‘एआय’चा अंधश्रद्धा पसरवण्यासाठी वापर

वाघेश साळुंखे -

२०२४ च्या जानेवारी महिन्यात अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन झाले. त्या सुमारास रामलल्लाच्या मूर्तीचा फोटो सोशल मीडियामध्ये सगळीकडे व्हायरल झाला. त्याच फोटोपासून एआयचा वापर करून व्हिडिओ बनवला गेला. व्हिडिओमध्ये ती मोहक मूर्ती जिवंत व्यक्तीसारखी डोळ्यांची उघडझाप करताना दिसत होती. मध्येच थोडीशी स्मित करत होती. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडिओ बघून कुणाच्यातरी सुपीक डोक्यातून एक कल्पना बाहेर पडली. या व्हिडिओच्या सुरुवातीला राम गंभीर दिसत होता; पण मध्येच एका ठिकाणी त्याने स्मित केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत होते. व्हिडिओमधील या दोन फ्रेमचे फोटो बनवून सोशल मीडियात टाकले आणि कॅप्शन दिले, ‘रामलल्ला हसायला लागला. आधीचा रामलल्ला गंभीर दिसत होता आणि नंतर त्याच्या चेहर्‍यावर स्मित दिसत आहे.’ दोन्ही फोटोंमधील फरक स्पष्ट दिसत होता. त्यामुळे लोकांचा त्यावर पटकन विश्वास बसला. हे दोन फोटोसुद्धा व्हायरल झाले. या फोटोंचे फॅक्ट चेक झाले. त्यातून हे फोटो आधी व्हायरल झालेल्या व्हिडिओमधूनच घेतल्याचे समोर आले. अंधश्रद्धा पसरवण्यासाठी ‘एआय’चा कसा वापर होऊ शकतो, याचे हे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल.

ज्यांचे विज्ञानाच्या विकासामध्ये काडीचेही योगदान नाही, ज्यांनी विज्ञानाला सतत विरोध केला, जे अजूनही विज्ञानावर सतत टीका करत असतात, तेच लोक विज्ञानाचा वापर करून खोट्या गोष्टी पसरवत आहेत. एकीकडे विज्ञानाला नावे ठेवायची आणि दुसरीकडे विज्ञानाद्वारा निर्मित साधनांचा भरपूर वापर करायचा, असा दुटप्पी व्यवहार या लोकांचा असतो. विज्ञानापेक्षा आमचे अध्यात्मच श्रेष्ठ आहे, असे एकीकडे म्हणायचे आणि व्यवहारात मात्र फक्त विज्ञानाचाच वापर करून सुखी जीवन जगायचे. कुठल्याही आध्यात्मिक व्यक्ती, संप्रदायाने किंवा संघटनेने त्यांच्याकडील आध्यात्मिक शक्ती, मंत्र किंवा सिद्धी वापरून सोशल मीडिया तयार केला नाही. एखादे फोटोशॉपसारखे सॉफ्टवेअरसुद्धा त्यांना तयार करता आले नाही. पण विज्ञानाने ते केले. याच साधनांचा वापर करून खोट्या गोष्टी पसरवण्यात मात्र हे लोक पटाईत आहेत. सुरुवातीच्या काळात खोट्या पोस्ट्स लिहिणे, फोटोशॉपचा वापर करून खोट्या इमेजेस तयार करणे, त्याचबरोबर व्हिडिओ एडिट करून दिशाभूल करणारे किंवा खोटे व्हिडिओ तयार करणे, असे प्रकार केले गेले. आता त्यांच्या मदतीला एआय आले आहे. या तंत्रज्ञानाद्वारे आपणाला हवे तसे फोटो, ऑडिओ आणि व्हिडिओ बनवता येऊ लागल्याने अंधश्रद्धा पसरवण्यासाठी याचा मोठ्या प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे. सुरुवातीच्या काळात ‘एआय’ने बनवलेले फोटो आणि व्हिडिओ कोणत्याही चिकित्सक व्यक्तीला सहज ओळखता येण्यासारखे होते. पण हल्ली त्यामध्ये खूप सफाईदारपणा आला आहे. या तंत्रज्ञानामध्ये पारंगत असलेल्या व्यक्तीलाही यातील खरे-खोटेपणा तपासणे अवघड होऊ लागले आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानातील प्रगती अंधश्रद्धा पसरवणार्‍या लोकांच्या पथ्यावर पडत आहे. मध्यंतरी पाण्याखालील मंदिराचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यातील मंदिराचे स्थापत्य, नक्षीकाम वगैरे गोष्टी खूपच आकर्षक होत्या. त्यासोबत दावा केला होता की, बाली (इंडोनेशिया) च्या समुद्रात ५००० वर्षे जुने हिंदू मंदिर सापडले आहे. हा व्हिडिओ पाहून आमच्याकडचे भाविक लोक हरखून गेले. हा व्हिडिओही खूप व्हायरल झाला. काही लोकांनी हाच व्हिडिओ ‘ही श्रीकृष्णाची बुडालेली द्वारका नगरी आहे’ असे सांगून पसरवला. हा व्हिडिओ एआयने तयार केलेला आहे हे सहजासहजी कळत नव्हते. तज्ज्ञ व्यतींनाच ते ओळखता येत होते.

अशी अनेक उदाहरणे आहेत. एआयचा वापर करून हवेत उडणारा हनुमान, देव/प्रेषित यांचे व्हिडिओ, भूत-प्रेतांचे व्हिडिओ, चमत्कारांचे व्हिडिओ असे अनेक व्हिडिओ तयार केले गेले आहेत आणि ते भरपूर व्हायरलही झाले आहेत. ख्रिश्चन धर्मगुरूंचे डीपफेक व्हिडिओ बनवून प्रार्थना किंवा ब्लेसिंगच्या नावाने दान मागण्याचा प्रकारही चालू आहे. काही लोकांनी सीसीटीव्ही फुटेज सारखे व्हिडिओ बनवून ते पसरवले आहेत. लोकांना ते खरोखरचे सीसीटीव्ही फुटेज वाटते आणि ते त्यावर पटकन विश्वास ठेवतात. भविष्यात हे प्रकार वाढतच जाणार आहेत.

एआय व्हिडिओंची घातकता काही दिवसांपूर्वीच दिसून आली होती. बेंगळुरूमधील एका ५७ वर्षांच्या महिलेला यू ट्यूबवर एआयने बनवलेला जग्गी वासुदेवचा व्हिडिओ दिसला. त्यात ते एका स्टॉक ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचे समर्थन करत असल्याचे दिसत होते. त्या महिलेने त्यात टप्प्याटप्प्याने पावणे चार कोटींपेक्षा जास्त रुपये गुंतवले आणि सर्व गमावले. या प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने गुगलला आदेश दिला की, जग्गी वासुदेव यांचे एआय इमेजेस आणि डीपफेक व्हिडिओ काढून टाकावेत.

एआय तंत्रज्ञान आल्यामुळे अनेकजण त्याचा धंद्यासाठी कसा उपयोग करता येईल, याचा विचार करू लागले आहेत. मग अंधश्रद्धेचा आणि धर्माचा धंदा करणारे त्यात मागे कसे राहतील? सध्या बाजारात अनेक ज्योतिष अ‍ॅप्स आहेत. व्यतीने एकदा अ‍ॅप्लिकेशन डाउनलोड करून घेतले की, बकरा त्यांच्या जाळ्यात सापडतो. प्रोफाईल बनवण्याच्या निमित्ताने तुमच्या जन्म तारखेपासून व्यवसायापर्यंत अनेक गोष्टींची माहिती घेतली जाते. आपण किती मौल्यवान डाटा या अ‍ॅप्सना देत आहोत, हा डाटा पुढे कसा आणि कुठे वापरला जाईल, याची वापरकर्त्याला जाणीवही नसते. बर्‍याच ज्योतिष अ‍ॅप्स मध्ये एआय चॅट बॉट्स आहेत. वापरकर्त्याने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देणे, त्याच्या समस्यांवर उपाय सुचवणे वगैरे प्राथमिक कामे या चॅटबॉट मार्फत केली जातात. पण त्याचे खरे काम असते वापरकर्त्याला वस्तू किंवा मोठी सेवा विकत घेण्यास प्रवृत्त करणे. त्यासाठी घरात अमुक एक वस्तू ठेवा म्हणजे तुमच्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येईल वगैरे थापा मारल्या जातात. किंवा काहीतरी भीती घातली जाते. उदाहरणार्थ, तुमच्या कुंडलीत अमुक एक दोष आहे. त्याचे निवारण करा; नाहीतर मोठे संकट येईल. अशा प्रकारे भीती घालून कोणता तरी विधी करण्यास किंवा एखादी वस्तू खरेदी करण्यास भाग पडले जाते. चॅटबॉटने ग्राहकाच्या मनात भीती निर्माण केल्यानंतर त्या ग्राहकाचा ताबा खर्‍या व्यक्तीकडे जातो. मग ती व्यती ग्राहकाकडून किती पैसे उकळायचे ते ठरवते. बर्‍याचदा पैसे एकदम न उकळता व्यतीचा अंदाज घेत टप्प्याटप्प्याने उकळले जातात. याच धर्तीवर काही आध्यात्मिक अ‍ॅप्स आलेली आहेत. त्यांच्यातील चॅटबॉटला धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांमधील डाटाच्या आधारावर प्रशिक्षित केलेले असते. यात Spiritual Guide असतात. ते आध्यात्मिक जीवन उन्नत करण्यासाठी मार्गदर्शन करतात. खरे तर आध्यात्मिक उन्नतीच्या नावाखाली दैनंदिन जीवनातील समस्यांवर उपाय सांगितले जातात. थोडक्यात, ही एक हायटेक बुवाबाजी आहे. अशा अ‍ॅप्सच्या माध्यमातून फसवल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. मुंबईतील एका सॉफ्टवेअर इंजिनियरला शुद्धीकरण विधी करण्यासाठी म्हणून एक लाख वीस हजार रुपयांना फसवले गेले आहे. सध्या एआयच्या अद्भुत शतीबद्दल खूपच चर्चा आहे. एआय काहीही करू शकते, त्याला खूप ज्ञान आणि बुद्धिमत्ता आहे, वगैरे चर्चांमुळे लोकांचा या चॅटबॉट्सवर लगेच विश्वास बसतो. माणूस फसवू शकतो, चॅटबॉट कशाला फसवेल? असा विचार करून लोक त्यावर विश्वास ठेवतात. पण या चॅटबॉट्सना तेच करण्याचे प्रशिक्षण दिलेले असते, हे त्यांना माहीत नसते.

यावर उपाय काय?

सगळ्यात नामी उपाय म्हणजे, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे. पण ते सगळ्यांच्याच बाबतीत शक्य होणार नाही, हे उघड आहे. त्यामुळे इतर उपाय करणे आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे, एआय तंत्रज्ञान समजून घेणे. या तंत्रज्ञानाचा व्यवहारात उपयोग करणे. आपण स्वतः अनेकदा एआय इमेजेस आणि व्हिडिओ तयार केले तर, खरे व्हिडिओ आणि एआय व्हिडिओ यांमधील फरक बर्‍यापैकी लक्षात येतो. सध्या एआय द्वारा व्हिडिओ तयार करताना आपोआपच त्यावर एआयचे चिन्ह किंवा लोगो दिसून येतो. त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. अर्थात, व्हिडिओ एडिट करताना ते चिन्ह लपवले सुद्धा जाऊ शकते. सध्या एआयचा फॅक्ट चेकिंगसाठी चांगला उपयोग होताना दिसतोय. एखादी पोस्ट खरी की खोटी, हे ग्रोक किंवा जेमिनी सारख्या एआय चॅटबॉटला विचारल्यास तो त्याबाबतची सत्यता सांगू शकतो. अर्थात, यालाही काही मर्यादा आहेत हे विसरून चालणार नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, सरकारच्या एआय धोरणात याचा विचार व्हायला हवा. याला प्रतिबंध करण्यासाठी सरकारकडूनच प्रयत्न झाले तर खूप चांगला परिणाम दिसून येईल. ज्याप्रमाणे सायबर फसवणुकीबाबत सरकारकडून जनजागृती केली जाते त्याप्रमाणेच एआयचा वापर करून पसरवल्या जाणार्‍या अंधश्रद्धांबतही जनजागृती करायला हवी. भारत सरकार हे करेल का? या प्रश्नाचे उत्तर तुम्हीच शोधा.

-वाघेश साळुंखे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]