साप पर्यावरणातील एक महत्त्वाचा घटक

सर्पमित्र दिलीप कामत -

नागपंचमी निमित्त विशेष लेख..

साप म्हटले की, भल्याभल्यांची बोबडी वळते. आजही कित्येक लोक असे आहेत की, जे सापाला साप न म्हणता ‘लांबडं’ किंवा ‘जनावर’ म्हणून संबोधतात. आजही ‘साप साप’ म्हणून भुई थोपटली जाते. सापाचा दंश झाला तर माणूस दगावतोच हा समज दृढ झाला असल्याने सापाबद्दल अनेक गैरसमज व भीती जनमानसात रुजली आहेत. भौगोलिक स्थानाशी मिळती जुळती रंगसंगती असल्याने पटकन दिसून न येणारा, चपळ तसेच रात्रीच्या वेळीही फिरणारा व त्यामुळे अंधारात दिसून न येणारा असा साप असल्याने तसेच पाणी, भूपृष्ठ व झाडावरही त्याचा वावर असल्याने सापाविषयी जनमनात भीतीने घर केले आहे. सापाविषयी कितीतरी प्रबोधन झाले असले तरीही शहरी किंवा ग्रामीण भागात सापाविषयीची भीती जनमनातून अजून दूर झालेली नाही. असा वैशिष्ट्यपूर्ण साप लोकांसाठी गूढ बनून राहिल्याने अनेक गैरसमजुती व अंधश्रद्धा रुजल्या गेल्या.

साप हा एक सरपटणारा थंड रक्ताचा प्राणी आहे. तो आक्रमक नसून तो मुळातच भित्र्या प्रवृत्तीचा असल्याने चाहूल लागताच पळून जातो. सापांना हात-पाय यासारखे अवयव नसल्याने ते पोटाखालील खवले व शरीराची विशिष्ट हालचाल याचा मेळ घालून सरपटत असतात. त्यामुळे त्यांना त्रास दिल्यास वा त्यांची कोंडी केल्यास ते चावण्याचा प्रयत्न करीत असतात. धावणे व सुटका करून घेणे हा त्यांचा प्रतिकाराचा एक मार्ग आहे आणि ते हा मार्ग सर्वांत शेवटी नाईलाजाने वापरतात साप मांसाहारी असून मासे, बेडूक, उंदीर, सरडे, पाली इत्यादी त्याचे भक्ष्य आहे. अजगरासारखे मोठा साप उंदीर-घुशी पासून हरणासारखे प्राणी गिळू शकतो, तर नागराजा (किंग कोब्रा) इतर साप खाऊन जगतो. सापाला बाह्य कर्ण नसल्याने हवेतील ध्वनी त्याला ऐकू येत नाही. नाकाने श्वास तर जीभेने वास तो घेत असतो. त्याचबरोबर तोंडावरील किंवा ओठावरील खवल्यांमधील विशिष्ट लहान खड्ड्यांद्वारे तापमानातील फरक जाणून घेत असतो. जगात आढळणार्‍या सापांपैकी फार कमी जातीचे साप विषारी आहेत. त्यामुळे कोणताही साप चावला की, तो विषारी आहे असे समजून घाबरण्याचे कारण नाही.

साप हा निसर्गचक्रातील एक महत्त्वाचा घटक आहे. निसर्गाच्या अन्नसाखळीतील त्याची भूमिका अतिशय महत्त्वाची अशी आहे. आपल्याकडे उंदरांची समस्या फार मोठी आहे. त्यांच्या प्रजननाचा वेग पाहता त्यांच्या बेसुमार वाढीव नियंत्रण ठेवणारे मांजर, मुंगुस, कोल्हे इत्यादींसारखे प्राणी व घार, घुबड, मोर इत्यादींसारखे पक्षी यांनाही मर्यादा येते. उंदीर बिळात गेल्यावर त्यांचा नाईलाज होतो. परंतु साप हा एक प्रभावी माध्यम असल्याने तो पाण्यात, जमिनीवर, झाडावर अगदी बिळात जरी उंदीर गेला तरी तेथे पोहोचून त्याचा फडशा पाडतो. साप नेहमीच मनुष्यवस्तीच्या आसपास दिसून येतात. याचे कारण म्हणजे मनुष्य वस्ती व शेतीत असणारे उंदीर, पाली यासारखे प्राणी होय. याचा अर्थ असा नाही की मनुष्य वस्तीत उंदीर, पाली नसाव्यात. उंदीर जरी शेतीस हानीकारक असले तरी मनुष्य वस्तीतील मानवाने टाकून दिलेले अन्नपदार्थ, खाद्य कचरा नष्ट करण्याचे काम उंदीर करीत असतात. (मात्र घरातील पुस्तके, कपडेही कुरतडून खराब करीत असल्याने ते घरात नसावेत.) तसेच घरातील, आवारातील कीटक (मुख्यत्वेकरून डास व झुरळ) खाण्याचे काम पाली करीत असतात. त्यामुळे त्यांची एक प्रकारे आपल्याला मदतच होत असते. ही एक निसर्गातील अन्नसाखळी आहे, हे येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सापांशी आपला संबंध येतच राहणार; पण यासाठी आपण योग्य ती दक्षता घेतल्यास आपण साप टाळून त्यांना जीवदान देऊ शकतो.

साप घरात येण्याचे कारण म्हणजे त्यांचे भक्ष असलेले उंदीर, पाली व पाळीव पक्षी आपल्या घरात असतात. खबरदारी म्हणून आपण उंदीर घरात येऊ नयेत म्हणून काही उपाययोजना करणे आवश्यक आहे. घरात खरकटी भांडी ठेवू नयेत किंवा कोणतेही खाद्यपदार्थ उघड्यावर ठेवू नयेत. धान्य जर पिशवी अथवा पोत्यात असेल, तर ते धातूच्या डब्यांमध्ये भरून ठेवावे. असे केल्याने उंदीर घरात प्रवेश करणार नाही. तरीही सापाने घरात प्रवेश करू नये यासाठी दाराला फट असू नये याची काळजी घ्यावी. जरी फट असेल तर उंबरा बसवून घ्यावा किंवा कापड अथवा तरटाचा तुकडा वरदळ नसेल तेव्हा फटीत ठासून ती फट बंद करावी. घरातील व घराबाहेरील बिळे सिमेंट वापरून बंद करावीत. खिडक्या, झरोक्यांना बारीक जाळी बसवावी. घराबाहेरील भिंतीला खिळे किंवा खुंटी ठोकू नये अन्यथा त्याचा आधार घेऊन साप खिडकी अथवा छपरमार्गे घरात घुसू शकतो. घराचे छत जर कौलारू असेल तर त्यावरील किंवा जवळील झाडाच्या फांद्या छाटाव्या. बाथरूममधील पाणी काढण्यासाठी जर लोखंडी पाईप टाकला असेल तर त्याला बाहेरून बारीक जाळी बांधावी. ही खबरदारी घेतल्यास साप घरात शिरणार नाही. मात्र पाली घरात असाव्यात अशा मताचा मी आहे. पाली घरातील झुरळ, डास, ढेकूण इत्यादी कीटकांना खाऊन त्यांच्यापासून होणार्‍या रोगराईपासून आपले संरक्षण करतात. घराबाहेर अंगणात केराचा, दगड-विटा अथवा मातीचे ढिग साचू देऊ नये. अशा ठिकाणी साप आश्रय घेत असतात.

ग्रामीण भागातील घरे ही बैठी व कौलारू असतात. ग्रामवासीयांनी याबाबतीत जास्त काळजी घेणे गरजेचे असते. घरातील धान्य धातूच्या कणगीत ठेवणे, घरात अडचण न ठेवणे, घरात अथवा घराबाहेर इांधन म्हणून ठेवलेला जळाऊ लाकडाचा साठा वा शेण्या (गोवर्‍या) यासारख्या वस्तू जमीनीपासून उंच बांधलेल्या मचाणावर रचून ठेवाव्यात. अशा उंचावरील ठिकाणी साप आश्रय घेण्याची शक्यता कमी होते. जरी जमिनीवर असा साठा असेल, तर त्यातील इंधन काढण्यासाठी थेट हाताचा वापर न करता एखाद्या आकडीने तो बाहेर ओढून काढून मगच उचलावे. कारण अशा ठिकाणी साप आसरा घेऊ शकतो व हाताला चावू शकतो. झोपण्यासाठी खाट, बाजले इत्यादींचा वापर करावा. साप शक्यतो उंच जागी जात नाही. त्यामुळे संरक्षण होते. नाईलाजाने खाली जमिनीवर झोपण्याची वेळ आली, तर अशावेळी खोलीच्या मध्यभागी झोपावे. कारण साप शक्यतो भिंतीकडेने फिरतात. मच्छरदाणी वापरणे हा सर्वोत्तम उपाय ठरू शकतो. त्यामुळे कीटक व साप यापासून संरक्षण मिळते. रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याचा प्रसंग आलाच तर प्रकाशाचे काहीतरी साधन असणे आवश्यक आहे. त्याच्या प्रकाशात वाटेवरील साप आपल्याला दिसून येतो आणि आपण संभाव्य धोका टाळू शकतो. अगदीच उजेडाचे कोणतेही साधन नसल्यास जमिनीवर काठी किंवा पाय आपटत चालल्यास निर्माण झालेल्या सूक्ष्म कंपनाद्वारे वाटेतील सापास धोक्याची जाणीव होऊन तो पळून जाईल आणि आपला मार्ग सुकर होईल.

गिरीभ्रमण अथवा पर्वतारोहणं करणार्‍यांनीही काही दक्षता घेणे आवश्यक आहे. अशा भ्रमंतीला जंगल तुडवावे लागते. पायवाटेने जाताना पाल्याच्या ढिगावर एकदम पाय टाकू नये. त्याखाली साप असण्याची शक्यता असते. अशा वाटेवरून जाण्याशिवाय गत्यंतर नसेल तर एखाद्या लांब काठीने आधी तो ढिग हलवावा, असे केल्याने त्याखाली जर साप असेल, तर तो पळून जातो. मगच मार्गस्थ व्हावे. झाडाच्या हिरव्या व खोडाच्या तपकिरी रंगासारख्या रंग साधर्म्याचे साप तेथे वावरत असतात त्यामुळे आधारासाठी झाडाचा अथवा खोडाचा वापर करण्याआधी तेथे साप नसल्याची खात्री करून घेणे. सापांना सकाळ व सायंकाळचे कोवळे ऊन आवश्यक असल्याने ते दगडावर किंवा जेथे ऊन मिळू शकेल अशा ठिकाणी बसलेले असतात, तेव्हा दगड हलविताना दक्षता घ्यावी. रात्रीच्या वेळेस प्रखर प्रकाशाची साधने वापरावीत. अशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस राहण्याची वेळ आली, तर तंबूचा वापर करावा. तंबू हा बंदिस्त असावा. अशा प्रकारचे तंबू बाजारात मिळतात की जे चेन ओढून पूर्णपणे बंदिस्त करता येतात. अशा तंबूंना काही ठिकाणी बारीक जाळीच्या झडपा असल्याने वायुविजनाचीही सोय होते. पर्वतारोहण करणार्‍यांनीही काही दक्षता घेणे आवश्यक आहे. बरेचसे साप कडेकपारीत आश्रय घेतात. ऊन्हासाठी ते कपारीबाहेर आलेले असतात. अशावेळी कपारी अथवा खाचांची पकड घेताना आधी तेथे साप नसल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. कारण अशा जागा नजरेच्या टप्प्याच्या वरील बाजूस असतात. यासाठी लांब लवचिक काडीने आधी त्या जागा तपासाव्यात. साप असेल तर काडीच्या धक्क्याने तेथून पळून जाईल. मगच पकड घ्यावी.

