विज्ञानाची उपेक्षा समाजाला घातकच…

-

कोरोना नियमावलीला पूर्णपणे धुडकावून लावत पाच राज्यांतील विधानसभेच्या निवडणुका आटोपल्या, लाखो साधू आणि भाविकांनी गंगेत डुबकी मारत साजरा केलेला कुंभमेळाही आटोपला आणि त्यानंतर देशभरात उसळलेल्या दुसर्‍या कोरोना लाटेत हजारो लोकांचे जीवन आटोपले. गेला महिनाभर अक्षरश: मृत्यूचे थैमान चालू असल्यासारखे वातावरण देशाच्या राजधानीपासून ग्रामीण भागापर्यंत होते. देशाचा कोणताही कोपरा याला अपवाद नव्हता. आता ही लाट किंचित ओसरत असल्याची चिन्हे दिसत आहेत. जरी अशी चिन्हे दिसत असली तरी अतिशय सावधगिरी बाळगण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ऑक्सिजनचा पुरवठा न होणे, जीवरक्षक औषधांची टंचाई, काळाबाजार, इस्पितळात खाटा न मिळाल्याने योग्य उपचार न मिळणे यांसारख्या ज्या गंभीर आणि अक्षम्य चुका विविध राज्यांच्या सरकारांकडून; विशेषत: सर्वाधिकार आपल्याकडे केंद्रित करणार्‍या तथाकथित ‘कार्यक्षम’ केंद्र सरकारकडून झाल्या आहेत; ज्यामुळे हजारो नागरिकांना आपल्या प्राणांना मुकावे लागले आहे. पहिल्या लाटेच्या अनुभवातून हे काही प्रमाणात तरी टाळता आले असते. तसे काही तज्ज्ञांनी इशारेही दिले होते. पण त्या इशार्‍यांकडे दुर्लक्ष केले गेले; इतके की अखेर दोनशे संशोधकांना, ‘संशोधनासाठी आम्हाला विश्वासार्ह आकडेवारी पुरवा,’ असे पत्र पंतप्रधानांना देणे भाग पडले. तर कोरोनाच्या संशोधनासाठी सरकारने नेमलेल्या समितीच्या अध्यक्षांनी सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला.

जगभरातील वैज्ञानिक जगत कोरोनाची महामारी आटोक्यात येण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व सांगत होते. जगभरात इतर देशांनी वैज्ञानिकांनी दिलेले सल्ले मानत आपले सारे प्रयत्न लस निर्माण करणे, मिळविणे व ती लोकांना उपलब्ध करून देण्याच्या व्यवस्थापनावर केंद्रित केले. लसीकरणाचे धोरण, मोहिमा आखून त्या देशांनी कोरोनाच्या महामारीचा विळखा सैल करण्याच्या दिशेने पुढे पाऊल टाकले. आपल्या केंद्रस्थानी मात्र थाळ्या, टाळ्या, गोमूत्र, निवडणुका, कुंभमेळा, नेतृत्वाची ‘दातृत्वी’ प्रतिमा, आत्मनिर्भरता वगैरेंसारखी अवैज्ञानिक, अविवेकी लक्ष्य असल्याने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेची दाहकता अधिकच वाढली. लसीकरणाच्या मोहिमेला खीळ बसली. या अपयशाचे पडसाद देशात, जगभरात उमटू लागले. मग हे अपयश झाकण्यासाठी आकडेवारीची, माहितीची दडवादडवी, सत्य उघड करणार्‍यांवर दडपशाही, देशद्रोहाचे आरोप, सकारात्मतेचे ढोल बडविणे चालू झाले.

त्यात रामदेवबाबासारख्या नटव्याने कोरोना संकटात अपुर्‍या साधनसामग्रीनिशी मोठ्या धाडसाने काम करणार्‍या डॉक्टरांची टिंगल करत आधुनिक वैद्यकशास्त्रालाच ‘दिवाळखोर’ संबोधले व ‘लसीचे दोन-दोन डोस घेऊनही 1000 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे,’ अशी थापेबाजी करत ‘जी लस खुद्द डॉक्टरांना वाचवू शकली नाही, ती तुम्हाला काय वाचवणार?’ असा लसीबद्दलच संभ्रम निर्माण करणारा प्रश्न उपस्थित केला व या सगळ्या प्रकरणाला आयुर्वेदविरुद्ध आधुनिक वैद्यकशास्त्र असा रंग देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ‘आयएमए’ने यासंदर्भात रामदेवबाबाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली असून रामदेवबाबावर देशद्रोही म्हणून खटला दाखल करावा, अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहे. रामदेवबाबाच्या ‘पतंजलि’च्या कोरोना बरा करण्याचा दावा करणार्‍या ‘कोरोनील’ची भलावण करणार्‍या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी रामदेवबाबाला पत्र लिहून वक्तव्य मागे घेण्याबद्दल ‘दम’ (?) दिला आहे.

पण अशा प्रकारचे वाद निर्माण करून कोरोना महामारीला आटोक्यात आणण्यातील सरकारी अपयशावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच रामदेवबाबा विरुद्ध ‘आयएमए’, आयुर्वेद विरुद्ध आधुनिक वैद्यकशास्त्र अशा ‘नूरा’ कुस्त्या खेळविल्या जात आहेत, असेच वाटावे अशी परिस्थिती आहे. ज्या वैज्ञानिक दृष्टिकोनाची, विवेकी विज्ञानाची आज नितांत आवश्यकता आहे, त्याचा मात्र यात पराभव होतोय. ज्या समाजात विवेकाची, विज्ञानाची उपेक्षा, दुर्लक्ष, टिंगलटवाळी केली जाते, त्या समाजाला त्याची भयानक किंमत राजकीय, सामाजिक, आर्थिक पातळीवर मोजावी लागते, जी आज आपण मोजत आहोत.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ]