अंनिस गोरेगाव, मुंबई तर्फे ‘विवेकजागर वक्तृत्व स्पर्धा’ संपन्न

-

‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, मुंबई जिल्हा’ आणि ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’ यांच्यावतीने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विवेकजागर आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा’, केशव गोरे स्मारक ट्रस्ट, गोरेगाव पश्चिम येथे, ६ सप्टेंबर २०२३ रोजी, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत संपन्न झाली. सदर स्पर्धेला मुंबईभरातून विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.

१) वैज्ञानिक दृष्टिकोनच भारताला महासत्ता बनवेल.

२) कधी संपणार सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा?

३) भारतातील विविधता : उणीव नव्हे ताकद.

४) खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे..

अशा विचारप्रवृत्त करणार्‍या विषयांवर विद्यार्थ्यांनी भाषणे केली. स्पर्धेच्या दिवशीच सायंकाळी पारितोषिक वितरण कार्यक्रम झाला. त्यात क्षिप्रा दिलीप अनुष्का बडवे, पार्ले टिळक विद्यालय, हिला रोख ५००० रुपयांचे प्रथम पारितोषिक, संचिता संपत चिकणे, नंदादीप विद्यालय, हिला रोख ३००० रुपयांचे द्वितीय पारितोषिक, गौरव गणेश चव्हाण, महाराष्ट्र विद्यालय, याला रोख २००० रुपयांचे तृतीय पारितोषिक देण्यात आले. वैष्णवी मोरे, जमानाधर अग्रवाल शाळा व कुणाल राजेश येरापल्ले, समता विद्यामंदिर यांना प्रत्येकी १००० रुपयांचे उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. सर्व विजेत्यांना स्मृतिचिन्ह तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना सुप्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले आणि सुप्रसिद्ध अभिनेते सिद्धार्थ जाधव यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देण्यात आले. ज्येष्ठ कवयित्री श्रीमती नीरजा यांच्या हस्ते परितोषिक वितरण करण्यात आले. स्पर्धेत २८ शाळांतील ७५ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. स्पर्धेतील मुलींचा सहभाग लक्षणीय होता. सर्व विद्यार्थी व्यवस्थित तयारी करून आले होते व बहुतेकांनी भाषणासाठी दिलेली चार मिनिटांची कालमर्यादा पाळली. स्पर्धेसाठी ज्योती मालंडकर, अनघा जाधव व विठ्ठल कुसाळे यांनी परीक्षक म्हणून काम पहिले. अर्जुन जगधने, शंकर बळी, मच्छिंद्र बोराडे, साईशंकर ऐवळे, राजश्री साळगे, संतोष शिंदे, विकास माळी, नितांत पेडणेकर, शुभदा निखार्गे, सुनीता देवलवार, राजेंद्र लांजेकर यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

परितोषिक वितरणाच्या प्रसंगी विद्यार्थ्यांना व पालकांना उद्देशून केलेल्या भाषणात कवीयत्री नीरजा म्हणाल्या, ‘कधी संपणार सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा?’ किंवा ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ यासारख्या ज्या विषयांवर बोलताना आज भीती वाटते त्या विषयांवर विचार करायला, बोलायला, विद्यार्थ्यांना, त्यांच्या पालकांना व शिक्षकांना उद्युक्त केल्याबद्दल मी मुंबई जिल्हा अंनिसच्या कार्यकर्त्यांचे आणि केशव गोरे ट्रस्टचे आभार मानते. महाराष्ट्राला प्रबोधनाची परंपरा असून पूर्वी संतांनी, त्यांचे अभंग, कविता तसेच भारूडांतून समाजाचे प्रबोधन केले आहे. विवेक शाबूत ठेवण्यासाठी सारासार विचार करण्याचे आपण विसरतोय की काय? अशी परिस्थिती असताना विवेकजागर करण्याचे काम अंनिस गेले अनेक वर्षे करत आहे. वेगवेगळ्या ठिकाणी अंनिसचे कार्यकर्ते जोमाने तळागाळात कार्य करीत आहेत. ‘कधी संपणार सुशिक्षितांमधील अंधश्रद्धा?’ या विषयाचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, सुशिक्षितांमध्ये अशिक्षितांएवढीच अंधश्रद्धा जोपासली जाते. मुलगी होण्यासाठी जी भ्रूणहत्या केली जाते, त्यात अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांचे प्रमाण जास्त आहे. ‘वैज्ञानिक दृष्टिकोनच भारताला जागतिक महासत्ता बनवेल’ या विषयाचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, चंद्रावर जे यान पाठवले गेले त्याच्या आधी नारळ फोडला गेला. टी. व्ही. वर यज्ञयागाच्या, मंत्रोच्चारांच्या, पूजेच्या, आरतीच्या बातम्या दाखवल्या जात होत्या. हा जो विरोधाभास आहे! एकीकडे सर्व वैज्ञानिक इतकी वर्षे याचे संशोधन करत आहेत, त्याला काहीच किंमत नाही का? तुमच्या मनात हे प्रश्न उभे राहिले का त्यावेळी? मागच्या वेळी जेव्हा ही मोहीम अयशस्वी ठरली तेव्हाही यज्ञ केले गेले होते. असा विचार आपण का करत नाही? नवसाला पावणार्‍या गणपतीला जाणार्‍या लाखोंच्या गर्दीत सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होतात का हो? तुम्ही देवाला सांगितले की, मी अभ्यास केला नाही तरी मला पास कर, तर देव पास करेल यावर तुमचा किंवा तुमच्या पालकांचा तरी विश्वास असतो का? अंनिस नेहमीच सांगत आली आहे की वैज्ञानिक दृष्टिकोन जपा. आपली मुले संशोधनाच्या क्षेत्रात गेली पाहिजेत. माणूस अश्रद्ध कधीच नसतो. त्याची श्रद्धा स्वत:वर, त्यांच्या आई-वडिलांवर, गुरुवर किंवा त्यांच्या विचारधारेवर असू शकते. पण आपण काय करतो तर श्रद्धेचा संबंध धर्माशी जोडतो. प्रश्न विचारायला शिका. पुस्तके वाचा. या देशाची चार्वाकापासूनची परंपरा होती की इथे धर्मचिकित्सा, राजकीय, सामाजिक वास्तवाची चिकित्सा होत होती. आताही तुम्ही प्रश्न विचारले पाहिजेत. मासिक पाळीला विटाळ मानणार्‍या लोकांना सांगा, आज स्त्रियांना मासिक पाळी आहे, म्हणून मानवजातीत वंशसातत्य आहे. मनुष्यप्राणी पृथ्वीवर टिकून आहे. ही एक मातृत्वासाठी आवश्यक असलेली शारीरिक क्रिया आहे. तो विटाळ नाही. ते अपवित्र नाही. त्यावेळी स्त्रीची मनस्थिती काय असते हेही समाज म्हणून समजून घेऊया.

‘खरा तो एकची धर्म’ या विषयाचा उल्लेख करून त्या म्हणाल्या की, आज आपण धर्माच्या नावाखाली हिंसक होत चाललो आहोत. आमचेच लोक इथे राहिले पाहिजेत, हा आमचा देश आहे, आमच्या देशातून निघून जा, अशी विचारधारा वाढत आहे. ‘धूल का फूल’ नामक चित्रपटात वाक्य होते, ‘न तू हिंदू बनेगा, न मुसलमान बनेगा, इंसान की औलाद है इंसान बनेगा|’ आजही समाजात जातीभेद पाळला जातो. दलितांना, स्त्रियांना देवळात प्रवेश नाकारला जातो. सानेगुरुजींचा पंढरपूरचा लढा आठवा! आपली संस्कृती इतर देशांपासून वेगळी का आहे? कारण भारतातील विविध धर्म, पंथ, भाषा, वेशभूषा आहेत. ओणमला मुंबईतील इतर भाषिक स्त्रियादेखील ओणमच्या साड्या घालून वावरतात. भाषणाचा समारोप करताना नीरजा म्हणाल्या की आज येथे खूप सुंदर, परखड भाषणे झाली. पारितोषक महत्वाचे नाही, आपले विचार मांडणे महत्वाचे आहे.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]