‘टाईप टू डायबिटीस ए टू झेड, आजार ते आरोग्य व्हाया रिव्हर्सल’

-

स्वतःला आरोग्यदायी सवयी लावून घेण्याचा संकल्प आपण सर्व जण वेळोवेळी करत असतो. कुणाला  गोड खाण्याची सवय सोडायची असते, तर कुणाला जेवण्याच्या निश्चित वेळा पाळायची सवय लावून घ्यायची असते. फत औषधे घेण्यापेक्षा जीवनशैली आणि औषधोपचार यांचा संतुलित वापर आरोग्यदायी जीवनासाठी अधिक उपयोगी असतो.  डॉ. विनायक हिंगणे यांचे ‘टाईप टू डायबिटीस ए टू झेड, आजार ते आरोग्य व्हाया रिव्हर्सल’ हे पुस्तक डायबेटीस किंवा मधुमेह या आजारासंदर्भात योग्य औषधोपचारांसोबत योग्य जीवनशैलीचा अंगीकार करण्याचे महत्त्व सुलभतेने उलगडून दाखवते.

पुस्तकाचे लेखक डॉ. विनायक हिंगणे यांनी एमबीबीएस, डीएनबी (मेडिसीन) हे शिक्षण घेतले आहे. ते  बुलडाणा येथे वैद्यकीय व्यवसाय करतात. त्यांनी काही काळ इंग्लंडच्या राष्ट्रीय आरोग्य सेवेत देखील काम केले आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या एका कार्यक्रमासाठी बुलडाण्याला जाणे झाले, तेव्हा ‘आहार’ या विषयावर डॉ. विनायक हिंगणे यांचे भाषण ऐकले होते. त्यात त्यांनी बैठी जीवनशैली असणार्‍या भारतीय लोकांना वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयोगी पडेल अशी जेवणाची एक पद्धत सांगितली होती. त्यानुसार दोन्ही वेळच्या  जेवणामध्ये भाजी, उसळ, वरण, कोशिंबीर आणि दही या पाच गोष्टी प्रत्येकी एक एक वाटी खाव्यात. एवढे खाल्ले की चपाती, भाकरी किंवा भात न खाता देखील पोट भरते व नेहमीचे जेवण जेवल्याचा मानसिक आनंद देखील मिळतो. एवढे खाऊनही भूक लागली तर एक अंडे, एक फळ, अर्धी मूठ शेंगदाणे खावेत. हे सर्व  घरात उपलब्ध होणारे रोजच्या आहारातील पदार्थ असल्याने हा आहार हे एक फॅड न बनता त्याची सवय टिकवून ठेवणे सोपे जाते. डॉ. हिंगणे यांचे ‘क्रेविंग खाण्याचे व्यसन’ हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. 

ग्रामीण भागात व्यवसाय करताना डायबेटीस हा फक्त शहरी व श्रीमंत लोकांपुरता मर्यादित आजार उरलेला नाही, हे डॉ. विनायक हिंगणे यांच्या अनुभवास आले. वेळीच निदान करून जीवनशैलीत बदल केले तर डायबेटीस बरा होतो याचा प्रत्यय त्यांनी स्वतःचे वडील व काका यांच्यावर उपचार करताना घेतला. त्यानंतर त्यांनी ‘प्री डायबेटिक स्टेज’मध्ये निदान व योग्य जीवनशैलीचा अंगीकार करण्यासाठी मार्गदर्शन याद्वारे मधुमेहाच्या अनेक रुग्णांवर उपचार केले. त्यांच्या अनुभवाचे सार त्यांनी या पुस्तकात मांडले आहे.

डायबेटीस होतो म्हणजे नेमके काय होते? डायबेटीस आनुवंशिक असतो की जीवनशैलीजन्य असतो? डायबेटीसचे निदान करण्याच्या शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत? डायबेटीसमुळे होणारे इतर आजार कोणते आणि त्यामुळे कोणती गुंतागुंत उद्भवू शकते? डायबेटीसचे रिव्हर्सल कसे करावे म्हणजे डायबेटीस परतवून कसा लावावा? अशा डायबेटीसशी संबंधित विविध मुद्यांबद्दल या पुस्तकात माहिती दिलेली आहे.

पुस्तकातील ‘डायबेटीसचे निदान’ या प्रकरणामध्ये डायबेटीसच्या आधीची पायरी कोणती असते? डायबेटीसचे पके निदान कसे केले जाते? वेगवेगळ्या जास्तीच्या तपासण्या का कराव्या लागतात? या प्रश्नांची उत्तरे मिळतील. आजाराला प्रतिबंध किंवा लवकर उपचार करण्यासाठी निदानसुद्धा लवकर होणे आवश्यक आहे. डॉ. हिंगणे सांगतात की, बहुतांश लोकांचे निदान हे आजाराची गुंतागुंत तयार झाल्यावरच होते. काही लोकांना त्यांना डायबेटीस आहे, हे माहिती असते, पण काहीतरी त्रास झाल्याशिवाय ते उपचार सुरू करत नाहीत. शरीरामध्ये डायबेटीस होण्याची प्रक्रिया सुरू झालेली असेल तर ते रक्ताच्या तपासणीमधून प्रत्यक्ष डायबेटीस होण्याच्या आधी समजू शकते. त्यानंतर कोणतेही औषध न देता योग्य जीवनशैलीचा अंगीकार करून त्यातून बाहेरही पडता येते. त्यामुळे प्री डायबेटीसचे निदान होणे यात कोणत्याही डॉक्टरांचा, औषध कंपन्यांचा फायदा आहे, असे वाटून ते करणे टाळू नये, असे हे पुस्तक वाचून आपल्या ध्यानात येते.

‘डायबेटीसमध्ये होणार्‍या गुंतागुंती’ या प्रकरणामध्ये डायबेटीस असणार्‍या व्यक्तीने पाय, डोळे, नसा, किडनी, हृदय, यकृत यांची घ्यायची काळजी, डायबेटीसमुळे या अवयवांच्या कामकाजामध्ये निर्माण होणारी गुंतागुंत व त्यावरील शास्त्रीय उपाय यांची माहिती दिलेली आहे. ‘डायबेटीसवरील उपचार’ या प्रकरणामध्ये वेगवेगळ्या औषध गटांमधील औषधे नेमकी कसे काम करतात व ती वापरण्याचे फायदे-तोटे स्पष्ट केले आहेत. आहार, व्यायाम व जीवनशैलीतील बदलातून डायबेटीस कसा मुळातून बरा करता येतो याची ‘डायबेटीस रिव्हर्सल’ या प्रकरणातील माहिती प्रत्येकाने आवर्जून वाचण्यासारखी आहे. डायबेटीस बद्दल सर्वसामान्यांच्या मनात असलेल्या ‘डायबेटिस रुग्णाने गहू खावा की ज्वारी?’ ‘फळे खावीत का?’ ‘रक्तातील साखर तपासण्याआधी औषधे घेतली तर चालतात का?’ यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शेवटच्या प्रकरणात दिलेली आहेत.

‘सकाळ’ प्रकाशनने प्रकाशित केलेल्या या सुमारे दीडशे पानी पुस्तकात भरपूर चित्रे आहेत, भाषा संवादी व मांडणी सुटसुटीत आहे. किंमत २२५ रूपये आहे.

-मुक्ता दाभोलकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ]