लॉकडाऊनच्या काळात अंनिसच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचा धडाका

सुनील स्वामी - 9881590050

आपली संघटना या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे. यासाठी अजूनही वेगवेगळे प्रयोग होत राहिले पाहिजेत. विविध शाखांचे युवक आणि कार्यकर्ते असे प्रयोग करत आहेत, आपण त्यांच्याबरोबर राहूया, संघटनेला नवतंत्रयुगात गतिमान करूया.

कोरोनाचा भारतात प्रवेश झाला आणि ’जनता कर्फ्यू’पाठोपाठ लॉकडाऊन सुरू झाले. हा लॉकडाऊनचा काळ किती लांबणार, याचा अंदाज नव्हता. पण हे दीर्घकाळ चालणार, असे दिसू लागले. लोक घरात स्थानबद्ध झाले. एकत्र येणं, कार्यक्रम, समारंभ सगळेच बंद झाले, सगळे शांत-शांत झाले. पण काहीही झाले तरी हताश होऊन शांत घरी बसेल तो कार्यकर्ता कसला? नेहमीप्रमाणे या कोरोनाच्या संकटातही अंनिसचा कार्यकर्ता लोकांच्या मदतीला धावून जाताना आपण अनेक ठिकाणी पाहिले. एका बाजूला हे मदतकार्य मोठ्या प्रमाणात चालू असताना चळवळीचे कामही कसे चालू ठेवता येईल, या विचारात अनेक कार्यकर्तेहोते. अशा वेळी अंनिसच्या पनवेल शाखेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम जाहीर केला. ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर घेण्याची घोषणा केली. या शिबिरामध्ये रोज दोन तास याप्रमाणे सलग सात दिवस वेगवेगळे सात विषय मांडण्यात आले. यामध्ये दररोजच्या सत्राची सुरुवात नेहमीच्या कार्यक्रमांप्रमाणे गाण्याने व्हायची. प्रास्ताविक व्हायचे, वक्त्यांचा परिचय व्हायचा. वक्त्यांची मांडणी झाल्यानंतर प्रश्नोत्तरे व्हायची, प्रशिक्षणासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व्हायचे. लोक प्रतिक्रिया द्यायचे. आभार प्रदर्शन होऊन सत्र संपायचे. हे प्रशिक्षण पनवेल शाखेने आयोजित केले असले, तरीही केवळ पनवेल किंवा रायगड जिल्ह्यापुरते ते मर्यादित राहील नाही. या सत्राची लिंक ज्याला जिथे मिळेल, तेथून तो जॉईन होतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या जवळपास 22 जिल्ह्यांतून, काही परराज्यांतून तर एक प्रशिक्षणार्थी अमेरिकेतूनही सहभागी झाला. संयोजकांनी, सहभागींनी हे शिबीर प्रचंड एन्जॉय केले, खूप मजा आली.

हे शिबीर इतके यशस्वी झाले की, त्याची प्रेरणा घेऊन विविध ठिकाणी अशा प्रशिक्षणांचा धडकाच सुरू झाला. पनवेलच्या शिबिरापाठोपाठ पुणे जिल्ह्याने असेच सात दिवसांचे आयोजन केले,तेही जाम यशस्वी झाले. त्यानंतर ठाणे जिल्ह्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांसाठी सात दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले, तेही खूप छान यशस्वी झाले. नंतर सोलापूर जिल्ह्याचे सात दिवसांचे शिबीर अत्यंत सुंदर झाले. लागलीच धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे सात दिवसांचे शिबीर संपन्न झाले. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनमधील महत्त्वाचे अँप कसे वापरायचे, याचे चार दिवसांचे शिबीर घेतले. नेहमी हातात असलेल्या फोनची वेगळी ओळख आणि त्या सहाय्याने नवनिर्मितीचा अनुभव अनोखा होता. या नव्या माध्यमामुळे आपले काम किती सोपे होते, ते असंख्य लोकांपर्यंत कसे पोचवता येते, हे कार्यकर्त्यांना शिकायला मिळाले. या प्रशिक्षणाची सर्वच कार्यकर्त्यांना गरज आहे, अशा प्रतिक्रिया आल्या. डोंबिवली शाखेनेही असाच एक अनोखा प्रयोग केला – आपल्या शाखेच्या कार्यकर्त्यांना वक्ता म्हणून घडवण्याची कार्यशाळा त्यांनी ऑनलाईन घेतली. तीही सात दिवस चालली. त्यामध्ये तेथील स्थानिक नवोदितांनी विविध विषय मांडले आणि त्यांना प्रेरणाा; तसेच महत्त्वाच्या सूचनाही मिळाल्या.

