संजीव चांदोरकर -
अनेक दशके गरीब, निम्न-मध्यमवर्गीय स्त्रियांनी आपल्या कुटुंबांच्या वित्तीय गरजांचे (खर्च, बचती, कर्जे, गुंतवणुकी इत्यादी) व्यवस्थापन करण्यात पुढाकार घेतला आहे. कारण, या कुटुंबातील स्त्रियाच कुटुंबाच्या वित्त-व्यवस्थापक असतात. त्याच स्त्रियांनी आपण स्वतः, आपले कुटुंब आपल्या वित्तीय प्रश्नांवर एकेकट्याने उत्तरे काढू शकणार नाही आणि हीच अवस्था आपल्या आजूबाजूच्या कुटुंबाची आहे; तर का नाही आपल्याला सामुदायिक उत्तरे शोधता येणार? याच आत्मभानातून या स्त्रियांनी वैविध्यपूर्ण सामुदायिक गट चालवले आहेत. हे अनौपचारिक (उदा. भिशी गट) अर्ध-औपचारिक (उदा. स्वयंसहाय्यता गट) गट सभासदांनी स्थापलेले, सभासदांनी, सभासदांसाठी चालवलेले असतात. सभासद स्त्रियांकडून नियमितपणे बचती एकत्रित करून भिशी ग्रुप चालवणे; किंवा अशा बचती गोळा करून त्या चक्राकार (रोटेशन) पद्धतीने सभासदांमध्ये बिनव्याजी किंवा व्याज आकारून, ज्या सभासदाला कर्जाची आत्यंतिक गरज आहे त्याला गटांतर्गत लिलाव (ऑक्शन) पुकारून कर्ज देणे; व्याजाचे उत्पन्न गटामध्येच वाटून घेणे असे वित्त-गटांचे असंख्य प्रकार प्रचलित आहेत. त्याला सामुदायिक कर्ज-वाटप (कम्युनिटी लेंडिंग) मॉडेल म्हणतात किंवा वित्तीय परिभाषेत रोटेटिंग सेव्हिंग अँड क्रेडिट असोसिएशन (ठजडउअ) असे देखील म्हणतात. आजच्या लेखात आपण या स्त्रियांनी चालविलेल्या या अर्थवित्त गटांची सामर्थ्ये काय, त्यांनी चालवलेल्या गट मॉडेलच्या पायावर वित्त भांडवलाच्या युगाला साजेसे, नवीन प्रकारच्या अर्थ-वित्त गटांची उभारणी शक्य आहे काय, त्यांची कार्यशैली कशी असावी, या गटांमुळे स्थानिक सामाजिक आर्थिक ढाच्यात हस्तक्षेप कसा होऊ शकेल आणि या गटांची नाळ जनकेंद्री पक्ष, संघटना, चळवळींशी कशी घालता येईल याबद्दल विचार करणार आहोत.
गरीब, निम्न मध्यमवर्गीय स्त्रियांनी स्थापन केलेल्या वित्त गटांची सामर्थ्ये –
अशा सामुदायिक वित्त-गटांची अनेक अंगभूत सामर्थ्ये आहेत. ती कोणत्याही एका नेत्याने किंवा एमबीए झालेल्या व्यवस्थापकाने विकसित केलेली नाहीत. लाखो स्त्रियांच्या सहभागातून, विचारीपणातून, भगिनी-भावातून ती विकसित झाली आहेत. त्यातील काही प्रमुख सामर्थ्याची थोडक्यात तोंडओळख करून घेऊ या :
(१) सामाजिक बंध हेच सामाजिक भांडवल (सोशल कॅपिटल)
गरीब/निम्न-मध्यमवर्गीयांच्या वस्त्यांमध्ये व्यते, कुटुंबे अडीनडीला एकमेकांना वस्तू वा पैशाची मदत व उसनवारी करतच असतात. लग्नकार्ये, कोणी आजारी पडले तर परस्परांना मदत केली जाते. यामध्ये आपण परस्परावलंबी आहोत ही खोल, वस्तुनिष्ठ जाण आहे. मी आज त्याला मदत केली तर उद्या गरज पडली तर, नाही ती पडणारच आहे, ती/तो देखील मला मदत करेल हा विश्वास आहे. दैनंदिन आयुष्य एकमेकांच्या मदतीने जगताना, त्यांच्यात एक प्रकारचे सामाजिक बंध, परस्परांबद्दल सदिच्छा (गुडविल) तयार झालेली असते. हे त्यांचे एक मौलिक सामाजिक भांडवल (सोशल कॅपिटल) आहे. आपापसात कोणतेही व्यवहार करताना हे सामाजिक भांडवल महत्त्वाचे असते. त्याचा उपयोग करता आला पाहिजे.
