आरती नाईक - 8652223803
“प्रिय डॉक्टर,
कसे आहात? खूपच औपचारिक प्रश्न आहे ना? तुम्ही गेल्यापासून क्वचितच असा एखादा दिवस गेला असेल की तुमची आठवण आली नाहीय. ‘संवादशाळा’ असो, पुस्तक वाचन असो किंवा आपलं बोलणं सुरू असो, तुम्ही असताच! आज सगळ्यांच्या समोर बोलणार आहोत आपण, एवढंच काय ते वेगळं!
तुम्हाला माहितेय न डॉक्टर, मला जितकं बोलायला आवडतं, तितकाच लिहायचा कंटाळा आहे. कोणी काही लिहायला सांगितलं की, किती चालढकल करत राहते. पण काल राहुलचा फोन आला, ‘यावेळी ऑगस्टच्या अंकात डॉक्टरांना तू पत्र लिहायचं आहेस आणि खरं सांगते डॉक्टर, काय विषय काही न विचारता मनानं उसळून होकार दिला होता. तुमच्याशी तर बोलायचं आहे. बरं, त्यात विषय सुद्धा दोघांच्या समान आवडीचा होताच.
‘जोडीदाराची विवेकी निवड’ किती मोठं नाव आहे ना हे, असं म्हणायचे मी आणि आज याच नावाच्या विभागाची मी राज्य कार्यवाह आहे. तुम्ही आणि अविनाशभाई जेव्हा या विषयावर मांडणी करायचा, त्या एकही युवा संकल्प परिषदेला, कार्यक्रमाला मी नव्हते; पण डॉक्टर, आज या विषयावर मांडणी करणारी आपली 30 युवा संवादकांची टीम आहे. गेली दोन वर्षे नावासारखंच मोठ्ठं 34 दिवसांचं ‘युवा संकल्प अभियान’ आपण राज्यभर राबवतोय. दोन्ही वर्षी 5000 पेक्षा जास्त युवकांपर्यंत हा विचार घेऊन जातोय. 27 जिल्ह्यांत युवा आणि पालकांसाठी 200 च्या आसपास संवादशाळा घेतल्या आहेत आणि आता तर कोरोना लॉकडाऊनमध्ये पण ‘ऑनलाईन’ ‘संवादशाळा’ सुरूच आहेत.
डॉक्टर, हे तुम्हाला सांगताना इतकं भारी वाटतंय ना! तुम्ही असतात तर आता किती कौतुक केलं असतं! आणि किती काय-काय सुचवलं असतं! या सगळ्या युवा टीममध्ये जीव ओतला असतात, असं प्रत्येक वेळी वाटत राहतं.
पण यावर आम्ही एक मार्ग पण काढलाय. प्रत्येक ‘संवादशाळे’च्या आधी आम्ही तुमचा तो युवा संकल्प परिषदेनंतर ‘साधना’ कार्यालयात दिलेला छोटा ‘बाईट’ दाखवतो. त्या ‘बाईट’मधलं तुमचं प्रत्येक वाक्य हे आज उपक्रमाची पंचसूत्री आहे आणि ही अक्षरशः आम्ही उपस्थित सगळ्यांकडून वदवून घेतो. त्या वेळी तुम्ही आमच्या सोबतच आहात हा ‘फील’ असतो आम्हाला. खूप आत्मविश्वास वाढवणारं असतं ते ‘फीलिंग!’
या पंचसूत्रीतल्या प्रत्येक सूत्राला धरून आपल्या ‘संवादशाळे’तून मिळणार्या विचारांची आखणी आहे. पहिलं सूत्र- ‘प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेणं.’ आता तर या सूत्रावर आपल्या स्वतंत्र कार्यशाळा होतात आणि त्यालाही भरभरून प्रतिसाद मिळतो. आपलं शेवटचं सूत्र आहे ना त्यावर आज मला जरा बोलायचं आहे डॉक्टर.
