जो सामाजिक बहिष्कार टाकला आहे, त्याच्या त्रासाची आपबीती पत्रकारांना सांगितली.

या प्रकरणाचा पाठपुरावा करून गुन्हा नोंद करण्यासाठी सातारा ‘अंनिस’चे कार्यकर्ते शंकर कणसे, प्रशांत पोतदार, भगवान रणदिवे, वंदना माने, डॉ. दीपक माने, अ‍ॅड. हौसेराव धुमाळ, मोहसीन शेख यांचे सहकार्य झाले. गुन्हा नोंद करण्यासाठी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उपाधीक्षक अश्विनी शेंडगे, पलूस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक विकास जाधव, राजश्री दुधाळ, हवालदार नितीन गोडे यांचे सहकार्य लाभले. पत्रकार परिषदेला सांगली अंनिसचे कार्यकर्ते राहुल थोरात, फारूक गवंडी, डॉ. सविता अक्कोळे इत्यादी उपस्थित होते.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]