मोहटादेवी मंदिरात दोन किलो सोने मूर्तीखाली पुरल्याच्या प्रकरणात गुन्हे दाखल

अ‍ॅड. रंजना गवांदे - 8788677468

अहमदनगर जिल्ह्यात शिर्डी, शनिशिंगणापूर ही मोठी देवस्थाने आहेत. त्याचबरोबर मढी, मोहटादेवी ही प्रसिद्ध व मोठ्या यात्रा भरणारी व लोकांची श्रद्धा असणारी देवस्थाने आहेत. या सर्वच देवस्थानांचे आपापले पब्लिक ट्रस्ट आहेत.

मोहटादेवी देवस्थान हे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात आहे. देवस्थानची दरवर्षी नवरात्रात मोठी यात्रा भरते. वर्षभरही भाविकांची रीघ असते. मोठ्या प्रमाणात पैसाही जमा होतो. देवस्थानच्या सार्वजनिक न्यास (पब्लिक ट्रस्ट) ची घटना पाहता भाविकांच्या हिताची, परिसराचा विकास करणारी व समाजहिताची कामे येणार्‍या पैशांतून करावीत, असे घटनेमध्ये नमूद आहे. परंतु घडले मात्र विपरीतच. मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू केल्यानंतर जाधव नावाच्या वास्तुविशारदाने देवांच्या मूर्तीखाली यंत्र पुरल्यास देवाला पूर्ण देवत्व प्राप्त होते. मूर्तीमधून चांगल्या ‘वेव्ह लेंग्थ’ निर्माण होतात. त्याचा भाविकांना फायदा होतो, असे ट्रस्टींना सांगितले. ट्रस्टींनी मीटिंग बोलावली, ठराव घेतला व देवाच्या मूर्तीखाली दोन किलो सोन्याचे यंत्र पुरण्यावर शिक्कामोर्तब झाले. यंत्र तयार करणे व तंत्र-मंत्र विधीसाठी सोलापूरचा मांत्रिक जाधव याला पंचवीस लाख रुपयांचे कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले. दोन किलो सोने त्याच्याकडे सुपूर्द केले. मांत्रिक जाधव याने दोन किलो सोन्याचे यंत्र बनवून ते दोन किलो सोने 2011 ते 16 या कालावधीत देवस्थानच्या मूर्तीखाली पुरल्याचे न्यासाची कागदपत्रं दर्शवतात.

जिल्हा न्यायाधीश हे या ट्रस्टचे अध्यक्ष असतात. जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ठराव पास झाले व त्यांच्याच कालावधीत हे सोने जमिनीत गाडले गेले. पाथर्डी तालुक्यातील अमरापूर येथील नामदेव गरड हे मोहाटा देवस्थानचे माजी ट्रस्टी आहेत. ट्रस्टच्या कारभारात काहीतरी गडबड आहे, असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ट्रस्टसंबंधातील कागदपत्रे जमा केली. पोलीस निरीक्षक व चॅरिटी कमिशनर यांच्याकडे तक्रारही केली. त्याच दरम्यान दै. ‘लोकमत’चे अहमदनगर येथील संपादक सुधीर लंके यांना दोन किलो सोन्याच्या संदर्भात बातमी समजली. त्यांनी सलग दोन दिवस वर्तमानपत्रातून मोहाटादेवी ट्रस्ट व दोन किलो सोन्याच्या संदर्भात बातमीवजा लेख लिहिले. ते लेख वाचल्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी मी, कॉ. बाबा अरगडे, डॉ. प्रकाश गरुड यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक, चॅरिटी कमिशनर, जिल्हाधिकार्‍यांना दि. 7 मार्च, 2017 रोजी निवेदन देऊन ट्रस्टींची कृती अंधश्रद्धामूलक आहे. पैशांचा अपहार झाला आहे. त्या संदर्भात चौकशी होऊन गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी केली. दरम्यान, गरड यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावेत, पुरलेले सोने उकरून काढावे, ट्रस्टची कागदपत्रे मागवावीत, या अन्य मागण्यांसाठी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली. ही याचिका कोर्टापुढे आली असता उपलब्ध कागदपत्रांवरून गरड यांचे व्यक्तिगत हितसंबंध आहेत की काय, असा संशय आल्याने कोर्टाने याचिकेबाबत नकारात्मक भूमिका घेतल्याचे लक्षात आल्यावर मला ‘लोकमत’चे संपादक लंके यांचा फोन आला व ‘मॅडम, तुम्ही दिलेल्या निवेदनाची कॉपी मला त्वरित मेल करा. खंडपीठापुढे दुपारी 2.30 वाजता मॅटर निघणार आहे. त्यापूर्वी तुमचे निवेदन कोर्टापुढे जायला हवे.’ मी हातातले काम सोडून निवेदनाची फाईल शोधून त्वरित निवेदन लंकेंना मेल केले व लंकेंमार्फत हायकोर्टात पाठविण्यात आले. ‘अंनिस’चे निवेदन आहे, असे पाहून कोर्टाचा पिटिशनकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.

दरम्यानच्या काळात औरंगाबाद येथे मी, कॉ. बाबा अरगडे व ‘अंनिस’चे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी औरंगाबाद खंडपीठात नामदेव गरड यांनी दाखल केलेल्या याचिकेत हस्तक्षेप याचिका दाखल केली. ‘अंनिस’ने हस्तक्षेप याचिका दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने अहमदनगरच्या पोलीस निरीक्षकांना नोटीस काढून अद्याप ट्रस्टी व संबंधितांविरोधात गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा केली. त्यानंतर पोलीस निरीक्षकांनी ‘अंनिस’ कार्यकर्त्यांचे जबाब नोंदविणेबाबत पाथर्डीच्या पोलीस निरीक्षकांना आदेश दिल्यानंतर पोलिसांनी पाथर्डी येथे बोलावून माझे व कॉ. बाबा अरगडेंचे जबाब नोंदविले.

3 फेब्रुवारी, 2021 रोजी औरंगाबाद खंडपीठाने मोहटादेवी ट्रस्टच्या संबंधात निकाल दिला. निकाल देताना न्यायमूर्तीं नलवडे व शेवलीकर यांनी ‘अंनिस’चे निवेदन आधार मानून गुन्ह्याचा तपास करावा. ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, जिल्हा न्यायाधीश व तत्कालीन अन्य ट्रस्टी, वास्तुविशारद, मांत्रिक, मुख्य अधिकारी या सर्वांच्या विरोधात तपासाअंती गुन्हे दाखल करावेत. हे गुन्हे दाखल करण्याकामी तपासकामात पुरावा देण्यासाठी ‘अंनिस’ कार्यकर्त्यांची मदत घ्यावी. गुन्ह्याचा तपास पोलीस उपाधीक्षक किंवा अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्यासारख्या अधिकार्‍याकडे देण्यात यावा. तपासावर पोलीस अधीक्षकांनी लक्ष ठेवावे, असे आदेश देत गुन्ह्याचा तपास सहा महिन्यांच्या आत करावा. अपहार, फसवणूक, कट-कारस्थान व जादूटोणाविरोधी कायदा या आणि योग्य त्या कलमांचा आधार घेत गुन्हा दाखल करावा, असा हुकूम उच्च न्यायालयाने दिला.

खरं तर उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा ‘अंनिस’च्या दृष्टीने स्वागतार्ह तर आहेच; परंतु दिशादर्शकही आहे. निकालानंतर कॉ. बाबा अरगडे, मी व अविनाश पाटील, अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुळे, जिल्हा कार्यवाह मा. प्राचार्य अशोक गवांदे, विनायक सापा, भारतभूषण, प्राची गवांदे व अन्य कार्यकर्ते अहमदनगर येथे पोलीस अधीक्षकांना भेटून गुन्हा दाखल करण्याबाबत पत्र दिले. पोलीस अधीक्षकांनी ताबडतोब पोलीस उपाधीक्षक, पाथर्डी यांना गुन्हा दाखल करून घेण्याबाबत आदेश दिले. त्याच दिवशी रात्री 9 वाजता आम्ही पाथर्डी येथे जाऊन गुन्हा दाखल केला. दरम्यानच्या काळात गुन्ह्याचा तपास सुरू आहे. मांत्रिकासह दोन आरोपी अटक केले आहेत.

या प्रकरणामध्ये सर्वांत खेदाची बाब म्हणजे जिल्हा न्यायाधीशासारखी जनतेला न्याय देणारी, संविधानाच्या चौकटीत काम करणारी व्यक्ती अंधश्रद्धामूलक कृतीला खतपाणी घालते, संमती देते, सहभागीही होते! सार्वजनिक न्यासातून दोन किलो सोने +25 लाख मजुरी असा मांत्रिकाला दिला जाणारा पैसा एकूण खर्च रुपये पंचाहत्तर लाख करताना चॅरिटी कमिशनरची परवानगी घेणे आवश्यक असताना घेतली गेली नाही. दोन किलो सोने जमिनीत पुरले, असे कागदपत्र सांगतात. परंतु त्याचाही पुरावा नाही.

पाथर्डी हा अतिशय दुष्काळी तालुका आहे. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे. रस्ते व अन्य मूलभूत सुविधांची वानवा आहे. ऊसतोड मजूर, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची फरफट आहे. अशा परिस्थितीत भोळ्या-भाबड्या भाविकांनी देवावरील श्रद्धेपोटी दिलेला पैसा न्यासाच्या उद्दिष्टांना हरताळ फासून अंधश्रद्धामूलक कृतीत खर्च (?) करणे, कायदेशीर परवानगी घेणे आवश्यक असताना कानाडोळा करणे, मांत्रिकाशी पंचवीस लाखांचा करार कोणतीही निविदा न काढता करणे या आणि अशा अनेक भानगडी या अध्यक्ष, ट्रस्टी व संबंधितांनी केल्या.

हा लेख लिहिताना मला वारंवार गाडगेबाबा आठवतात. कारण गाडगेबाबांची एकुलती एक लेक अलोकाबाई बाबांनी सुरू केलेल्या धर्मशाळेत राहायला गेली. बाबांनी अलोकाबाईंना पत्र लिहून कळविले, ‘तिथून लवकर बाहेर पडा. मी नसतो तर ट्रस्टींनी तुमच्यावर खटला भरून पोलिसांच्या ताब्यात दिले असते. माझी म्हणून यापुढे तुम्ही कोणालाही काही मागू नये व देणार्‍याने देऊ नये. मी कोणाचा गुरू नाही, माझा कोणी शिष्य नाही. हा जनतेचा ट्रस्ट आहे.’ असे मृत्युपत्रात गाडगेबाबांनी नमूद केले. स्वतःच्या आचरणातून गाडगेबाबांनी आदर्श निर्माण केला.

आज अनेक देवस्थानं, त्यातील संपत्ती, संपत्तीचा विनियोग या संदर्भात मोठे प्रश्नचिन्ह आहे. ‘प्रबोधन’कार ठाकरेंनी देवस्थानची सर्व संपत्ती एकत्र करून देशात शाळा, रस्ते, वाचनालये बांधावीत, आरोग्य सुविधा निर्माण कराव्यात, असे म्हटले होते. पंजाबराव देशमुखांनी, सर्व देवस्थाने सरकारच्या अखत्यारित घ्यावीत. देवस्थानातून मिळालेला पैसा, दान म्हणून मिळालेली संपत्ती ही देशातील गरजू लोकांच्या हितासाठी वापरण्यात यावी. यासाठी 1932 मध्ये ‘हिंदू देवस्थान संपत्ती बिल’ आणले होते.

गाडगेबाबांनी ट्रस्टी कसा असावा, संदर्भात आदर्श निर्माण केला असला तरीही आज मोहाटादेवी ट्रस्टसारखी अनेक प्रकरणे समोर येतात. सार्वजनिक न्यासातील पैशांचा अपव्यय व अपहार होतो आहे. औरंगाबाद खंडपीठाचा निकाल या सर्व वातावरणात खरोखर आशेचा किरण आहे.

अ‍ॅड. रंजना गवांदे, संगमनेर

संपर्क : 8788677468


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ]