माध्यम साक्षरता आपल्याला ध्रुवीकरणापासून वाचवेल

-

तंत्रज्ञानाच्या गैरवापराच्या काळात नागरिकांची माध्यम साक्षरता आपल्याला ध्रुवीकरणापासून वाचवेल – माध्यम तज्ज्ञांचे मत

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील आव्हाने” या चर्चासत्रामध्ये झाले वैचारिक मंथन

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त २० ऑगस्ट २०२३ रोजी साने गुरुजी स्मारक, पुणे येथे “वैज्ञानिक दृष्टिकोनासमोरील सध्याची आव्हाने” या विषयावर चर्चासत्र झाले. यात पत्रकार प्रसन्न जोशी हे संवादक होते, तर अलका धुपकर (सहाय्यक संपादक, TOI Plus), प्रतीक सिन्हा (संपादक, अल्ट न्यूज), आशिष दीक्षित (वरिष्ठ वृत्त संपादक, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस) यांनी सक्रिय सहभाग घेतला. याच कार्यक्रमात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या तीन मराठी पुस्तकांच्या हिंदी आवृत्त्या या पत्रकारांच्या हस्ते प्रकाशित झाल्या. ‘सोचिए तो सही!’ (समता संगर) अनु.- निलेश झाल्टे आणि डॉ. धनंजय झाल्टे, ‘विचार से विवेक’ (विचार तर कराल) अनु. – डॉ. भाऊसाहेब नवले, ‘अंधश्रद्धा की गुत्थि’(अंधश्रद्धा विनाशाय) अनु.-विलास शेंडगे) ही हिंदीमध्ये झालेली अनुवादित पुस्तके आहेत. या अनुवाद प्रकल्पाचे प्रमुख संपादक हे डॉ. सुनीलकुमार लवटे तर समन्वय संपादक डॉ. चंदा सोनकर आणि सहायक संपादक डॉ. गिरीश कशीद हे आहेत. या अनुवाद प्रकल्पामध्ये आतापर्यंत डॉ. दाभोलकर यांची एकूण १७ पुस्तके अनुवादित केली गेली आहेत आणि ती सर्व राजकमल प्रकाशन, दिल्ली तर्फे निर्मित आहेत. या तीन पुस्तकांबरोबरच मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी लिहिलेल्या ‘तिमिरभेद- धांडोळा मुस्लम अंधश्रद्धांचा’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली. डॉ. चंदा सोनकर यांनी अनुवादकांच्या वतीने थोडक्यात मनोगत व्यक्त केले. त्या म्हणाल्या, “जेव्हा आम्ही हा अनुवाद करायचो, तेव्हा आम्ही किती महत्त्वाचे काम करत आहोत, याची नम्र जाणीव झाली. डॉ. दाभोलकर यांच्या सर्व हिंदी अनुवादित पुस्तकांना उत्तर भारतातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनासाठी डॉ. नरेंद्र दाभोलकर हुतात्मा झाले, त्यांना अभिवादन!”

अंनिस राज्य कार्यकारी समितीच्या सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी प्रास्तविक केले. त्या म्हणाल्या, “आज डॉक्टरांच्या खुनाला दहा वर्षे पूर्ण होत असतानाच गेल्या दहा वर्षांत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्यासाठी पत्रकारांसमोर कोणती आव्हाने आहेत हे पाहायला पाहिजे. दहा वर्षांच्या काळात पिढी बदलत असते, तंत्रज्ञान पुढे जात असते. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि पत्रकार यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. निर्भीडपणे सत्य शोधायचे आणि ते सगळ्यांसमोर मांडायचे. हे काम चळवळीचा कार्यकर्ता आणि पत्रकार दोघे जण करत असतात. गरज पडल्यास ते स्वत:ला पणाला लावतात. आम्ही या चर्चासत्रासाठी पत्रकारांची निवड केली याला एक समकालीन संदर्भ आहे. अंधश्रद्धा निर्मूलन ही एक चळवळ आहे. म्हणून प्रत्यक्षात रोजच्या आयुष्यात काय घडते आणि त्याचा आपल्या कामाशी काय संबंध आहे याविषयी बोलणे, हे जाणून घेणे कार्यकर्त्यांसाठी आवश्यक आहे. ज्यांनी डॉक्टरांचा खून करून माणूस मारून विचार मारता येतो हे सांगण्याचा प्रयत्न केला त्याला चळवळ म्हणून आपण सर्वांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. जसे तरुण माणसं प्रेमात पडणे कधीच थांबणार नाहीत त्याचप्रमाणे माणूस स्वतःची बुद्धी वापरून विचार करणे कधीच थांबवणार नाही. जेव्हा आम्ही तरुणांशी बोलतो, तेव्हा त्याचा प्रतिसाद नेहमीच उत्साहवर्धक असतो. त्यामुळे हे तरुणच चळवळींचे बळ वाढवतात. डॉक्टर म्हणायचे तसे या चळवळीच्या कामाचा हिशेब केवळ दशकांच्या नाही तर शतकांच्या भाषेत मोजला पाहिजे. आजपासून राज्यभरात जादूटोणाविरोधी कायद्याच्या प्रचारासाठी अंनिसची प्रबोधन जनसंवाद गाडी फिरणार आहे. कर्नाटकात हा कायदा होऊन सहा वर्षे झाली; पण महाराष्ट्रात ज्याप्रमाणे एक हजारच्या वर गुन्हे दाखल झाले, त्या प्रमाणात कर्नाटकमध्ये दाखल झाले नाहीत. याचा अर्थ असा आहे की, महाराष्ट्रात चळवळ चालू आहे; पण पोलिसांचे प्रशिक्षण पुरेसे झाले नाही. दक्षता अधिकारी अजून पुरेसे संवेदनशील झाले नाहीत. विशेष म्हणजे या कायद्याचे नियम अजून झाले नाहीत. हे नियम होऊन जोमाने या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. डॉक्टरांच्या खुनाचा खटला काही दिवसांनी संपेल; पण या कटातील सूत्रधार न सापडणे, हे वेदनादायक आणि धोकादायक आहे. सध्या मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी थांबवल्यावर सर्वोच्च न्यायालयात आपण गेलो आहोत. सूत्रधार पकडले जाणे हे पुढील हिंसक घटना होऊ नयेत, यासाठी आवश्यक आहे. डॉक्टरांच्या खटल्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सत्य शोधणे हे एकच मूल्य आहे. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अजिबात दगड उचलला नाही, हे पण विशेष. ही आमची जीवनधारणा आहे. डॉक्टर म्हणायचे की, मला या कामात मज्जा येते. या पत्रकारांना सुद्धा त्यांच्या कामात मज्जा येते. आपल्या सर्वांच्या अभिमानाची ही गोष्ट आहे.”

प्रसन्न जोशी यांनी चर्चेला सुरुवात करताना आजच्या पत्रकारितेसमोरची आव्हाने कोणती त्यावर मांडणी केली. ते म्हणाले, “अंधश्रद्धा निर्मूलन म्हटले की, विवेक जागर आलाच. बाबा-बुवा यांच्या शोषणाच्या पलिकडे, फेक-न्यूजवरचा अंधविश्वास हे आजच्या काळातील प्रमुख आव्हान आहे. ज्या जगात आपण जगत आहोत, त्या जगात उजव्या शक्तींचा उदय झालेला असताना आपण कोणत्या जगात जगत आहोत, हे समजून घेतलं पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे एक प्रागतिक भूमिका असते. मूलतत्त्ववादाचे पुनरुज्जीवन होत असलेल्या काळात पत्रकारितेची भूमिका काय असावी? सोशल मीडियाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे बातमीदारी सोडून वेगळंच दाखवलं जातंय. सोशल मीडियावर ए.आय. (कृत्रिम बुद्धिमत्ता), deep fake वापरले जाते. त्यामुळे fact checkers ची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. फेक न्यूज एक समुदाय विशेष म्हणजे मुस्लीम, दलित विरोधात वापरले जातात. मग फेक न्यूजवर अंधश्रद्धा कशी पसरते यावर चर्चा झाली पाहिजे. फेक न्यूज येण्याचे प्रमाण उत्तर भारतात का जास्त आहे, असा सुद्धा कधी कधी प्रश्न पडतो.” यासारखे अनेक विषय समोर ठेवून त्यांनी सहकारी पत्रकारांना बोलते केले. ए.आय. माणसाच्या विवेकाला मदत करेल की, संभ्रमाची गाथा तयार करेल, यावरही त्यांनी चर्चा घडवून आणली.

बीबीसीचे आशिष दीक्षित म्हणाले, “महाराष्ट्र, भारत आणि अमेरिका, युरोप, ब्राझील, इस्राईल या सगळ्या ठिकाणी ज्या काही उलथापालथी होत आहेत, त्यात काही समान धागे आहेत. समाजातील बर्‍याच पुराणमतवादी लोकांना डार्विन, वैज्ञानिक दृष्टिकोन मंजूर नव्हता. या लोकांना काही वर्षांपूर्वी सामाजिक, राजकीय अधिष्ठान नव्हते; पण आज यांचे धाडस वाढले आहे. एक केंद्रीय मंत्री म्हणतात की, माकडापासून माणूस झालाच नाही. पृथ्वी सपाट आहे, असं सांगितलं जातंय, हिंसेला प्रोत्साहन देणारी धर्मसंसद आयोजित केली जात आहे.

माणसं एकमेकांपासून दूर जात आहेत. आपल्या कुटुंबातील सुशिक्षित नातेवाईक अवैज्ञानिक आणि ध्रुवीकरणाला बळी का पडतात, याचा विचार आपण का करत नाही? सोशल मीडियामुळे प्रत्येकाचे वास्तव वेगवेगळे तयार होते. कोवीडच्या लसीवर विश्वास न ठेवणे हे त्यातूनच होते. ज्यामुळे ठराविक अवैज्ञानिक मते आपण सोशल मीडियावर सारखी पाहतो, त्याच खोट्या बातम्या आपल्याकडे नेहमी येत राहतात. ध्रुवीकरण हे उजव्या आणि डाव्या अशा दोन्ही बाजूने होत राहते. डाव्या बाजूने सुद्धा संवाद न साधण्याचे प्रमाण तेवढेच जास्त आहे, यांच्याकडे बौद्धिक अहंकार आहे. उजवी बाजूसुद्धा त्यांच्या बाजूने हेकेखोर आहे; पण शिकले, सवरलेले लोक यावर विश्वास का ठेवतात, तर कुठेतरी अविश्वास खूप आधी निर्माण झाला होता असे असेल का? पण आता कदाचित उशीर होत असेल, मधला संवादाचा अवकाश निश्चितच आता कमी होतो आहे.

प्रत्येक जण वास्तवाची वेगळी रूपे पाहतोय. काही चॅनल्सनी दिवस-रात्र सांगितलं की, ‘सुशांतसिंग राजपूतने आत्महत्या केली नाही तर त्याचा खून झालाय.’ त्यामुळे friends of friends algorithm मुळे प्रत्येकाचं वास्तव वेगळं होतंय. भारतातील बर्‍याच लोकांनी सुशांतचा खून झाला यावर विश्वास ठेवला होता. म्हणून वेळीच आपण संवाद साधला पाहिजे. मोठ्या प्रमाणात फेक न्यूज उजव्या विचारधारा आणि राजकीय पक्षांकडूनच का येतात हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. संवाद आपण कुणाशी साधायचं हे आपल्याला ठरवावे लागेल.

दक्षिण भारतात सुद्धा बाबा-बुवांचे प्रमाण जास्त आहे. खुद्द महाराष्ट्रातसुद्धा माजी मुख्यमंत्री सत्तेत असताना सत्यसाई बाबा यांना शासकीय निवासस्थानी घेऊन गेले होते. पण महाराष्ट्रात फुले-शाहू-आंबेडकर-दाभोलकर होऊन गेले. महाराष्ट्रात पुरोगामी आणि अतिशय प्रतिगामी लोक एकत्र राहतात, हे महाराष्ट्राचे वैशिष्ट्य आहे.

या सगळ्यांचा संबंध लोकशाहीशी आहे. जर लोकशाही कमजोर होत गेली तिथे पत्रकारिता कमजोर होत जाणार. जिथे जिथे हुकूमशाही आहे, लोकशाही नाही, तिथे तिथे सत्य आहे ते सांगण्याची हिम्मत आता आपल्या देशात मुक्त वातावरणात रुजताना दिसत नाही. वैज्ञानिक दृष्टिकोन बद्दल हेच घडत आहे. जगभरात लोकशाहीची पिछेहाट होत आहे. एकविसाव्या शतकात त्या अर्थाने हुकूमशाही येणार नाही; पण लोकशाहीच्या वेशात हुकूमशाही नांदेल. सगळ्या देशातील सत्ता नावापुरती लोकशाही कायम ठेवते. पूर्ण जगात हे होत जाणार, अशी चिन्हे आहेत. पत्रकारिता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन्हींची पिछेहाट होत आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे. म्हणून आता आपण अतिशय सजग राहायला हवे. वास्तव सांगणे, हे आमचे काम आहे. आपापल्या परीने आपण काय करू शकतो, ते आपण पाहिलं पाहिजे. आपणाला एका मोठ्या लढाईला तयार राहावं लागेल.

ए. आय. सध्या बाल्यावस्थेत आहे आणि याचा खूप बागुलबुवा पण केला जातोय. आपणासमोर असा आभास निर्माण केला जातोय की, ए. आय. विचार करू शकत आहे. ते अजूनही विचार करू शकत नाही; पण त्याकडे आपण दुर्लक्ष करू शकणार नाही. जेव्हा जेव्हा नवीन तंत्रज्ञान आले तेव्हा-तेव्हा अफवा, खोट्या गोष्टींचा स्फोट झाला होता. प्रिंटिंग प्रेस, रेडिओ आले तेव्हा तसेच झाले. त्यामुळे नवीन तंत्रज्ञानाने फेक न्यूजचा प्रसार रोखण्यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजना करायला आपण कमी पडतो. ए. आय. चा वापर करून खूप मोठ्या स्वरूपात आपल्या फोटो, आपल्या आवाजाचा वापर करून नवीन व्हिडीओ आणि खोटे संदेश तयार केले जात आहेत. अनेक ठिकाणी यंत्रच ठरवते की काय माहिती, बातमी द्यायची ते. तर यापुढे ए. आय. चा वापर करून काय काय होत आहे, त्याला तोंड देण्यासाठी तयार राहायला हवे.”

अल्ट-न्यूजचे संस्थापक प्रतीक सिन्हा म्हणाले, “मी एका अधार्मिक, वैज्ञानिक विचारांच्या घरात मोठा झालो. शाळेत असताना मी बर्‍याच अंधश्रद्धांबद्दल चर्चा ऐकायचो. त्या काळात विविध मुद्द्यांवर चर्चा शक्य होती. आजकाल सर्व चर्चा या राजकीय अंगाने होतात. त्यामुळे मुद्यांची सूक्ष्मता हरवून जाते. आजकाल संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा करणे अवघड झाले आहे. प्रत्येक बाबतीत मुद्द्यांचे ध्रुवीकरण केले जाते. आपण सर्वजण चर्चेचा अवकाश गमावून बसलो आहोत. माहितीच्या व्यवस्थेचे तीन स्तंभ आहेत- त्यात माहिती तयार करणारे तंत्रज्ञ, ते प्रसारित करणारे प्लॅटफॉर्म्स आणि ग्रहण करणारे सर्व ग्राहक किंवा नागरिक यांचा समावेश होतो. तीन प्रकारचे दूषप्रचार आहेत. एक तर राजकीय दूषप्रचार असतो. एकच व्हिडीओ एडिट करून हजारोंच्या संख्येने टाकला जातो. यात पैशासाठी काम करणार्‍या influencers ची संख्या मोठी आहे. हे आहेत माहितीचे निर्माते. अनेक लोक राजकीय विचारधारेसाठी टाकतात पण त्याहून मोठ्या प्रमाणात बरेचजण पैसे मिळतात म्हणून पोस्ट टाकत राहतात. तर अशा पोस्ट टाकणारा एक critical mass झाल्यावर त्याचा प्रभाव पडतो. ज्याप्रमाणे अमेरिकेचे माजी अध्यक्ष ट्रॅम्प निवडणुका हरल्यानंतर अमेरिकन संसदेवर हल्ला झाला. तो अचानक झाला नव्हता तर ट्रॅम्प निवडणूक हारला नाही असा (अंध) विश्वास हळूहळू रुजवला गेला होता त्यामुळे झाला. याच्यामध्ये प्लॅटफॉर्मची मोठी भूमिका असते. प्लॅटफॉर्मचे व्यावसायिक मॉडेल आपल्याला समजून घ्यावे लागेल. चुकीच्या माहितीवर लोक विश्वास कसे ठेवतात याचा अभ्यास व्हायला हवा. बरेच लोक चुकीच्या पोस्ट टाकतात किंवा व्हायरल करतात. हे प्रसारित होण्यामागे समाजमाध्यम कंपन्यांचे अल्गोरिदम तंत्रज्ञान कारणीभूत आहे.

