रामभाऊ डोंगरे -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उत्तर नागपूर शाखेच्या वतीने नागपुरातील रेड लाईट एरिया समजल्या जाणार्या गंगा-जमुना भागातील पोलीस चौकीच्या प्रांगणामध्ये येथील देह व्यापार करणार्या या भगिनींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण व्यक्तिगत अंतर (फिजिकल डिस्टंसिंग) ठेवून करण्यात आले.
या भगिनींवर अगोदरच नाना प्रकारच्या संकटांचे सावट असते; त्यातल्या त्यात अपुर्या खोल्या, नानाविध ग्राहक, स्वच्छतेचा अभाव. अशातच त्यांच्यासमोर कोरोना व्हायरसचे महासंकट आ वासून उभे आहे. कोरोनाच्या भीतीने वेश्यालये बंद असल्यामुळे उत्पन्नाची साधनंही बंद आहेत. तर गरिबी, आर्थिक परिस्थिती व पुरुषी वासनेच्या बळी पडल्याने त्या या व्यवसायात ढकलल्या गेल्यात. आज त्यांच्या परिवारासमोर समस्यांचे डोंगर उभे आहेत. उदरनिर्वाहाकरिता अन्नधान्य नाही, स्वयंपाकांकरिता इंधन नाही, मुलांकरिता खाण्या-पिण्याची व शिक्षणाची सोय नाही, दुसरे उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही. कारण त्यांच्या व्यवसायाला समाजमान्यता नाही, शासकीय मदतीचा अभाव आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष जगजितसिंग यांनी देशातील कोरोना संकटाच्या लढ्यामध्ये ‘महाराष्ट्र अंनिस’ अग्रेसर असल्याचे मत व्यक्त केले. कार्याध्यक्ष चंद्रकांत श्रीखंडे यांनी सर्व मदतीचे उपक्रम व्यक्तिगत अंतर (फिजिकल डिस्टंसिंग) ठेवून राबविले जात असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हा प्रधान सचिवद्वय गौरव आळणे व रामभाऊ डोंगरे, जिल्हा वार्तापत्र कार्यवाह विजय श्रीखंडे, शीलाताई डोंगरे, कांचन वाघ, उत्तर नागपूर कार्याध्यक्ष पुष्पा बोंदाडे, देवानंद बडगे, आनंद मेश्राम, रमेश ढवळे, लहानु बनसोड, चरण गजभिये, वीरेंद्र खापर्डे, जितेंद्र चौरे, यामाजी उमरेडकर, ब्ल्यू अँड रेड न्यूज इंडियाचे राजेश मेश्राम; तसेच लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत गंगा-जमुना पोलीस चौकीतील अधिकारी व कर्मचार्यांच्या हस्ते व उपस्थितीत जीवनावश्यक सामग्रीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा प्रधान सचिव रामभाऊ डोंगरे यांनी केले. आभार प्रदर्शन पुष्पा बोंदाडे यांनी केले.