‘आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहाची शक्यता आजमावून पाहणे,’ असं शेवटचं सूत्र आहे आपलं. आता या सूत्राचा आम्ही पुढच्या टप्प्यावर आंतरजातीय, आंतरधर्मीयच्या पलिकडे जाऊन जात आणि ‘धर्मविरहित’ विवाहाची शक्यता आजमावून पाहणे, हा विचार पुढं नेतोय. आंतरजातीय म्हटलं म्हणजे आपल्याला आपल्या जाती मान्य आहेत आणि दोन भिन्न जातीतील विवाह असा त्याचा अर्थ होतो. आधीच्या पिढीतील आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांच्या मुलांचीही आंतरजातीय लग्नं होत असतील तर जातनिर्मूलन तर नाहीच झालं ना! आता त्या पुढं जाऊन जाती विचारात न घेता आपल्याला अनुरूप, पूरक व्यक्ती जोडीदार म्हणून विचारपूर्वक निवडावी आणि परिचयोत्तर विवाहाची शक्यता पाहावी, असं आपण रुजवू पाहतोय. जोडीदाराची विवेकी निवड करताना यापुढच्या काळात ‘आंतरमानवीय विवाह’ व्हावेत, असं स्वप्नं आहे आपलं!
काही चुकत असेल तर नक्की सांगा, हं डॉक्टर.
या दिशेनं या उपक्रमाला नेताना जाणीवपूर्वक व्यावहारिक पातळीवर करता येतील, असे काही पर्याय पण आपण सुचवत आहोत. ‘संवादशाळां’च्या माध्यमातून पालक आणि युवकांपर्यंत हा विचार झेपेल, सोसेल तसा संवादी पद्धतीने पोचवत आहोत. खरं तर जातिभेद निर्मूलनासाठी आंतरजातीय विवाह, असं म्हटलं जायचं; पण आता इथून पुढं जातिभेद निर्मूलनासाठी ‘जोडीदाराची विवेकी निवड’ हेच पहिलं पाऊल आहे, असं आम्हाला वाटतंय. जोडीदाराची विवेकी निवड आंतरमानवीय विवाहासाठी, नात्यातील सुरेल संवादासाठी व्हायची, तर माणसावर जन्माने लादलेल्या जातीचा विचार दुय्यम ठरायला हवा.
डॉक्टर, तुम्हाला माहितेय ना सध्याच्या परिस्थितीत आताच्या पिढीला जातीच्या मुद्द्यावर अधिक संघर्षाला तोंड द्यावं लागतंय. जातीच्या खोट्या प्रतिष्ठेपायी पालकांकडूनच मुलांचे, त्यांनी निवडलेल्या जोडीदाराचे होणारे खून प्रचंड अस्वस्थ करणारे आहेत. याला ‘ऑनर किलिंग’ म्हटलं की खूप संताप होतो. या पार्श्वभूमीवर आपण आपल्या कार्यशाळेतून हे समाजासाठी भूषणाची नाही, तर शरमेची बाब आहे आणि याने ‘डिसऑनर’ होतं समाजाचं, हे बिंबवत आहोत. या वातावरणात जातीच्या बेड्या तोडून जोडीदाराच्या निवडीचा विवेकाने निर्णय घेऊ पाहणार्या तरुणांच्या पाठीमागं खूप मोठं बळ उभं करण्याची गरज आहे आज! तरच ‘आंतरमानवीय विवाह’ ही संकल्पना भविष्यात रुजवू शकू आपण.
‘जोविनि’च्या माध्यमातून – (‘जोविनि’ हा शॉर्ट फॉर्म पण आपोआपच झालाय, चटकन उच्चारलं जातं म्हणून) आपण लग्नाळू मुला-मुलींसाठी ‘व्हॉट्सअॅप’वर जे ‘ऑनलाईन’ ट्रेनिंग देतोय, त्यात स्वतःची पुरेशी ओळख होईल, असा बायोडेटा आपण तयार करून घेतो. यात कुठंही कोणालाही जात, धर्म विचारला जात नाही की, कोणी सांगतही नाही. जोडीदार निवडीच्या विवेकात सगळ्या मुद्द्यांचा विचार करता कुठंही जातीवाचून अडतंय, असं घडत नाही. हा मुद्दा रोजच्या सहजीवनासाठी, यशस्वी नात्यासाठी किती महत्त्वाचा आहे, याचं आत्मपरीक्षण स्वतः युवकांनी करावं, हा ही प्रक्रिया घडवण्यासाठी आपला प्रयत्न असतो. तरुणांनी याचवेळी पालकांशी संवाद साधत राहावं, हाही प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातोय.
आपली ‘ती’ पत्रिका आठवते ना डॉक्टर…? 12 गुणांची ही पत्रिका महाराष्ट्रभर आता चांगलीच पसरतेय. त्यात सुद्धा आपण काही कालसुसंगत बदल केले आहेत बरं का! आपले संवादक रोजच्या उदाहरणांतून खूप चांगल्या प्रकारे पालकांनाही हे मुद्दे व्यवस्थित पटवून देतात. पालकांच्या चेहर्यावर जे समाधान दिसतं, त्यातून सकारात्मक वातावरण प्रत्येक ‘संवादशाळे’त तयार होतं. एक वेगळा संवादाचा पूल आपण पालक आणि तरुण यांच्यात बांधून देतो, असं मला वाटतं. मागे ना एका पालकांचा फोन आला होता, ‘सगळं पटतं; पण जातीचा दबाव असतो. त्यातून बाहेर लगेच पडता येत नाही. त्यातून मुलांवर अन्याय होतो,’ ही त्यांनी मांडलेली व्यथा पुरेशी बोलकी होती. हा बदल अगदी सावकाशीने होणारेय, याची पूर्ण कल्पना आहेच; पण सुरुवात तरी होतेय, हेही समाधानकारक आहे.
आता व्यावहारिक पातळीवर व्यक्तिगत झालेले काही बदल ऐका हं डॉक्टर, तुम्हालाही नक्की आनंद वाटेल.
आपल्या उपक्रमाला साद देत काही तरुण आवर्जून परिचयोत्तर विवाहासाठी पुढाकार घेताना दिसतात. कुटुंबासोबत सातत्याने संवाद साधत त्यांचा सहभाग असेल, असं पाहत आहेत. जात, धर्म अजिबात विचारात न घेता जोडीदाराची निवड करू पाहतात आणि काहींनी तशी निवड करूनही दाखवली आहे, हे विशेष आहे. काहींनी लग्नानंतर जोडीदाराच्या नावात बदल केला नाहीय की जात-धर्म बदलाचे आग्रह धरले नाहीयेत. मुली आता स्वतःची ओळख पुसत नाहीयेत, तर आत्मविश्वासाने अस्मिता जपत आहेत. यापुढच्या टप्प्यावर आपल्या काही कार्यकर्त्यांनी आपल्या मुलांना जात-धर्म लावलाच नाहीय, अगदी शासकीय कागदावर सुद्धा! जात-धर्मविरहित मुलांचे जन्मप्रमाणपत्र शासकीय मान्यता दाखवतात ना! त्याही पुढे या मुलांची नावं आडनावविरहित आहेत. मुंबईचा आपला कार्यकर्ता मंगेश, रश्मी यांची मुक्ता आणि कुणाल-तेजलची सोयरा ही तर प्रातिनिधिक उदाहरणे आहेत.
हा प्रवास काही सोपा नाहीय ना डॉक्टर! टेबलापलिकडे बसलेल्या अधिकार्यांच्या मर्यादांसोबत संवाद साधत अधिकृत मान्यता मिळवणं तसं सहज नव्हतंच. आपण ‘संवाद शाळे’तून सांगतो ते वास्तवात येणं शक्य नाही, ऐकायलाच बरं वाटतं, हा समज दूर करत हे तरुण जी धडपड करतात, ती जातनिर्मूलनाच्या लढ्यातील खूप आश्वासक पाऊलं वाटतात मला. केवळ भाषण करून, व्याख्यान देऊन नाही तर आपला लढा स्वतःपासून सुरू करत ही तरुण पिढी इतरांसाठी सुद्धा मोठं बळ उभं करत आहेत, याचा आनंद वाटतो. हे लोण पसरत जाणारेय डॉक्टर…
आपण जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमाच्या माध्यमातून थेट कुटुंबात विधायक हस्तक्षेप करतोय. महाराष्ट्रभरची तरुणाई आपल्याला जोडली जातेय. हा विषय त्यांना फार जिव्हाळ्याचा वाटतोय आणि आपली सोबत त्यांना आधार देणारी वाटतेय. हे फक्त तरुणांपुरतं नाही तर घरातल्या ज्येष्ठांना सुद्धा हा संवाद गरजेचा वाटतोय, हे यश आहे ना!
या सगळ्यात तुम्ही सोबत आहात, असा ‘फील’ कायम असतो हा डॉक्टर. तुम्हाला आमचं कौतुक वाटतं हे जाणवतं. आम्हाला खूप लांबचा पल्ला गाठण्यासाठी प्रवास करायचा आहे, तुमच्या सोबतीनं यात आधार वाटतो, उत्साह टिकून राहतो. असेच सोबत राहा हं डॉक्टर.
लव्ह यू आणि मिस यू डॉक्टर.”