राहूल विद्या माने - 8208160132
– अंनिस विवेक जागर कार्यक्रमात कलाकारांचे चिंतन
शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त “विवेक जागर” कार्यक्रम महाराष्ट्र अंनिसतर्फे साने गुरुजी स्मारक, पुणे येथे १९ ऑगस्ट २०२३ रोजी आयोजित केला गेला होता. यामध्ये दोन प्रहसन नाटिका सादर करण्यात आल्या. ‘व्हॉटसअॅप माध्यमातून पसरणारी फेक न्यूज, अंधश्रद्धा, दुष्प्रचार तसेच आपल्या समस्यांसाठी बुवा-बाबांवर अवलंबून राहणारी आपली मानसिकता’ यावर आधारित पहिली नाटिका होती. दुसरी नाटिका ही ‘वैज्ञानिक दृष्टिकोन व छद्मविज्ञान तसेच श्रद्धा व अंधश्रद्धा’ यातील फरक समजावून सांगणारी होती. प्रचंड व उत्स्फूर्त अशा प्रतिसादाने गाजलेल्या या नाटिकानंतर या कलाकारांनी आपल्या भावना मोकळेपणाने व्यक्त केल्या.
दिग्दर्शक सचिन गोस्वामी म्हणाले, “आम्हाला भाषणाची सवय नाही. आम्हाला जे बोलायचं ते कलेतून बोलायचं, असा आमचा कलाकारांचा स्वभाव आहे. निर्भीडपणे, आजूबाजूची परिस्थिती काहीही असो, सतत घुसमटत राहायचं नाही असे आम्हाला वाटते. त्यामुळे आम्ही विविध विचारांशी जोडले जातो. समाजाने आमच्यावर केलेल्या उपकारानंतर आम्हीसुद्धा काहीतरी करावे असे नेहमी आम्हाला वाटत राहते. समाज जर आपुलकीने आम्हाला वागवत असेल तर त्याच समाजातील विसंगती आम्ही दाखवल्या तर समाज त्यावर विचार करेल, असा विश्वास वाटल्यानेच आम्ही हे करू शकतो. कलावंतांची जबाबदारी वाढते याची जाणीव आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा मी नोंदणी केलेला सदस्य नाही पण या विचाराशी पहिल्यापासून जोडले गेलेलो आहे. माझे लहानपण धुळे सारख्या ठिकाणी गेले. आमच्या घरी श्रद्धाळू वातावरण होते, पंचांग पाहिलं जायचं. त्यावेळी मला जाणवत होतं की आमच्या घरच्या विशेषतः आईच्या कर्मकांडामुळे आमच्या घरची परिस्थिती बदलत नव्हती. पण जो काही बदल होत होता तो केवळ आमच्या आई-वडिलांच्या परिश्रमामुळे होत होता. आईला हे लवकर उमगलं आणि ते कर्मकांड थांबलं. वडील हे नेहमी तर्क शिकवायचे. वडिलांचे एक वाक्य होते, ‘ज्याचा हात तुटेल, त्याच्या गळ्यात पडेल’. माझ्या लहानपणी मला सायकलवरून स्मशानभूमीजवळून घरी येताना भुताचा अनुभव आल्याचा भास झाला होता. पण त्यावर थोडा विचार केल्यानंतर मी त्यातून बाहेर आलो. डॉ. दाभोलकर सांगायचे की तुम्ही कार्यकारणाचा विचार करा. तर्क करा तर भुते जवळ येणार नाहीत. भूत तर्काला घाबरते. त्या घटनेनंतर माझ्या मनातून भूत निघून गेले. हळूहळू राष्ट्र सेवा दल आणि छात्रभारतीच्या सहवासात आल्यानंतर सगळ्या चळवळींकडे ओढला गेलो. पुढे डॉ. दाभोलकरांची ‘खुपते तिथे दुखते’ या मालिकेसाठी मुलाखत घेण्याचा योग आला होता. त्यावेळी अडीच-तीन तास त्यांना ऐकले आणि त्यांची पुस्तके त्यानंतर वाचली. दाभोलकर सगळे घरदार सोडून काम करत आहेत याची जाणीव झाल्यानंतर आपण काहीच करत नाही याची लाज वाटली. त्यामुळे जसं जमत गेलं तसं काम करत गेलो. आता परिस्थिती इतकी धक्कादायक झाली आहे की, चळवळीच्या कार्यक्रमाला जाणं हे साहसाचे ठरत आहे आणि हे दुःखद आहे. कलाकार समाजाचाच भाग आहे. त्यामुळे जे काही समाजावर परिणाम होतात त्याने कलाकार प्रभावित होतो. त्यामुळे समाजातील वैगुण्यावर कलाकार भाष्य करत असेल तर त्यांचे ते कर्तव्यच आहे.”
सचिन मोटे म्हणाले, “या दोन्ही नाटिका सर्वांनी मिळून केल्या. पहिल्या नाटिकेचे लेखन समीर चौगुले यांनी तर दुसर्या नाटिकेचे लेखन विनायक पुरुषोत्तम याने केले होते. मी सातार्याचा असल्यामुळे आपण दाभोलकरांच्या गावचा आहे याचा मला लहानपणापासून अभिमान आहे. स्मशानातील भुते, डोळ्यातून दगड काढणारे बुवा असतील या ना त्या मार्गाने डॉ. दाभोलकरांचे काम कानावर येत होते. त्यामुळे त्या चळवळीबद्दल एक सहानुभूती होती. माझ्या वडिलांना वाचन आवडायचं. त्यामुळे डॉ. दाभोलकरांच्या खूप गोष्टी मनावर बिंबवल्या गेल्या. अंधश्रद्धेवर काही विनोद करायचा म्हटलं तर कोण कधी दुखावलं जाईल, याचा नेम नसतो. अंधश्रद्धा निर्मूलन हे दिवसेंदिवस अधिक किचकट आणि आव्हानात्मक झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान आल्यावर अंधश्रद्धा थांबेल असं वाटत होते. आपण शाळेत निबंध लिहितो की एकविसावे शतक हे विज्ञानाचे असणार आहे. पण विज्ञान-तंत्रज्ञानाचा सगळ्यात जास्त फायदा हा अंधश्रद्धा पसरवणार्या लोकांनी घेतला आहे. सामाजिक विषमता वाढली आहे. गरीब माणसाच्या हातात मोबाईल आला आहे. कित्येक वर्षे आपण म्हणत आहोत की, आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे शासनाकडे असली पाहिजे. असं होताना दिसत नसल्यामुळे हवालदिल झालेली माणसे बाबा-बुवांकडे जातात. आपण ही विषमता कशी दूर करणार? दूरचित्रवाणी हे सुद्धा भांडवलशाहीचे आधुनिक रूप आहे आणि कित्येक वर्षे याचा भाग आहोत. मग याच माध्यमातून काही तरी सामाजिक संदेश असलेले इंजेक्शन देण्याचा प्रयत्न आम्ही करतो. यापुढे जगाला कोणी वाचवणार असेल तर संत तुकाराम, गाडगेबाबा आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार! यांनाच कळलं होतं की समाजाला कसं सांगितलं की कळेल. आपल्याला आता उत्तरे शोधण्यासाठी या लोकांचा आधार घ्यावा लागणार आहे. अलीकडे तव्यावर बसणार्या बाबाचा पर्दाफाश तुम्ही केला आणि नंतर सगळेजण ते कसं खोटं आहे, हे स्वतः तसं करून सिद्ध करून दाखवू लागले. त्यामुळे यापुढील काळात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच आपल्या सगळ्यांचा आधार आहे. थोडासा वाटा उचलायला मिळावा म्हणून आम्ही इथं आलो.”
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, “नरेंद्र काकांच्या खूनाला दहा वर्षे झाल्यानिमित्ताने हे हास्यकलाकार आले याचे प्रचंड कौतुक आहे. ही आपली हास्यजत्रेची प्रिय मंडळी प्रचंड लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. महाराष्ट्रात हजारो लोकांची हास्यजत्रा पाहण्याच्या ठराविक वेळा आहेत. आताच हे सर्वजण अमेरिकेच्या दौर्यावरून आली आहेत आणि तिकडे लोकांनी तासनतास वाट पाहून यांच्या कार्यक्रमांना प्रचंड प्रतिसाद दिला. तर करिअरच्या या टप्प्यावर अशा कार्यक्रमाला येण्याचा धोका कुणी पत्करत नाही. पण या लोकांनी त्याची चिंता केली नाही. कलाकार म्हणून आमच्यावर प्रचंड दडपणे असतात. तरीही अंधश्रद्धा विषयवार नाटिका सादर करण्याचे धाडस दाखवलं यासाठी त्यांचे कौतुक. या दोन्ही नाटिकांतील विषय खूप वेगवगेळे होते. त्यांच्या स्वच्छ विचाराने हे दाखवून दिले की परिवर्तनाचा विचार किती महत्त्वाचा असतो. मला जर मुक्ता आणि नरेंद्र काका भेटले नसते तर मला पण या कामाचे महत्त्व कळले नसते. ज्या काळात नरेंद्रकाकांची चळवळ चालू होती, तेव्हा माध्यमे एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती. त्यांनी एकेकाचे बोट पकडून, संवाद साधून काम पुढे नेले. मला व्यक्तिशः सणवार कधीच चुकीचे वाटायचे नाही. मला शिक्षणात पिछेहाट होऊ नये असं माझ्या भावाचे सांगणे असायचे. एकदा मला कमी मार्क पडल्यावर मी त्याचा असा बचाव केला की “मी खरंतर दररोज गणपतीला जायचे तरी सुद्धा मला कमी पडले.” यावर भावाने राग व्यक्त केला की एका मूर्तीवर कशाला अवलंबून राहायचं? मला देवासमोर दिवा लावला की बरे वाटते याचे काय करायचे असं मी नरेंद्रकाकांना विचारायचे तेव्हा ते म्हणत असत की ‘स्वतःशी संवाद साधून, स्वत:ला प्रश्न विचारून विचार करायचा!”
समीर चौगुले म्हणाले, “डॉक्टरांची पुस्तके खूप वाचली आहेत. कोरोनामध्ये जेव्हा मी आजारी होतो तेव्हा माझ्या बाजूच्या पलंगावर रेमडेसिविर मिळावं म्हणून लिंबू-मिरची फिरवायची पद्धत सुरू होती. मला बरे होण्यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रकारचे अवैज्ञानिक सल्ले दिले. बरेच सल्ले हे व्हॉट्सअॅपवर फिरणारे होते. सुशिक्षित घरात व्हॉट्सअॅपच्या फॉरवर्डमुळे प्रत्येक कुटुंब हललेले आहे. अमुकतमुक वैद्यकीय सल्ला कुणी दिला, हे आपल्याला माहीत नसतं. प्रत्येकजण सांगत होता की, ते सांगत असलेला उपचार बरोबर होता. जर असं असतं, तर आपण एवढी माणसं का गमावली? त्यामुळे मी फार अस्वस्थ झालो. आज राजकीय विचारसरणी काय असावी, यावर घराघरात फूट पडत आहे याला माझा विरोध आहे. व्हॉट्सअॅपमुळे पसरणारी अंधश्रद्धा याकडे खूप कमी लोकांचे लक्ष आहे. दर पंधरा दिवसांनी जगबुडीच्या बातम्या येतात, परग्रहांवरील रहिवासी एलियन आला आहे. या बातम्या परत परत पाहिल्या जातात. आपला वर्षानुवर्षे वेळ असाच वाया घालवतो. अंनिसने देव-धर्माला कधीही मनाई केली नाही. ते जेव्हा समाज विघातक होतात तेव्हाच अंनिस त्याला विरोध करते. मी रात्री-अपरात्री अनेक ठिकाणी गेलेलो आहे; पण भूत बघितले नाही. माझा त्यावर विश्वास नाही.”
श्रमेश पेठकर म्हणाला, “मी डॉ. दाभोलकर गेल्यावर एक कविता केली होती-‘दांभिकतेचा साज सुवर्ण, विचारांची भिंत गळते आहे… माणुसकीचे आयुष्य क्षणभर, अंधश्रद्धेची चलती आहे!’ हल्ली भावना खूप लवकर दुखावल्या जातात आणि भावनाशून्य माणूसच जास्त दुखावतो. त्यामुळे हल्लीच्या समाजात प्रेम करणं आणि विचार करणं हा द्रोह झालाय. त्याचे कारण हे आहे की आजच्या समाज शब्दातील ‘स’ हे अक्षर सायलेंट होऊन ‘माज’ उरला आहे. हा ‘स’ जेव्हा आपण शोधू तेव्हा दाभोलकर सरांचे काम पूर्ण होईल. आपण माकडापासून माणूस का झालो आणि आपणच का माणूस झालो तर आपण विचार करायला लागलो तर आपल्याला सर्व उत्तरे कळतील. प्रेम करण्यात गम्मत आहे. माणूस म्हणून राहण्यातच गम्मत आहे. जेव्हा आपण माणूस म्हणून मिळून मिसळून राहू, तेव्हा आपले प्रश्न मिटतील. माझी आई नेहमी सांगते की, चांगला विचार आणि चांगला माणूस यांच्याबरोबर नेहमी राहायचं, तर रात्री झोप सुखाची लागेल. मी एकटाच नाही तर आज इथे आलेल्या सर्वांना चांगल्या माणसांसोबत आणि विचारांबरोबर राहायचं आहे.”
ओंकार राऊत म्हणाले, “मला दहावीपासून भविष्य बघण्याची सवय होती. माझे लकी नंबर कोणते होते, यावर बराच शोध घ्यायचो. हळूहळू एक ते दहा असे सगळेच नंबर लकी ठरले. माझ्या आईने माझी रास कन्या सांगितली होती, असं सांगितलं होते; पण माझ्या पत्रिकेत माझी रास आधी कुंभ आहे, असं कळले. मग जेव्हाजेव्हा मी कन्या राशीचे भविष्य वाचायचो, तेव्हा ते सर्व माझ्याबद्दल घडत होते आणि जेव्हा कुंभ राशीचे भविष्य बघायचो, तेव्हा ते लिहिलेले सर्व माझ्या बाबतीत घडायचे. आपण राशी भविष्य वाचतो ते दिवसभर आपण डोक्यात घेऊन फिरत असतो आणि त्यानुसार आपण आपले नियोजन बदलत राहतो आणि त्यामुळे मन:स्ताप वाढतो. तेव्हापासून मी ते थांबवले. मी डॉ. दाभोलकरांची मुलाखत ऐकली आणि त्यात ते म्हणाले की, “वर्तमानपत्रांनी राशीभविष्य छापावे; पण त्या खाली लिहावे की हे सर्व मनोरंजनासाठी आहे.” मला ते खूप पटलं. आपण लहान मुलांना जी भीती दाखवतो की बागुलबुवा येईल किंवा भूत येईल तशी भीती आपण नको दाखवायला. कारण ती भीती तशीच बसत जाते. बर्याच घरातील आई-वडील आता भूत आहे असे सांगत नाहीत, हा एक मोठा बदल झाला आहे.”
अतुल पेठे म्हणाले, “सर्वप्रथम रंगमंचावरील पंधरा दाभोलकर आणि प्रेक्षागृहात हजार दाभोलकर यांना नमस्कार! डॉ. दाभोलकर यांना अभिवादन. दाभोलकर हे देहाने नाहीत; पण विचाराने इथे आहेत. याचा अर्थच असा आहे की, आपणा सगळ्यांच्या रुपात ते आज इथे आहेत. एकदम मला महाराष्ट्राची परिस्थिती आशादायक वाटत आहे. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्रात ज्या अतिशय हास्यास्पद, मूल्यहीन बेडूक उड्या चालू आहेत, ते सर्व बघून माणसं रडायला लागली आहेत. तिथे हास्य, विनोद
हीच एकमेव आशा आहे. ज्या समाजात विनोद होऊ शकतो आणि जो समाज हसू शकतो, तो निरोगी समाज असण्याची शक्यता जास्त आहे. मराठीमध्ये चिं. वि. जोशी यांच्यापासून विनोदाची समृद्ध परंपरा आहे. आमच्याकडे नाटकातील विदूषक किंवा क्लाऊन “राजा तू नागडा आहेस,” हे तो निर्भयपणे सांगतो. हे धैर्य त्या विदूषकाचा असते. एका अर्थाने तो भविष्यवेत्ता असतो. हेन्री थोरोने सांगितले की, एखाद्या माणसाची पावले जर तालावर पडत नसतील, तर आमच्या लेखक, कलावंत मंडळींना वेगळे ध्वनी, हाकारे ऐकू येतात. याचाच खूप आनंद होतो आणि आशा वाटते. दाभोलकर यांच्या खुनाला दहा वर्षे पूर्ण होत असतील तर हा कसला विकास म्हणावा अशी लांछनास्पद परिस्थिती आहे. नागपूर-मुंबई महामार्गावर जे अपघात होत आहेत, तिथे महामृत्युंजय पूजा होत आहे. म्हणजे आपल्याला मूळ प्रश्न सोडवायचे नाहीत, आपल्याला त्यांना बगल द्यायची आहे. महाराष्ट्रामध्ये ही परिस्थिती असताना आज लेखक, कलाकारांचे महत्त्वाचे काम आहे. इतकी मुस्कटदाबी आहे, हुकूमशाही आहे, संस्था संघटनांची सेन्सॉर आहे आणि आता आपणच आपल्यावर सेन्सॉर करत आहोत. दहशत आहे, जिथे मुक्तपणे आपण बोलू शकत नाही, तिथे आपण मुक्तपणे आविष्कार कसे होतील? जर मुक्तपणे अविष्कार झाले नाहीत, तर आपण एकमेकांना समजून कसे घेऊ, प्रश्न कसे सोडवू? भांडवलशाही व्यवस्थेमध्ये हे खूप महत्त्वाचे काम करत आहेत. निखळपणे आनंद देणारा आणि विचार करणारा हा तुमचा कार्यक्रम आहे. ही निव्वळ महाराष्ट्राची जत्रा नाही तर हास्यजत्रा आहे. हासणे हे आपल्यासाठी एक साधन आहे. पण दुसरं काय करता येईल? Absurdity मध्ये नेहमी आपल्याकडे काय शिल्लक राहतं? तर आपण हसलं पाहिजे. तर विनोदासारखी दुसरी धोकादायक गोष्ट नाही. प्लेटो असं म्हणाला होता की, लेखकांना आधी बाहेर काढा. चार्ली चॅप्लिनने ‘द ग्रेट डीक्टेटर’ फिल्म बनवली त्याचे रिल्स नाझी राजवटीत जाळली गेली. तीन गोळ्या झाडणं सोपे आहे; पण जेव्हा एखाद्याच्या डोक्यात आधी बेरोजगारी आणि ‘धर्म खतरे में हैं’ असं रुजवणं, हे म्हणणं सुद्धा सोपं आहे आणि कुणाला तरी गोळ्याने उडवून लावणं हेही सोपं आहे; परंतु गेल्या दहा वर्षांत अंनिसने एक वाळूचा कणसुद्धा उचलला नाही मारण्यासाठी. कारण आमचा अहिंसा आणि माणुसकीवर विश्वास आहे. मी तर एकदा असं म्हणालो होतो की, तुमची एक गोळी असेल, तर आमची कादंबरी आहे. तुमची एक गोळी असेल, तर आमचं नाटक आहे. तुमची एक गोळी असेल, तर आमचा विनोद आहे. ते जास्त जहाल आहे. लॉरेल हार्डी, चार्ली चॅप्लिन हे विदूषकच होते, ते समाजातील वैगुण्यावर विनोद करून एका बाजूने हसवायचं, दुसर्या बाजूने रडवायचे आणि तिसर्या बाजूने शहाणे करायचे. तुम्ही नुसता विनोद वाचवत नाही, तर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हे मराठी भाषा वाचवण्याचे काम सुद्धा करत आहे. एकही इंग्रजी शब्द तुम्ही वापरत नाही. शब्दांची, भाषेची म्हणून एक ताकद असते. यांना वक्रोक्ती बरोबर करता येते. खरं मराठी वाचवायचं झालं तर यांचे कार्यक्रम लोकांनी बघितले पाहिजेत. मुलांवर चांगले संस्कार करायचे असतील तर हास्यजत्रा आवर्जून बघा. मी बघतो. कलाकाराला सुद्धा डॉक्टर, इंजिनिअर, आर्किटेक्ट यांच्या एवढीच बुद्धिमत्ता लागते. यांनी अनेक पर्यायी शब्द शोधले आहेत. पर्यायी शब्द वापरले तर आकलन सुधारते आणि आकलन सुधारले तर अभिव्यक्ती सुधारते. याचा आपल्या जगण्याशी संबंध आहे आणि ते निरोगी होईल. कलाकारांनी भूमिका घेतली, तर त्यांना काही चित्रपट गमवावे लागतात. सोनाली कुलकर्णीच्या निर्भयतेचे कौतुक आहे. सोनाली कुलकर्णी ही स्मिता पाटील सारखी भूमिका घेते. हा देश जेवढा तुमच्या बापाचा आहे तेवढाच आमच्या बापाचासुद्धा आहे. तुम्ही आम्हाला हिंदू धर्म शिकवू नका. कारण आमच्या बापाच्या बापाचे बाप तुकाराम, गाडगेबाबापासून आणि दाभोलकरपर्यंत येतात. गाडगेबाबा असे संवाद करत की, प्रेक्षक विचार करायला लागत. विचार विन्मुख लोकांना ते विचार सन्मुख करत. अंधश्रद्धेची गोळी द्यायची नाही, विचार करायला लावायचा. दाभोलकर यांच्यानंतर पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या खुनाचे तपास पूर्ण झाले नाहीत आणि रोज हजारोंच्या संख्यासमोर आंबा खाल्ल्याने मूल होते म्हणणारे स्वघोषित बुवा-गुरुजी आहेत. याचा आपल्याला त्रास होतो. कारण आपण विचार करणारे लोक आहोत. आज तुम्ही इथे आहात, हा त्याचा पुरावा आहे. आपण जगताना आपले कर्तव्य केले पाहिजे. ऑस्कर, नोबेल पुरस्कार स्वीकारताना कलाकार आणि कामू, सार्त्र, काफका यांची भाषणे भूमिका घेणारी होती. मराठी नाटकांना सुद्धा अभिव्यक्तीची मोठी परंपरा आहे. मराठी नाटक अजिबात प्रतिगामी नाही. आम्ही पुरोगामी आहोतच. अंनिसच्या नंदिनी जाधवने २७६ जटा सोडवल्या, हे एवढं सोपं नाही.
महाराष्ट्र म्हणजे निर्भय लोकांचा प्रदेश आहे. तुकाराम, जोतिबा फुले यांची भाषा अत्यंत निर्भय आहे. आज देशभर दंगली का पेटत आहेत? देशातील अस्वस्थ वातावरण बद्दल सर्वांना जाणीव करून देण्याचे काम कलावंत करतात. आम्ही रिंगण नाटक केलं होतं. आमच्या रंगमंचावर जावेद अख्तर, किशोर कदम, विजय केंकरे, नागराज मंजुळे येऊन गेले. त्यांनी एक भूमिका घेतली. कलाकाराला बुद्धी लागते आणि ही बुद्धी लोकशाहीमध्ये रुजते. कला ही लोकशाहीमध्ये फुलते आणि कारागिरी ही हुकूमशाहीमध्ये फुलते. मोठमोठे प्रकल्प करा, हे हुकूमशाहीचे लक्षण आहे. फक्त मोठमोठे प्रकल्प म्हणजे विकास नाही. नाटक करायला, कविता सुचायला लोकशाही लागते. विकास म्हणजे विवेकाची कास. विकास म्हणजे मानवी बुद्धीचा विकास, भावनेचा विकास. जागतिक आरोग्य संघटनाने सांगितले आहे की, ज्या समाजात सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, सामाजिक आणि शारीरिक आरोग्य आहे तो समाज आरोग्यदायी असतो. सांस्कृतिक दारिद्र्य कळत नाही. मराठीतील पुस्तकांची आवृत्ती खपायला दहा-दहा वर्षे लागतात. जोपर्यंत आपली मागणी येत नाही की, चांगल्या सिरिअल्स, चित्रपट, पुस्तके यावेत आणि जोपर्यंत आपण ते वाचत, बघत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही. आपल्याला ज्ञान आणि मनोरंजन दोन्ही मिळाले पाहिजेत. तमस, डिस्कव्हरी ऑफ इंडिया सारखी सिरिअल्स आज शक्य नाही. उत्तमोत्तम काम करायचे. टोपी तर उडवायची, गम्मत पण करायची आहे. कडबा आणि कडधान्ये यांच्यातील फरक आपल्याला कळले पाहिजे. या काळातील आपल्या जबाबदार्या अधिक आहेत. आपल्याकडची परिस्थिती जगभर जवळपास सगळी अशीच असते. जर्मनी मधील ब्रेख्तने एका नाटकात म्हणले आहे की, कलाकाराला झोपलेल्या प्रेक्षकाच्या न कळता झोपलेल्या पलंगाखालचे चारी पाय काढता आले पाहिजेत आणि त्याला कळलेसुद्धा नाही पाहिजे. तो कलेच्या कौशल्याचे प्रतिकात्मक उदाहरण देत होता. आपल्याकडचे कादंबरी, कविता आणि अभिनय आपल्या सर्वांचे आणि तळागाळातील माणसांचे जगणे समृद्ध करण्यासाठी यासाठी वापरायची आहे. कलाकार याच समाजातील आहेत, तर ही परंपरा आपण पुढे नेऊ या.”
डॉ. हमीद दाभोलकर यांनी प्रास्तविक केले आणि सर्व कलाकारांचा परिचय करून दिला. ते म्हणाले, “डॉ. दाभोलकर यांच्या खुनाबद्दल जे आरोपपत्र दाखल करण्यात आले होते ते दहशतवादी कृत्यासाठी न्यायालयात मांडले गेले. यातून केवळ त्या व्यक्तीला मारण्याचा उद्देश नसतो तर समाजाला संदेश देण्याचा त्यामागे उद्देश असतो. जगभरात परिवर्तनाचे काम करणारे खूप कमी असतात. ते नेहमी ‘सावध ऐका पुढच्या हाका’ अशा पद्धतीने समाजाला संदेश देत असतात. डॉ. दाभोलकर यांचे काम महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही. आतापर्यंत त्यांची पंधरा पुस्तके हिंदीमध्ये पोचली आहेत. इंग्रजीमध्ये त्यांची पुस्तके आलेली आहेत. ‘ऑल इंडिया पीपल सायन्स नेटवर्क’तर्फे देशभर डॉ. दाभोलकर यांचा स्मृतिदिन हा वैज्ञानिक दृष्टिकोन दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. डॉ. दाभोलकर यांच्या पुस्तकांचा घरोघरी प्रसार व्हावा, म्हणून आम्ही दहा पुस्तिका तयार केल्या आणि त्याच्या सात हजार प्रतींची नोंदणी झालेली आहे. माणसाला मारून विचार मारता येतो, ही जी अंधश्रद्धा आहे, त्याला या सगळ्यांमुळे आव्हान मिळाले आहे. महाराष्ट्रातील समाज प्रबोधनाच्या चळवळी आहेत त्यात भजन, कीर्तनचा वापर केला गेला आहे. अमर शेख पासून शाहीर साबळे पर्यंत अनेकांनी त्यांच्या कलेचा वापर केला आहे. महाराष्ट्र अंनिसच्या वाट्याला कलावंतांचे प्रेम आलेले आहे. श्रीराम लागू, निळू फुले आणि सदाशिव अमरापूरकर यांनी नेहमीच अंनिसला सक्रिय पाठिंबा दिला. त्यानंतर सुद्धा अतुल पेठे, नागराज मंजुळे, सोनाली कुलकर्णी यासारखे कलाकार चळवळीला पाठिंबा देत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकार आमच्या निमंत्रणावरून पूर्ण त्यांची बारा जणांची टीम इथे आलेली आहे. मानसोपचारात असं म्हणलं जातं की, हास्य आणि विनोद हा सर्वांत प्रगल्भ अशी संरक्षण यंत्रणा असते. हे कौशल्य मिळवणारा माणूस हा सदृढ असतो. उपरोधिक हास्याच्या माध्यमातून आपण विवेक जागर करणार्या कलाकारांचे आम्ही स्वागत करतो. “मेरी बात लोग मानेंगे लेकिन मेरे जाने के बाद” हे राम मनोहर लोहियांचे वाक्य सांगून डॉ. दाभोलकर नेहमी म्हणत की, असं माझ्या बाबतीत होऊ नये. “जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा, विजा घेऊन येणार्या पिढ्यांशी बोलतो आम्ही.” ही सुरेश भटांची गझल डॉ. दाभोलकर स्वतःशी म्हणायचे. तर हे सर्व कलाकार याच भावनेने काम करत आहेत, ही आमच्यासाठी समाधानाची बाब आहे. तुम्ही नाटिकांमधून जे दाखवलं त्यापेक्षा वेगळं आम्ही चळवळीत काहीच करत नाही. या कला कामगिरीतून तुम्ही सर्व कलाकारांनी आम्हाला हजार हत्तींचे बळ लढायला दिले आहे. ”
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकांचा संच आणि गुलाबपुष्प देऊन सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. सचिन गोस्वामी, सचिन मोटे, समीर चौगुले, वनिता खरात, शाम राजपूत, ओंकार राऊत, चेतना भट, अमीर हडकर, विनायक पुरुषोत्तम, श्रमेश बेटकर, प्रथमेश शिवलकर आणि दशरथ शिरसाठ या कलाकारांचे स्वागत अरविंद पाखले, दीपक गिरमे, मिलिंद देशमुख, श्रीपाल ललवाणी, नंदिनी जाधव, अनिश पटवर्धन यांनी केले. राहुल थोरात यांनी सूत्रसंचालन केले.
शब्दांकन : राहुल माने, पुणे
मो. ८२०८१ ६०१३२