रत्नागिरी जिल्ह्यात जादूटोणा विरोधी कायदा प्रचार यात्रा

मुक्ता दाभोलकर -

कोकणातील भगतगिरी व सामाजिक बहिष्कारचा प्रश्न

२० ऑगस्ट २०२४ रोजी पुण्याच्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून महाराष्ट्रव्यापी जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा प्रचार-प्रसार यात्रा काढण्यात आली होती. चौर्‍याऐंशी दिवस ही यात्रा महाराष्ट्रात फिरली. या यात्रेच्या अनुभवानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या दोन कायद्यांचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी स्वतंत्र जिल्हा दौरे आयोजित करण्याचे ठरले. रत्नागिरी जिल्हा दौर्‍यापासून त्याची सुरुवात झाली.

१३ ते १७ मे २०२४ या कालावधीत रत्नागिरी जिल्हा दौरा पार पडला. राज्य कार्यकारी समिती सदस्य विनोद वायंगणकर व मुक्ता दाभोलकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुक्यांना भेट दिली. राधा वणजू, मधुसूदन तावडे, निखिल भोसले, प्रा. विनायक होमकळस, वल्लभ वणजू, जयश्री बर्वे, पाष्टे गुरुजी, सुनील लोंढे, नेत्रदीप तांबे, मोहन चव्हाण, राजपाल भिडे हे व इतर कार्यकर्ते शक्य त्या ठिकाणी कार्यक्रमात सहभागी झाले.

गेल्या वर्षी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात एका मांत्रिकाने एका कुटुंबाचे जवळपास पस्तीस लाख रुपये लुबाडले होते. मातीकाम करून उदरनिर्वाह करणार्‍या त्या कुटुंबाने कर्ज काढून घेतलेला जेसीबी विकून ते पैसे मांत्रिकाला दिले होते. या घटनेनंतर रत्नागिरी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी यांनी समाजमाध्यमांमध्ये एक व्हिडिओ प्रसारित करून असे प्रकार आढळल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणण्याचे आवाहन जनतेला केले होते. तो व्हिडिओ पाहून त्यांच्या या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला होता. रत्नागिरी जिल्ह्यात भगतगिरी, इतर अंधश्रद्धा व सामाजिक बहिष्काराचे प्रकार मोठ्या प्रमाणात निदर्शनास येतात. त्यामुळे जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी व पोलीस पाटील यांना सदर कायद्यांची माहिती देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती एक अभियान चालवणार असून त्याला सहकार्य करण्याची विनंती आम्ही त्यांना केली. ही विनंती त्यांनी लगेचच मान्य केली. त्यांच्या सहकार्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व नऊ तालुका पोलीस ठाणी तसेच मोठ्या तालुक्यातील इतर पाच पोलीस ठाणी असे एकूण चौदा ठिकाणी आम्ही कायद्याची माहिती देण्याचे कार्यक्रम केले. रत्नागिरी येथील पोलीस मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मा. पोलिस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी व अतिरिक्त पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड हे स्वतः उपस्थित राहिले. त्या त्या गावातील काही नागरिक देखील या सर्व कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहिले.

कोणत्याही व्यक्तीप्रमाणे पोलीस देखील भोवतालच्या समाजातच घडलेले असतात. त्यामुळे ‘अंगात नेमके कसे येते?’, ‘अमुकने संगितले त्याप्रमाणे माझी हरवलेली वस्तू नेमकी कशी सापडली?’ ‘काही आजार डॉक्टरला कळले नाहीत, पण बाहेरचं बघितल्यावर बरे वाटले हे कसे?’ ‘अमुक गावात पेटत्या निखार्‍यावरून चालतात ते कसे शक्य होते?’ ‘अमुक ठिकाणी लोक तोंडात जरबा किंवा पाठीला गळ टोचून घेतात ते कसे?’ ‘अंधश्रद्धेच्या आहारी गेलेल्या व्यक्ती आपले काही ऐकत नाहीत, अशा वेळी काय करायचे?’ असे अनेक प्रश्न समोर आले. दोन्ही कायद्यांची माहिती देऊन कोणत्या प्रकरणी कोणती कलमे लागू शकतील याबद्दल आम्ही चर्चा करत होतो, स्पष्टीकरण देत होतो. अतींद्रिय शक्ती वापरून हरवलेली वस्तू शोधून देण्याचा दावा करणार्‍या व्यक्तीला पोलीस खात्यात नोकरी मिळू शकेल का? यांसारखे प्रश्न विचारून त्यांना विचारप्रवृत्त करत होतो. १९८२ साली केरळचे विवेकवादी बी. प्रेमानंद यांच्या महाराष्ट्राच्या दौर्‍यात ते स्वतः व इतर विज्ञानवादी कार्यकर्ते निखार्‍यावरून चालण्याचे प्रात्यक्षिक करत असत व त्यामागील विज्ञान लोकांना समजावून सांगत असत. त्यानंतर चाळीस वर्षांनी देखील रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये निखार्‍यांवरून चालण्याचा हा तथाकथित चमत्कार केला जातो. बालपण, तरुणपण अशा जडणघडणीच्या सर्व वर्षांमध्ये जवळपास दरवर्षी जे मूल याचा अनुभव घेत असेल त्याचे मन कसे घडत असेल? त्याचे मन अंधश्रद्धामुक्त करणे किती कठीण काम असेल!

रत्नागिरी जिल्ह्यात गावोगावी प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी कौल लावले जातात. एखाद्याने करणी केली आहे की नाही? चोरी केली आहे की नाही? शेताची राखण म्हणून कोंबड्याचा बळी देण्याची कुटुंबाची प्रथा बंद करावी की नाही? दोघांच्या भांडणात कोणाचे म्हणणे खरे? अशा वेगवेगळ्या प्रकरणात निर्णय घेण्यासाठी कौल लावले जातात व कौलाच्या आधारे गावकरी त्या मुद्यावर निकाल देतात. यातून एखाद्या व्यक्तीला किंवा कुटुंबाला दोषी जाहीर करून दंड व सामाजिक बहिष्काराच्या माध्यमातून त्यांचा अनन्वित छळ सुरू होतो. जे लोक अशा संविधानबाह्य निवाड्यात सहभागी होणे नाकारतात त्यांच्यावर देखील सामाजिक बहिष्कार टाकण्यात येतो. काही गावांनी कौल लावून निवाड्याचे हे प्रकार बंद देखील केले आहेत. या व्यतिरिक्त गावाच्या जत्रेचा किंवा भात लावणी सुरू करण्याचा दिवस ठरविण्यासाठी देखील कौल लावण्याची देखील परंपरा आहे. (त्यात कोणाचे शोषण नाही. त्यामुळे त्याला विरोध करण्याचे कारण नाही.) सामाजिक बहिष्काराची वेगवेगळी कारणेही समोर आली. ग्रामपंचायत निवडणुकीला उभा राहण्यापासून ते गावाचे देव तू तुला सामील करून घेतलेस यांसारख्या अनाकलनीय कारणापर्यंत अनेक कारणांनी एखाद्याला समाज बहिष्कृत केले जाते. बहिष्कृत व्यक्तींशी बोलणार्‍या किंवा कोणताही सामाजिक व्यवहार करणार्‍या व्यक्तीला देखील दंड किंवा सामाजिक बहिष्काराची शिक्षा सुनावली जाते.

या दौर्‍याच्या निमित्ताने पुन्हा एकदा जाणवले की भगतगिरी किंवा सामाजिक बहिष्कार हे समाजजीवनाचा अविभाज्य भाग आहेत. त्यातून फसवणूक व शोषण होते. त्यामुळे तो व्यक्तिगत किंवा गावाचा मामला नसून तो कायद्याने गुन्हा आहे हे समाजाच्या पचनी पडायला निश्चितच काही काळ जाईल. स्त्रियांवरील हिंसाचाराशी संबंधित कायद्यांबद्दल समाज या टप्प्यांतून गेला आहे. पिढ्यानपिढ्या लोक असे मानत होते की, राग आला म्हणून बायकोला मारणे किंवा घराबाहेर काढणे ही जनरीत आहे, तो नवर्‍याचा हक आहे. परंतु स्त्री चळवळीच्या व कायद्याच्या रेट्यामुळे कौटुंबिक हिंसाचार हा कायद्याने गुन्हा आहे, हे बहुतेकांना आता माहीत झाले आहे. त्यानुसार सर्वांचे मन व वर्तन बदलले आहे असे नाही, परंतु किमान कायद्याचे अस्तित्व लोकांना माहिती झालेले आहे. तसेच जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यातून भगतगिरी व सामाजिक बहिष्कार या प्रश्न सोडविण्याच्या योग्य पद्धती नाहीत, हे निश्चितपणे समाजापर्यंत पोहोचेल याची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला खात्री आहे.

मुक्ता दाभोलकर, विनोद वायंगणकर


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]