मिलिंद देशमुख -
मेळघाटातील लहान मुलांच्या पोटावर डागण्या (डंबा) देण्याच्या अघोरी प्रथेविरोधातील प्रबोधन मोहिमेचा पहिला टप्पा १७ मार्च ते सात एप्रिल असा यशस्वीपणे पार पडला. २२ दिवसात ७२ गावांमध्ये नंदिनी जाधव, भगवान रणदिवे व श्रीकृष्ण धोटे यांनी केलेले कार्यक्रम याचा वृत्तांत आपण मागील महिन्याच्या ‘अनिवा’च्या अंकात वाचला. या पहिल्या टप्प्यातील प्रबोधन मोहिमेस मेळघाटातील आदिवासींकडून भरघोस प्रतिसाद मिळाला. त्या प्रतिसादाने उत्साहित होत अंनिसने २५ जूनपासूनच्या मेळघाट मोहिमेच्या दुसर्या टप्प्याची आखणी केली. या टप्प्यात नंदिनी जाधव आणि मी… मिलिंद देशमुख (पुणे), शंकर कणसे व भगवान रणदिवे (सातारा) हे सामील झाले होते. आधीच्या मोहिमेत आलेल्या अडचणी विचारात घेत या मोहिमेसाठी आम्ही बरीच पूर्वतयारी करून ठेवली होती. कारण मागील मोहिमेत राहण्या-खाण्याबाबत बरीच गैरसोय झाल्याचे ऐकले होते. तेव्हा ट्रेकिंगला वापरतात तसा गॅस स्टोव्ह बरोबर ठेवावा तसेच अडचणीच्या वेळी तंबूही सोबत घ्यावयाचा असे ठरवले.
सकाळपासूनच पाऊस चालू होता. दोन दिवस आधीपासून महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी पावसाचे वृत्त होते. आमच्या मोहिमेवर हे सावट होतेच. आधी खूप ऊन असणार, पाण्याची टंचाई असणार… त्यामुळे ह्या तारखा घेऊ नका असे मेळघाटातील आरोग्य खात्यातील काही लोकांनी सुचवले होते व नंतर मुसळधार पावसात कार्यक्रम होणे अवघड होईल असेही सांगितले गेले. मात्र, नंदिनीने याच तारखांना आपण जाऊ, जे होईल त्याला तोंड देऊ असा पवित्रा घेतला व आम्ही तिघेजण २५ तारखेला सकाळी सहा वाजता देहू रोडवरून निघालो. पुढे नंदिनी खराडी बायपासला आमच्यात सामील झाली आणि खर्या अर्थाने आमची मोहीम चालू झाली.
नुकताच आजारातून उठलेला अहिल्यानगरचा कार्यकर्ता महेश धनवटे, औरंगाबादचे कार्यकर्ते जगदीश परदेशी, भोसले सर यांच्या भेटी घेत जालन्याचे मधुकर गायकवाड, ज्ञानेश्वर गिराम यांच्यासमवेत इतर कार्यकर्ते यांची मीटिंग झाली. मग रात्री मधुकर गायकवाड यांच्याकडे मुकाम करून २६ तारखेला सकाळी आम्ही अमरावतीकडे रवाना झालो. अमरावतीत पोहोचलो तेव्हा अकरा वाजले होते. मला एका जुन्या कार्यकर्त्याची आठवण आली. २०१८ मध्ये अमरावतीमध्ये राज्य कार्यकारिणी झाली होती. त्या वेळी प्रणव देशमुख नावाचा एक विद्यार्थी भेटला होता. त्याचा माझा व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क होता. सहज त्याला फोन करून पाहिला असता तो अमरावतीमध्येच शिकत होता. तो तत्परतेने भेटावयास आला. तसेच परतवाडा येथे माझे घर आहेत, तुम्ही सर्व जण माझ्या घरी जेवायला या असे त्याने सुचले.
दुपारी तीन वाजता आम्ही आरोग्य खात्याचे प्रमुख डॉक्टर सुरेश आसोले यांची भेट घेतली व त्यांना दुसर्या टप्प्यातील आमच्या मोहिमेबद्दल सांगितले. त्यांनी डंबा प्रकाराबरोबरच लहान वयात लग्न होणे, घरी बाळंतपण होणे ह्याही समस्या आहेत असे सांगितले. ही मोहीम महाराष्ट्र अंनिस आणि आरोग्य विभाग यांनी संयुक्तपणे आखलेली असल्याने डॉक्टर असोले यांनी चिखलदरा येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रात आमची राहण्याची सोय केली. तसेच पुढील सर्व गावांचे नियोजन, गावांची नावे व तारखा कळविण्याचे त्यांनी मान्य केले.

मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सहभागी असलेले अमरावतीचे श्रीकृष्ण धोटे यांनी मला व नंदिनी जाधव यांना फोन करून मी भेटावयास येत आहे असे सांगितले. त्याप्रमाणे श्रीकृष्ण धोटे आम्हास भेटावयास आले व आग्रहाने आम्हाला जेवणासाठी त्यांच्या मुलीच्या हॉटेलमध्ये घेऊन गेले. तेथून बाहेर पडलो तेव्हा जवळपास साडेपाच वाजले होते व आम्हाला एक फ्लेक्स बनवून हवा होता तो अमरावतीत मिळाला नाही. त्या वेळी प्रणव देशमुख आमच्याबरोबर होता. त्याने परतवाडा येथे संपर्क करून फ्लेक्स बनवून ठेवण्यास सांगितले व मी मोटारसायकलवरून येतो तुम्ही माझ्या घरी नकी या असे सांगितले. साधारण साडेसात वाजता आम्ही प्रणव देशमुख यांच्या घरी पोहोचले तिथे पोहे आणि चहा घेऊन आम्ही चहापाणी करण्यासाठी आवश्यक गोष्टी तसेच फरसाण इत्यादी गोष्टी परतवाडा येथे खरेदी केल्या. आमच्याकडे अॅम्प्लिफायर नसल्याचे प्रणवने ऐकल्याने त्याने त्याच्या घरातील एक अॅम्प्लिफायर आम्हाला सोबत दिला. तो चार्जिंग करून वापरता येत असे त्यामुळे आमचे काम सोपे झाले. परतवाड्यामध्ये गाडीत डिझेल फुल्ल करून घेतले व आम्ही चिखलदरा येथील आरोग्य प्रशिक्षण केंद्रात रात्री साडेअकरा वाजता पोहोचलो तेव्हा जोरात पाऊस सुरू होता.
२७ तारखेला सकाळी लवकर उठून शंकर कणसे यांनी सर्वांना गरम गरम चहा करून दिला. चहा-बिस्किटे खाऊन आम्ही तयार होत असताना देहू रोडला रात्री माझ्या बायकोने, अंजूने जागून तळलेल्या गोड पुर्यांचा डबा घरीच विसरल्याचे लक्षात आले. चिखलदरा येथे सकाळी आम्ही जवळच असलेला गोविलगड किल्ला पाहिला. तिथे नंदिनीने काही आदिवासी लोकांना डंबाबाबत विचारले तेव्हा एकाने त्याला जिथे चटके दिले होते ते दाखवले. जवळच एक देवीचे मंदिर होते तिथे मोठ्या प्रमाणात कोंबड्या आणि बकरे कापण्यासाठी आदिवासी लोक आलेले होते त्यांच्याबरोबरही संवाद साधला. एक बकरा साधारण दहा ते पंधरा हजारात त्यांनी आणला होता. सोबत क्रूजर गाडीत २०-२५ लोकांनाही आणले होते. सर्व जण तिथेच स्वयंपाक करून जेवणार होते. बकरा कापणारा एक हजार रुपये घेत होता. तिथे काही बायकांच्या अंगातही आलेले होते. थोडीफार त्यांची माहिती घेऊन आम्ही परत प्रशिक्षण केंद्रात आलो. सकाळपासूनच मला सर्दी व खोकला जाणवत होता.
दुपारी नंदिनी ‘हातरू जवळील सलवार खेडा या गावात जाऊन येऊ या’, असे म्हणत होती. मी मात्र ‘तुम्ही जाऊन या, मी आराम करतो’. असे म्हटले. त्याप्रमाणे नंदिनी जाधव, भगवान रणदिवे, शंकर कणसे व सागर बावणे असे चौघेजण दुपारी अडीच वाजता गेले. मी झोपूनच होतो. रात्री बराच पाऊस व वादळ झाले. गाडी रात्री पंक्चरही झाली होती. तसेच एका गावातील कार्यक्रम करून परत येण्यास त्यांना रात्री दीड वाजला होता. दुसर्या दिवशी सलोना गावातील ‘पीएचसी’ मध्ये कार्यक्रम होता. तिथे डॉक्टर कंकाळ भेटले. ते खूप चांगले होते. सर्व नोंदी छान ठेवत होते. स्वतः डॉ. कंकाळ व तेथील कर्मचारी रुग्णांशी आपुलकीने बोलत होते. त्यांच्याकडून मी खोकल्यासाठी औषध घेतले, त्यानंतर आम्ही हत्ती घाट येथे कार्यक्रम केला. तसेच ढोमनीफाटा या गावात लग्न असल्यामुळे कार्यक्रम होऊ शकला नाही. त्यानंतर आम्ही परत चिखलदरा येथे आलो तोपर्यंत आरोग्य खात्यामार्फत आम्हाला गावांची नावे व यादी मिळाली. त्यामध्ये आशा वर्करचे फोन नंबरही होते.

