सौरभ बागडे -
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात मा. कुलगुरुंच्या हस्ते
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकरांचे विचार सामान्यातील सामान्य लोकांपर्यंत पोहोचावेत या उद्देशाने डॉ. दाभोलकरांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘दाभोलकरांचे विचार घरोघरी’ या मालिकेतील १२ पुस्तिकांची निर्मिती केली. या पुस्तिकांचे लोकार्पण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात महाराष्ट्र अंनिस आणि विद्यापीठ संघर्ष कृती समितीच्या संयुक्त विद्यमाने १७ ऑगस्टरोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. सुरेश गोसावी यांच्याहस्ते साहित्यिक अच्युत गोडबोले, अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास आढाव, राहुल थोरात, डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीचा प्रतिनिधी राहुल ससाणे याने समारंभाचे प्रास्ताविक केलं. तो म्हणाला, “विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्यावतीने आम्ही विद्यापीठात विद्यार्थांच्या प्रश्नांवर काम करत असतो, आपल्या आजूबाजूला ज्या बर्यावाईट घटना घडत असतात त्यावर भाष्य देखील करत असतो. म्हणून एक वैचारिक कार्यक्रम विद्यापीठात व्हावा, पुरोगामी विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा या धारणेतून हा कार्यक्रम आयोजित केला आहे. आज राजकीय, सांस्कृतिक जीवनात ध्रुवीकरण चालू आहे, अशा वातावरणात वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये पेरणे आवश्यक आहे. तीच पेरणी या १२ पुस्तिकामधून होईल हाच या कार्यक्रमामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकानंतर मा. कुलगुरू सुरेश गोसावी, साहित्यिक अच्युत गोडबोले, महा. अंनिस ट्रस्टचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांचा सत्कार प. रा. आर्डे यांचे ‘फसवे विज्ञान’ हे पुस्तक देऊन करण्यात आला.
त्यानंतर विद्यार्थांसमोर डॉ. हमीद दाभोलकरांनी महाराष्ट्र अंनिसची भूमिका मांडली. हमीद दाभोलकर म्हणाले, “आज विद्यापीठाच्या प्रांगणामध्ये महा. अंनिसचा होणारा कदाचित पहिलाच कार्यक्रम असेल, अनेक वेळेस आम्ही खुश्कीच्या मार्गाने, गनिमी काव्याने इथे येऊन विचार पेरण्याचे काम करत असतो. विद्यापीठाचे कुलगुरू विज्ञाननिष्ठ विचारांसाठी अनुकूल आहेत हे आश्वासक चित्र आहे. खरंतर आमच्या कामामध्ये गनिमी काव्याने करण्यासारखे काहीच नाही. महा. अंनिस विज्ञानवाद रुजवण्याचे काम करते, ते राज्यघटनेमध्ये प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य सांगितलं आहे. पण इतिहासात असे कालखंड येतात की, स्वतःचे कर्तव्य पार पाडणं अवघड होऊन बसतं. दहा वर्षांपूर्वी २० ऑगस्टला याच पुण्यात डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा निर्घृण खून झाला. त्यानंतर कॉ. पानसरे, डॉ. कलबुर्गी, पत्रकार गौरी लंकेश यांचेदेखील खून झाले. या प्रकरणात तपास यंत्रणांनी असे नमुद केले आहे की, हा एक सुनियोजित कटाचा दहशतवादी हल्ला होता. दहशतवादी हल्ल्यात त्या व्यक्तीला जरी मारलं गेलं असलं तरी समाजात दहशत निर्माण व्हावी, अशी अपेक्षा असते. मात्र असं घडलेलं नाही. महाराष्ट्रातील अनेक सुजाण नागरिक, विचारवंत, विद्यार्थी, कार्यकर्ते, माध्यमांनी असं होऊ दिलं नाही. त्यामुळे मारेकर्यांनी दाभोलकरांचे शरीर नष्ट केलं असलं तरी विचार नष्ट होऊ शकलेला नाही.”
त्यानंतर कुलगुरू सुरेश गोसावी यांनी संवाद साधला, ते म्हणाले, “डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या पुस्तकांचे लोकार्पण समारंभ विद्यापीठात होत आहे याचा मला मनस्वी आनंद वाटतो. वाचनसंस्कृती हा शिक्षणाचा कणा आहे. पुस्तकातील शब्दांना करुणेची झाक आहे, सर्वे संतु निरामय ही विज्ञानाची हाक आहे. पुस्तक म्हणजे वसुधैव कुटुंबम, आयुष्य पथावर नवा कदम.” अंधश्रद्धा निर्मूलन ट्रस्टचे अध्यक्ष मा. प्रतापराव पवार म्हणाले, “माहिती आणि ज्ञानात फरक आहे. माहिती सर्वत्र मिळते. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ज्ञान देते. अंधश्रद्धा, रूढीप्रामाण्यात समाज गुरफटला गेला आहे, त्याला त्यातून बाहेर काढणं सोपं नाहीये. तुम्ही सामाजाला पुढे नेण्यात हातभार लावाल, असा विश्वास वाटतो.”