या प्रकारच्या दक्षता घेतल्या तर आपण सर्पदंश टाळू शकतो. याउपर काही कारणाने सर्पदंश झालाच तर प्रथमोपचार करून रुग्णाला त्रास पडू न देता रुग्णालयात नेणे आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे सर्पदंश हाताला किंवा पायाला होत असतात. रुग्णाला धीर देणे हा सर्वांत मोठा प्रथमोपचार आहे. सापाचे विष शरीरात गेल्यावर साधारणपणे दहा ते वीस मिनिटांत दंश झालेल्या ठिकाणी तीव्र वेदना जाणवू लागतात. पुढे त्या पसरू लागतात. तसेच दंश झालेल्या जागेला सूज येऊन प्रसंगी ती पसरू लागते. अशा वेळेस रुग्णाला झोपलेल्या (म्हणजे आडवे) अवस्थेत ठेवणे आणि हाताला दंश झाला असेल, तर हात हृदयाच्या पातळीच्या खाली व पायाला दंश झाला असेल तर तोही हृदयाच्या पातळीच्या खाली राहील याची दक्षता घ्यावी. त्यामुळे रक्ताभिसरणाचा वेग कमी होईल. दंश झालेल्या अवयवाला स्थिर ठेवण्यासाठी आधार पट्ट्या बांधल्या तरी चालेल. रुग्ण घाबरला तर रक्ताभिसरणाचा वेग वाढून विष लवकर पसरू शकते. त्यामुळे रुग्णाला धीर देणे फार महत्त्वाचे आहे. तो एक प्रकारचा प्रथमोपचारच आहे. रुग्णाला एखाद्या वाहनाद्वारे जवळच्या रुग्णालयात लवकरात लवकर दाखल केले असता, योग्य ते उपचार मिळून रुग्ण वाचू शकतो. सर्पदंशामुळे विष भिनले असल्यास त्यावर देवळात नेऊन ठेवणे, मांत्रिकाकरवी मंत्रोपचार करणे, जडी-बुटी, गंडे-दोरे इत्यादी उपाय करण्यात वेळ घालवू नये. सर्पविषावर त्याचा काहीही उपयोग होत नाही. उलट योग्य वैद्यकीय उपाय वेळेवर न मिळाल्याने रुग्ण दगावू शकतो. विषारी सर्पदंशावर उतारा म्हणून सापाच्या विषावर प्रक्रिया करून तयार केलेली लस जीवनदायी ठरते.

आज सर्वत्र हजारोंच्या संख्येने सर्पमित्र तयार झालेले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानामुळे दूरध्वनीद्वारे तात्काळ संपर्क करून त्यांना काही वेळातच पाचारण करता येऊ शकते. त्यांच्याकरवी घरात आलेला साप पकडून पुन्हा तो निसर्गात सोडता येतो आणि पर्यावरण संतुलन राखण्यास मदत करता येते.

काही अनुभव

१९९५ ची घटना आहे. निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणीसंग्रहालयातील दिवसभराची कामे आटोपून प्राणीसंग्रहालय बंद झाल्यावर आणि कर्मचारी निघून गेल्यावर गेटजवळील तिकीट केबीनमध्ये बसून रजिस्टर्समधील नोंदी अद्ययावत करणे, अहवाल तयार करणे, कार्यालयीन पत्र तयार करणे, कर्मचार्‍यांना रजा मंजूर करून फाईलिंग करणे इत्यादी कामे करण्यासाठी अधिक वेळ थांबत असे. असेच एके सायंकाळी लिखाण करीत बसलो असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मिलिंद देशमुख भेटायला आले. आम्ही थोडा वेळ गप्पा मारत बसलो होतो. त्याचवेळी स्कूटरवरून एक तरुण आला आणि रामनगर येथे साप निघाला असल्याचे सांगितले. देशमुखांबरोबर त्यांच्या गाडीवरून आम्ही रामनगरला गेलो. लांबूनच रस्त्यावर मोठा जमाव थांबलेला दिसून आला. गाडी बाजूला लावून जमावामधून वाट काढत आम्ही पुढे गेलो. तेथील ‘अडवानी ऑर्लिकॉन’ कंपनीच्या गेटबाहेर रस्त्यावर अग्निशमन दलाची गाडी उभी दिसली. सोबत आलेल्या तरुणाने वर बोट करून तेथे साप असल्याचे सांगितले. नीट निरखून पाहिले असता कंपनीतील एका झाडापासून रस्त्यापलिकडील पथदिव्याच्या खाबांला सुमारे २० फूट उंचीवर एक केबल बांधलेली होती. त्या केबलवर एक साप बसलेला आढळला. रात्रीची वेळ आणि पुरेसा उजेड नसल्याने सापाची जात कळून येत नव्हती. लोकांनी मदतीसाठी अग्निशमन दलाला पाचारण केले होते; पण साप असल्याने कर्मचारी दलही हतबल झाला होता. आम्ही दोघे अग्निशमन दलाच्या गाडीवर चढलो आणि बॅटरीच्या उजेडात पाहिले तर तो विरूळा किंवा दिवड जातीचा बिनविषारी पाणसाप होता.