दुसर्या दिवशी आम्ही धामणगाव येथे जोशी नर्सरीचे जोशी यांची भेट घेतली. त्यांना या भागातील खूप माहिती होती. त्यांनी कोणते गाव तुम्ही आज करू शकता याची यादी करून दिली, तसेच आम्ही त्या दिवशी एकंदर सात गावांची यादी केली व तिथे कार्यक्रम केले. एका गावातील ग्रामसेवक आमच्याबरोबर पाच कार्यक्रमात सोबत होता. त्यांना आपले काम खूपच आवडले. ३० तारखेला टेंब्रुसोंडा या गावात सर्व आशाताईंचे प्रशिक्षण असल्याचे कळाले. आम्ही त्या गावातील पीएचसी ला भेट दिली तेव्हा तिथे कुष्ठरोग जनजागृती करण्यासाठी एक टीम आलेली होती. या भागात या आजाराविषयी अनेक अंधश्रद्धा असल्याचे कळाले. तसेच या भागात सर्वांत जास्त कुष्ठरोगी आहेत हेही कळाले. त्यांच्या प्रशिक्षण केंद्रात जवळपास ५० एक आशा वर्कर शिबिरासाठी आल्या होत्या. त्यांच्यासाठी आम्ही एक कार्यक्रम करू आम्हाला एक तास वेळ द्या, अशी विनंती नंदिनी जाधव यांनी केली व आम्हाला वेळ मिळाला. आमचा कार्यक्रम सर्व आशाताईंनी पाहिला व त्यांना हा कार्यक्रम आवडल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर आम्ही तीन-चार गावांत कार्यक्रम केले.
यानंतर ३१ तारखेला आम्ही दोन टीम केल्या. एका टीममध्ये मी व भगवान रणदिवे व दुसर्या टीममध्ये नंदिनी जाधव व शंकर कणसे असे विभागलो. त्यामुळे दोन तासात आमचे दोन कार्यक्रम होऊ लागले. ३१ तारखेला आम्ही जवळपास सात गावांमध्ये कार्यक्रम केले. प्रत्येक गावात कार्यक्रमाच्या वेळी कोंबड्या आणि बकर्या दिसत. सुरुवातीला एका गावात एक कोंबडी मागून घेतली व तिला संमोहित करण्याचा चमत्कार करून दाखवला. त्याचे कारणही लोकांना सांगितले व हा प्रयोग लोकांना फार आवडत असल्याचे जाणवले. पुढे पुढे जवळजवळ सर्वच ठिकाणी हा चमत्कार आम्ही दाखवू लागलो. आमचे पाहून आमचा ड्रायव्हर सागर बावणे हा देखील हा चमत्कार करू लागला. त्यामुळे आमच्या दोन्ही गटात हा चमत्कार होऊ लागला. पुढील तीन दिवसांत जवळपास आमचे २५ गावांमध्ये कार्यक्रम झाले. सुरुवातीला कणसे अजिबात बोलत नव्हते. मी फक्त किचन संभाळतो असे म्हणाले, पण नंदिनीने त्यांना पण हा विषय मांडण्यासाठी सांगितले व तेही बोलू लागले.
टेंब्रुसोंडा येथील डॉक्टर पिंपरकर हे त्यांच्या पत्नी बरोबर दवाखान्याच्या वार्टर्समध्ये राहात होते. एक दिवस आमची जेवणाची सोय त्यांच्या घरीच केली होती. त्यांच्याशी ओळख झाल्यावर त्यांना जवळपास आठ भाषा येत असल्याचे कळले. आदिवासी लोकांशी ते त्यांच्या भाषेत बोलत असत व तसे बोलण्याचा खूप चांगला परिणाम त्यांना दिसून येत होता. आम्हालाही ते जाणवलं. पिंपरकर डॉक्टरांनी आमच्या कामाविषयी जाणून घेतले. तसेच आमच्याकडील अॅम्प्लिफायर त्यांना आवडला व त्यांनी असाच एक अॅम्प्लिफायर मला आणून द्या व एक मी तुम्हाला भेट देणार आहे असे सांगितले. दुसर्या दिवशी आम्ही दोन अॅम्प्लिफायर घेऊन आलो. एक त्यांना दिला व एक सोबत ठेवला. त्यामुळे आमच्या दोन्ही गटात अॅम्प्लिफायर वापरता आला. तसेच एक मराठी आशाताई जिला चांगले कोरकू येत होते, तिच्या आवाजात मी लोकांना बोलवण्यासाठी कोरकू भाषेत रेकॉर्डिंग करून घेतले. पुढे गावात गेल्यावर तोच ऑडिओ अॅम्प्लिफायर वर लावत असे. त्याचा गर्दी जमा करण्यासाठी चांगला परिणाम होत होता. त्याचबरोबर आम्ही प्रबोधनपर काही गाणी आम्ही लावत असू. लहान मुलांना जादू दाखवणार असे सांगितल्यामुळे मुले जमत असत. आशाताई स्वतः बायकांना गोळा करत, सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, अंगणवाडी ताई ज्यांना ज्यांना संपर्क करता येत असे, त्यांना आम्ही संपर्क करून कार्यक्रमासाठी बोलवत होतो. त्यामुळे बरीच गर्दी जमत असे.
दररोज कार्यक्रम करण्यासाठी आम्ही सकाळी साडेसात वाजता चिखलदरा येथून निघत होतो. परत येण्यास आम्हास रात्रीचे १२ ते १ वाजत असत. रोज घाट उतरणे व घाट चढणे हे होत होते. एका गावात चाकात एक मोठा दगडच घुसला व खूप मोठे पंक्चर झाले. गडबडीत गाडीखाली जॅक लावताना चुकीच्या बाजूने लागला. तो फिरवण्यासाठी सागरला गाडीखाली जावे लागले; पण तिथे जाऊनही तो फिरवणे अवघड झाले होते. मागे एक किलोमीटर वर एक गाव होते, तिथे जाऊन मी एकाला कारचा जॅक मागितला. त्या गावात नुकताच आमचा कार्यक्रम झाला होता. त्यामुळे तो माझ्यासोबतच आला व त्याच्या मदतीने आम्ही चाक बदलले, पण हे पंक्चर एवढे मोठे होते की, परतवाड्यात आम्हाला नवीन ट्यूब टाकावी लागली.

एका गावात भगवान रणदिवे व मी कार्यक्रम करत होतो. गाव डोंगरावर होते. आमचा कार्यक्रम संपल्यावर गाडीला दोन किलोमीटरवर यावे लागणार होते व परत त्याच रस्त्याने खाली जायचे होते. म्हणून मी तेथील एका मुलाला खाली जाण्यासाठी शॉर्टकट आहे का असे विचारले तो मुलगा अॅम्प्लिफायर घेऊन आम्हाला रस्ता दाखवण्यासाठी चालत खाली आला. त्यामुळे आमचा खूप वेळ वाचला. गावागावात सर्व जण सहकार्य करत असल्याचे जाणवत होते. काही कार्यक्रमात भूमिका येऊन बसत असत पण विरोध करत नसत. एका ठिकाणी मात्र आमच्या चमत्कारानंतर एकाने लोकांना बोलावून एक चमत्कार करून दाखवला. अर्थात, दृष्ट काढतो त्या वेळी ज्याप्रमाणे परातीत पाणी उचलले जाते तसेच प्रकारचा तो चमत्कार होता
दोन वेळा आम्ही पूर्णपणे जंगलात होतो. वेळ रात्रीची होती. वन विभागाने प्रवेश बंद केलेला होता, पण आम्ही आरोग्य विभागाचे काम करीत असलेने आमच्या गाडीला अडवले नाही. जंगलात आम्हाला ससे, हरणे, रानडुकर व एकदा तर गव्यांचा कळपही दिसला. वाघ किंवा बिबट्या मात्र दिसला नाही, पण त्याच काळात एका माणसाला वाघाने मारल्याची बातमी ऐकण्यात आली. बर्याच गावात पिण्याच्या पाण्याची समस्या जाणवत होती. लोकांना लांबून पाणी आणावे लागत होते. गटारे व शौचालय नसल्याने बरेच ठिकाणी घाणीचे साम्राज्य होते. त्यामुळे माश्या खूप ठिकाणी दिसत होत्या. प्रत्येक गावात लहान मुलांची संख्या खूप होती व एक तरी लग्न चालू होते किंवा झाले होते. मात्र, कोठे मुलीची छेड काढणारी मुले दिसली नाहीत. कुठे मारामारीचे प्रसंग दिसले नाही. पाण्यासाठी बायकांची भांडणेही दिसली नाहीत. फक्त एका लग्नात मुलीची आई तिच्या सासरच्या लोकांशी पैशावरून भांडण करत होती. थोडी माहिती घेतली असता तिची मुलगी एका मुलाबरोबर पळून गेली होती व पंचांनी मुलाला एक लाख रुपये मुलीच्या आईस देण्यास सांगितले होते व पन्नास हजार आता व पन्नास हजार नंतर अशी सवलत दिली. ती आत्ताच मला एक लाख हवे यासाठी भांडण करत होती, पण पंचांचा निर्णय अंतिम असतो. त्यामुळे तिची चिडचिड चालू होती. प्रत्येक गावातील कार्यक्रम हा वेगळा अनुभव होता.
रस्त्यात शिर्डी फाट्याच्या पुढे एका ठिकाणी खूप गर्दी दिसली. जवळपास सातशे-आठशे लोक एका शॉप पुढे उभे होते. रस्त्याच्या कडेला बर्याच टू व्हीलर आणि फोर व्हीलर लागलेल्या होत्या. आम्ही मेळघाटातील आदिवासी लोकांच्या अंधश्रद्धा दूर करण्यास निघालो होतो व इथे श्री आदिवासी सावंथी हर्बल हेअर ऑइलची जोरदार विक्री चालू होती. शाखा क्रमांक पाच असाही उल्लेख होता. तिथे गाडी थांबवून आम्ही माहिती घेतली असता वेगवेगळ्या लाईनीत लोक डोक्यावर मेंदी सारखे औषध लावून घेत होते. बाराशे रुपयांचे तेल व शंभर रुपयाचा शांपू अशी विक्री चालू होती. जमलेल्या सर्व गर्दीमध्ये जवळपास ९०% लोक टकल असलेले होते. तिथे एक जण कॉम्प्युटरच्या साह्याने एक सेन्सर हातात घेऊन लोकांच्या टकलावर सेन्सर ठेवून केस किती दिवसात येतील हे सांगत होता. अर्थात, आमच्याकडे जास्त वेळ नसल्याने आम्ही थोडी माहिती घेऊन निघालो. पण ही नवीन बुवाबाजी उदयाला आल्याचे जाणवले व पुढे तीन- चार दिवसातच डोक्याला लावलेल्या लोशनमुळे अनेकांच्या डोळ्यांची जळजळ होत असल्याची बातमी ऐकण्यात आली.
माझ्या भाषणात मी सर्पदंश, व्यसन, कमी वयात लग्न या मुद्यांवर भर देत असे. भगवान रणदिवे दिवा पेटवणे, लंगर सोडवणे हे चमत्कार दाखवत असत. या भागात गवळी समाज हा जास्त सधन वाटत होता. तसेच मुलांना शिकवण्याकडे त्यांचा जास्त कल होता. प्रत्येक गावात स्लॅबचे बांधकाम चालू असल्याचे दिसून आले. शासनाकडून एक लाख वीस हजार मिळत असल्याचे कळाले. काही गावांमध्ये एनजीओच्या मदतीने पाण्याच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न झाल्याचे दिसले. काही ठिकाणी कामे अर्धवट होती.
सात जुलैपर्यंत आम्ही घेतलेले टार्गेट पूर्ण केले होते व अखेरच्या दिवसाचा मुकाम करण्यासाठी आम्ही प्रणव देशमुखच्या घरी आलो. तेथे जेवण करून तेथेच मुकाम केला. सकाळी परतवाडा सोडले. येताना रविवार असल्याने अमरावतीत कोणी भेटणार नव्हते. त्यामुळे आम्ही यवतमाळ शाखेची भेट घेण्याचे ठरवले. प्रकाश आंबिलकर यांना भेटलो त्यांच्या घरी जेवण करून आम्ही चार-पाच जणांच्या घरी गेलो. तिथे असलेले एक महात्मा फुले यांच्या नावाचे विद्यापीठही पाहिले त्याचे संचालक आपल्याच विचाराचे असल्याचे जाणवले. परत येताना आम्ही नुकतेच निधन झालेले कन्तड येथील कार्यकर्ते भुयागळे यांच्या घरी गेलो. आमच्याबरोबर जालन्याची टीम होती, लहाने सरही होते. काही वेळ त्यांच्या कुटुंबीयांबरोबर घालवल्यावर आदरांजलीचा कार्यक्रम केला. नंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.
-मिलिंद देशमुख
संपर्क : ८०८७८ ७६८०९
