प्रभाकर नानावटी -
केरळमधील कृपासनमच्या मेरियन श्राइनच्या (पवित्र स्थान – Shrine) हॉलमध्ये प्रचंड गर्दी जमली होती. पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती. सगळीकडे चेहरेच चेहरे. काहींच्या चेहर्यावर दुःखद छटा. काहींच्या चेहर्यावर हतबलतेचे भाव. सर्व जण थकलेले. त्या सगळ्यांना काही तरी सांगायचे होते, काहींना स्वतः अनुभवलेल्या व त्यांच्या जीवनालाच कलाटणी देणार्या चमत्कारांच्या गोष्टी सांगावेसे वाटत होते. त्यांच्यातील भावना उचंबळून येत होत्या. घोगर्या आवाजात त्या दैवीकृपेने कशा रोगमुक्त झाल्या हे ते सांगत होते. अनाहुतपणे त्यांना कसा धनलाभ झाला व त्यांनी आर्थिक अडचणीवर कशी मात केली हे सांगायचे होते. काहींना आपण कसे व्यसनमुक्त झालो हेही सांगायचे होते. जमलेल्या सगळ्यांना या सर्व गोष्टी दैवी चमत्कारामुळे होऊ शकतात, याबद्दल तिळमात्र संशय नव्हता. हे सर्व सांगत असताना काहींच्या डोळ्यात पाणी तरारत होते. गर्दी एकाग्र चित्ताने लक्षपूर्वक ऐकत होती. गर्दीच्या दुसर्या बाजूला काही जण रांगेत उभे राहून एकेक जण पुढे सरकत होते. टोकाला उभारलेला पाद्री पुढे आलेल्या भक्ताच्या डोक्यावर पवित्र पाणी (Holy Water) शिंपडत होता. पाद्री काही तरी पुटपुटल्यासारखे तोंडातून म्हणत होता. भक्ताच्या मुक्तीसाठी, त्याच्या उपचारासाठी तो प्रार्थना करत असावा. ठिकठिकाणी लावलेल्या उदबत्तीच्या वासामुळे वातावरण तापलेले वाटत होते. या उन्मादी व गंभीर वातावरणात भक्त आपापल्या समस्यांचा पाढा वाचत होते दुःख, वेदना, आजारपण, कर्जबाजारीपण, व्यसनाधीनता जीससच्या क्रॉससमोर उभे राहून सांत्वनाची व या जंजाळातून बाहेर पडण्याची अपेक्षा करत होते.
४६ वर्षांची रम्या मोहन श्राइनच्या वेदिकेसमोर उभे राहून अक्षरशः रडत रडत कृपासनमच्या चमत्काराने तिच्या आयुष्यात कसे बदल घडविले हे सांगत होती. काही वर्षांपूर्वी तिच्या तीन वर्षांच्या मुलाचे अपघाती मृत्यू झाला होता. त्या जीवघेण्या अपघातात तीसुद्धा मरता मरता वाचली. कृपासनमच्या पवित्र स्थानाची भक्त असल्यामुळे तिने मदर मेरीला एवढी मोठी शिक्षा का दिली म्हणून विचारत होती. तिचा मुलगा आता जास्त सुरक्षित व चांगल्या स्थळी गेला आहे, असे तिला सांगण्यात आले. तिची तब्येत हळूहळू सुधारायला लागली. जे काही होत आहे ते आपल्या भल्यासाठीच व परमेश्वर तुझी परीक्षा घेत होता, असे दैवी शक्तीने तिला सांगितले म्हणे. रम्या धर्माने हिंदू असूनसुद्धा या चर्चला येत होती व ईश्वराबरोबर करार केल्याप्रमाणे प्रार्थना करत होती.