त्यानंतर अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. विलास आढाव म्हणाले, “मी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील गुन्हवरं गावचा आहे. त्या आमच्या गावामध्ये ५००-६०० वर्ष जुनं भैरवनाथाचे मंदिर आहे. त्या मंदिरात चैत्रात जत्रा भरायची, तिथे पूर्वाश्रमीचा महार समाजाचा १५-२० जणांचा जथ्था धावत येऊन, भैरवनाथाचे चांगभलं म्हणत एका मोठ्या दगडावर डोकं आपटून घ्यायचं. ही जी अनादी काळापासून चालत आलेली अंधश्रद्धा होती. ती प्रथा माझे वडील कालकथीत बी. पी. आढाव आणि नरेंद्र दाभोलकर यांनी १९७८ साली बंद केली. त्याचा मी एक साक्षीदार आहे. त्यामुळे या पुस्तिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लोकार्पण करताना मला विशेष आनंद होत आहे.”
साहित्यिक अच्युत गोडबोले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी भाषणाची सुरुवात गंमतीदार किस्सा सांगून केली. गोडबोले म्हणाले, “एक मनुष्य वैज्ञानिक दृष्टिकोन यावर पीएच.डी करत होता. तर त्याला कोणीतरी विचारलं तुझी पीएच.डी कधी पूर्ण होईल. तो म्हणाला, काय परमेश्वराची कृपा असेल तेव्हा मिळेल.” यावर विद्यार्थ्यांमध्ये हशा पिकला. “देव-धर्माच्या श्रद्धेला विरोध नाही, मात्र त्याचे जे व्यापारीकरण झालं आहे, दंगा-मारामार्या होत आहेत, शोषण होत आहे त्याला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा विरोध होता. त्यांनी अंनिसच्या देव-धर्माविषयीच्या भूमिकेत हे मांडलं आहे. ज्या धर्मांनी आपल्याला एकमेकांवर प्रेम करायला शिकवलं त्या संघटित धर्मांनी युद्धापेक्षा, अॅटोमीक बॉम्बपेक्षा एकमेकांचा द्वेष करून माणसं मारली. त्यामुळे मी आईनस्टाईनसारखं निसर्गाला देव मानतो, माणुसकीला धर्म मानतो. आपल्या संतानी सांगून ठेवलं आहे तुमच्या आणि देवाच्यामध्ये एजंट कशाला पाहिजे. दाभोलकरांनी देव या संकल्पनेचे सुंदर विवेचन केलं आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनाची पूर्वअट मुक्त ठेवणं आहे. तर्काच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासणं. जे टिकतं ते ठेवणं, जे टिकत नाही ते सोडून देणं. विवेकानंद हे विज्ञानवादी होतं. ते ज्योतिषाची चेष्टा करायचं. मात्र आपल्यासमोर ते भगवे कपडे घातलेले एका धर्माचे प्रचारक होते असं चित्र उभं केलं जातं. दत्तप्रसाद दाभोलकरांनी त्यावर पुस्तक लिहिलं आहे ते जरूर वाचा. या चार लोकांच्या हत्येच्या खुन्यांना शिक्षा होईल मात्र त्यांचं नसणं मला कायम जाणवतं राहील.” शेवटी अच्युत गोडबोले यांनी विद्यार्थांना डॉ. दाभोलकरांची यूट्यूबवरील भाषणे ऐकण्याची, पुस्तके वाचण्याचे आवाहन केलं.
इतिहास संशोधक विद्यार्थी सागर नाईक आभार मानताना म्हणाला, “ज्यांनी गॅलिलिओचा छळ केला, ज्यांनी तुकारामाची गाथा बुडवली, ज्यांनी सावित्रीबाईंवर दगड-धोंडे, शेण फेकलं, ज्यांनी गांधीजींना मारलं, त्याच प्रवृत्तींनी डॉ. दाभोलकरांचा खून केला; पण तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने आलात त्याअर्थी काही विचार चिरकाल टिकणारे असतात, याची साक्ष पटली आहे. तुकारामाचा विचार, गॅलिलिओचा विचार, दाभोलकरांचा विचार कालातीत आणि चिरकाल टिकणारा आहे.” कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्र अंनिस पुणे शाखेचा कार्यकर्ता सौरभ बागडे याने केले.
कार्यक्रमाला दोनशेहून अधिक तरुणांची उपस्थिती होती. पिंपरी-चिंचवड शाखेचे विश्वास पेंडसे (काका) यांनी पुस्तक विक्रीचा स्टॉल लावला होता. सुमारे ९० सेट्सची विक्री झाली. सोबत इतर पुस्तकांचीही विक्री झाली. कार्यक्रमाला तरुणांचा भरभरून प्रतिसाद लाभला. महाराष्ट्र अंनिसचे कार्यकर्ते श्रीपाल ललवाणी, दीपक गिरमे, अरविंद पाखले, राजीव देशपांडे, मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते.
– सौरभ बागडे, पुणे
संपर्क ७३५०७ ७३४२७