तसेच बर्‍याच मोठ्या प्रमाणात विशिष्ट राजकीय धार्मिक विचार प्रसारित करणारा आशय (कंटेंट) बनवला जातो, त्यामुळे सुद्धा ही समस्या मोठी झाली आहे. जेवढे वेळा या पोस्ट पाहिल्या जातात तेवढी प्लॅटफॉर्मची कमाई वाढते. त्यामुळे त्या दिशेने प्लॅटफॉर्मचे तंत्रज्ञान बदलले जाते. आपल्याला सतत नवनवीन आशय हवा असतो. त्यामुळे उदाहरणार्थ : आपण लसीवर शंका घेणारा एखादा व्हिडीओ पाहिला तर दुसरा व तिसरा व त्यासारखाच पुढे आणखी आपल्यासमोरच्या टाईमलाइनवर येत जातो. एका विशिष्ट समाजाच्या बाबतीत आणि भारतात मुस्लीम समाजाच्या बाबतीत tunnel vision संकल्पनेच्या जोरावर आपल्या मनात विषारी मते बनवली जातात आणि समाजात दुही, विद्वेष पसरवला जातो. अशा प्रकारचे संदेश पाठवणार्‍या लोकांना समाजात दुही किंवा मतभेदाची दरी कुठे असते, हे माहीत असते. त्यामुळे समाजमाध्यमांचा असा गैरवापर करून आणि एकच असत्य अनेक वेळा सांगून एक वेगळे नॅरेटिव्ह तयार केले जाते. त्यामुळेच माध्यम आणि तंत्रज्ञान साक्षरतेची आपल्या देशात नितांत गरज आहे.

फेक न्यूज हे फक्त साधन आहे. दोन्ही बाजूनी राजकीय शत्रूविरोधात याचा वापर केला जातो पण उजव्या शक्तीकडून निश्चितच फेक न्यूज येण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. माहितीच्या दुष्प्रचाराने केवळ राजकीय आक्रमण सध्या होत नाही तर समाजाची पुनर्मांडणी उजव्या शक्तीना करायची आहे. त्यांच्या फेक न्यूजमुळे समुदायावर आक्रमण होते. जर उजव्या शक्ती, उजव्या राजकीय पक्षांच्या प्रवक्ते त्यांच्या टाईमलाईनवर किती फेक न्यूज पसरवतात हे पाहिलं, तर आपल्याला हे लक्षात येईल.

हे फक्त सोशल मीडियापुरते मर्यादित नाही. यूक्रेन-रशिया युद्धात No Fly Zone मध्ये भारतीय मुलांना आणण्यासाठी आपले सरकारचे विमान जात आहे ही खोटी बातमी सोशल मीडियावरून उचलली गेली आणि ती नंतर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी मोठ्या प्रमाणात प्रसारित केली. हा एका सुव्यवस्थित योजनेचा भाग आहे आणि यात कुणावरच त्याची कायदेशीर जबाबदारी निश्चित केली जात नाही.

जे मूलतत्त्ववादी राजकीय शक्ती स्वत:हून थेट काही करू शकत नाही ते असामाजिक तत्त्व असलेल्या झुंडीमार्फत गुन्हे घडवून आणतात. त्याचे व्हिडीओ, लाईव्ह बनवले जाते. त्यांना पोलिस व कायदेशीर संरक्षण दिले जाते. महिला कुस्तीगीर आंदोलनात धादांत खोटे सांगितले गेले. Alt News मध्ये माझ्याबरोबर काम करणारे जुबेरला १९८३ मधील एका फिल्मची क्लिप सोशल मीडियावर टाकल्याबद्दल २१ दिवसांसाठी तुरुंगात ठेवले गेले.

माझ्या मतानुसार संवाद झाला पाहिजे पण वेगवेगळ्या पातळीवर संवाद साधायला हवा. उजव्या शक्ती अशा का वागतात हे समजण्यासाठी संवाद आवश्यक आहे. संवाद दोन प्रकारचे असतात. एक प्रकारचा संवाद आवश्यक असतो तो म्हणजे समोरच्याला समजावण्यासाठी आणि दुसर्‍या प्रकारचा संवाद असतो तो म्हणजे समोरच्याला समजावून घेण्यासाठी. सत्यशोधन (fact check) ही फक्त पत्रकारांची जबाबदारी नाहीतर सगळ्यांची जबाबदारी आहे. शिक्षण व्यवस्थेचे यामध्ये मोठे योगदान असू शकते. लोकांना मूर्ख बनवण्यासाठी फक्त एआयची गरज नाही. आज ५० टक्के फेक न्यूज ज्याचा आम्ही पर्दाफाश करतो, त्या बातम्या हिंसक घटनांशी संबंधित असतात. जेव्हा हिंसा ही सोशल मीडिया मध्ये येते तेव्हा लोकांचा विवेक संपून जातो. पण तंत्रज्ञान सुद्धा अडचणीचे ठरू शकते. बर्‍याच व्हिडीओमध्ये आवाज आणि दृश्य वेगवेगळ्या ठिकाणचे असतात. मूळ छायचित्रे हे ए. आय. चा वापर करून बदलले जातात. ए. आय. मुळे माहितीचा दुष्प्रचार निश्चितच वाढतो. महिला कुस्तीगीर खेळाडूंना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांचा हसतानाचा खोटा फोटो आला होता तो faceapp वापरून तयार केला गेला होता. हिंदुस्थान टाइम्सने १९८३ च्या क्रिकेट संघाबद्दल एक लेख अलीकडे प्रकाशित केला होता ज्यात त्या संघात नसलेल्या खेळाडूबद्दल माहिती आली होती. नंतर तपास केल्यावर असे कळाले की ते chat GPT चा वापर करून ते लिहिले गेले होते.

दुष्प्रचार करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. मणिपूर आणि ओडिशा रेल्वे अपघातबद्दल आलेल्या फेक न्यूजमध्ये ए. आय. तंत्रज्ञान जबाबदार नव्हते. ए. आय. पेक्षा माहितीचा दुष्प्रचार जास्त धोकादायक आहे. आपल्याला सर्व बाबतीत सत्यावर आधारित माहितीकडे जायला हवे. आपल्याकडे माहितीचा प्रचंड स्फोट झाला आहे. आपण सत्य कसे शोधणार? त्यामुळे शिक्षणात येणार्‍या नव्या माहितीबद्दल साक्षरता आवश्यक आहे. आधीच्या काळात पत्रकारितेमध्ये निनावी स्रोत हे त्यांचे संरक्षण करण्यासाठी वापरले जायचे. आता शासकीय स्रोतांचा चुकीचे दावे पसरवण्यासाठी गैरवापर केला जातो. Media Theory च्या दृष्टिकोनातून माहितीची प्रक्रिया कशी होते हे आपण लहान मुलांना सांगितलं पाहिजे. माहिती आणि माध्यम साक्षरता हे फक्त साधे कौशल्य न बनता जीवन कौशल्य (Life Skill) बनले पाहिजे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या अलका धुपकर म्हणाल्या, “जे पत्रकार सत्य बाजू मांडतात, ते सत्तेला आव्हान देणारे असतात. अशा प्रश्न विचारणार्‍या पत्रकारांची बदनामी आणि बदली केली जाते, किंवा अशा पत्रकारांना धमकी दिली जाते. त्यामुळे पत्रकारांनी आपल्या करिअरची, कुटुंबीयांची काळजी करायची का आपला आतला आवाज ऐकायचा का पत्रकारितेतील स्पर्धेला सामोरे जायचे असा त्यांच्यासमोर असलेला अवघड प्रश्न आहे? इथं राहून मुख्य प्रवाहातील पत्रकारिता करणे हे खूप आव्हानात्मक आहे असं मला वाटतं. बर्‍याचशा गाव किंवा तालुका पातळीवरील पत्रकारांना संधी मिळत नाही. आज बुवाबाजी, अंधश्रद्धा, मुस्लीम द्वेष बद्दलच्या, छद्मविज्ञानाच्या बातम्या खूप सहजतेने खपवल्या जातात. आज कौटुंबिक व्हॉटसअ‍ॅप ग्रुपमध्ये सत्यशोधक धर्माचा कोणता कार्यक्रम जर शेयर केला, तर तुम्ही हिंदू विरोधी ठरवले जाता. जिथे जोतीराव-सावित्रीबाई फुले यांना मानलं जात नाही, तिथं तुम्हाला वर्षातून एक दिवस बाईला फेटा घालून बुलेटवर मिरवायला प्रोत्साहित केलं जातं, तसेच लव्ह-जिहादच्या भीतीपोटी आणि मुस्लीम धर्माच्या विद्वेषाने नऊ, दहा मुले जन्माला घालण्यास सांगितलं जाते. महिलांवर भरपूर दबाव नेहमी येतो. मासिक पाळीबद्दल कॉर्पोरेट आणि सामाजिक संस्था बरेच काम करत आहेत; पण स्त्री आरोग्याच्या अनेक समस्यांबद्दल किंवा महिलांना मुलं होत नसतील, तर मग त्यांना बाबा-बुवांकडे नेलं जातं. कोवीड काळात जी औषधे मार्केटिंग तंत्रे वापरून विकली गेली आणि त्यांनी हजारो कोटी कमावले. त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. कोरोनील यातील एक महत्त्वाचे उदाहरण आहे.

आज सर्व पत्रकारांना काळ्या-गोर्‍या रंगात लेपण्याचा प्रयत्न होत आहे. सर्व मुख्य धारेतील पत्रकार वाईट आहेत, असं सांगितलं जातं; पण बरेचशे मुख्य प्रवाहातील पत्रकार आपापल्या पद्धतीने चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे एक वाचक म्हणून तुम्ही कुठलं माध्यम वाचता, बघता हेसुद्धा तुमची जबाबदारी आहे. तुम्ही काय पाहता, यावर प्रेक्षकांची जबाबदारी आहे. आमचं काम बातमीदारी पुरतं मर्यादित आहे. काय छापले जावे, हे प्रत्येक वेळी आमच्या हातात नसतं.

जेव्हा संगणक येत होते, त्याला विरोध करणारे लोक आज म्हणत आहेत की, तेव्हा आम्ही बहुजन समाजातील लोकांपर्यंत संगणक साक्षरता पोचवण्याची आम्ही मागणी करायला हवी होती. डिजिटल साक्षरता नसल्यामुळे यासह अनेक समस्या झाल्या आहेत. डीप फेक, एआय समजून घेतलं पाहिजे. मग आपण sulli deals, bulli deals हे जे ऑनलाईन गुन्हे घडले, ते सर्व थांबवू शकतो.

उजव्या शक्तींशी संवाद साधला पाहिजे, यात वादच नाही; परंतु काही बदल जे होत आहेत, तेसुद्धा पाहिले पाहिजेत. आज परिस्थिती अशी झाली आहे की, शांतीस्वरूप भटनागर विज्ञान संशोधन पुरस्कार दोन वर्षांपासून दिला जात नाही, त्याचा पुनर्विचार सरकार करतंय. NCERT अभ्यासक्रमाचा चुकीच्या दिशेने पुनर्विचार झालाय. गांधी हत्या, गुजरात दंगली आणि इतर अनेक महत्त्वाच्या ऐतिहासिक मुद्याबद्दल माहिती अभ्यासक्रमातून वगळली गेली आहे. योग्य लैंगिक शिक्षण दिले जात नाही. पुराणातील असत्य ज्या प्रमाणात भारतात रुजवली जात आहेत ते तर आपल्यासमोर मोठे आव्हान आहे. हे सगळे असताना संवाद कसा साधायचा हे सुद्धा आव्हान आहे कारण संवादाचा अवकाश आकुंचन पावत आहे. खोटारडेपणाला काही तरी मर्यादा असते.

आज हिंदू-मुस्लीम यांच्यामध्ये खूप मोठी दरी आहे. देशभरात ‘मेरे घर आके देखो’ हे अभियान सुरू झाले आहे, त्यात तुम्ही सहभागी व्हा. द्वेषमूलक प्रचार (हेट स्पीच)ला निधी कोण पुरवते हेसुद्धा या निमित्ताने पाहायला पाहिजे. IIM Bangalo च्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पंतप्रधानाना यासाठी पत्र लिहिले आहे. त्यांनी द्वेषाला खतपाणी घालणार्‍या कामासाठी पैसे न देण्याचे कॉर्पोरेट क्षेत्राला आवाहन केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि विशेषत: उत्तर भारतावर हेट स्पीचचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो कारण दक्षिण भारताचे राजकारण आणि अर्थव्यवस्था खूप वेगळे आहे.

मी कुठल्याही तंत्रज्ञानाच्या विरोधात नाही. मी परवाच स्टॅनफर्ड विद्यापीठाचा एक अभ्यासक्रम केला ज्यामध्ये ए. आय. आणि पत्रकारितामधील बदल याबद्दल शिकवलं गेलं. पुढचा काळ ए. आय. चा आहे हे निश्चित. तंत्रज्ञानामुळे जे बदल होत आहे, ते आपण समजून घेतलं पाहिजे. या शासनाने मोठ्या प्रमाणात शक्ती केंद्रित आहे, अशावेळी पत्रकार म्हणून आपल्याकडे कोणकोणती साधने आहेत आणि या पातळीवर तंत्रज्ञानामध्ये काय काय क्रांतिकारी बदल होत आहेत त्याकडे आपण दुर्लक्ष करू नये. आजची पिढी ही सोशल मीडियावर आलेल्या सुट्या-सुट्या बातम्या वाचणारी आहे, ही पिढी बातम्या वर्तमानपत्र विकत घेऊन वाचत नाही. त्यामुळे त्यांच्याशी संवाद वाढवायला पाहिजे.

दाभोलकरांबद्दल, तुकारामांबद्दल या पिढीला सांगताना नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. जे खोटे दावे महापुरुषांबद्दल केले जातात, त्याचा पर्दाफाश केला पाहिजे. चळवळी का कमकुवत आहेत यावर कल्पक पद्धतीने विचार करून पुढे आले पाहिजे. जसे सावरकर, औरंगजेब राजकारणाच्या केंद्रस्थानी आणले गेले आहेत किंवा ज्याप्रमाणे तुकारामांची बदनामी केली जात आहे, हे तर समजून घ्यावेच पण त्यापुढे जाऊन ए. आय.च्या दुनियेत वावरणार्‍या तरुणांशी आपल्याला संवाद साधावा लागेल. त्यांचे व्यक्त होण्याचे मार्ग काय आहेत ते आपण समजून घ्यावे. मी, नंदिनी जाधव आणि मिलिंद जोशी यांनी असे विविध पद्धतीने प्रयत्न केले. पुष्पा भावे म्हणायच्या, “कल्पक पद्धतीने आंदोलने झाली तरच लोक त्याला प्रतिसाद देतील. ए. आय.च्या युगात लोकशाही विचार, राज्यघटना, माणुसकीचे म्हणणं मांडता आलं पाहिजे. फेक न्यूज, बुवाबाजी यावर नागरिकांनी शहाणपण वापरावे. यासाठी प्रत्येक वेळी कलाकार आणि सेलिब्रिटीची गरज नाही. ए.आय. शिकून विचारांचा वारसा पुढे नेऊ या. तुमचं शहाणपण वापरा. ए. आय. आणि नवीन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण घ्या.

परिवर्तनचे कार्यकर्ते राजू इनामदार यांनी सुरुवातीला “अभिवादन करून तुम्हा डॉ. दाभोलकर…” आणि शेवटी “आम्ही प्रकाशबीजे रुजवीत चाललो…” ही गीते सादर केली. भारत विठ्ठलदास, बाळकृष्ण लोंढे, प्रशांत पोतदार, विजय सुर्वे, धनंजय कोठावळे, श्रीराम नलावडे, सौरभ बागडे या कार्यकर्त्यांनी अनुवादक आणि चर्चासत्रास निमंत्रित पत्रकारांचे स्वागत केले. अंनिस राज्य सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरूण बुरांडे यांनी पत्रकारांचा परिचय केला आणि सूत्रसंचालन केले.

– शब्दांकन : राहुल माने


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ]