सुभाष किन्होळकर - 9421492069

सहामाही परीक्षेचे दिवस जवळ आले होते. मुलं अभ्यासाला लागली होती. सौ. सरकटे मॅडमनी सगळ्यांना आधीच खडसावून सांगितलं होतं की, “परीक्षेत मनासारखे गुण मिळायला हवेत; नाही तर तुमच्या आई-बाबांना शाळेत बोलावले जाईल. त्यांच्याकडे तुमची तक्रार केली जाईल. त्यांना प्रगतिपत्रकही दाखवले जाईल.” याच भीतीपोटी मुलं चिकटून अभ्यास करू लागली होती. मुलांवर कोणाचा ना कोणाचा वचक असला की, ती वाकड्या वळणार जात नाहीत. मॅडमनी या सगळ्या गोष्टी बरोबर हेरल्या होत्या.
परीक्षा संपली. विद्यार्थ्यांनी मनापासून तयारी केलेली असल्यामुळे पेपर चांगले सोडवले गेले होते. मॅडमही खूष होत्या. पेपर तपासताना त्यांना आनंदच होत होता; पण अकस्मात एक पेपर असा आला की, तो पाहून त्यांना धक्काच बसला. अर्धवट पेपर सोडवलेला होता. कुणाचा पेपर म्हणून त्यांनी वर लिहिलेलं नाव पाहिलं, मॅडमना एकदम राग आला. त्या फणकारल्या,
“भार्गवी वसंत साने.”
सौ. सरकटे मॅडम अशा एकाएकी चिडलेल्या पाहून वर्गात शांतता पसरली. सगळा वर्ग त्यांच्याकडे पाहायला लागला. प्रत्येकाच्या मनात खोलवर प्रश्न रूतत होता की, काहीतरी विपरीत घडले असावे! एवढ्यात पुन्हा मॅडमचा आवाज वर्गभर पसरला,
“भार्गवी वसंत साने.”
वर्ग एकदम चिडीचूप झाला होता.
“काय सायली, कुठे आहे ती?”
सायली वर्गाची मॉनिटर होती. तशीच ती भार्गवीची जीवलग मैत्रीणही होती. दोघीही बर्यापैकी हुशार होत्या. मॅडमच्या बोलासरशी सायली उभी राहत उत्तरली,
“मॅडम ती तीन दिवसांपासून आली नाही.”
“का बरं?”
“तिची आई म्हणाली की, तिची तब्येत बरी नाही आहे.”
एवढ्यात सायलीच्या बाजूला बसलेली राजश्री उभी राहिली आणि चटदिशी म्हणाली,
“मला ठाऊक आहे मॅडम, तिला काय झालंय.”
“सांग, काय झालंय?”
“तिला खूप ताप आला आहे मॅडम. पेपरच्या दिवशी सुद्धा तिच्या अंगातून गरम वाफा निघत होत्या. तिला त्या दिवशी काहीच सुचेना. चक्कर आल्यासारखं व्हायचं; पण तिनं कसंबसं सावरलं आणि जमेल तेवढा पेपर सोडवला.”
सायलीचं बोलणं ऐकून मॅडमही अबोल झाल्या होत्या. त्यांच्या तोंडातून शब्दही निघत नव्हता, तरीपण काहीसं सावरून त्यांनी विचारलं,
“मग दवाखान्यात नाही नेलं तिला?”
“होऽ नेलं की.”
“आता बरी आहे?”
“होऽ मॅडम.”
भार्गवी अतिशय हुशार आणि गुणी मुलगी होती. तशीच ती प्रेमळही होती. त्यामुळे मैत्रिणींमध्ये तिच्याविषयी आपुलकी होती. मॅडमनाही ती खूप आवडायची. कधीही तिचा गृहपाठ अपूर्ण राहत नव्हता किंवा सांगितलेलं पाठांतर. म्हणूनच आता अर्धाकोरा पेपर पाहून मॅडमना आश्चर्य वाटणं स्वाभाविक होतं. तिच्या तापाविषयी ऐकल्यापासून त्यांना आपण केव्हा एकदा भार्गवीला भेटतो, असं झालं होतं.
शाळा सुटली तशा सौ. सरकटे मॅडम राजश्री आणि सायलीसह भार्गवीच्या घराकडे निघाल्या. रस्त्यात आणखी दोन-तीन मैत्रिणीपण सहभागी झाल्या. गावाच्या एका कडेला भार्गवीचं घर होतं. घराच्या दिशेनं त्यांची पावलं झपाझप पडत होती.
बघता-बघता घर गाठलं. भार्गवी जमिनीवर चादर अंथरून तिच्यावर अंग टाकून होती. चेहरा सुकलेला होता, केस विस्कटलेले होते. मॅडमना पाहताच तिनं त्यांना नमस्कार केला. त्या येऊन तिच्याजवळ बसल्या. त्यांना तिच्या हलाखीच्या परिस्थितीची जाणीव होती. तिचे वडील वारलेले होते. आई लोकांच्या घरी धुणी-भांडी करत होती. मिळणार्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह कसाबसा चालत होता. नेहमीच त्यांना आर्थिक तंगी सोसावी लागायची. फार खडतर दिवस त्यांच्यापुढे आ वासून उभे ठाकले होते.
मॅडमनी भार्गवीच्या केसांवरून मायेचा हात फिरवत तब्येतीची विचारपूस केली.
“काय गं, बरं आहे ना आता?”
“होऽ मॅडम. ठीक आहे.”
“दवाखान्यात गेली होतीस?”
“होऽ गेली होती.”
भार्गवीनं उशाखालची औषधं काढून मॅडमना दाखवली. मॅडमनी औषधांसोबत बिलही पाहिलं. तीनशे रुपये बिल झालेलं होतं. एवढ्या पैशांच्या जमवण्याबद्दल मॅडमनी तिला विचारलं, तेव्हा तिचं उत्तर ऐकून त्याही अवाक् झाल्या.
भार्गवी म्हणाली, “राजश्री आणि सायलीनं त्यांच्या जमवलेल्या खाऊच्या पैशांतून मला मदत केलीय, मॅडम. त्यांच्या उपकारांची परतफेड करणं मला कदापि शक्य नाही.”
मॅडम आश्चर्यानं क्षणभर ‘त्या’ मुलींकडे पाहत राहिल्या. आपल्या विद्यार्थिनींच्या मोठेपणांचं कौतुक त्यांना आवरेना. खरंतर राजश्री आणि सायलीबद्दल त्यांच्यामध्ये खूप अभिमान जागा झाला. अभिमानानं त्यांची छाती दोन इंच फुगली. नकळत त्यांच्या ओठांतून शब्द बाहेर पडले,
“भार्गवी, तू त्यांच्या उपकाराच्या परतफेडीची चिंता करू नको. ते काम माझ्यावर सोपव. येत्या बालकदिनाच्या दिवशी आपण त्यांना भेटवस्तू देऊन भव्य सत्कार करूया. त्यांच्या या चांगल्या कार्याला सगळ्यांपर्यंत पोचूया, जेणेकरून त्यांच्यापासून इतर विद्यार्थी सुद्धा प्रेरणा घेतील.”
मॅडमचे शब्द ऐकून भार्गवीच्या चेहर्यावर आता नकळत गुलाबी हास्य पसरलं होतं.
– सुभाष किन्होळकर
मु.पो. धामणगाव, ता. मोताळा, जि. बुलढाणा.
संपर्क : 94214 92069