नरेंद्र लांजेवार -
बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा या गावात लक्ष्मण तायडे यांच्या घरात गेल्या तीन महिन्यापासून आपोआप आग लागण्याचे छोटेमोठे प्रकार सातत्याने घडत होते, त्यामुळे गावात भीतीचे वातावरण व उलटसुलट चर्चाला उधाण आले होते. या आग लागण्याच्या पाठीमागील कारण शोधण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुलढाण्याची टीम काल चांदुरबिस्वा या गावी प्रत्यक्ष जाऊन आली. आग लागण्यामागील कारणांचा शोध घेत, हा कोणत्याही भानामतीचा प्रकार नसून सदर कुटुंबाला त्रास देण्याच्या मानसिकतेतून काही व्यक्ती हा खोडसाळपणा करीत आहे, हे कुटुंबातील व्यक्तीला समजावून सांगितले. कुटुंबातील लोकांच्या मनातील जादूटोणा, करणी, भानामती या बाबतची भीती दूर करण्यात आली. पुन्हा असा प्रकार घडल्यास संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याचे काम अंनिसच्या वतीने करण्यात येणार आहे. या प्रकाराने भयभीत झालेल्या तायडे कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे समुपदेशन करून या पुढे त्यांनी घरात काय दक्षता घ्यावी याचेसुद्धा मार्गदर्शन त्यांना करण्यात आले. या कामात अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे सहसंपादक नरेंद्र लांजेवार, महाराष्ट्र अंनिस बुलढाणा पदाधिकारी प्रा. डॉ संतोष आंबेकर, शहिणा पठाण, प्रदीप हिवाळे, दिपक फाळके इ.चे विशेष सहकार्य लाभले.
– नरेंद्र लांजेवार, बुलढाणा