॥ नतमस्तक ॥

अतुल पेठे - 9422319717

डॉ. श्रीराम लागूंच्यावर वस्तुतः गेल्या काही दिवसांत इतके उत्तम लेख आले आहेत की, मी त्यांच्याबाबत काय नव्यानं सांगू शकेन, असा मला प्रश्नच उपस्थित झाला आहे, तरीही मी माझ्या परीने त्यांच्या मोठेपणाचे काही अर्थ लावायचा प्रयत्न करतो.

डॉ. श्रीराम लागू हे रंगभूमीवरील ‘सुई जेनेरीस’ अभिनेते होते. ‘सुई जेनेरीस’ हा लॅटिन शब्द आहे. इंग्रजीमध्ये ‘सुई जेनेरीस’ला बरेच अर्थ आहेत. Special, Unique, Distinct, Peculiar, Rare, Uncommon, Unusual, Incomparable, Matchless, Offbeat, Out of the way, Unequalled, Beyond comparison वगैरे वगैरे. त्याचा मराठीत अर्थ स्वयंभू! शब्दकोशात अनन्यसाधारण, एकमात्र किंवा एकमेवाद्वितीय, असेही त्याचे अर्थ आहेत. डॉ. श्रीराम लागू यांना हे सर्व अर्थ सार्थ ठरतात. मराठी रंगभूमीवर आजपावेतो उत्तम अभिनेते होते आणि आहेतही; पण डॉ. लागूंची ‘लीगसी’ किंवा ‘कुळ’ वेगळंच आहे; इतकं वेगळं की, त्याच्या आसपासही मला कोणी दिसत नाही. ‘रंगप्रेमी’, ‘रंगकर्मी’ आणि ‘रंगधर्मी’ असे तीन स्तर आम्हा नाटकवाल्यांच्यात करता येतील. डॉ. श्रीराम लागू हे त्यातील ‘रंगधर्मी’ या उच्च पदावर होते. या त्यांच्या रंगधर्माची अनेक वैशिष्ट्ये होती. या वैशिष्ट्यांचा यानिमित्ताने मी शोध घेऊ इच्छित आहे.

यातील सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य हे की, अनेक प्रायोगिक नाटकांत प्रत्यक्ष काम करून त्यांनी या रंगभूमीला बळ दिले. ही प्रायोगिक नाटके वैचारिक आणि आशयगर्भ होती. उद्ध्वस्त धर्मशाळा, गार्बो, अँटिगनी, गिधाडे, आत्मकथा, किरवन्त, शतखंड, क्षितिजापर्यंत समुद्र, प्रेमाची गोष्ट, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र अशी अनेक. अशा तर्‍हेच्या नाटकांत काम करून आणि खटारा बसमधून गावोगावी मैलोन्मैल प्रवास करून प्रयोग करणे, ही आज अशक्यप्राय वाटणारी दंतकथा वाटू लागली आहे. लक्षात घ्या की, प्रायोगिक रंगभूमीला आर्थिक मदत करणे अथवा तिथल्या लोकांचे कौतुक करणे, यापेक्षा प्रत्यक्ष त्यांच्या खांद्याला खांदा लावून असे नाटक करण्याची जबाबदारी घेणे, हे मूल्यच निराळे आहे. नव्या लोकांसोबत स्वतःची प्रसिद्धी बाजूला सारून स्वतःला नव्याने ‘एक्स्पोज’ करणे – उघडे करणे – अवघड असते. असे करायला कमालीचे नैतिक, मानसिक आणि बौद्धिक धारिष्ट्य लागते. Recognition, Remuneration, Reward आणि Respect या चार गोष्टींची प्रायोगिक रंगभूमीवर हमी नसते, हे आपण जाणतो. बिनहिशेबी ‘रिस्क’ म्हणजे जोखीम इथे घ्यावी लागते. सतत यशाची हाव धरून लोकानुनय प्रणाली इथे राबवली जात नाही, तर रंगरूपाशयाच्या शक्यता पडताळल्या जातात. मात्र बहुतांश वेळा असे अनुभवास येते की, अशा तर्‍हेची नाटके करण्याची बात सोडा; पण प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये प्रायोगिक रंगभूमीविषयक तुच्छता, अलिप्तपणा किंवा नकोसेपणा असतो. ते लोककलेवरील प्रेम अथवा व्यक्तिगत उन्नयनाकरिता प्रायोगिक नाटके पाहतही नाहीत, अशी अवस्था. डॉक्टरांचा विशेष हा की, ते व्यावसायिक नाटकंही तितक्याच निष्ठेने करत आणि पाहतही. बरेचसे प्रसिद्ध लोक कधीतरी चवीला प्रायोगिक नाटक करतात किंवा उरलेले बहुतेक वेळा यशाच्या रुळलेल्या वाटा चोखाळतात किंवा झाकली मूठ सव्वा लाखाची करतात; पण हा माणूस वयाच्या पंच्याहत्तरीपर्यंत अथकपणे नवनव्या पायवाटा धुंडाळत होता. तरुण वयात दोन-चार प्रायोगिक नाटके करायची असतात आणि मग धंदेवाईक नाटक वा चित्रपट करायचे असतात, हा समज आपल्या नाट्यकलाविश्वात दृढ असताना हा माणूस आयुष्यभर, स्वतःच्या जुन्या नाटकांच्या आठवणी न उगाळत बसता, खंबीरपणे नव्या लोकांबरोबर प्रायोगिक नाटकांत सहभागी होऊन आधुनिक संवेदनेला भिडत होता. खरं तर या त्यांच्या एकाच वैशिष्ट्यामुळे, आजूबाजूचे उथळ बेगडीपण समजून येईल. त्यामुळे कोणाचीही उंची आणि खोली मोजायला डॉ. श्रीराम लागू नावाचा असा मापदंड मराठी रंगभूमीवर आता आपल्या जवळ आहे.

डॉक्टरांनी आशयगर्भ वैचारिक प्रायोगिक नाटक लिहून घेतले, दिग्दर्शित केले, अभिनय केला आणि प्रसंगी निर्मिती केली. याबरोबरच अशा काही नाटकांना आर्थिक मदत केली, अडीअडचणीला अथवा मुस्कटदाबीला आवाज उठवला, लेख लिहिले, भूमिका घेतली. हे सारे करत असताना स्वतःची बुद्धी, प्रतिभा, वेळ, पैसे आणि प्रतिष्ठा अक्षरशः पणाला लावली; प्रसंगी अपमानही सहन केले. याचे एक उदाहरण देतो. ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटक त्यांनी चार मोठ्या नाट्यनिर्मात्यांना पदरमोड करून मुंबईत जाऊन वाचून दाखवले. लक्षात घ्या की, त्यावेळी त्यांचे वय 70 होते. त्या निर्मात्यांनी नकार दिला आणि दुर्लक्ष केले. पुढे हे नाटक त्यांनी अमेरिकेत वाचून दाखवले आणि तिथे आर्थिक मदतीकरिता झोळी फिरवली. वस्तुतः हे सारे करणे त्यांना अत्यंत वेदनामय झालेले होते. अशावेळी डॉक्टर व्यथित होऊन उशीवर हात आपटायचे; पण क्षणभरच ! मग त्यांचे धारदार डोळे लकाकत. ते परत उभे राहायचे. खचून जाऊन भावनिक न होता जखमेवर उपचार करणे, हा त्यांचा स्थायीभाव होता. अशा वेळी ते ओठांचा चंबू करून ‘फु sss’ असे उद्गारत. प्रायोगिक नाटक करण्यामागच्या त्यांच्या या तडफडीमागे स्वतःच्या आणि समाजाच्या कलात्मक जगण्याचा दर्जा उच्च प्रतीचा करणे, हे गर्भित मूल्य होते. एक प्रकारची साधनाच! ‘अचिव्हमेंट (काम) आणि ‘वर्क’ (कार्य) यात फरक आहे. ‘आचिव्हमेंट’मुळे व्यक्तीच्या मोठेपणात वाढ होते; पण ‘वर्क’ मुळे समष्टीच्या संस्कृतीत भर पडते. डॉक्टरांनी ‘वर्क’ केले. मराठी रंगभूमीला भारतीय स्तरावर जो मान आज मिळतो, त्यात डॉक्टरांच्या कार्याचा वाटा मोठा आहे, तो असा.

आता मी त्यांच्या इतर वैशिष्ट्यांचा वेध घेतो. कुठल्याही कलेत लोकांना अचंबा वाटेल, असे एक गूढ वलय तयार केलेले असते. कलाकार हा दैवी गुणांनी मंडित असतो, हे रुजवलेले असते. नाटकात अशा दंतकथा तयार करायला भरपूर वाव असताना डॉक्टरांनी या अंधश्रद्धेला तडा दिला, ‘डीमिस्टीफिकेशन’ केले, नाटकाचे विज्ञान अभ्यासले, तालमींमध्ये दृष्टिकोन आणला, गायनकलेचा ‘रियाज’ त्यांनी अमलात आणला. याबाबत त्यांनी महान गायक कुमार गंधर्व यांना शिक्षक मानले. ‘रियाझ करोगे तो राज करोगे’ याचा मथितार्थ जाणला. यात वैचारिक रियाजला महत्त्वाचे स्थान दिले. भूमिका करताना मग हुकमी पद्धतीने भावदर्शन आणि रसनिष्पत्ती करण्याची कला त्यांनी अवगत केली. भूमिकेचा तार्किक पद्धतीने अभ्यास करताना वाचणे, पाहणे, ऐकणे आणि करणे, यावर त्यांचा भर होता. याबाबत वैद्यकीय शिक्षण त्यांच्या कामी आले. शरीर म्हणजे काय आणि ते आतून कसे कार्यरत असते, हे त्यांना उमजलेले होते. कारणे, लक्षणे, परिणाम आणि उपाय, या चारही शास्त्रीय पायर्‍या ते नाटकांतही उपयोगात आणत. अभ्यासपूर्ण रीतीने विच्छेदन करून शल्यविशारदाची व्यावसायिक सफाई त्यांनी अभिनय कौशल्यात आणली होती. सतत जागे राहून स्वतःचा अभिनय अलिप्त राहून पाहणे, हा त्यांच्या अभिनयाचा गाभा होता.

डॉक्टरांनी नाट्यकलेत व्यावसायिकतेची नवी व्याख्याच केली. त्यांच्या या व्याख्येत अनेक घटक होते. त्यांच्या नाटकांची निवड हा अभ्यासाचा विषय आहे. त्यात पुरोगामी, निर्भय आणि बंडखोर नाटकांना होकार देताना आकलनात्मक आणि अकलात्मक हीन अभिरुचीच्या ‘नथुराम’ सारख्या नाटकांना नकार, हेही त्यांचे वैशिष्ट्य! हे समंजस भान त्यांचे जसे नाटकाच्या निवडीत होते, तसेच त्यांनी निवडलेल्या सामाजिक कार्यातही होते. हे काम फक्त ‘शॉट’ पुरते खेडेगावात जाऊन कुदळ, फावडे हातात घेऊन टीव्हीवरील जाहिरातीपुरते नव्हते, तर प्रत्यक्ष दगड आणि सनातनी शिव्याशाप खायला लागणारे होते. एकदा का नाटक वाचून आणि नंतर चर्चा, वादविवाद करून होकार दिला की, त्या नाटकाशी आणि नाट्य व्यवहाराशी संपूर्ण प्रामाणिक राहण्याचे त्यांचे मूल्य अफाट होते. पुढे नाटकावर टीका झाली, तरी ते लेखकाला वा दिग्दर्शकाला कधीही दोष देत नसत वा कुचाळक्या करत नसत. त्यांच्याकरिता दिग्दर्शक हा ’बोटीचा कप्तान’ असे. हा मान ते प्रत्येक प्रयोगाला देत असल्याचा अनुभव मला आलेला आहे. तालमीला आणि प्रयोगाला आले की, ते आल्याचे सांगत. तसंच जाताना परवानगी घेऊन घरी निघत. ही सभ्यता दुर्मिळच ! आपण करत असलेल्या नाटकाच्या खस्ता काय आहेत, हे ते पुरेपूर जाणून असत. त्यांच्यामुळे मला तालमीला अथवा एकाही प्रयोगाला काडीचाही त्रास झालेला नाही. आदळआपट करून स्वतःचे महत्त्व उगाचच वाढवण्याचा छंद त्यांनी जोपासला नाही. प्रायोगिक नाटकांत काम करणार्‍या नटाने कसे असावे, याचा ते आदर्श होते. वेळ आणि शब्द पाळणे, यातली व्यावसायिकता तर त्यांनी पाळलीच; पण जगण्याची एकूण ‘डीग्निटी’ राखली. स्वतःचा खासगीपणा जपताना इतरांचाही खासगीपणा तितक्याच तोलामोलाने जपला. रंगभूमीविषयक आस्था, कळकळ आणि ममत्व, हेच त्यातील मर्म होते. आता शेवटी दोन अतिशय हृद्य प्रसंग सांगतो. त्यातून हे मर्म सिद्ध होईल.

आमचा ‘बालगंधर्व’ मध्ये ‘आषाढातील एक दिवस’चा प्रयोग होता. तर अचानक मला कोणी डॉक्टर आलेत, असे सांगितले. वस्तुतः हे नाटक त्यांनी आधी पाहिलेलं होतं. पण पाहतो तर डॉक्टर पलिकडच्या विंगेत मागे कोणाला अडचण होणार नाही, असे काठी घेऊन उभे होते. तिथून तन्मयतेने नाटक पाहत होते. मी त्यांच्या गाडीचा सारथी बबनरावांना विचारले तर त्यांनी मला सांगितले की, दादांनी (डॉक्टरांनी) जाहिरात पाहिली आणि व्यायामाच्या ऐवजी प्रयोगाकडे चक्कर टाकू, असे त्याला सांगितले. मी डॉक्टरांच्याकडे पाहत राहिलो. ते संथपणे खोलवर श्वास घेत होते. नाट्यगृह हाच त्यांच्याकरिता सतत जिवंत ठेवणारा असा ‘ऑक्सिजन’ होता. त्यांच्या चैतन्याचा शोध मला त्यावेळेस लागला. दुसरा प्रसंग असा की, ‘समाजस्वास्थ्य’ नाटकानंतर किमान त्या नाटकात र. धों. कर्व्यांच्या बाजूने कोर्टात बाकड्यावर नुसत्या बसलेल्या माणसाची भूमिका करायची इच्छा माझ्याकडे व्यक्त केली. मी विचारले, तिथे का? तर त्यावर क्षणाचाही विलंब न करता ते म्हणाले की, आजच्या काळात तिथे र. धों.च्या बाजूने बसायला कोणी इच्छुक नाही! या वाक्यानंतर एक मोठ्ठा विराम आला. या विरामात ‘रंगधर्मा’चे उरलेले सारे अर्थ मला उमगले.

आता हे असे अनुभव आल्यावर अशा ‘नट’मस्तकासमोर आपण ‘नतमस्तक’ झाल्याशिवाय राहू काय ?


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]