राहुल विद्या माने -

अक्षम्य कृत्यासाठी सासरच्या मंडळींविरुद्ध लोणावळा येथे जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिळीम गावात नवविवाहित गर्भवती महिलेचा हुंडा आणि इतर कारणांसाठी छळ केल्यामुळे; तसेच आणि बाळंतपणात तातडीच्या उपचारांची आवश्यकता असताना तिला दवाखान्यात न घेऊन जाता भगताकडे घेऊन गेल्यामुळे वैद्यकीय उपचारांअभावी धक्कादायक मृत्यू झाला. यासंबंधात मृत्युमुखी पडलेल्या महिलेच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र अंनिसच्या मदतीने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांच्या तपासाची चक्रे हलली आणि याप्रकरणी 22 फेब्रुवारीला संध्याकाळी उशिरा हुंडा प्रतिबंधक कायदा, घरगुती हिंसाचार कायदा आणि जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात अधिक तपशील पुढीलप्रमाणे : दीपाली महेश बीडकर हिचे लग्न 21 एप्रिल, 2020 रोजी महेश रघुनाथ बीडकर याच्याशी झाले होते. लग्नानंतर जेव्हा ती गर्भवती राहिली, तेव्हा तिच्या पतीने आणि सासरच्या मंडळींनी लग्नात काही वस्तू न दिल्याचा बहाणा करत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास देऊन जाच करण्यास सुरुवात केली. एक वर्षापूर्वीच मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाल्यामुळे याबाबत दीपालीने तिच्या माहेरच्यांना लगेचच सांगितले नाही. आपल्या बाळंतपणानंतर सर्व काही ठीक होईल, असे तिला वाटत होते. दोन फेब्रुवारीला ती माहेरी डोहाळे-जेवणासाठी आली तेव्हा तिची तब्येत व्यवस्थित होती.
पण दीपालीला सासरची मंडळी औषधोपचार न करता देवऋषी भगतबाईकडे अघोरी उपचार करण्यासाठी तिचे सासरचे लोक घेऊन गेले. त्यावेळी ती 8 महिन्यांची गरोदर होती. 9 फेब्रुवारीच्या पहाटे तिच्या आरोग्यात अचानक बिघाड झाल्यानंतर मुलीच्या सासरच्या कुटुंबीयांनी तिला दवाखान्यात घेऊन न जाता निष्काळजीपणा करून तिच्यावर अघोरी उपचार करायला घेऊन गेले. जेव्हा या प्रकारच्या अंधश्रद्धेमुळे ती मरणासन्न अवस्थेत पोचली, तेव्हा तिला तळेगाव दाभाडे येथील जनरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. परंतु 10 फेब्रुवारीच्या संध्याकाळी तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. वेळीच योग्य तो आधुनिक वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे दीपाली आणि तिच्या बाळाचा सुद्धा मृत्यू झाला.
मृत्यू झाल्यानंतर सुरुवातीला खेड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि दीपालीचे नातेवाईक उमेश राऊत यांच्या मदतीने भारती अशोक मगर (वय 49) या मुलीच्या आईने याबद्दल लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 17 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. याबाबत कोणतीही कारवाई सुरुवातीला करण्यात आलेली नव्हती, म्हणून मुलीच्या माहेरच्या कुटुंबीयांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे त्यांची समस्या मांडली. त्यानंतर महाराष्ट्र अंनिसचे प्रधान सचिव मिलिंद देशमुख, पुणे जिल्हा अंनिस कार्याध्यक्ष नंदिनी जाधव, पांडुरंग तिखे (सचिव, लोणावळा शहर अंनिस शाखा) व कार्यकर्ते अर्जुन मोरे यांनी पुढाकार घेऊन केस पोलिसांत नोंदवण्यासाठी पाठपुरावा केला.
याबद्दल दाखल झालेल्या तक्रारीनुसार दीपालीच्या सासरकडचे नातेवाईक – रघुनाथ बीडकर (सासरे), जिजाबाई बीडकर (सासू), मोहन बीडकर (दीर) आणि बकुळा मोहन बीडकर (जाऊ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात दीपालीच्या सासरच्या लोकांनी दीपालीच्या माहेरच्या (बऊर गाव) लोकांना तिच्या तेराव्या दिवशी मारहाणसुद्धा केली. याबद्दल दीपालीच्या आत्याने अशी माहिती दिली की त्याच्यावरून उतारे टाकून अघोरी उपचार झाल्याचे समक्ष पाहिले. त्यावेळी भगतबाईच्या अंगात आल्याचे सुद्धा मुलीच्या आत्याने सांगितले.
याबद्दल लोणावळा ग्रामीणचे पोलीस अधिक तपास करत आहेत.