(२) गटाच्या सभासदांबद्दल विश्वसनीय माहिती
असे बहुतांश वित्त-गट वस्तीनिहाय गावाच्या पातळीवर स्थापन झालेले असतात. परस्परांना अनेक वर्षे ओळखत असल्यामुळे, कोण सचोटीचा, कोण लबाड, कोण चांगला बोलतो, कोणात नेतृत्वगुण आहेत, कोण शिकलेला, कोण कमी शिकलेला हे त्यांना माहीत असते. त्याचा उपयोग करता आला पाहिजे.
(३) कारभारातील लवचिकता / कमी खर्चीक
सभासद जवळपास राहात असल्यामुळे, एकत्र भेटण्यासाठी वेळेची लवचिकता आणता येते. मीटिंगसाठी जायचे म्हणून वेगळा खर्च येत नाही. या गटातील अधिक शिकल्या-सवरलेल्या एखाद्या सभासदाकडे हिशोब ठेवणे, कागदपत्रे बनवण्याचे काम दिले जाऊ शकते. लिखापढी, कागदपत्रे बनवली तरी ती अगदी जुजबी स्वरूपाची असतात. त्याचा उपयोग करता आला पाहिजे.
(४) विकेंद्रित सुशासन
गटाचे नाव काय, गट कसा चालवायचा, गटाचे पदाधिकारी कोण, गटांतर्गत तयार होणारे ताणतणाव कसे हाताळायचे हे सारे प्रश्न गटातील सभासदच सोडवतात. सुशासनाचे हे विकेंद्रित प्रारूप अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. एवढे महत्त्वाचे की, आपल्या देशातील लोकशाही प्रणाली अधिक सक्षम करण्याची कुवत त्यामध्ये आहे. याला गट-मॉडेलचा समाजासाठी, राष्ट्रासाठी बिगर-वित्तीय परतावा (नॉन फायनान्शियल रिटर्न) म्हणता येईल.
स्त्रियांनी उभ्या केलेल्या गट मॉडेलच्या पायावर नवीन अर्थ-वित्त गटांची उभारणी शक्य आहे.
जे भौतिक प्रश्न सुटावेत या उद्देशाने नागरिक बँका, कंपन्यांचे ग्राहक बनतात, ते प्रश्न ग्राहक बनल्यावर सुटतातच असे नाही. नवीनच अधिक गंभीर प्रश्न तयार होतात. मुळात ग्राहक व्हावे की नाही; व्हावे तर नक्की कोणत्या बँकेचे, कंपनीचे, विमा कंपनीचे; त्यांची तुलना नकी कशी करायची; अटींची पूर्तता कशी करायची; त्यातील अनेक अटी, संज्ञा-संकल्पनांचे अर्थ न समजणे, अनेक कागदपत्रांवर न कळताच सह्या करणे, ग्राहक बनल्यानंतर देखील वेगळीच परिस्थिती अचानक उद्भवणे व त्याला नकी कसा प्रतिसाद द्यायचा हे न कळणे. वस्तीतील, गावातील जनधन योजना खातेधारक, सूक्ष्म कर्जे काढलेले स्त्री-पुरुष, गृहकर्जे काढलेले, पिक विमा काढलेले शेतकरी, सोने गहाण कर्ज काढलेल्या स्त्रिया, आरोग्य विमा काढलेली कुटुंबे, मायक्रो आयुर्विमा मायक्रो पेन्शनचे हप्ते भरलेल्या व्यक्ती, शैक्षणिक कर्जे काढलेले विद्यार्थी, पालक, सहकारी पतपेढ्या, सहकारी बँका, प्लांटेशन किंवा तत्सम कंपन्यांमध्ये आपल्या बचती ठेवणारे, केंद्र, राज्य सरकारच्या विविध कल्याणकारी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर्स योजनांचे लाभार्थी, असे अक्षरशः अनेकानेक प्रश्न स्त्री-पुरुष ग्राहकांना सतावत असतात. नकी कोणाशी बोलायचे कळत नाही, माहीतगार माहीत नसतो. नाबार्ड पुरस्कृत स्वयंसहाय्यता गटाची प्रमुख अॅक्टिव्हिटी गटांतर्गत बचती आणि कर्जवाटप ही होती. आता सर्वच संदर्भ मोठ्या प्रमाणावर बदलत आहेत. ग्रामीण, शहरी भागातील स्त्री-पुरुष वैविध्यपूर्ण वित्तीय प्रॉडक्ट्स, सेवांचे ग्राहक बनू लागली आहेत. सूक्ष्म कर्ज कंपन्या, क्रेडिट कार्ड, गोल्ड लोन्स, विनातारण, विनाकारण कर्जे, डिजिटल लेंडिंग, शैक्षणिक कर्जे, गृहकर्जे, छोट्या बचती गोळा करणार्या, आयुर्विमा, आरोग्य विमा, पेन्शन, शेतकर्यांचा पीक विमा इत्यादी. या बदललेल्या संदर्भांचे प्रतिबिंब नवीन प्रकारचे अर्थ-वित्त गट तयार करताना पडले पाहिजे.
वित्त क्षेत्राच्या सध्याच्या अजेंड्याला छेद द्यायचा असेल तर गरीब, निम्न मध्यम वर्गातील स्त्रियांनी अनेक दशकांच्या मेहनतीतून उभ्या केलेल्या गट मॉडेलमध्ये पुन्हा एकदा जान भरणे गरजेचे आहे. याचा अर्थ, सेल्फ हेल्प ग्रुप मॉडेल स्थापनेपासून होते तसेच्या तसे कार्यरत करणे नाही. त्याचा कारभार अधिक व्यापक करता येईल. असे गट फक्त स्त्रियांपुरते मर्यादित न ठेवता स्त्री-पुरुषांचे मिश्र अर्थ-वित्त गट होऊ शकतात. गेल्या दोन दशकात अजून एक महत्त्वाचा बदल झाला आहे. होत आहे. गेल्या २५-३० वर्षांत शाळा, कॉलेजचे शिक्षण घेतलेल्या, स्मार्टफोन, कॉम्प्युटर्स, इंटरनेट हाताळू शकणार्या, किमान त्या इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सबद्दल भयगंड न बाळगणार्या, आकडेमोड, इंग्रजी शब्दांची तोंडओळख झालेल्या मुला-मुलींची संख्या काही पटींनी वाढली आहे. अजून वाढत आहे. मुख्य म्हणजे, त्यांच्यात तयार झालेला आत्मविश्वास आणि सिस्टिमला जाब विचारण्याची हिम्मत त्यांच्या पालकांपेक्षा खूप जास्त आहे. या कमी-जास्त शिकलेल्या स्मार्ट मुला-मुलींपैकी अनेकजणांनी संसार थाटले आहेत. मुलांना जन्म दिला आहे. त्यांची संख्या वाढणार आहे. आपले, आपल्या कुटुंबाचे, आपल्या मुला-बाळांचे भौतिक राहणीमान सुधारण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची, नवीन गोष्टी कौशल्ये शिकण्याची या तरुण स्त्री-पुरुषांची तयारी आहे. हा खूप मोठा सामाजिक अॅसेट आहे. त्यांना नवीन अर्थ वित्त गटात आवर्जून सामील करून घेतले पाहिजे.
-संजीव चांदोरकर
संपर्क : chandorkar.sanjeev@gmail.com