कोचीहून आलेली ५४ वर्षांची जेस्सी कृपासनमच्या श्राइनला नेहमी भेट देते. तिच्या भावाच्या हृदयाजवळच्या रक्तवाहिनीत तीन ब्लॉकेजेस आहेत, असे डॉक्टरांनी निदान केले होते. तो बरा व्हावा म्हणून ती येथे येऊन प्रार्थना करत होती. त्याच्यावर हॉस्पिटलमध्ये हार्ट सर्जरी करण्यात आली व तो पूर्णपणे बरा झाला. जेस्सीला मात्र कृपासनमच्या मदर मेरीच्या दैवी हस्तक्षेपामुळेच तो बरा झाला यावर विश्वास होता. तिने तिच्या जमीनीचा एक तुकडा विक्रीसाठी काढला होता. त्याला योग्य किंमत मिळत नव्हती. मात्र अलीकडेच एका गिर्हाइकाने योग्य किंमत देऊन खरेदी केली. तिला हे सर्व कृपासनमच्या मदर मेरीच्या कृपेमुळेच व ती करत असलेल्या रोजच्या प्रार्थनेमुळेच दैवी चमत्कार होऊन घडले असेच वाटते.
पाथनंथिट्टा गावच्या ४६ वर्षांच्या शांतम्माजवळ दारिद्र्यापासून कर्जबाजारीपणा त्यावर अजून कुठलेही उपाय सापडले नाहीत. मुलीचा घटस्फोट व कुटुंबियांच्या आजारपणापर्यंत सांगण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. माझं इतकं पोट दुखत होत की, मी ते सहन करू शकत नव्हते. सगळ्या प्रकारच्या चाचण्या झाल्या व बायोप्सीसुद्धा करण्यात आली. मी मदर मेरीच्या प्रार्थनेसाठी येथे आले. व बायोप्सीच्या चाचणीत काही सापडू नये, अशी मी मनोमन प्रार्थना केली आणि खरोखरच सगळे काही नॉर्मल आहे असे निष्कर्ष काढण्यात आले. माझी मुलगी गेली कित्येक वर्षे घटस्फोटासाठी प्रयत्न करत होती. मी मदर मेरीशी प्रार्थनेचा करार केला व तिला कोर्टात माझ्या मुलीच्या बाजूने लढण्यास आव्हान केले आणि काय आश्चर्य. मदर मेरी कोर्टात लढली व केसचा निकाल माझ्या मुलीच्या बाजूने लागला, हे सर्व सांगत असताना तिला तिचे हुंदके आवरत नव्हते. डोळ्यांत अश्रूंच्या धारा वाहत होत्या. चमत्कारामुळे तिचे दुःख, वेदना, घेतलेले कष्ट यावर कृपासनम येथील दैवी हस्तक्षेपामुळे चमत्कार घडला असे ती वारंवार सांगत होती.
अलपुझ्झा जिल्ह्यातील कलवूर या गावी १९८९च्या सुमारास या श्राइनची स्थापना झाली. केवळ भक्तांच्या समस्यांवर उपाय शोधणार्या परमेश्वरांच्या चमत्कारांची प्रात्यक्षिके दाखविणार्या येथील चर्चमुळेच हे गाव प्रसिद्धीच्या झोतात आलेले नसून येथून प्रकाशित होणार्या तथाकथित दैवी वृत्तपत्रामुळेसुद्धा हे गाव प्रसिद्ध झाले आहे. या वृत्तपत्राची कायदेशीर नोंदणी झालेली असून मलयाळम, इंग्रजी, उरिया, गुजराती, बंगाली, मराठी, तमिळ, तेलुगु, हिंदी, कोंकणी, कन्नड, इटालियन, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश आदी १५ भाषेत हे वृत्तपत्र प्रकाशित होते. जगभरातील पूजास्थळामध्ये प्रार्थनेमुळे भक्तांच्या भौतिक समस्यावर दैवी चमत्कारामुळे उत्तरं सापडलेली अनेक उदाहरणं असतील. परंतु त्या चमत्कारांचे लिखित दस्तावेजच्या स्वरूपातील गोष्टी कायदेशीररित्या नोंद झालेल्या याच वृत्तपत्रात सापडतील. म्हणूनच या वृत्तपत्राचे नाव ‘कृपासनम’ असे ठेवण्यात आले असावे.
कृपासनम हे वृत्तपत्र इतर वृत्तपत्राप्रमाणे बातम्या व जागतिक/स्थानिक घडामोडीचे वृत्त देऊन थांबत नाही. तर कृपासनमच्या दैवी हस्तक्षेपामुळे भाविकांच्या आयुष्यात झालेल्या बदलाबद्दलची बातमी ठळकपणे देते. याचे मुख्य संपादक व्ही. पी. जोसेफ हा पाद्री असून त्यांनी लिहिलेल्या संपादकियामध्ये काही जणांना या चमत्काराचे प्रत्यय का येत नाही यावर भाष्य केलेले असते. एका संपादकियामध्ये परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या एका विद्यार्थिनीच्या बद्दलचे भाष्य आहे. संपादकांच्या मते या तरुणीने देवाशी केलेल्या करारनाम्याप्रमाणे प्रार्थना करत नव्हती व तिने धर्मादाय कामे करण्याच्या आश्वासनांची पूर्ती केली नव्हती. सर्व १५ भाषांमधील वृत्तपत्रांमध्ये अशाच प्रकारच्या कृपासनमच्या श्राइनच्या भक्तांना आलेल्या दैवी चमत्काराच्या, ईश्वरी आशिर्वादाच्या व प्रार्थनेच्या अनुभवाबद्दलच्या बातम्या, भाष्य व चर्चेतील मुद्दे छापले जातात.
परंतु अलीकडील काही काळ कृपासनम श्राइन व कृपासनम वृत्तपत्र यांना समाज माध्यमावरील टीका-टिप्पणीला व ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. येथे आलेले भक्त कृपासनम वर्तमानपत्राचे तुकडे करून खातात म्हणून बातमी झळकल्यावर हे श्राइन वादाच्या भोवर्यात अडकले. काही जण तर वर्तमानपत्र जाळून त्याची राख अन्नपदार्थात मिसळून खातात अशीही बातमी छापून आल्यामुळे तेथील व्यवस्थापकांचे धाबे दणाणले. प्रार्थनेमुळे रोगमुक्त झालेल्यांच्या, ईश्वरी आशिर्वादामुळे नोकरी मिळालेल्यांच्या, कर्जबाजारीतून मुक्त झालेल्यांच्या प्रशस्तिपत्रांवर आणि वृत्तपत्र खाऊन रोगमुक्त झालेल्यांच्या बातम्यांच्यावर पुरोगाम्याकडून सणसणीत टीका केली जात होती.
२०१९ मध्ये केरळ शास्त्र साहित्य परिषद (KSSP) या विज्ञान प्रसार करणार्या डाव्या विचाराच्या संघटनेनी श्राइनच्या दाव्यांच्या व अंधश्रद्धा पसरविणार्या गोष्टींच्या विरोधात आंदोलन केले व पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली. केरळमध्ये महाराष्ट्रात असल्यासारखी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा नसल्यामुळे पोलीसांनी या कृपासनमच्या विरोधात कुठलेही क्रम उचलू शकत नव्हते. आम्ही अनेक वेळा ठिकठिकाणी कृपासनमच्या अंधश्रद्धा पसरविणार्या बातम्या व तेथील भोंगळ दाव्याबद्दल उग्र निदर्शने व जनजागृतीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले. परंतु आम्ही त्यांच्यासमोर फार कमी पडलो. महाराष्ट्रासारखा अंधश्रद्धा विरोधी कायदा केरळ राज्यात नसल्यामुळे आम्ही जास्त काही करू शकलो नाही. KSSP च्या दक्षिण विभागाचे सचिव हताश होऊन सांगत होते.
या आंदोलनाचा एक दृश्य परिणाम मात्र झाला. वृत्तपत्राचे तुकडे खाल्ल्यामुळे वा राखेचे सेवन केल्यामुळे काहीही दुष्परिणाम झाल्यास श्राइन जबाबदार नाही. अशा स्वरुपाचे डिस्क्लेमर ठळक अक्षरात कृपासनम दैनिकात छापून येऊ लागले. कृपासनमला अंधश्रद्धा वाढविण्यात रस नाही अशी पुष्टी त्याला जोडलेली होती.
प्रार्थनेचा करार (Covenant Prayer) हा एक प्रकारचा परमेश्वराशी केलेला कालबद्ध कंत्राट असतो. हा करार मान्य असलेल्या व्यक्तीला निश्चित मुदतीत प्रार्थना करण्यासाठी येत राहीन अशी हमी द्यावी लागते. ही मुदत, तीन महिने, सहा महिने वा एका वर्षाची व त्यापेक्षा जास्त अवधीची असू शकते. प्रार्थनेच्या करारासाठी हमी दिलेल्या व्यक्तीला कुठल्याही परिस्थितीत श्राइनला येऊन प्रार्थना करणे बंधनकारक असते. या कालखंडात व नंतरसुद्धा दैवी चमत्काराचा प्रत्यय येईल किंवा येणारही नाही वा आपले ईप्सित पूर्ण होईल किंवा होणारही नाही. जर प्रार्थना करणार्या व्यक्तीचे समाधान न झाल्यास त्या व्यक्तीच्या प्रार्थनेतच काही तरी उणीव असू शकेल वा संपूर्ण भक्तीभावाने, नीटपणे श्रद्धापूर्वक प्रार्थना केली नसेल असे सांगितले जाते.
प्रार्थनेचा करार आता ऑनलाइनही करता येतो. यासाठी कृपासनमच्या वेब साइटवर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करावी लागते. प्रत्येक नोंदणीकृत भक्तांनी दैवी तेल व दैवी मीठ याची खरेदी करणे बंधनकारक असते व त्याच प्रमाणे शंभर रुपये भरून कृपासनम या दैनिकाच्या एक गठ्ठ्याची खरेदी करावी लागते. कृपासनमचे एक यूट्यूब चॅनेलसुद्धा आहे. त्याच्यावर भक्तांच्या अनुभवाचे दृकश्राव्य स्वरूपात लाईव्ह प्रसारण केले जाते. कृपासनमच्या श्राइनसमोर केलेल्या प्रार्थनेमुळे त्यांच्या जीवनात कसा बदल घडत गेला याचे रसभरित वर्णन या यूट्यूब चॅनेलवर ऐकायला मिळते. शेकडोनी यात भक्त सामील होतात व प्रार्थनेला प्रशस्तीपत्र देतात.
गंमतीचा भाग म्हणजे कृपासनमला प्रशस्तीपत्र देणार्यात हिंदूंची संख्या जास्त आहे. एका व्हिडियोमध्ये कोट्टायम जिल्ह्यातील राजेश्वरीने तिला पडलेल्या एका स्वप्नाची हकीकत सांगत आहे. तिच्या स्वप्नात एक भव्य देऊळ आपोआप नाहिसे होते. ती जेव्हा देवळाच्या शोधात निघते तेव्हा तिला कृपासनमचे श्राइन दिसते. तिचाही प्रार्थनेचा करार झालेला असतो. तिचा एक मुलगा नोकरीच्या शाधात असतो. ती आपल्या मुलाच्या नोकरीसाठी प्रार्थना करत असते. प्रार्थनेमुळे तिच्या मुलाला गल्फमध्ये चांगली नोकरी मिळाली म्हणे.
कृपासनमच्या भाविकामध्ये केवळ अशिक्षितच नव्हे तर भरपूर शिकलेले सुशिक्षितसुद्धा आहेत. डॉक्टर्स, इंजिनीयर्स आहेत, वकीलही आहेत. त्रिशूरचे फुफ्फुसरोगतज्ज्ञ (Pulmonologist), प्रिन्सो मॅथ्यू, अलपुझ्झाचे काही डॉक्टर्स व वकील या श्राइनचे भाविक आहेत. एर्नाकुलम येथील इंजिनियर अंकिता हिने मास्टर्स डिग्री घेतलेली व परदेशात शिकण्यासाठी सक्तीचे असलेली Duolingo English Test पास होण्यासाठी ५-६ वेळा परीक्षेला बसलेली भाविक होती. प्रिन्सोची पत्नी चित्रा हिला मूल होत नव्हते. कित्येक वर्षांनंतर तिला मूल झाले. यासाठी पती-पत्नी दोघेही श्राइनचे आभार मानतात. अशा प्रकारचे कितीतरी उदाहरणं साइटवर दिसतील.
चमत्कारांचे पुरावे म्हणून दिलेल्या प्रशंसापत्रातून एक लक्षात येते की प्रगत वैद्यकीय उपचारातून रोगमुक्त होणे, मूल-बाळ होणे यात विशेष काहीही नाही. परीक्षा पास होणे, नोकरी मिळणे, घर बांधणे इत्यादी गोष्टी आयुष्यात घडत असतात. यामध्ये कुठलेही दैवी हस्तक्षेप नसतो. परंतु जे हतबल झालेले असतात व सारासार विचार करत नाहीत, त्यांना मात्र त्यातले काहीही घडले तरी तो चमत्कारच वाटू लागतो व त्यासाठी दैवीकृपेला क्रेडिट दिले जाते.
परंतु हे चमत्कार वा दैवीकृपा रस्त्यावर दिवसभर उभे राहून विक्री करणार्या छोटे छोटे व्यावसायिकांच्या बाबतीत का घडत नाहीत हे एक न सुटलेले कोडे आहे. त्यांच्यावर मदर मेरीची कृपादृष्टी का पडत नाही? ते आयुष्यभर खस्ता खात जीवन जगतात. श्राइनच्या रस्त्यावर ४६ वर्षांची श्रीजा गेली सहा वर्षे लॉटरीची तिकिटे विकत होती. तीन महिन्यापूर्वी तिला लॉटरी विक्रीचा धंदा बंद करावा लागला व त्याऐवजी पापडविक्रीचा धंदा करावा लागला. येथे येणारे लॉटरीची तिकिटे विकत घेत नाहीत. जे विकत घेतात व लॉटरी नाही लागल्यास मला शिव्या देतात. मी पूर्ण वैतागले होते. ती सांगत होती. लोकांच्याकडे दयामाया अजिबात नाही. ५० रुपयांचा पापडाचा पुडा घेण्यासाठी ते मागे पुढे पाहतात. कारण रस्त्यावर विकणार्यांच्याकडे ते नेहमीच दुर्लक्ष करतात. पापड विक्रीचा धंदाही नीट चालत नाही. अशी तिची तक्रार होती.
काही वर्षांपूर्वी कृपासनमचे प्रमुख पाद्री, वालियावीत्तिल, एका मोठ्या वादात अडकले. २०१९ साली व्हायरल तापाची लागण झाल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्याची वेळ आली. ही बातमी वार्यासारखी पसरली व समाज माध्यमावर त्यांचे ट्रोलिंग सुरू झाले. ट्रोलिंग करणारे त्याला ‘होली वॉटर’ ऐवजी आधुनिक औषधोपचार का घेतोस, असे प्रश्न विचारत होते. नंतर त्यांना उत्तर द्यावे लागले. एवढ्या सगळ्या भक्तांच्या काबाडकष्टाच्या कहाण्या व त्यांच्या दुःखाचे प्रसंग रोज रोज ऐकून माझ्या हृदयावर फार ताण आला व हा ताण होली वॉटर दूर करू शकत नव्हते म्हणून हॉस्पिटलमध्ये भरती व्हावे लागले. तरीसुद्धा ट्रोलींग काही थांबेना. त्यानंतर त्यांनी प्रतिक्रिया देण्याचेच थांबवले. जेव्हा आउटलूकचा पत्रकार त्याची मुलाखत घेऊन श्राइनबद्दल जास्त माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू लागला तेव्हा तेथील मॅनेजरने परवानगी नाकारली.
कुठल्याही गोष्टीला चमत्काराचे लेबल चिकटविणे हा एक (प्रचंड प्रमाणात) पैसे कमावण्याचा मार्ग झाला आहे. त्यामुळे कृपासनमच्या श्राइनसुद्धा त्यास अपवाद कसा काय असू शकेल?
(संदर्भः आउटलूक)
