प्रकाश घादगिने -
1990 पासून महाराष्ट्राने नवे स्वप्न साकार झालेले पाहिले. दहावी आणि बारावीमध्ये बोर्डात टॉप करणारी पुण्या-मुंबईची परंपरा लातूरने मोडीत काढली. डॉ. अनिरुध्द जाधव, डॉ जनार्दन वाघमारे यांच्या संकल्पनेतून साकारलेला शिक्षणाचा ‘नवा प्रयोग’ मराठवाड्यातील लातूरने राबवला. शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची कठोर मेहनत यशाचा मार्ग खुला करते, हे या पॅटर्नने महाराष्ट्राला दाखवून दिले. याच शाहू कॉलेजने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील मुलांना मूल्यशिक्षण मिळावे म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता या विषयांवर चर्चा, कार्यानुभव असा कृती कार्यक्रम प्रा. अनुजा जाधव यांनी तयार केला. दरवर्षी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह विविध सामाजिक संघटनांमधील कृतिशील कार्यकर्त्यांना या महाविद्यालयात मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले जाते.
यावर्षी शाहू कॉलेजच्या वतीने अंनिसचे कार्यकर्ते अण्णा कडलास्कर (पालघर) यांनी 8 एप्रिल रोजी दोन सत्रांत जवळजवळ 1200 युवक-युवती या चर्चासत्र घेतले. यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? त्याची सुरुवात, मूल्ये, आपल्या देशात तो विकसित न होण्याची कारणे, वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगला तर काय फायदे होतात आणि तो नसेल तर जीवनात काय अडथळे निर्माण होतात? विवेकी समाज निर्माण होण्यासाठी दैववाद गाडून, प्रयत्नवादी होऊया, असा संदेश कडलास्कर यांनी आपल्या व्याख्यानातून दिला.
महाविद्यालयाचे प्राचार्य गव्हाणे प्रचंड उत्साहाने सर्व कार्यक्रमांचे नियोजन करण्याचा सूचना देत होते. उपप्राचार्य एस. एन. शिंदे हे तर ‘अंनिस’चे ज्येष्ठ कार्यकर्तेच. डॉ. अनिरुध्द जाधव यांच्या कन्या प्रा. अनुजा जाधव या गेल्या नऊ वर्षांतील मूल्यशिक्षणाचा प्रयोग यशस्वी अंमलबजावणीमुळे कसा साकार झाला, हे अभिमानाने सांगत होत्या. यासाठी त्यांना डॉ. नरेंद्र दाभोलकर सतत प्रोत्साहन देत.
लातूरचे ज्येष्ठ कार्यकर्ते, शाहू कॉलेजचे उपप्राचार्य एस. एन. शिंदे यांनी शनिवारसाठी सकाळी लातूरचे प्रसिध्द बसवेश्वर महाविद्यालय आणि दुपारी दयानंद महाविद्यालय या ठिकाणी ‘वैज्ञानिक दृष्टिकोन विकास’ या विषयावर अण्णा कडलास्कर यांचे दोन संवाद आयोजित केले.
– प्रकाश घादगिने, लातूर अंनिस