गडचिरोली जिल्हा कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न

सम्राट हटकर -

गडचिरोली हा महाराष्ट्रातील आदिवासी बहुल जिल्हा. महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगडचा सीमावर्ती भाग. घनदाट जंगलाने संपूर्ण वेढलेला गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त भाग म्हणून भारताच्या नकाशावर आलेला आहे. नैसर्गिक साधन संपत्ती विपुल प्रमाणात पण शिक्षणाचे प्रमाण  व आरोग्याच्या सुविधांचे प्रमाण अल्प. अंधश्रद्धा भरपूर त्यामुळे भगतं मात्रिकांची चलती. आदिवासींच्या रूढी परंपरा मुख्य प्रवाहातील समाजापासून अतिशय वेगळ्या. ते त्या जाणीवपूर्वक जपतात. रूढी परंपरेच्या नावाखाली अनेक अंधश्रद्धा जपल्या जातात. या जिल्ह्यात विविध प्रकल्पावर काम करणारे डॉ. राणी बंग व डॉ. अभय बंग तसेच डॉ. मंदाकिनी आमटे व डॉ. प्रकाश आमटे यांनी त्यांच्या भाषणात व लिखाणात या जिल्ह्यातील लोकांमध्ये असलेल्या प्रचंड अंधश्रद्धा बाबत वेळोवेळी उल्लेख केलेला आहे. शिवाय स्वतः अंधश्रद्धा निर्मूलन समितीने दोन वेळेस काढलेल्या जादूटोणाविरोधी कायदा यात्रेदरम्यान या बाबींची नोंद घेतलीच आहे. त्यानुसार येथे मोठ्या प्रमाणात अंनिसच्या कार्यकर्त्यांची फळी निर्माण करावी या उद्देशाने या जिल्ह्यात अंनिसचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर १६ ऑगस्ट व १७ ऑगस्ट २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. ज्यामध्ये १०० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.

सातारचे डॉक्टर दीपक माने,  नागपूरचे कार्यकर्ते रामभाऊ डोंगरे, देवयानी भगत, प्रा. सुनील भगत, चंद्रशेखर मेश्राम व मी (सम्राट हटकर) प्रशिक्षणाच्या आदल्या दिवशी गडचिरोलीला पोहोचलो. गडचिरोली जिल्ह्याचे कार्याध्यक्ष मुनेश्वर बोरकर यांनी आमचे स्वागत केले.

स्थानिक आयोजकांनी प्रशिक्षणाचे पॅम्पलेट काढून सोशल मीडियाद्वारे प्रशिक्षणार्थी पर्यंत पोहोचविले होते. जाहिरातबाजी केली होती. आदल्या रात्री फोनही केले होते. त्यामुळे उद्घाटनाच्या पहिल्या सत्रापर्यंतच संख्या १०० पर्यंत पोचली.

या प्रशिक्षणाचे उद्घाटन डॉ. सुरेशचंद्र डोंगरवार आरोग्य अधिकारी, आरोग्य विभाग नागपूर यांच्या हस्ते पाण्याचा दिवा पेटवून करण्यात आले. चंद्रशेखर भंडागे अध्यक्षपदी होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य राजन गजभिये उपस्थित होते. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक रामभाऊ डोंगरे यांनी केले, सूत्रसंचालन मुनेश्वर बोरकर यांनी केले, तर भोजराज कान्हेकर यांनी आभार मानले. नंतर प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटक डॉ. डोंगरवार आणि अध्यक्ष भंडागे उद्घाटन सत्रानंतर प्रशिक्षणार्थ्यात जाऊन बसले.

प्रथम चमत्कार सादरीकरण व आचारसंहिता हा विषय घेण्यात आला. यामध्ये सम्राट हटकर यांनी चमत्कार सादर केले. नंतर चमत्काराचे महत्त्व, चमत्कार कसे करावेत, सादरीकरणात कोणती काळजी घ्यावी, कोणते चमत्कार लोकांवर प्रभाव पडतात, चमत्काराच्या अनुषंगाने मांडणी कशी करावी व चमत्काराचे साहित्य याबद्दल माहिती दिली. त्यानंतर डॉ. दीपक माने यांनी संघटना बांधणी या विषयाची मांडणी केली. त्यामध्ये कार्यकर्त्यांची जडणघडण व शाखा बांधणी याची माहिती दिली आणि पहिले सत्र संपले. पहिल्या दिवसाच्या दुसर्‍या सत्रात सम्राट हटकर यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची मांडणी केली. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची व्याख्या, वैशिष्ट्य, गरज, प्रक्रिया, अक्षेप, अडथळे, नीतीशी व मूल्यांशी संबंध उदाहरणे देऊन स्पष्ट केले. नंतर दीपक माने यांनी ग्रह कार्य व मानवी जीवन या विषयावर ग्रहतार्‍याविषयी माहिती दिली त्यामध्ये गृहतार्‍यांचा आकार, अंतर, रचना, राशी नक्षत्र आणि मानवाचा जन्म याच्या संबंधानुसार मांडणी केली. या सत्राच्या शेवटी शकुन अपशकुन या विषयावर डॉ. सुनील भगत यांनी शकुन-अपशकुन म्हणजे काय याची अनेक उदाहरणे देऊन मांडणी केली.

प्रशिक्षणाच्या दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात सम्राट हटकर यांनी बुवाबाजी हा प्रशिक्षणाचा विषय घेतला त्यामध्ये बुवा, बुवाबाजी म्हणजे काय? त्यांचे प्रकार, बुवा बाबांचं भांडवल काय असतं? लोक बुवाबाजीकडे का वळतात? बुवा बाबांकडे गेल्यावर बरं का वाटतं? बुवाबाजीचा आधार काय? त्याला विरोध कसा करावा? यावर सखोल मांडणी केली. नंतर डॉ. दीपक माने यांनी मन, मनाचे आजार हा विषय घेऊन त्यामध्ये मन म्हणजे? काय ते कुठे असते? मन आजारी कसे पडते? त्याच्यावर उपचार काय? याचे प्रशिक्षण दिले.

दुसर्‍या दिवशीच्या दुसर्‍या सत्रात जादूटोणाविरोधी कायदा या अनुषंगाने कायद्याची पार्श्वभूमी, त्याची आवश्यकता, अधिनियम व अनुसूची व पूरक कायदे याविषयी सम्राट हटकर यांनी मांडणी केली. तर डॉ. सुनील भगत यांनी शकुन अपशकुन भाग २ मध्ये अनेक उदाहरणे देऊन विश्लेषण केले.

सर्व विषयांची मांडणी पीपीटीच्या माध्यमातून केल्यामुळे विषय अत्यंत प्रभावीपणे मांडता आले. प्रत्येक सत्राच्या नंतर प्रश्नोत्तरासाठी वेळ देण्यात आला होता. प्रत्येक विषयाच्या मांडणीच्या अगोदर एक चमत्कार आणि  गीत घेण्यात येत होते. तसा लोकांचा आग्रह होता. गीत गाण्यांमध्ये स्थानिक लोकही सहभाग घेत होते. फर्माईश करत.

समारोपाच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शासकीय विज्ञान महाविद्यालय गडचिरोलीचे प्राचार्य डॉ. प्रशांत जाखी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. शंतनु पाटील उपस्थित होते. या सत्रात सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्र देण्यात आले.

या प्रशिक्षणासाठी प्रा. पुष्प घोडके, चंदा मोटघरे, गीता सुरवडे, विजय सुरवाडे, वर्ष टेंभेकर तसेच मूल येथून दिलीप गेडाम, जी. एम. बांबोडे, सहदेव रामटेके, सपना निमगडे, यशवंत देवगडे नागपूर येथून गाड्या करून आले होते. खरंतर नागपूरकरांचा दुहेरी हेतू होता. प्रशिक्षण घेणे आणि मदत करणे. प्रशिक्षण जरी गडचिरोलीला होते तरी नियोजनाची सूत्रे नागपूर वरून रामभाऊ डोंगरे हलवत होते. त्यांना भगत दांपत्याची खूपच मदत झाली. पुस्तक विक्रीचा स्टॉल मांडला होता. याची पूर्ण जबाबदारी चंद्रशेखर मेश्राम यांनी घेतली होती.

या शिबिरामध्ये चहा नाश्ता जेवण व निवास याची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरास स्थानिक लोकांचे उत्साही सहकार्य होते. विशेष बाब म्हणजे प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटक डॉ. डोंगरवार आणि अध्यक्ष भंडागे हे दोन्ही दिवस पूर्ण वेळ प्रशिक्षणासाठी उपस्थित होते.

प्रशिक्षण शिबिर यशस्वी करण्यासाठी स्थानिक कार्यकर्ते विकाश दहिवले घोट, भोजराज कानेकर, दशरथ साखरे, प्रमोद सरदारे, मारोती भैसारे, चोखोबा ढवळे, संघमित्रा राजवाडे, लता रामटेके यांनी सहकार्य केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]