खरेतर हा साप नदी, नाले, तलाव, विहिरी, पाण्याची डबकी येथे आढळतो. शहरात तो गटारीतही आढळतो. हा साप तसा बिबट्यासारखा आहे. बिबट्या वाघ जसा कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतो, तसा हा सापही कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेतो. खरे तर सर्प जिवंत भक्ष पकडून त्याला गुदमरवून खातात म्हणजेच गिळतात. पण हा साप सर्रास मृत प्राण्यांचे व पक्षांचे मांस भक्षण करताना आढळला आहे. येथे तर तो चक्क २०-२५ फूट उंचीवरील केबलवर जाऊन बसला होता. गाडीवर उभे राहूनही तो आमच्यापासून ९-१० फुटावर होता त्यामुळे हाताला येणे शक्य नव्हते. देशमुखांनी एक लांब काठी घेऊन त्याला डिवचले त्यामुळे तो खाली अलगद माझ्या हातात येऊन पडला. मुळात तापट स्वभावाचा असल्याने माझ्या हाताला चावा घेऊन जणू त्याने निषेध व्यक्त केला. त्याला कापडी पिशवीत बंद करून आम्ही खाली उतरलो.

भोवताली गर्दी आणखीन वाढली होती. काहीजण साप दाखवा म्हणत होते, तर काहीजण त्या सापाबद्दल अद्भूत माहिती देत होते. एकाने पुढे येऊन हा साप नर आहे की मादी असे विचारले. त्यावर मी हा नर असल्याचे त्याला सांगितले त्यावर तो म्हणाला की या कंपनीच्या परिसरात याची मादी फिरत आहे, ही जोडी आहे. तेव्हा ही जोडी तोडू नका. जोडी तोडल्यास तुम्हाला शाप लागेलच; परंतु आम्हा रहिवाशांना मादी येऊन बदला घेण्यासाठी त्रास देईल, तेव्हा या सापाला या कंपनीच्या आवरामध्ये सोडा. त्याला इतर अनेक जणांनी दुजोरा दिला. एक तर माझ्या हाताला सापाने चावले होते आणि दंशाच्या जागी रक्ताचे थेंब गोठले होते. जखम लवकर स्वच्छ करणे आवश्यक होते, नाहीतर जंतू संसर्ग होण्याची शक्यता होती. मी लोकांना जखमेबाबत सांगितले; पण ते ऐकायला तयार नव्हते. देशमुख आणि मी त्यांना समजावत होतो की साप हा कुटुंबाने राहत नसतो मात्र प्रजोत्पादनाकरिता वर्षातून अल्प काळ नर आणि मादी मिलनाकरिता एकत्र येतात आणि मिलन झाल्यावर आपापल्या वाटेने निघून जातात. अगदी पिल्लेही एकत्र राहत नाहीत. पण ते ऐकायला तयार नव्हते. शेवटी मी त्यांना सांगितले की कंपनीच्या आवारात साप सोडला तर कदाचित कंपनी माझ्यावर गुन्हा दाखल करेल. तरीही ते ऐकायला तयार नव्हते. जमाव सुमारे ४०-५० जणांचा होता. आता तर ते हातातली सापाची पिशवी हिसकावून घेण्याचा प्रयत्न करू लागले, तेव्हा देशमुख म्हणाले की, आता येथे साप पकडल्याचा पंचनामा करून त्याच्या नोंदी घेऊन खात्यामार्फत वन खात्याला कळवावे लागले त्यानंतर त्यांच्याकडून परवानगी आल्यानंतर साप त्याच्या अधिवासात सोडावा लागतो, अशी माहिती दिली शिवाय नियमांचे पालन केले नाही तर अडथळा आणणार्‍यांवर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो, याची जाणीव करून दिल्यावर लोकांनी हा साप जवळच्या खाणीत सोडा असा दबाव टाकला. आम्ही नाइलाजाने तो साप खाणीत सोडला.

परत येताना देशमुख आणि मी याच विषयावर चर्चा करत होतो. अजूनही समाजात असलेले सापाविषयीचे गैरसमज व अंधश्रद्धा दूर करण्याचे काम वाढवले पाहिजे यावर दोघांचे एकमत झाले.

– सर्पमित्र दिलीप कामत, पुणे

संपर्क : ९८२२० २७१०७


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]