देवदत्त कदम -

भारतीय समाजातील अंत्यज संबोधल्या गेलेल्या समूहाला जातिव्यवस्थेने निर्माण केलेल्या अस्पृश्यतेचे ‘चटके’ सोसावे लागले. या समाजघटकांवर होणारा अन्याय दूर करून त्यांना ‘माणूस’ म्हणून समाजात प्रतिष्ठा मिळावी यासाठी आधुनिक भारतात अनेक व्यक्तींनी आयुष्यभर प्रयत्न केले. बडोद्याच्या महाराजा सयाजीरावांनी आपल्या ६४ वर्षांच्या कारकिर्दीत अस्पृश्योद्धाराचा ‘महायज्ञ’ आपल्या संस्थानात राबवून भारतीय अस्पृश्योद्धार चळवळीचा ‘पाया’ रचला. सयाजीरावांनी दिलेल्या खंबीर पाठबळामुळेच विठ्ठल रामजी शिंदे व बाबासाहेब आंबेडकर आपले अस्पृश्योन्नतीचे कार्य ‘उभा’ करू शकले. परंतु सयाजीरावांकडून प्रेरणा, आर्थिक सहकार्य आणि पाठबळ घेऊन बाबासाहेबांच्या कार्याला भक्कम पार्श्वभूमी तयार केलेले विठ्ठल रामजी शिंदे सयाजीरावांप्रमाणेच महाराष्ट्रात दुर्लक्षित राहिले.
२३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे जन्मलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांचे शिक्षण गंगाधर भाऊ मस्के यांच्या डेक्कन मराठा असोसिएशन आणि सयाजीराव या दोघांच्या शिष्यवृत्तीवर झाले. ज्या डेक्कन मराठा असोसिएशनने पहिल्या टप्प्यात शिंदेंना शिष्यवृत्ती दिली त्या संस्थेला सयाजीरावांनी १८८५ ते १९३९ अशी ५४ वर्षेअखंडपणे आर्थिक पाठबळ दिले. ही मदत ५ लाख २९ हजार ५५६ रु. इतकी होती. आजच्या रुपयाच्या दरात या रकमेचे कमीतकमी मूल्य ७२ कोटी ४५ लाखांहून अधिक होईल. बाबासाहेबांप्रमाणेच अगदी पदवी शिक्षणापासूनच अप्रत्यक्षपणे महाराजांची मदत शिंदेंना मिळाली. परंतु गंगारामभाऊ म्हस्केंची शिष्यवृत्ती पुरेशी नसल्याने बी. ए. पदवी शिक्षणखर्चाच्या विवंचनेत असणार्या विठ्ठल रामजी शिंदेंनी १८९६ मध्ये लक्ष्मणराव माने व खासेराव जाधव यांच्या मदतीने सयाजीरावांची भेट घेतली. या भेटीत सयाजीरावांनी त्यांना दरमहा २५ रु. स्कॉलरशिप मंजूर केली. ही स्कॉलरशिप देताना शिक्षणपूर्तीनंतर विठ्ठल रामजी शिंदेंनी बडोद्यात नोकरी करावी अथवा स्कॉलरशिपची रक्कम परत करावी, अशी अट त्यांना घालण्यात आली. सयाजीरावांनी ही स्कॉलरशिप दिल्यानंतर डेक्कन मराठा असोसिएशनकडून शिंदेंना दिली जाणारी १० रु. ची मदत बंद करण्यात आली. सयाजीरावांनी विठ्ठल रामजी शिंदेंना पदवी आणि एल्एल. बी. शिक्षणासाठी ५ वर्षे एकूण सुमारे १५०० रु.ची मदत केली. यानंतर सयाजीरावांनी शिंदेंना ऑक्सफर्ड येथील तुलनात्मक धर्म अभ्यासासाठी आधीची स्कॉलरशिप देताना घातलेली बडोद्यातील नोकरीविषयीची अट बाजूला ठेवून पुन्हा १५०० रु. प्रवास खर्च दिला. यामध्ये सामाजिक कार्य करण्यासाठी जाणीवपूर्वक मनुष्यबळ तयार करण्याचा महाराजांचा उद्देश होता. महर्षी शिंद्यांप्रमाणेच श्रीधर व्यंकटेश केतकर आणि बाबासाहेब आंबेडकर यांनाही शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बडोद्यात नोकरी न करण्याचा पर्याय स्वीकारण्याबरोबरच त्यांच्यावर झालेला शिक्षणाचा खर्च माफ करण्याचा उदारपणा महाराजांनी दाखवला होता हे विसरता येणार नाही.
विठ्ठल रामजी शिंदे परदेशाहून परत येण्याआधी सयाजीरावांनी त्यांना पत्राद्वारे भारतात आल्यानंतर सर्वप्रथम आपली भेट घेण्यास सांगितले. त्याप्रमाणे भारतात आल्यानंतर ऑक्टोबर १९०३ मध्ये शिंदेंनी बडोद्यात सयाजीरावांची भेट घेतली. सयाजीरावांनी त्यांना बडोद्यातील अस्पृश्यांसाठीच्या शाळांची तपासणी करून सूचना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे विठ्ठल रामजी शिंदेंनी या शाळांची तपासणी करून प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी पारंपरिक उद्योगधंदे करण्यास नाखूष असल्याने त्यांना नोकर्या उपलब्ध करून देण्याची सूचना मांडली. या सूचनेवरील सयाजीरावांची प्रतिक्रिया सांगताना शिंदे म्हणतात, धोरणी महाराजांनी लोकमत अनुकूल नसल्याने तूर्त हे शक्य नाही असे सांगितले; पण स्कॉलरशिप देऊन पुढील शिक्षणाची सोय करण्याचे कबूल केले आणि त्याप्रमाणे तशी व्यवस्था पण झाली. त्या वेळी अस्पृश्योद्धारासाठी सयाजीरावांनी राबवलेले शैक्षणिक उपक्रम पाहून ते इतके प्रभावित झाले की ब्राह्मो समाजाच्या कामाबरोबर त्यांनी देश पातळीवर अस्पृश्य उद्धाराची संस्थात्मक चळवळ उभी करण्यासाठी आपले जीवन समर्पित केले.
पुढे ४ वर्षांनंतर १९०७ मध्ये सयाजीरावांनी बडोद्यात न्यायमंदिराच्या दिवाणखान्यात विठ्ठल रामजी शिंदेंचे ‘अस्पृश्योद्धार’ या विषयावरील भाषण आयोजित केले होते. ते भाषण ‘बहिष्कृत भारत’ या मथळ्याखाली ‘मनोरंजन’ मासिकाच्या डिसेंबर १९०८ च्या अंकात प्रकाशित झाले. पुढे महाराजांच्या आज्ञेने हेच व्याख्यान ‘बहिष्कृत भारत’ या स्वतंत्र पुस्तक रूपाने प्रसिद्ध झाले. पुढे २० वर्षांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘बहिष्कृत भारत’ याच नावाचे पाक्षिक १९२७ मध्ये सुरू केले. तर डॉ. आंबेडकरांच्या १९३६ मधील ‘Annihilation Of Caste’ या जगप्रसिद्ध भाषण-निबंधाची पूर्वतयारी ठरणारा सयाजीरावांचा ‘The Depressed Classes’ हा ऐतिहासिक इंग्रजी निबंध १९०९ मध्ये ‘Indian Review’ या मासिकाच्या डिसेंबरच्या अंकात प्रसिद्ध झाला होता. त्या वेळी बाबासाहेब पदवीच्या दुसर्या वर्षात शिकत होते. विठ्ठल रामजी शिंदेंच्या ‘बहिष्कृत भारत’ या पुस्तिकेच्या एक हजार प्रती महाराजांनी विकत घेऊन बडोद्यात वाटल्या. हा विठ्ठल रामजी शिंदेचा या विषयावरील पहिला मराठी निबंध होता. हा निबंध म्हणजे पुढे शिंदेंच्या ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ (१९३३) या प्रश्नाची समाजशास्त्रीय चर्चा करणार्या मराठीतील पहिल्या ग्रंथाचा पाया होता. दुर्दैवाने महाराजांच्या अन्य कार्याप्रमाणे ही कृतीसुद्धा दुर्लक्षित राहिली.
संपूर्ण भारतात सर्वप्रथम विठ्ठल रामजी शिंदेंनी अस्पृश्योद्धाराचे संस्थात्मक काम उभे केले. विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या अगोदर शिंदेंनी देशपातळीवर सुरू केलेल्या या कार्यामागे सयाजीरावांची प्रेरणा होती. सयाजीरावांनी बडोद्यात अगदी १८८२ पासून सुरू केलेले काम अभ्यासण्याची संधी महर्षी शिंद्यांना १९०३ मध्ये मिळाली. हा अनुभव त्यांना या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात आणून देणारा ठरला. एका अर्थाने विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवनातील हा सर्वांत महत्त्वाचा ‘टर्निंग पॉईंट’ होता.
या संदर्भात शिंदे आपल्या आत्मचरित्रात म्हणतात, ‘१८९१-९२ साली बडोदा, अमरेली, पाटण आणि नवसारी येथे प्रत्येक ठिकाणी अस्पृश्य मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढून त्यांच्या जेवणाची व राहण्याची सोय केली गेली. कपडेलत्ते, पाट्यापेन्सिली वगैरेही पुरविली. ह्यानंतर कित्येक वर्षेह्या प्रयोगाला दुष्काळ व प्लेग ही विघ्ने आली. तरी देखील महाराजांनी खर्चात बचत न करता बडोदे भागात रु. ४० च्या व इतर भागात रु. २५ च्या शिष्यवृत्त्या ठेवल्या व कसेही करून १९०० सालापासून पुढे काही वर्षेशाळांतून विद्यार्थ्यांची संख्या १०० पासून १५०० पर्यंत राहील असे केले. एकंदरीत ह्या थोर पुरुषाच्या अंत:करणात ह्या हतभागी लोकांचा ध्यास सतत लागला होता, हे माझ्या ध्यानात येऊन चुकले. इतकेच नव्हे, तर या महत्त्वाच्या विषयासंबंधी माझ्या स्वत:च्या विचारांना नवीन प्रोत्साहन मिळून ब्राह्मो समाजाच्या अखिल भारतातील माझ्या प्रचारकार्याबरोबर या लोकांची निरनिराळ्या प्रांतांतील स्थिती स्वत: डोळ्याने नीट निरखून अजमाविण्याची मला प्रेरणा झाली.’ शिंदे यांनी केलेल्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या ऐतिहासिक कार्याची प्रेरणा सयाजीरावच होते याचा पुरावा हे स्वगत देते.
विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याला सयाजीरावांनी सातत्याने सक्रिय पाठिंबा दिला. १९०४ मध्ये मुंबई येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉँग्रेसच्या अधिवेशनात सामाजिक परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते. याच परिषदेत रामकृष्ण भांडारकरांच्या अध्यक्षतेखाली होणार्या धर्म परिषदेसाठी विठ्ठल रामजी शिंदेंनी सयाजीरावांना निमंत्रित केले होते. १९०९ मध्ये विठ्ठल रामजी शिंदे सेक्रेटरी असणार्या भारतीय एकेश्वरी धर्म परिषदेच्या लाहोर अधिवेशनास सयाजीरावांनी आपला प्रतिनिधी पाठवला होता. १९१४ मध्ये शिंदे जागतिक एकेश्वरवादी धर्म परिषद घेण्याच्या प्रयत्नात होते. त्या वेळी त्यांनी महाराजांची भेट घेऊन चर्चा केली. त्या वेळी महाराजांनी शिंदेंना या परिषदेसाठी सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. परंतु याच वेळी पहिले जागतिक महायुद्ध सुरू झाल्याने ही परिषद झाली नाही. २३ व २४ मार्च १९१८ रोजी विठ्ठल रामजी शिंदेंनी मुंबई येथे भरवलेल्या दुसर्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेचे अध्यक्ष सयाजीराव होते. या परिषदेत भारतातील पहिला अस्पृश्यता निवारण ठराव मांडला होता. या ठरावावर उपस्थित मान्यवरांपैकी शंभरहून अधिक लोकांनी सह्या केल्या. त्यामध्ये पहिली सही करणारी व्यक्ती सयाजीराव गायकवाड होते.
विठ्ठल रामजी शिंदेंनी स्थापन केलेल्या ‘डिप्रेस्ड् क्लासेस मिशन’ या संस्थेचीदेखील सयाजीरावांनी सातत्याने खंबीर ‘पाठराखण’ केली. सप्टेंबर १९०९ मध्ये डिप्रेस्ड् क्लासेस मिशनच्या पुणे शाखेच्या शाळांच्या बक्षीस समारंभाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिलेल्या सयाजीरावांनी या संस्थेला एक हजार रुपयांची देणगी दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम २७ लाख ७२ हजार रु. हून अधिक भरते. या कार्यक्रमानंतर पुणे येथील महार समाजाचे प्रमुख पुढारी रा. शिवराम जानबा कांबळे व रा. श्रीपतराव थोरात या दोघांना सयाजीरावांनी बडोद्यास खास आमंत्रित केले. बडोदा भेटीवेळी त्यांचा योग्य सत्कार करून राजमहालात सयाजीरावांनी त्यांच्याबरोबर आपल्या टेबलावर सहभोजन केले. तर १८ ऑक्टोबर १९०९ रोजी मुंबई येथील डिप्रेस्ड् क्लासेस मिशनच्या वाढदिवस समारंभाचे सयाजीराव अध्यक्ष होते. या वेळी महाराजांनी डिप्रेस्ड् क्लासेस मिशनला दोन हजार रुपयांची देणगी दिली. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ५५ लाख ४५ हजार रु. हून अधिक भरते. या देणगीच्या व्याजातून डिप्रेस्ड् क्लासेस मिशनच्या शाळांतील विद्यार्थ्यांना ‘दमाजीराव गायकवाड स्कॉलरशिप फंड’ या नावाने शिष्यवृत्त्या चालू करण्यात आल्या. त्याचबरोबर सयाजीरावांनी डिप्रेस्ड् क्लासेस मिशनच्या वसतिगृहातील रा. भटकर नावाच्या महार विद्यार्थ्याला मॅट्रिक परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर कॉलेजातील पुढील शिक्षणासाठी दरमहा २५ रुपयांची स्कॉलरशिप दिली. विठ्ठल रामजी शिंदेंच्या अस्पृश्योद्धाराच्या संस्थात्मक कार्याला सयाजीरावांचा असलेला भक्कम पाठिंबा यातून अधोरेखित होतो. विशेष बाब म्हणजे, डिप्रेस्ड् क्लास मिशनच्या कार्याला १९०६ पासून प्रार्थना समाजानेसुद्धा सक्रिय पाठिंबा दिला होता.
१८८५ मध्ये स्थापन झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने भारताच्या सामाजिक-राजकीय परिवर्तनात कळीची भूमिका बजावली. १९१५ मध्ये आफ्रिकेतून भारतात आलेल्या महात्मा गांधींनी काँग्रेसच्या माध्यमातून अस्पृश्यता निवारणासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले हे आपण जाणतोच. परंतु महात्मा गांधींच्या या प्रयत्नांना पूरक पार्श्वभूमी शिंदेंनी आधीच तयार करून ठेवली होती. राष्ट्रीय काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न हाती घ्यावा यासाठी विठ्ठल रामजी शिंदेंनी १९०७ पासून राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात ठराव मांडण्याचा प्रयत्न केला होता. १९०७ ते १९१७ या दहा वर्षांतील शिंदेंच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर १९१७ च्या कलकत्ता येथील काँग्रेसच्या अधिवेशनात अस्पृश्यता निवारणाचा ठराव पास करण्यात आला. राष्ट्रीय काँग्रेसने अस्पृश्यता निवारणाचे कार्य हाती घ्यावे यासाठी तब्बल १० वर्षेविठ्ठल रामजी शिंदेंनी केलेल्या ‘धडपडी’चेच हे फलित होते.
विठ्ठल रामजी शिंदेंनी अशीच महत्त्वपूर्ण भूमिका धर्मानंद कोसंबी यांच्या आयुष्यामध्ये बजावली. महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आणि पाली भाषेच्या प्रसारात धर्मानंद कोसंबी यांचे स्थान अन्योन्य आहे. कोसंबींच्या विनंतीवरून १९१२ मध्ये सयाजीरावांनी फर्ग्युसन कॉलेजमधील पाली भाषेच्या विद्यार्थ्यांसाठी दर महिन्याला पंधरा रुपयांच्या दोन आणि दहा रुपयाच्या दोन अशा चार शिष्यवृत्त्या सुरू केल्या. या शिष्यवृत्त्यांमुळेच फर्ग्युसन कॉलेज पाली भाषा सुरू करू शकले. कोसंबींना ही नोकरी मिळवून देण्यामध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचा मोठा वाटा होता. महाराष्ट्रातील बौद्ध धर्म आणि पाली भाषा प्रसाराचा हा इतिहास आज आपण समजून घेणे आवश्यक आहे.
संस्थानातील जनतेचे विविध विषयांचे आकलन परिपूर्ण व्हावे या उद्देशाने ग्रंथ निर्मितीला प्रोत्साहन देणार्या सयाजीरावांनी अनेक लेखकांना राजाश्रय दिला. बडोद्यातील ‘श्रीमंत सयाजीराव गायकवाड पारितोषिक समिती’च्या वतीने नोबेल पुरस्काराच्या धर्तीवर भारतातील लेखक आणि समाजसेवकांना पुरस्कार दिला जात होता. या पुरस्काराच्या मानकर्यांनी बडोद्यात एक आठवडा येऊन संस्थानचे पाहुणे म्हणून राहावे आणि एक-दोन व्याख्याने द्यावीत असा नियम होता. १९३२-३३ साली एक हजार रुपये रोख रकमेचा हा पुरस्कार विठ्ठल रामजी शिंदेंना देण्यात आला. याच वर्षी एक वर्षासाठीची तैनात म्हणून दरमहा शंभर रु. असे वार्षिक १२०० रु. व पुरस्काराचे एक हजार रुपये असे एकूण २२०० रु. महर्षी शिंदेंना या वेळी मिळाले. आजच्या रुपयाच्या मूल्यात ही रक्कम ४७ लाख ५८ हजार २६९ रु. इतकी भरते. पुरस्कार स्वीकारण्यासाठी बडोद्यास गेल्यानंतर शिंदेंनी ‘अस्पृश्यतेचा प्रश्न’ आणि ‘समाजसुधारणा’ या विषयांवर ३ व्याख्याने दिली. यातील १८ जानेवारी १९३३ रोजी बडोदा कॉलेजच्या हॉलमध्ये झालेल्या पहिल्या व्याख्यानाला सयाजीराव उपस्थित होते. विठ्ठल रामजी शिंदे यांचे जातधर्मविषयक संशोधन आणि अस्पृश्यता निवारणासाठीच्या सामाजिक पातळीवरील संस्थात्मक कार्याचा विचार करता २५ ते २७ डिसेंबर १९३४ दरम्यान बडोद्यात भरलेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या तत्त्वज्ञान आणि समाजशास्त्र या सत्राचे अध्यक्ष म्हणून त्यांची झालेली निवड सार्थ ठरते.
२० व्या शतकाच्या पूर्वार्धात झालेली पंजाबराव देशमुखांच्या नेतृत्वाखालील अमरावती येथील अंबाबाई मंदिर (१९२७) व डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील पर्वती टेकडी (१९२९) आणि काळाराम मंदिर (१९३०) प्रवेशासाठीची आंदोलने महाराष्ट्रभर गाजली. परंतु १९२४ मध्ये त्रावणकोर संस्थानातील व्हायकोम येथे विठ्ठल रामजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाबाबत पुरोगामी महाराष्ट्र ‘अज्ञानी’ राहिला. याउलट महाराजा सयाजीरावांनी १८८३ मध्येच आपले खाजगी खंडेरायाचे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले होते. १९२५ मध्ये सयाजीरावांनी अमरेली येथील सार्वजनिक मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केले. तर १९३२ मध्ये सयाजीरावांनी कोणत्याही आंदोलनाशिवाय बडोदा संस्थानातील सर्व सरकारी मंदिरे अस्पृश्यांसाठी खुली केली. मंदिर ‘प्रवेशा’चा हा अज्ञात इतिहास आजच्या समाजाने समजून घेतला तर अस्पृश्यता निर्मूलन चळवळीविषयीचे आकलन अधिक परिपूर्ण होण्यास मदत होईल.
कोणत्याही आंदोलनाशिवाय जनतेला मंदिर प्रवेशाचा हक्क बहाल करणार्या सयाजीरावांनी सातत्याने आपल्या भाषणांमधून धर्म आणि जात यांच्या वस्तुनिष्ठ आकलनाची आवश्यकता स्पष्ट केली. या संदर्भातील अनेक ग्रंथांचे अनुवाद व स्वतंत्र ग्रंथ लेखन यासाठी अगदी १८९५ पासून सयाजीराव प्रयत्नशील होते. याबाबत विठ्ठल रामजी शिंदेंनी नोंदवलेली एक आठवण खूपच बोलकी आहे. शिंदे म्हणतात, ‘आर्य-द्रविड-वाद या संशोधन विषयाकडे माझे लक्ष लागले होते. इंदूर, बडोदा वगैरे संस्थानातून आणि म्हैसूर वगैरेच्या युनिव्हर्सिट्यांतून कागदपत्रांचा पुरावा मिळवून हिंदुस्थानच्या पुरातन इतिहासाची सामग्री मिळवण्याचा प्रयत्न चालला होता. त्या वेळी बडोदा येथे एक साहित्य संमेलन झाले. त्याला हजर राहून श्रीमंत सयाजीराव महाराजांची मी प्रत्यक्ष भेटही घेतली होती. मी बडोद्यास कायमचा जाऊन राहात असेन तर बडोद्याची मोठी सेंट्रल लायब्ररीच नव्हे, तर संस्थानचे सर्व नवे-जुने कागदपत्र शोधून पाहण्याचा पूर्ण अधिकार महाराजांनी मला देऊ केला होता. भारतात तोपर्यंत जाती प्रश्नावर फारसे संशोधन झाले नव्हते. या पार्श्वभूमीवर जातीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर संशोधन करू पाहणार्या शिंदेंना संपूर्ण सहकार्याच्या माध्यमातून प्रोत्साहन देण्याचे सयाजीरावांचे धोरण आज स्वतःला ‘संशोधनाची केंद्रे’ संबोधणार्या व्यक्ती आणि संस्थांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. श्रीधर व्यंकटेश केतकरांच्या मराठी ज्ञानकोशासाठी १९२३ मध्ये लिहिलेली ‘अस्पृश्यता निवारणाचा भारतीय इतिहास’ नोंद हे विठ्ठल रामजी शिंदेंचे अत्यंत महत्त्वाचे लेखन आहे. या नोंदीत त्यांनी संपूर्ण भारतातील अस्पृश्यांच्या खानेसुमारीचा आधार घेऊन आधुनिक काळातील अस्पृश्यता उद्धाराची पूर्वपीठिका वस्तुनिष्ठपणे मांडली आहे. या नोंदीत भारतातील अस्पृश्योद्धाराच्या कामाचा इतिहास सांगताना शिंदेंनी महात्मा फुले, शशिपाद बंडोपाध्याय यांच्यानंतर तिसरा क्रमांक महाराजा सयाजीराव गायकवाड यांना दिला होता. हा क्रमांक कालानुक्रमे होता. ही दखल घेत असताना सयाजीरावांच्या कार्याच्या परिणामकारकतेबाबत शिंदे म्हणतात, कार्याच्या प्रमाणाच्या व सिद्धीच्या दृष्टीने पाहताना वरील दोघांपेक्षा महाराजांचे काम इतके विस्तीर्ण व परिणामकारक झाले आहे की, या तिघांच्या कार्याची तुलना करणेच व्यर्थ आहे. भारतातील अस्पृश्यता निवारणविषयक कार्याला सयाजीरावांनी वेळोवेळी केलेल्या मदतीविषयी शिंदे ‘कृतज्ञ’ होते. सयाजीरावांनी स्वत:च्या संस्थानात अस्पृश्यता निवारणासाठी केलेले प्रयत्न आणि भारतभरातील व्यक्ती आणि संस्थांना केलेले साहाय्य यांचे महत्त्व विठ्ठल रामजी शिंदेंनी आपल्या नोंदीत अचूकरीत्या अधोरेखित केले आहे.
सयाजीरावांच्या अस्पृश्यता निवारण कार्याच्या गौरवार्थ १९२१ मध्ये परोपकारी सभा व आर्य समाजाने अस्पृश्यांसाठीच्या कार्यासाठी सयाजीरावांना ‘पतितपावन’ ही पदवी दिली. ९ फेब्रुवारी १९३३ रोजी बडोदा येथे म्युनिसिपालिटीतर्फे देण्यात आलेल्या मानपत्र समारंभात सयाजीरावांनी अस्पृश्यतेची उत्पत्ती आणि तिचे स्वरूप यावर भाषण केले. १९३७ मध्ये लंडनमधून प्रकाशित झालेल्या आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने सयाजीराव महाराजांच्या हयातीत प्रकाशित केलेल्या चरित्र ग्रंथाचे लेखक स्टॅनले राईस यांच्या ‘हिंदू कस्टम्स अँड देअर ओरिजिन्स’ या ग्रंथाला लिहिलेल्या प्रस्तावनेत सयाजीरावांनी अस्पृश्यतेला आपल्या ‘प्रगतीच्या इतिहासावरील डाग’ म्हटले आहे. राईस यांनी हा ग्रंथ महाराजांना अर्पण केला आहे. आपल्या कारकिर्दीत सयाजीरावांनी केलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला हा ‘अनोखा’ सन्मान होता.
अस्पृश्योद्धारासाठी राबणार्या अनेक व्यक्ती आणि संस्थांप्रमाणेच विठ्ठल रामजी शिंदे यांच्या एकूण सार्वजनिक जीवनात सयाजीरावांनी केलेली ‘पाठराखण’ ही वटवृक्षाच्या ‘आश्वासक’ सावलीसारखी होती. सयाजीरावांचे स्वत:च्या आयुष्यातील स्थान अधोरेखित करताना विठ्ठल रामजी शिंदे म्हणतात, मी महाराजांकडून उपकृत झालेला मनुष्य आहे. आजकाल भरत खंडात अस्पृश्यता निवारणार्थ चळवळ देशभर फोफावली आहे, तिची पाळंमुळं आणि धुरा महाराजांच्याच खांद्यावर आहे. अस्पृश्योद्धाराची हिंदुस्थानातील मुहूर्तमेढ ह्या खंबीर पुरुषाने धडाक्यासरशी जी रोवली तिचा पुढे विस्तार होत गेला. सयाजीरावांनी दिलेल्या खंबीर पाठिंब्यामुळे विठ्ठल रामजी शिंदे आपले अस्पृश्यता निवारणासाठीचे संस्थात्मक कार्य उभे करू शकले. त्यामुळेच १९३३ मध्ये विठ्ठल रामजी शिंदेंनी स्वतःचा ‘भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न’ हा महत्त्वपूर्ण ग्रंथ कृतज्ञतापूर्वक सयाजीरावांना अर्पण केला होता.
अस्पृश्योद्धाराच्या ध्येयाने ‘झपाटलेले’ विठ्ठल रामजी शिंदे कुटुंबासह महार वस्तीत जाऊन राहिले. त्यांच्या या कृतीमुळे मराठे त्यांना ‘महार मराठा’ म्हणत तर महार त्यांना ‘मराठा’ म्हणत. दोन्ही समाजांनी उपेक्षिलेल्या विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाची दखल महाराष्ट्राने घेतली नाही. त्यांच्या कार्यावर संशोधनात्मक आणि परिपूर्ण असा एकही ग्रंथ इंग्रजीत नाही. मराठीत त्यांच्या कार्यावरील काही प्रासंगिक लेखन उपलब्ध आहे. परंतु ते शिंदेंना न्याय देणारे नाही, ही अतिशय वेदनादायी बाब आहे. विठ्ठल रामजी शिंदेंचे महाराजांशी असणारे नाते अस्पृश्यता निर्मूलनाविषयक कामाने अधिक घट्ट झाले होते. सयाजीराव आणि महर्षी शिंदे यांच्याइतके अस्पृश्यता उद्धाराचे काम भारतात दुसर्या कोणाकडूनही झालेले नाही. परंतु अस्पृश्यता उद्धाराच्या इतिहासाने आजवर या दोघांबाबत ‘मौन’ बाळगले. म्हणूनच आज विठ्ठल रामजी शिंदेंच्या पुण्यतिथीदिनानिमित्त या ‘दुर्लक्षित’ इतिहासाचे चिंतन नवी दृष्टी देऊ शकते.
लेखक संपर्क ः ८६९८६६८८०२