आईच्या पोटात गर्भ कसा वाढतो?

डॉ. उत्तमा जोशी -

‘माझ्याच बाबतीत असं का झालं?’ रडत प्रश्न विचारणार्‍या सुलभाला पटकन काय उत्तर द्यावं आणि कसं समजवून सांगावं, असं कोडंच पडलं मला. सुलभाचं नुकतंच अबॉर्शन झालं होतं आणि बाळात जन्मतः व्यंग होतं. मग मी असं करायला पाहिजे होतं का की, तसं नको करायला होतं, अशा अनेक प्रश्नांनी तिच्या मनात ठाण मांडलं होतं. अशा प्रकारे अनुभव येणार्‍या सुलभासारख्या अनेकजणींना हा प्रश्न भेडसावत असणार. म्हणून मग याविषयीची शास्त्रोक्त माहिती देण्याचा या लेखामागचा उद्देश…

‘आई होणं’, मातृत्व हा स्त्रीच्या जीवनातला आत्यंतिक सुखाचा आणि आनंदाचा परमावधीच जणू!! पण, याबरोबरच ‘निरोगी’ बाळ जन्माला येणं, हेही तितकंच महत्त्वाचं. असं निरोगी बाळ जन्माला येण्यासाठी अनेक घटकांचा एकमेकांशी ताळमेळ असणं, हेही तितकंच महत्त्वाचं असतं.

या घटकांचं दोन विभागात वर्गीकरण करता येऊ शकतं.

1) आई-वडील (होणारे) यांच्याशी निगडित असणारे घटक

2) वातावरणात असणारे (बाह्य) घटक

पहिल्या प्रकारात म्हणजे होणार्‍या आई-वडिलांशी निगडित असणार्‍या घटकांत खालील बाबींचा समावेश होतो –

1) आजार जसे की – डायबेटीस, हाय ब्लडप्रेशर, थायरॉइड ग्रंथीशी निगडित आणि जनुकीय दोष इ.

2) आईचे/ मातेचे वय हा पण विचारात घेण्याचा महत्त्वाचा घटक आहे – जसजसं होणार्‍या आईचं वय वाढत जातं (35 वर्षांपेक्षा जास्त), तसतसं बाळामध्ये जन्मतः निर्माण होणार्‍या विकृतीचं प्रमाणही वाढत जातं.

3) अन्नघटकांची कमतरता – उदा. फॉलिक अ‍ॅसिड (ब जीवनसत्वापैकी एक), आयोडिन इ.

2. बाह्य घटकांचा प्रभाव

1) किरणोत्सर्गी घटकांशी/ पदार्थांशी संपर्क – दुसर्‍या जागतिक महायुद्धात हिरोशिमा आणि नागासाकी येथे झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर जन्माला आलेल्या बाळांमध्ये अनेक दोष जन्मतः आढळले होते.

2) अनेक घातक द्रव्ये/ केमिकल – यात काही औषधींचा पण समावेश होऊ शकतो, जसे कॅन्सर ट्रिटमेंटसाठी वापरली जाणारी औषधी

3) जंतुसंसर्ग – प्रामुख्याने विषाणू संसर्ग

अशा अनेक गोष्टी योग्य वेळी आणि प्रमाणात असतील तर निरोगी बाळाचा जन्म होऊ शकतो.

गर्भाच्या वाढीचं पण शास्त्र आहे आणि त्यानुसार गर्भवाढ तीन टप्प्यांत विभागली आहे –

1) भ्रूण तयार होण्याचा काळ ज्याला प्री एम्बरीओनिक पीरिअड म्हणतात – 1 ते 3 आठवड्यांचा काळ

2) भ्रूण विकसित होण्याचा काळ- एम्बरीओनिक पीरिअड – 3 ते 8 आठवडे

3) गर्भाच्या वाढीचा काळ – फिटल पीरिअड- 9 व्या आठवड्यापासून ते बाळ जन्माला येईपर्यंतचा काळ

यापैकी सगळ्यात महत्त्वाचा काळ हा पहिल्या 10 ते 12 आठवड्यांचा असतो. या कालावधीत काही कमी-जास्त झाल्यास बाळामध्ये दोष निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असते. या काळात वर सांगितलेल्या घटकांपैकी उदा. फॉलिक अ‍ॅसिड किंवा व्हिटॅमिन बी-12 यांची कमतरता असेल, तर बाळावर विपरीत परिणाम होतात. बाळात व्यंग निर्माण होते. उदा. बाळाचा ओठ अथवा टाळूमध्ये छेद असणे, मेंदूमध्ये किंवा चेतारज्जू, पाठीचा मणका यात दोष निर्माण होतात इ. काही वेळेस हे दोष इतके तीव्र स्वरुपात असतात की बाळाचा मृत्यूही संभवतो आणि मग गर्भपात होतो.

फॉलिक अ‍ॅसिड व व्हिटॅमिन बी-12 हे पेशींची वाढ होताना पुरेशा प्रमाणात असावेच लागतात. बाळाचे ओठ तयार होण्याची क्रिया फार क्लिष्ट असते; तसेच डोक्याची कवटी किंवा पाठीच्या कण्याचे शेवटचे मणके यांचीही वाढ फार आव्हानात्मक असते. त्यामुळे वरील व्हिटॅमिनची जरा जरी कमतरता झाली, तर पेशी नीट जुळून येत नाहीत व दोष निर्माण होतो. ग्रहणाच्या वेळी महिलेने काही कापले म्हणून ओठ फाटला, असे कधी होत नाही.

10 ते 12 आठवड्यांच्या काळानंतर बाळाच्या शरीराची फक्त आकार आणि वजन यादृष्टीने वाढ होत असते.

कधी-कधी काही केसेसमध्ये बाळातील व्यंगाचे कोणतेही ठोस कारण वरकरणी सापडत नाही. अशा वेळेस आई-वडील आणि मृत अर्भकाची जनुकीय चाचणी करून घेणे योग्य ठरते. या चाचणीत ही काही दोष आढळला नाही, तर मग असं का व्हावं, याला सध्या उत्तर नाही आणि ज्ञात कारणाशिवाय कोणती कारणं असू शकतात, याच्या आपण शोधात आहोत.

आपल्या आजूबाजूला किंवा परिचित अथवा नातेवाईकांमध्ये अशी काही घटना घडली की, मग त्यावर चर्चाचर्वण सुरू होते आणि त्यातून मग या अशा गोष्टी टाळण्यासाठी अनेकविध उपाय सुचवले जातात. ‘मातृत्व’ हा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्याने मग पुष्कळदा त्या उपायांची खातरजमा न करताच ती अवलंबली जातात. यातूनच गर्भसंस्काराच्या अनेक नवनवीन कल्पनांचा उदय होतो आहे. गर्भावर संस्कार व्हावेत; पण कोणते? तर होणारी आई आणि तिच्या आजूबाजूची मंडळी आणि वातावरणाचे. योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार यांचे.

शरीर आणि मनाच्या निरोगीपणासाठी चौरस आहार, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य व्यायाम आणि ज्या गोष्टींनी मनाला आनंद मिळतो, प्रसन्न वाटतं अशा गोष्टी करणे उचित ठरेल.

(फोटो सौजन्य – इंटरनेट रेझिंग चाईल्ड ,बेबी सेंटर)

डॉ. उत्तमा उमेश जोशी

(लेखिका ह्या भारती विद्यापीठ मेडीकल कॉलेज येथे शरीरचनाशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]