डॉ. दीपक माने -

आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात, अत्यंत खडतर स्पर्धेच्या या जगात भविष्याची चिंता प्रत्येकालाच भेडसावत असते. अशा परिस्थितीत मग भविष्यातील सुखदुःखांची भाकिते जाणण्याची नैसर्गिक मानवी प्रवृत्ती उचल खाते आणि मग सारासार विवेकबुद्धी बाजूला सारत माणूस अगतिक बनतो. या अगतिक मानसिकतेचा उपयोग आपल्या राजकारणात, अर्थकारणात करण्यासाठी आपल्या सभोवताली अनेक भोंदू बाबा, ज्योतिषी टपलेले असतात. ते विज्ञानाच्या नावावर अवैज्ञानिक भ्रम पसरवत, शोषण आणि मानसिक गुलामीला प्रोत्साहन देताना दिसतात.
या तथाकथित तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अपत्य जन्माला येण्यापूर्वीच गर्भावस्थेतच काही विधी केले, संगीत, विचार ऐकवले, मंत्रपठण केले तर त्यामुळे गर्भ सुसंस्कारित होतो. यालाच त्यांनी गर्भसंस्कार असे गोंडस नाव दिले आहे.
आता या संस्कारात, गर्भधारणेसाठी कोणती तिथी/तारीख योग्य म्हणजे अमुक लिंगाचे बाळ जन्मते, अमुक दिवशी धारणा झाल्यास गर्भाशयातच अर्भक मृत्यू होतो किंवा तमुक तारखेस झाल्यास नवरा मरतो, सर्वप्रथम गर्भ तयार होतो नंतर त्यात जीव येतो, मातेची मानसिक अवस्था गर्भाचे लिंग ठरवते, ग्रहपीडा/ पिशाच पीडा यांचा त्रास गर्भाला होतो, गर्भाला भाषा ऐकता येते, आकलन होते, तशी प्रतिक्रिया गर्भ देते, बाहेरून ओरडणे, बडबड करणे, मंत्र म्हणणे, संगीत ऐकणे, पुरातन कथा ऐकवणे, यावरून गर्भाची वाढ कशी होणार, गुण-अवगुण ठरणार अशा गोष्टी येतात.
अशा प्रकारच्या नानाविध संकल्पना हजारो वर्षांपूर्वीपासून मानवामध्ये होत्याच. त्यावेळेस गर्भधारणेबद्दल आजचे विज्ञान जेवढे जाणते तेवढे ज्ञान त्याला नव्हते. त्यातील अनेक गोष्टी आधुनिक विज्ञानाने त्याज्य ठरवल्या. तरीही हे तथाकथित तज्ज्ञ त्या संकल्पनांचा संदर्भ देत त्यातील काही गोष्टींबाबतीत संस्कारांच्या नावावर आपले दुकान चालवत आहेत. त्यामुळे त्यातील तथ्य आणि मिथ्य तपासणे अत्यावश्यक आहे.
गर्भधारणेबाबत जीवशास्त्राच्या विशेष ज्ञानशाखेने खूप प्रगती करत जे ज्ञान प्राप्त केले आहे ते शालेय पातळीवरही आज उपलब्ध आहे.
१) गर्भधारणेसाठी तारीख/तिथीची आवश्यकता नाही, तर स्त्रीबीज – शुक्राणू यांचा संयोग आवश्यक असतो.
२) गर्भाच्या तीन महिन्यातच अवयवांचे स्वरूप तयार होते त्यामध्ये मेंदूचे आवरण तयार होणे (मायलीनेशन) सुरू होते ते जन्मानंतर तीन वर्षांनी पूर्ण होते. त्यामुळे भाषा समजणे, आकलन करणे हे नंतर होते.
३) गर्भाभोवती भरपूर द्रव असतो आणि गर्भाशयाला रक्त पुरवणार्या प्रमुख रक्तवाहिन्या असतात. त्यांचा आवाज हा ५० – ६० डेसिबल म्हणजे डॉल्बी इतका असतो. म्हणून गर्भास अगदी क्षीण आवाज ऐकू येतो.
४) गर्भाचे गुण-अवगुण हे आनुवंशिकतेने अर्थात जनुके ठरवतात. बाह्य आवाजाने/ संगीत/ मंत्र म्हणणे /ओरडणे यांनी ते बदलता येत नाहीत.
५) मातेच्या भावनांचा/विचारांचा गर्भावर परिणाम होतो हे चूक आहे कारण जुळी मुले असतात त्यातील एक सद्गुणी व दुसरा दुर्गुणी कसा होतो?
या सर्वांचा विचार करता बाजारात जे गर्भाविषयी वर्ग भरतात, त्यात ठरावीक वाक्य सुरात म्हणा, श्वास कोंडा/ सोडा, अमुक संगीत ऐका हे सुचवतात तसेच अमुक-तमुक विधी करा म्हणजे अपत्य दिव्य, तेज:पुंज, ज्ञानी होईल सांगतात; पण दिव्यता, तेज:पुंजता यांचे निकषच उपलब्ध नाहीत तर तपासणार कसे?
खरे तर गर्भावर संस्कार नकोत तर मातृ-पितृ विवेकभान हवे. जे आई, बाबा, आजी, आजोबा, परिवार यांना नवीन नात्यासाठी विवेक शिकवेल. संस्कार फक्त आईवरच सोडून चालणार नाही. तर सर्वांनीच ते केले पाहिजेत. योग्य लसीकरण, योग्य पाौष्टिक आहार, योग्य ती दक्षता, माफक व्यायाम, मनःशांतीसाठी प्रसन्न भवताल, या गोष्टी करण्याऐवजी भलत्याच अशास्त्रीय, कालबाह्य कृती करून वेळ घालवणे धोकादायक आहे. जन्मानंतर कौशल्य शिकणे, संस्कार करणे आणि ते विवेकाने अमलात आणणे हे शक्य आहे.
जन्मापूर्वीचा दुसरा एक फलज्योतिषी घणाघात म्हणजे गरोदर काळातील ग्रहण व त्याकाळी करावयाचे विधी, उपाय आणि त्यामुळे होणारे अपाय.
प्राथमिक स्तरीय ज्ञान सांगते, ग्रहण म्हणजे सावल्यांचा खेळ आहे. आकाशस्थ ग्रह, गोल यांच्या भ्रमणातून जी स्थिती येते जशी सूर्य-चंद्र-पृथ्वी (सूर्यग्रहण), सूर्य-पृथ्वी-चंद्र(चंद्रग्रहण) आणि त्यावेळी सावल्या पसरतात. अशा सावल्या खरेतर रोजच रात्री पृथ्वीच्या एका बाजूस असतात. ग्रहणाला अनेक विपरीत कहाण्या जोडत काही शतकांपूर्वी जी माहिती जशी उपलब्ध होती तशा ग्रहणाबाबत अनेक धारणा जगभर होत्या. कोण म्हणे चंद्राला/सूर्याला कुत्रा खातो, कोण म्हणे अस्वल खाते, तर कोण म्हणे काल्पनिक छेदनबिंदू असणारे ग्रह गिळतात, राक्षस चंद्राला गिळतात मग यातून सुटण्याचे उपायही अजब होते.
रेड इंडियन लोक आकाशात पेटते बाण सूर्याकडे सोडत, अरबी कथेनुसार वाळू आकाशात भिरकावत असत, इटलीत फुलझाडे लावत, काही लोक नदीच्या संगमावर, नदीमध्ये, समुद्रात पाण्यात उभे राहून प्रार्थना म्हणत. आता विज्ञानाच्या प्रगतीमुळे समजले की, ग्रहण हा सावल्यांचा खेळ आहे त्यांची अचूक वेळ खगोलशास्त्राने व गणिताने काढता येते. ग्रहणाची इतर कसलीही फलिते नसतात. ग्रहणावेळी गरोदर स्त्रीने अमुक-तमुक करू नये त्यामुळे गर्भावर विपरीत परिणाम होईल, अशी भीती घातली जाते. त्यामुळे निर्जल उपवास, एका जागेवर बसून राहणे, या गोष्टी भीतीपोटी केल्या जातात. उगीच रिस्क नको म्हणूनही पाळल्या जातात आणि याचा विपरीत परिणाम होतो. सातारा जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी एका महिलेच्या यामुळे जिवावर बेतले होते. गर्भावस्थेत ज्यादा सकस आहाराची गरज असताना उपाशी राहिल्याने रक्तातील साखर कमी होते, बसून राहिल्यामुळे रक्तपुरवठा मंदावतो आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता वाढते. पाणी कमी पिण्यामुळे लघवी कमी व त्यामुळे मूत्राशयात जंतुसंसर्ग वाढण्याची भीती असते.
सर्वच संस्कृतीने जगभर प्रतिभेच्या, कल्पनांच्या भरार्या भरत याला रोचक केले आणि शुभ वेळ, अशुभ वेळ यांचे टेकू देत भीतीदायक वातावरण करून, पुढील पिढीला निर्भयतेऐवजी भीतीची शिकवण देण्याचे काम केले आहे.
उत्तम सकस आहार, सुविचार, सुआचार, योग्य व्यायाम, चांगले छंद, विज्ञान, निर्भयता यातून निर्माण होणार्या नीतीमुळेच समाजस्वास्थ राखले जाईल.
यासाठी विज्ञानप्रेमी, खगोलप्रेमी, तसेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे अनेक ठिकाणी ग्रहण दाखवणे, गरोदर स्त्रियांचे कामे करण्याचे प्रात्यक्षिक करत प्रबोधन करणे, ग्रहणाचे विज्ञान समजावून सांगणे अशा प्रकारचे कार्यक्रम घेऊन, प्रसिद्धी देऊन परिवर्तनाची वाटचाल सुरू आहे. जन्मापूर्वीपासून सुरू होणारे हे फलज्योतिष जन्मानंतरही माणसाच्या जीवनात ढवळाढवळ करत असते. त्याचा पाया आहे, जन्मवेळ आणि जनमकुंडली. त्याचे खंडण- मंडण पुढच्या अंकात.
लेखक संपर्क : ९८६०७६८८७१