‘वाटा-पळवाटा’मधील भूमिकेने मला आंबेडकरी विचारांकडे वळविले

डॉ. शरद भुताडिया - 9923323829

व्यवसायाने डॉक्टर असलेले शरद भुताडिया हे मराठी रंगभूमी आणि मराठी, हिंदी चित्रपटातील नावाजलेले अभिनेते आहेत. कोल्हापुरातील ‘प्रत्यय’ या हौशी नाट्य संस्थेतर्फे ते 1982 पासून भूमिका, दिग्दर्शन करीत आहेत. त्यांनी साकारलेल्या ‘किंग लिअर’, ‘जोतिबा फुले’; तसेच ‘आईनस्टाईन’ यांच्या भूमिका खूपच गाजल्या. एका राजकीय कैद्याचा मृत्यू (दारिया फो), घोडा (जुलियस हो), राशोमान (अकिरा कुरोसोवा), दुशिंगराव आणि त्याचा माणूस (ब्रेख्त), कोपनहेगन (मायकेल फ्रायन) अशी विदेशी नाटककारांची; तसेच दत्ता भगत, गो. पु. देशपांडे, विंदा करंदीकर, रुद्र प्रसाद आणि लक्ष्मीनारायण लाल अशा भारतीय व मराठी नाटककारांची नाटके त्यांनी दिग्दर्शित व अभिनित केली. त्याचबरोबर ‘राहिले दूर घर माझे’, ‘ज्याचा-त्याचा प्रश्न’ या व्यावसायिक नाटकांतही त्यांच्या भूमिका होत्या. त्यांनी ‘मुक्ता’, ‘दृश्यम’, ‘कदाचित’, ‘ओवाळणी’ अशा 27 हिंदी, मराठी चित्रपटांतून अभिनय केला आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कोल्हापूर शाखेचे ते अध्यक्ष होते.

आंबेडकरी विचारांची ओळख खरं तर आम्ही ‘प्रत्यय’तर्फे केलेल्या दत्ता भगत लिखित ‘वाटा-पळवाटा’ या नाटकामुळे झाली. आम्ही ते राज्य नाट्य स्पर्धेमध्ये 1990 मध्ये सादर केले होते. त्या आधी आंबेडकरांच्या वैचारिक भूमिकेचा माझा परिचय नव्हता; तो केवळ आरक्षणापुरता मर्यादित होता. शैक्षणिक आरक्षणाची सवलत कशी मिळते, किती टक्के कोणत्या दलितांना असते. यासंदर्भातच. कॉलेजमध्ये प्रवेशअर्ज भरताना या दलितांचे नेते आणि त्यांना आरक्षण मिळवून देणारे थोर पुरुष म्हणजे आंबेडकर एवढेच माहीत होते. सुरुवातीला हे दलित आरक्षण, ज्यांना मिळते त्यांचा मला हेवा वाटत असे; पण जेव्हा माझे स्वत:चे आरक्षण इतर मागासवर्गीय या वर्गात झाले आणि मला मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला, तेव्हा मला खूप आनंद झाला आणि त्यातूनच मागासवर्गीयांविषयी वाटणारा हेवा नाहीसा झाला, ते मला जवळचे वाटू लागले. पुढे कॉलेजमध्ये हॉस्टेलवर राहणार्‍या माझ्या दलित, गरीब मित्रांची आर्थिक परिस्थिती जवळून पाहिल्यावर त्यांच्याबद्दल आपुलकी/सहानुभूती वाटू लागली. त्यातील काही मुलांना तर बाथरूममधील कमोड आणि बेसीन यातील फरकही माहीत नव्हता. हे बघून त्यांचे आतापर्यंतचे आयुष्य छोट्या गावातील मागासलेल्या वातावरणात झाल्याचे ध्यानात आले, वाईट वाटले.

माझे वैद्यकीय शिक्षण संपवून मी कोल्हापूर मुक्कामी परत आलो आणि माझा संबंध ‘प्रत्यय’ या पुरोगामी विचारांच्या नाट्यसंस्थेशी आला आणि मी त्यांच्या नाटकांचे दिग्दर्शन आणि त्यातून प्रमुख भूमिकाही करू लागलो. गो. पुं.चे ‘उद्ध्वस्त धर्मशाळा’, दारिओ फोचे ‘एका राजकीय कैद्याचा अपघाती मृत्यू’ अशी काही नाटके बसविल्यानंतर दत्ता भगत यांचे ‘वाटा- पळवाटा’ बसवायचे ठरले. या नाटकाचे लेखक दत्ता भगत स्वत: दलित असून त्यांचे दलित चळवळीचे आणि आंबेडकरी विचारांचे भान निर्विवाद होते. नाटकात त्यांनी दलितांच्या तीन पिढ्यांचे दर्शन, विचारप्रणाली आणि उच्चवर्णीय; तसेच परस्परांशी असलेले संघर्ष दाखवले आहेत. पहिल्या पिढीचे प्रतिनिधी ‘काका’ हे ब्रिटीश राजवटीतील अशिक्षित, एखाद्या प्रश्नाची सखोल चर्चा करावी एवढी उसंत नसलेले आणि तेवढा बौद्धिक आवाकाही नसणारे; पण प्रामाणिक आणि निष्ठावान कार्यकर्ते.

दुसरी पिढी सुशिक्षित सतीशसारख्या प्राध्यापकाची नोकरी असल्याने थोडे आर्थिक स्थैर्य लाभलेली आणि स्वातंत्र्य मिळाल्याने लोकशाही जीवनपद्धतीचे आश्वासन मिळालेली. ध्येयवादी आंबेडकरी विचारप्रणालीचा अभ्यास केल्याने कोणत्याही प्रश्नाचा विचार गंभीरपणे करणारी. तिसरी पिढी स्वातंत्र्योत्तर काळातील तरुण, विद्रोही, आक्रमक अर्जुनसारख्या कार्यकर्त्याची. परिवर्तनाची गती आणि अपेक्षा यातील व्यस्त प्रमाणामुळे संतापलेली. धाडसी; पण लोकशाहीवरचा विश्वास गमावून बसलेली. यात प्रा. सतीशची पत्नी हेमा ब्राह्मण कुटुंबातील दाखवलेल्या या नाटकाला एक चौथे परिमाण आले आहे. वयस्क काका, जे आपल्या सुनेला ‘बामन’ म्हणतात आणि ‘जात नाही ती जात’ असंही सांगतात. प्रा. सतीश बुद्धिवादी असल्याने अर्जुन आणि काकांना आंबेडकर नेहमी काय म्हणत असते, ते सांगतो – “माझ्या रथाला तुम्ही पुढे नेलं नाही तरी चालेल; पण निदान मागे तरी नेऊ नका.” आंबेडकरांनी लिहिलेल्या घटनेचा त्याला अभिमान आहे, श्रद्धा आहे. त्यामुळे सतीश विरुद्ध काका आणि अर्जुन असा संघर्ष निर्माण होतो आणि या सर्वांमध्ये हेमा सगळ्यांना सांभाळून घ्यायचा प्रयत्न करीत राहते. पण कधी-कधी तिचाही संयम सुटतो आणि ‘महार’ म्हटलं तर ती शिवी ठरते आणि ‘बामन’ म्हटलं, तर तो काय आमचा गौरव होतो, असा एक महत्त्वाचा प्रश्न ती लोकांसमोर ठेवते.

जेव्हा भूमिकेसाठी निवड करायची वेळ आली, तेव्हा साहजिकच मी काकांची भूमिका करावी का, याचा विचार करीत असताना प्रा. सतीश हा या नाटकाची खरी वैचारिक भूमिका सांगणारा माणूस आहे, अशी एक मांडणी चर्चेतून पुढे आली, त्याविषयी सर्वांचे एकमत झाले आणि शेवटी मी ती भूमिका करण्याचे ठरले. नाटक बसवताना दलितांची सामाजिक परिस्थिती, त्यांची विद्रोही चळवळ आणि सतीशची वैचारिक भाग, स्वत:शी आणि पर्यायानं सर्व दलित समाजाशी असलेली बांधिलकी, त्यांच्या उद्धाराची तळमळ, स्वत:च्या पत्नीशी असणारे प्रेम आणि आपुलकीचे संबंध याची माझी समज हळूहळू घडत गेली. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता आपले विचार आणि भूमिका लावून धरणे कसे महत्त्वाचे असते, हे समजू लागले. विचारांना कृतीची जोड नसेल, तर ती नुसतीच चर्चा होते, हे त्याला कुठंतरी बोचतंय; पण शेवटी तो ही चळवळ पुढे नेण्यासाठी तयार होतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे, असं वाटण्याइतपत ही व्यक्तिरेखा आणि सबंध नाटक न्यावं लागतं आणि ती जबाबदारी मला पार पाडायची होती. त्यामध्ये मी किती यशस्वी झालो ठाऊक नाही. आम्ही या नाटकाचे मोजकेच प्रयोग केले; पण त्यातून आंबेडकरी विचारांची एक बर्‍यापैकी समज मला मिळाली, असे वाटते. प्रा. सतीश मी करण्यामागची भूमिका काही प्रमाणात सार्थकी लागली असावी, हीच एक आशा आहे.

संपर्क – 9923323829


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]