डॉ. शमसुद्दीन तांबोळी - 9822679391
स्मृतीशेष कमलताई विचारे यांचा आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा खूपच निकटचा संबंध होता. चळवळीच्या उपक्रमाबद्दल त्या नेहमी फोन करून विचारणा करत असत. वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. अखेरपर्यंत पुरोगामी चळवळीशी संबंधित असणार्या कमलताई विचारे यांना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सर्व कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ भावपूर्ण आदरांजली अर्पण करीत आहे.
सत्यशोधक केशवराव विचारे यांच्या स्नुषा अशी एक ओळख असलेल्या बहुआयामी कमलताई विचारे (वय ९५) यांचे ७ फेब्रुवारी रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास आकस्मिक निधन झाले. त्या तपस ओल्ड एज केअर, वाकड, पुणे येथे गेल्या एक वर्षापासून वास्तव्यास होत्या.
१९६० पासून काँग्रेसच्या क्रियाशील सदस्य राहिलेल्या कमलताई अखिल भारतीय काँग्रेस महिला फ्रंटच्या सरचिटणीस होत्या. त्यांनी विविध विभागात केलेल्या नेत्रदीपक कार्याची दखल घेऊन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधींनी १९७४ साली कमलताईंना झाशीची राणी लक्ष्मीबाईचा अश्वारूढ पुतळ्याच्या स्वरूपातील चांदीची ढाल देऊन सन्मानित केले होते. लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘लूप’ चा शोध लागल्यावर कमलताईंनी भारतातील पहिले लूप शिबिर १९६५ साली अडूर या कोकणातल्या गावी मोठ्या कल्पकतेने यशस्वी करून दाखवले. इतकेच नव्हे, तर ‘लूप’ ची भारतातील पहिली पाच शिबिरे याच महाराष्ट्रातील भूमीवर संपन्न करून एक आगळावेगळा विक्रम प्रस्थापित केला! मागासवर्गीय भागात पाच पूर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळा स्थापून मुलांचे आयुष्य घडवण्याचे कार्य केले.
१२ एप्रिल १९२९ रोजी जन्मलेल्या कमलताईंचे बालपण, शिक्षण आणि जडणघडण पुण्यात झाले. पुण्यातील शिवाजीनगर भागातील मॉडर्न हायस्कूलमध्ये त्या शिकल्या. नंतर एम. ए. पर्यंत शिक्षण घेऊन उच्चविद्याविभूषित झाल्या. त्या १९७५ साली आंतरराष्ट्रीय महिला वर्षानिमित्त एका शिष्टमंडळातून बर्लिनला गेल्या. त्यानंतर युरोपचा दौरा केला.
स्वतः स्थापन केलेल्या ‘स्त्रीहितवर्धिनी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्री विकासाचे प्रयोग आणि प्रकल्प राबविले. शिवाय अशा प्रकारचे काम करणार्या स्वयंसेवी संस्थांनाही त्या नेहमीच आधार देत राहिल्या. स्त्री विकासाचे काम कुठे चालले आहे याचा शोध त्या नेहमी घेत असत, तेथे प्रत्यक्ष जात असत.
कमलताईंचे सासरे सत्यशोधक केशवराव विचारे यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक विद्यार्थी संघाच्या त्या प्रथम विद्यार्थिनी झाल्या. शिक्षिका या नात्याने मुंबईच्या कामगार विभागात स्त्री-पुरुषांसाठी अनेक अभ्यास वर्ग चालविले. महाराष्ट्र राज्य समाजकल्याण सल्लागार मंडळाचे सदस्य, महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाच्या पहिल्या सिनेट सदस्य, महाराष्ट्र राज्याच्या महात्मा फुले पुण्यतिथी शताब्दी समितीच्या उपाध्यक्ष आणि महाराष्ट्र शासनाच्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी असलेल्या अनेक उपक्रमांत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. कमलताई विचारेनी महिलांसाठी संसारशास्र अभ्यासक्रम बनवला होता, जो महाराष्ट्र शासनाने स्वीकारून महिला विकास शाळा काढल्या. हा अभ्यासक्रम ग्रामीण भागात नेण्यासाठी महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत ५०-५० महिलांची ५-५ दिवसांची शिबिरे आयोजित केली. अन्न आघाडीवरील ‘गृहिणी’ नावाचे उपयुक्त पुस्तकही लिहिले. १२ ऑगस्ट १९८६ रोजी ‘घरोबा’ नावाचे एक ग्राहक सहकारी भांडार सुरू केले. स्त्रियांचे, स्त्रियांनी चालवलेले हे महाराष्ट्रातील पहिलेच भांडार आहे. १ जानेवारी १९७३ रोजी कमलताईंनी ‘स्त्रीसेवा सहकार संघ’ या नावाने एक मध्यवर्ती संस्था स्थापन केली. महाराष्ट्रातील २५ हून अधिक महिला औद्योगिक सहकारी संस्था या संघाच्या संलग्न सभासद आहेत. संपूर्ण देशात अशा प्रकारची ही पहिलीच संस्था आहे.
वयाच्या ९५ व्या वर्षीही त्यांचे वाचन अफाट होते. शरीर थकलेले असले तरी तल्लख बुद्धी, विनोदी स्वभाव, चिमटे काढणे, अगदी खळखळून निरागस हसणे हे शेवटपर्यंत कायम राहिले. आयुष्याकडे अगदी सकारात्मकतेने पाहणार्या कमलताईर्ंनी कोणाविषयी कधीही तक्रार केली नाही.
कविवर्य बा. भ. बोरकरांच्या
” देखणा देहान्त तो, जो सागरी सूर्यास्तसा! अग्निचा पेरून जातो, रात्रगर्भी वारसा!!”
या ओळीने कमलताईना अभिवादन..!
– डॉ. शमसुद्दीन तांबोळी (संपर्क : ९८२२६७९३९१)