या सर्व शिबिरांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, अंनिसची पंचसूत्री व व्यापक वैचारिक भूमिका, फलज्योतिष : समज आणि वास्तव, मन, मनाचे आजार, सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा, जादूटोणाविरोधी कायदा, स्त्रिया आणि अंधश्रद्धा, संविधान आणि आपण, जोडीदाराची विवेकी निवड का, कशी आणि सहजीवन, पुरुषभान, अंधश्रद्धा निर्मूलन का आणि कसे? इत्यादी विषयांवर व्यापक मांडणी आणि प्रश्नोत्तरे, चर्चा झाली.

दरम्यान, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ (जोविनि) विभागाच्या वतीने रोज तीन तास याप्रमाणे चार दिवसांच्या दोन संवादशाळा नेहमीप्रमाणे अत्यंत उत्साहात, तरुणांच्या प्रचंड प्रतिसादाने संपन्न झाल्या. हे सुरू असतानाच ’जोविनि’ विभागाने ढजढ अर्थात प्रशिक्षकांचे प्रशिक्षणसुद्धा घेतले. यामधून त्यांनी या विषयांसाठीच्या तीन-तीन संवादकांचे चार ते पाच गट तयार केले. त्यांना केवळ विषय देऊन, तो असा मांडायचा, एवढे सांगून ते थांबले नाहीत, तर या TOT मध्ये सहभागी, संवादक होऊ इच्छिणार्‍या सर्व 14 लोकांची त्यांच्या विषयाची प्रत्यक्ष मांडणी त्यांनी ऐकली, चांगल्या गोष्टींचे कौतुक केले आणि महत्त्वाच्या सूचना; तसेच सुधारणाही सांगितल्या. हे TOT आणि ते संपले की, संवादशाळा. यासाठी या विभागाचे सहा लोक रोज जवळपास सात तास ऑनलाईन कार्यरत होते. हे खूपच कौतुकास्पद आहे.

याशिवाय, सध्या वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचे सहा दिवसांचे शिबीर सुरू आहे. त्यांनी दोनच दिवसांत 130 सहभागींची नोंदणी पूर्ण केली. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचेही शिबीर सुरू आहे. तेही पाच दिवसांचे आहे आणि छान नोंदणी झाली आहे. असेच सहा दिवसांचे शिबीर कोल्हापूर जिल्ह्याचे सुरू आहे. नाशिक जिल्ह्याचे पाच दिवसांचे शिबीर सुरू आहे. औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याचे सहा दिवसांचे शिबीर सुरू झाले आहे.

धुळे- नंदुरबार जिल्ह्याचे युवा विभागाचे पाच दिवसांचे युवकांशी संबंधित विषयांचे शिबीर अत्यंत यशस्वीपणे पार पडले.

या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराची वैशिष्ट्ये

शिबिरातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट अशी की, अशा प्रकारच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना घर किंवा नोकरी- व्यवसायातून स्वतंत्र वेळ काढून, रजा काढून उपस्थित राहण्याची आवश्यकता राहत नाही. जेथे असेल तिथून शिबिरात सहभागी होता येते. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो. दुसरे म्हणजे, प्रशिक्षणार्थींना राहत्या गावापासून प्रशिक्षणाच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्याचा प्रवास व त्यासाठीचा खर्च करण्याची आवश्यकता नाही. तिसरे, संयोजकांना चहापान, जेवण, प्रशिक्षणासाठीचा हॉल, साऊंड सिस्टिम, निवासाची व्यवस्था याच्या नियोजनाचा कोणत्याही प्रकारचा ताण नाही. त्यामुळे यासाठीचा संयोजकांचा खर्च शून्य रुपये होतो; शिवाय संपूर्ण नियोजनासाठीचे शरीरश्रम पूर्णपणे वाचतात. येथे एक नमूद केले पाहिजे, ते असे की, खर्चाच्या पातळीवर आपण किमान सहा- सात लाख रुपये वाचवले आहेत. सात विषयांची मांडणी होईल, यासाठी आपण दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करत होतो. त्यासाठी चहा, नाश्ता, जेवण असा शंभर लोकांसाठी किमान चाळीस हजार रुपये, हॉलभाडे, साऊंड, निवास व्यवस्था इत्यादींसाठी किमान पाच-दहा हजार आणि वक्त्याच्या येण्या-जाण्यासाठी पाच-दहा हजार, असा पन्नास ते साठ हजार रुपयांचा खर्च येतो; शिवाय उपस्थितांचा प्रवासखर्च, जो तसा मोठा असतो, याचा विचार केला जात नव्हता. याप्रकारे हिशोब केल्यास आता आपण वरील सर्व प्रशिक्षणासाठी सहा ते सात लाख रुपयांची मोठी बचत केली आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय वेळेची, श्रमाची बचत ही वेगळीच.

अशा ऑनलाईन प्रशिक्षणाचे चौथे आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हवा तो वक्ता मिळण्याची शक्यता कमी. एरव्ही कामात, व्यवसायात व्यस्त असणारा, दूर अंतरावर राहणारा एखाद्या विषयावरचा नामवंत वक्ता या प्रशिक्षणांना सहज उपलब्ध होतो. कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून तास-दोन तासांचा वेळ तो आनंदाने देतो. तासभराच्या व्याख्यानासाठी प्रत्यक्ष एखाद्या गावात जाण्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि श्रम वाचतात.

या शिबिरांचे पाचवे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे एरव्हीच्या प्रशिक्षणात महिलांची उपस्थिती खूप कमी असते. मात्र या ऑनलाईन शिबिरांमध्ये महिला घरातील जबाबदारी सांभाळत मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात.

सहावी बाब, प्रशिक्षणाला नोंदणी केलेल्या व्यक्तीसोबत तिच्या घरचे इतर लोकही सहभागी होताना दिसतात. त्यामुळे नोंदणी झालेल्या संख्येपेक्षा प्रत्यक्ष ऐकणार्‍यांची संख्या दुप्पट-तिप्पट असते.

सर्वांत महत्त्वाची आणि सातवी गोष्ट म्हणजे युवकांची विशेष उपस्थिती. या सर्व शिबिरांच्यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक सहभाग तरुणांचा दिसून आला, ही खूप आनंदाची आणि आश्वासक बाब आहे.

आठवी गोष्ट अशी की, या सर्व शिबिरांचे, कार्यक्रमांचे नियोजन आणि संचालन युवावर्ग करताना दिसला. तरुणांच्या बदललेल्या माध्यमाचा चळवळीसाठी वापर किती महत्त्वाचा आहे, हे दिसून आले.

नववी बाब अशी की, या ऑनलाईन शिबिरांमध्ये व्याख्यानानंतर प्रश्न विचारणार्‍यांची संख्याही अधिक जाणवते. नेहमीच्या प्रशिक्षणात प्रश्न विचारण्यात असणारा संकोच इथे कमी झालेला दिसतो.

दहावी गोष्ट म्हणजे, प्रशिक्षणातील झालेल्या प्रत्येक सत्राबद्दल प्रतिक्रिया, ‘फीडबॅक’ही ज्या-त्या वेळी दिला जातो. वक्त्याचे मूल्यमापन होते, ते त्याला उपयोगी ठरते.

अकरावी महत्त्वाची बाब म्हणजे, व्यापकता. दोन प्रकारची व्यापकता दिसून येत आहे – पहिली अशी की, इतर काही संघटनांनी आयोजन केल्याप्रमाणे केवळ एखाद्या विषयाची माहिती देण्यापुरते हे मर्यादित राहिले नाही, तर ते विविध विषयांच्या प्रशिक्षणाच्या पातळीवर आपणहून गेले आणि दुसरी व्यापकता अशी की, याचे संयोजन केवळ राज्य पातळीवर होत नाही, तर जिल्हे आणि शाखा पातळीवर हे आयोजन होत आहे. आयोजनामध्ये व्यापक सहभाग, विषयांची विविधता दिसून येत आहे.

बारावी महत्त्वाची आणि संघटनेच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे या सर्व प्रशिक्षणांतील सर्व म्हणजे जवळपास 80 सत्रांची विषयमांडणी आपले अंनिसचे कार्यकर्तेवक्तेच करत आहेत. केवळ दोन सत्रांसाठी आपण अंनिसचे थेट क्रियाशील कार्यकर्तेनसणारे वक्ते घेतले, हे आपले मोठे यश आहे.

काही मर्यादा..

अशा प्रशिक्षणाच्या काही मर्यादा आहेत. एक म्हणजे, श्रोत्यांस किंवा वक्त्यास ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’ व्यवस्थित नसेल तर मांडणीमध्ये, ऐकण्यामध्ये अडचणी येतात. वक्त्यांची तशी काही अडचण निर्माण झाली तर कार्यक्रमच थांबतो. पण यासाठी पूर्वानुभवानुसार वक्ता जिथे आहे तिथे ‘नेट कनेक्टिव्हिटी’ टिकून राहील, याची काही पूर्वतयारी करता येते. दुसरे म्हणजे, वक्त्यास समोर श्रोत्यांचा समूह नसताना, चेहरे दिसत नसताना, हशा, टाळ्या अशा प्रतिक्रियेशिवाय आपली मांडणी करत राहावे लागते; प्रत्यक्ष वक्ता आणि श्रोता भेटण्याचा आनंद मिळत नाही. तिसरी मर्यादा म्हणजे या शिबिरांमध्ये प्रशिक्षणार्थींना परस्परांना ओळख करून घेता येत नाही, त्यांच्या संघटनासाठी किमान परिचयाची आवश्यकता असते, हे येथे घडत नाही. चौथी मर्यादा अशी की, अशी ऑनलाईन प्रशिक्षणे होण्यासाठी तंत्रस्नेही व्यक्तींची गरज असते, ज्या शाखांकडे असे लोक नाहीत, त्यांना अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात अडचणी येतात. पण हे तंत्र अत्यंत सोपे असून सर्वांन शिकणे शक्य आहे.

बदलत्या जगामध्ये ऑनलाईन शिबिरांचे फायदे, विशेषतः काही अपरिहार्य परिस्थिती असणारे फायदे हे अधिक आहेत. त्यामुळे अशी ऑनलाईन प्रशिक्षणे होणे, हे नियोजनासाठी अधिक सोपे-सुटसुटीत, वेळ, पैसा, श्रम या दृष्टीने अत्यंत कमी खर्चाचे, म्हणून ताणतणावरहित आहेत, हे लक्षात येते. कोरोनानंतरच्या काळातही ऑनलाईन प्रशिक्षणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, या माध्यमाचा अवलंब करत राहणे, वाढवणे खूप महत्त्वाचे आहे.

सध्या आपल्या विविध शाखा आणि जिल्ह्यांच्या बैठका ऑनलाईन होत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपले राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीही कार्यकारी समिती, राज्य कार्यकरिणी, युवा सहभाग वगैरे वेगवेगळे विभाग, समविचारी संघटना, इत्यादींशी ऑनलाईन संवाद साधला. याविषयी याच अंकात वेगळे लेखन केले आहे.

थोडक्यात, आपली संघटना या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे. यासाठी अजूनही वेगवेगळे प्रयोग होत राहिले पाहिजेत. विविध शाखांचे युवक आणि कार्यकर्ते असे प्रयोग करत आहेत, आपण त्यांच्याबरोबर राहूया, संघटनेला नवतंत्रयुगात गतिमान करूया.

सुनील स्वामी (राज्य कार्यवाह, मअंनिस, प्रशिक्षण विभाग)


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ]