स्वातंत्र्य आणि विवेकाची पुष्कळ किंमत चुकवूनही एकूण हिशोब जमेचाच!

डॉ. निलांबरी सामंत-तेंडुलकर -

२० ऑगस्टला डॉ. नरेंद्र दाभोलकरांचा अकरावा स्मृतिदिन आहे. १० मे रोजी खुनाच्या खटल्याचा निकाल येऊन जरी दोघाही मारेकर्‍यांना आजन्म कारवास झाला असला, तरी त्यांना हे कृत्य करायला लावणार्‍या मुख्य हातांपर्यंत अजून पोहोचायचं आहे. अंनिस कार्यकर्त्यांची चिकाटी, त्यांनी दाखवलेला संयम आणि सुरू असलेलं काम तेवढ्याच निर्धाराने चालू ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न यामुळे मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यात नकीच यश मिळणार याची मला खात्री आहे.

मी डॉ. नीलांबरी सामंत-तेंडुलकर. मी व्यवसायाने स्त्रीरोग तज्ज्ञ आहे. १९८९ मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना झाली तेव्हापासून माझे वडील नागेश सामंत आणि आई नीता सामंत हे अंनिसशी जोडले गेलेले आहेत.

तेव्हा मी साधारण १२-१३ वर्षांची असेन. दाभोलकर काकांचा संबंध येण्यापूर्वीचे पप्पा आणि अंनिसशी जोडले गेल्यानंतर त्यांच्या जीवनात झालेला बदल मला अगदी स्पष्ट आठवतोय. आमचं घर जरी पूर्वी मुंबई आणि आता चाळीसगावात असलं तरी आमचं मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्यात श्रीपादवाडी म्हणून आहे. दत्ताचं जागृत देवस्थान म्हणून हे गाव प्रसिद्ध आहे.

दत्तगिरी महाराज म्हणून एक बाबा आमच्या गावात निवास करून गेले आणि गावाचा उद्धार करून गेले अशी लोकांची समजूत आहे. तेव्हापासून पिशाच्चवाडी हे गावाचे नाव बदलून श्रीपादवाडी हे नाव झाले. दर दत्त जयंतीला आजूबाजूच्या खेड्यांतून लाखो लोक इथे जमतात आणि उत्सव साजरा होतो. माझ्या लहानपणी आम्ही दर दत्त जयंतीला अगदी शाळा बुडवून सुद्धा तिकडे जायचो. आम्हा मुलांची तर खूपच मजा असायची. वेगवेगळ्या भुताखेतांच्या गोष्टी करायच्या, पिशादेव म्हणून एक दगडाचा देव होता त्याला मनातल्या इच्छा मागायच्या. भजन-कीर्तन पालखी या सगळ्या गोष्टी खूपच आवडायच्या. आमच्या घरी पप्पा तर दर गुरुवारी उपास करायचे. सोवळं नेसून दत्ताची पूजा करायचे. खूप मोठी आरती व्हायची. मला पेढे खाण्यासाठी आणि उपवासाचे पदार्थ खाण्यासाठी तो सोहळा खूपच आवडायचा.

लोकविज्ञान चळवळीतर्फे चाळीसगावात एक वैज्ञानिक परिषद झाली. त्या वेळी दाभोलकर काकांची पहिल्यांदा पप्पांशी ओळख झाली. दाभोलकर काकांचे साधे सरळ व्यक्तिमत्त्व, प्रभावी वतृत्व, समोरच्याला आपलं मत पटवून देण्याची हातोटी त्यामुळे माझे पप्पा इतके प्रभावित झाले की, १९८९ मध्ये जेव्हा महाराष्ट्र अंनिसची स्थापना झाली तेव्हा ते लगेचच अंनिसचे कार्यकर्ते बनले. त्या वेळी मी लहान असल्यामुळे म्हणा किंवा माझं लक्ष जास्त खेळांकडे आणि अभ्यासाकडे असल्यामुळे या गोष्टींचा फारसा विचारच केला नाही. पण पप्पांच्या आणि आईच्या वागण्यामध्ये मात्र खूपच बदल जाणवायला लागला. नागेश सामंतांचं अंनिसशी इतकं घट्ट नातं जोडलं गेलं की आमच्या घरातलं वातावरणच बदलून गेलं. देव या जगात नाहीच ही खात्री पटल्यावर त्या अनुषंगाने येणारी कर्मकांडं, उपासतापास पप्पांनी सोडूनच दिले. दिवाळीच्या वेळी आमच्या सगळ्या दुकानांवर लक्ष्मीपूजनाची जी धूम असायची ती सुद्धा त्यांनी बंद केली. मला आणि माझ्या दोन लहान जुळ्या बहिणींना मात्र त्या वेळी खूपच वैषम्य वाटायचं. बाकीच्या मैत्रिणींकडे गौरी-गणपती केवढ्या दणक्यात साजरा करतात. दिवाळीत लक्ष्मीपूजन किती थाटात साजरं होतं. संक्रांतीचं किंवा चैत्रगौरीचं हळदी-कुंकू होतं! सगळंच हळूहळू बंद झाल्यामुळे आपल्याच घरी काहीच कसं नाही याचा थोडा रागच यायचा. पण जसजशी मी मोठी होत गेले, विचार करायला लागले तेव्हा मात्र पप्पांचं आणि आईचं वागणं आम्हाला पटायला लागलं. त्यांचा अभिमानच वाटायला लागला. अंनिसचे कार्यकर्ते झाल्यावर माझ्या पप्पांनी अतिशय साधी जीवनपद्धती स्वीकारली. कुठलाही समारंभ जिथे पैशांची उधळपट्टी आहे, डामडौल, मोठेपणा आहे तिथे जाणं त्यांनी सोडलं. अगदी सख्ख्या भावांच्या मुलांच्या लग्नातही ते गेले नाहीत. ते म्हणायचे की, रजिस्टर आणि साधेपणाने लग्न करा तरच मी येईन.

दरम्यान संघटना बांधणीसाठी दाभोलकरकाकांचा दौरा नेहमीच खानदेश, मराठवाडा, विदर्भ या ठिकाणी असायचा तेव्हा त्यांचा मुकाम अर्थातच आमच्याकडेच असायचा. वेगवेगळ्या प्रोग्रॅम्सच्या निमित्ताने दाभोलकरकाका मोठ्या मोठ्या लोकांना घेऊन यायचे. डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, प्रा. देवदत्त दाभोलकर, एन. डी. पाटील सर, डॉ. प्रसन्न दाभोलकर, डॉ. मोहन आगाशे, अतुल पेठे, प्रतीक्षा लोणकर, पुष्पाताई भावे असे अनेक मान्यवर आमच्या घरी यायचे. रात्री उशिरापर्यंत त्यांच्या गप्पा रंगायच्या. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये प्रसिद्ध असलेले हे लोक इतके कसे साधे राहतात, समाजासाठी-समाजातील चुकीच्या प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा बदलण्यासाठी आपला बहुमोल वेळ देतात हे बघतच आम्ही लहानाचे मोठे झालो. नकळत वैज्ञानिक दृष्टिकोनाचा एक संस्कार आम्हा तिघी बहिणींवर झाला. कुठलीही गोष्ट आपल्या सदसद्विवेकबुद्धीला पटल्याशिवाय तावून-सुलाखून घेतल्याशिवाय स्वीकारायची नाही ही सवय कोणीही न शिकवता आम्हाला लागली. आमचं शिक्षण झाल्यावर जेव्हा लग्नाचा विषय निघाला तेव्हा सुद्धा माझे पप्पा त्यांच्या विचारांशी ठाम होते. मी माझ्या मुलींना भरपूर शिकवले आहे. स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. मुलीची बाजू म्हणून मी कुठलाही कमीपणा घेणार नाही ही पप्पांची भूमिका होती आणि आम्ही तिघी बहिणींचा त्यांच्या या भूमिकेला पूर्ण पाठिंबा होता. मुली म्हणजे परक्याचं धन किंवा खूप थाटामाटात लग्न करण्यासाठी पैसे साठवून ठेवले पाहिजेत असे विचार कधी आमच्या कानावर पडलेच नाहीत. खूप अभिमानाने मला सांगावसं वाटतं की, आमच्या तिघींची लग्नं कुठल्याही सामाजिक किंवा कौटुंबिक दबावाला बळी न पडता, पत्रिका न बघता, जातीची अट न घालता पंचवीस वर्षांपूर्वी रजिस्टर पद्धतीने झाली. तिघींचे नवरे आणि सासरची माणसं खूपच छान मिळाली.

२००२ साली आमच्या चाळीसगावच्या घरावर दुसर्‍यांदा खूप मोठा दरोडा पडला. पहिला मोठा दरोडा १९९१ मध्ये पडला. आई-पप्पांना दरोडेखोरांनी बांधून ठेवून खूपच मारलं होतं. तेव्हा सुद्धा आजूबाजूचे लोक, अगदी कुटुंबातले लोक सुद्धा दोष द्यायला तयारच होते. तुम्ही देव मानत नाही, कुठली पूजा करत नाही, कशावरच तुमचा विश्वास नाही. त्यामुळे एक ना एक दिवस असं होणारच होतं. सगळेजण टपलेलेच होते. पण आई-पप्पांचा आम्हाला खूप अभिमान वाटतो की अशा कुठल्याच बोलण्याकडे त्यांनी कधीच लक्ष दिले नाही.

नाशिक जवळच्या दिंडोरी येथील आमची चांगली चालणारी वैद्यकीय प्रॅक्टिस सोडून माझ्या विनंतीला मान देऊन डॉ. दिगंबर तेंडुलकर-माझा जोडीदार जो स्वतः बालरोगतज्ज्ञ आहे, चाळीसगावला राहायला यायला लगेच तयार झाला. आम्ही दोघांनी चाळीसगावला आमचं हॉस्पिटल सुरू केलं. समाजाच्या मान्यतेच्या आखीव रेखीव चौकटीच्या विरुद्ध आणखी एक गोष्ट म्हणजे फार मोठ्या मनाचे माझे सासू-सासरे त्यांचं पनवेलचं स्वतःचं घर सोडून चाळीसगावला आमच्याकडे राहायला आले. अत्यंत गुण्यागोविंदाने शेवटपर्यंत ते चाळीसगावलाच होते. नवरा तंतोतंत माझ्याच विचारांचा मिळाल्याने आणि सासू-सासरे व्यतिस्वातंत्र्यात ढवळाढवळ न करणारे मिळाल्याने माझी वाट खूपच सुसह्य झाली.

२००६ मध्ये अचानक हार्ट अटॅक येऊन नागेश सामंतांचं निधन झालं. सगळ्यांनाच मानसिक धका बसला. ज्या दिवशी निधन झालं त्या अतीव दुःखातही आईने देहदान करण्याची त्यांची इच्छा बोलून दाखवली. आम्ही तिघी बहिणी आणि जावयांनी पुढाकार घेऊन ती इच्छा पूर्ण केली. आपण जसे बोलतो, जसे समाजाला बदलायला सांगतो तसं स्वतःवर प्रसंग आल्यावर वागण्याचे संस्कार आम्हाला दाभोलकर काकांमुळे आणि माझ्या पप्पांमुळे मिळाले. माझ्या सासर्‍यांचं सुद्धा दोन वर्षांपूर्वी निधन झालं आणि सासूबाई आत्ताच दोन महिन्यापूर्वी चाळीसगावलाच दिवंगत झाल्या. पण त्यांच्या इच्छेनुसारच कोणतेही अंत्यविधी आम्ही केले नाहीत. अर्थातच सुरुवातीला हे कोणीतरी जगावेगळे लोक आहेत, त्यांना स्वतःचंच खरं करायला आवडतं, अति आत्मविश्वास आहे असं आजूबाजूच्या सगळ्यांचं म्हणणं असायचं. त्यात कुटुंबीय होते, आजूबाजूचा समाज होता, मित्रमंडळी होती, आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणारे कर्मचारी होते.

माझ्यावर संस्कारच असे झाले आहेत की कुठलीही वाईट गोष्ट जी विवेकात बसत नाही, मनाला पटत नाही ती करायची नाही. या वागण्याचा आमच्या व्यवसायावर खूप परिणाम झाला. वैद्यकीय व्यवसायात सध्या कट कमिशन आणि फसवणुकीची जी कीड लागली आहे त्याच्याशी जुळवून न घेतल्यामुळे आम्ही कधीच बाहेर फेकले गेलो. अर्थातच याचा कधीही पश्चात्तापच झाला नाही. बरेच सल्ले मिळाले; मित्र-मैत्रिणींकडून, कुटुंबीयांकडून… ‘अगं आशा वर्करला पैसे द्यायला काय हरकत आहे? त्या तर किती गरीब असतात.’ पण जी मूल्यं लहानपणापासून घट्ट चिकटली होती त्यांनी या गोष्टी कधीच स्वीकारायला दिल्या नाहीत. अर्थात, दोन गोष्टी लक्षात घ्यायला लागतील. एक तर आर्थिकदृष्ट्या मी स्वावलंबी असल्यामुळे इतरांच्या मताप्रमाणे नाइलाजाने वागण्याचा प्रसंग आला नाही. आणि आमच्या कुटुंबात आई अतिशय मनमिळाऊ आणि समाजात लोकप्रिय असल्यामुळे आम्हाला कधीही कोणी त्रास दिला नाही. मतभेदांचे द्वेषात किंवा विरोधात रूपांतर झालं नाही. आपण चांगले तर लोक चांगले हे आम्ही आजही अनुभवतो आहोत.

पण कधीतरी एक प्रकारची पोकळी, एक प्रकारचा एकटेपणा जाणवतो. आजूबाजूच्या सगळ्याच मित्र-मैत्रिणींची, कुटुंबीयांची विचारसरणी आणि आपली विचारसरणी यात खूप फरक असल्यामुळे एखाद्या कौटुंबिक समारंभानिमित्त जमलेल्या नातेवाईकांच्या गप्पा, त्यांच्या आवडीनिवडी इतक्या वेगळ्या असतात की आपण कोणीतरी एलियन आहोत असं वाटतं. एवढे हुषार, मोठ्या मोठ्या हुद्यांवर काम करणारे अगदी सायंटिस्ट सुद्धा! सर्वांचे टोकाचे विचार ऐकून उद्विग्नता येते, तुटलेपण जाणवतं. मित्र मंडळींशी नातं टिकवून ठेवायचं तर काही विषय वर्ज्य ठेवावे लागतात.

हळदीकुंकू, सत्यनारायण किंवा इतर सण-समारंभातून इतरांचा सहजपणे परिचय होतो, मैत्री होते. माझ्या बाबतीत मात्र मला प्रयत्नपूर्वक हा परिचय वाढवावा लागतो. मैत्री जुळवावी लागते. देव-धर्म, श्रद्धा याला अंनिस वैयक्तिक स्वातंत्र्याचा भाग मानत असली, तरी आम्ही हे सगळं नाकारत आणि विवेकाची मशाल हातात धरून त्याच्या प्रकाशातच चालत आहोत. विवेकवादी आणि नास्तिकांच्या वाट्याला येणारा एकटेपणा कधीतरी दुखावून जातो.

आज मागे वळून बघताना स्वातंत्र्य आणि विवेकाची पुष्कळ किंमत चुकवूनही एकूणच हिशोब जमेचा दिसतो. पुढे काय होईल त्यालाही धैर्याने समोर जाऊ हे निश्चित. अंनिस परिवाराचा आधार नेहमीच पाठीशी राहील याचा विश्वास वाटतो. अखेर शल्य वाटत राहतं ते आज दाभोलकरकाका आणि माझे पप्पा सोबत नसल्याबद्दल! पण आयुष्यात शल्यही असणारच.

(डॉ. निलांबरी चाळीसगाव येथे स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.)


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]