समितीच्या अध्यक्षपदी मा. सरोजमाई पाटील यांची निवड

-

अंनिसच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत निर्णय

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांचे वयाच्या 93 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून मा. सरोजताई पाटील यांचे नाव सुचविण्यात आले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारी समिती, सल्लागार समिती, सर्व राज्य विभाग यांच्या बैठकीमध्ये सरोजताई पाटील यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब झाले. सरोजताईंनी ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिल्याने सर्व कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

‘सत्यशोधक चळवळी’चा विचार मानणार्‍या कुटुंबात सरोजताईंचा जन्म झाला.‘सत्यशोधक’ परंपरेतील विवेकवादी विचार उचलून धरणारे एन. डी. पाटील त्यांना पती म्हणून लाभले. सरोजताई स्वतःदेखील विवेकवादी विचार-वर्तन मानणार्‍या; तसेच तत्त्वनिष्ठ जीवन जगलेल्या व्यक्ती आहेत. त्यांची कार्यक्षमता, परखडपणा, चळवळीच्या कार्यकर्त्यांना सामावून घेण्याची वृत्ती हे सर्व आश्वासक आहे.

बी ए., बी. एड. केल्यानंतरची सरोजताई पाटील यांनी दहा वर्षे शिक्षक आणि पंचवीस वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले. पटसंख्या व गुणवत्ता अशा सर्व आघाड्यांवर मागे पाडलेल्या, वंचित वर्गातील मुलांच्या शाळा गजबजलेल्या व गुणवत्तापूर्ण करण्याचे त्यांनी या शाळेपासून सुरू केलेले काम आजही अखंड चालू आहे. मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली, तेव्हा त्यांच्या शाळेचा निकाल 10 टक्के लागत असे. तो सरोजताईंनी 97 टक्क्यांवर नेला. मुलांचा कल ध्यानात घेऊन त्यांना रोजगाराभिमुख करणारे प्रशिक्षण सुरू केले. समाजातील प्रतिष्ठित लोकांना शाळेशी जोडून घेतले व त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी 250 मुला-मुलींना ‘दत्तक पालक योजने’चा लाभ दिला. मुलांना अभ्यासासाठी जागा नाही, ही अडचण दूर करण्यासाठी रात्र अभ्यासिका सुरू केली. परिसरातील सेवानिवृत्त अधिकार्‍यांना या कामाशी जोडून घेतले. मुले रात्री अभ्यास करताना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी व त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हे अधिकारी उपस्थित राहत व त्यांच्या अनुभवांचा मुलांना फायदा होत असे. या शाळेतील त्यांचे दोन विद्यार्थी आमदार, तर दहा नगरसेवक झाले आहेत. अनेक पातळ्यांवर त्यांच्या या कामाची दाखल घेण्यात आली. स्थानिक पार्लेकर नागरिकांनी ‘प्रयोगशील’ मुख्याध्यापिका म्हणून त्यांचा सत्कार केला. सरोजताईंच्या विद्यार्थ्यांनी अनुताई वाघांच्या हस्ते त्यांचा हृद्य सत्कार घडवून आणला. महाराष्ट्र शासनाने त्यांना राज्य पुरस्काराने व मुंबई महापालिकेने महापौर पुरस्काराने सन्मानित केले. परिसरात झाडे लावणे, जोपासणे यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. या कामासाठी त्यांच्या शाळेला सलग सात वर्षे राज्यपालांच्या हस्ते ‘वृक्ष सन्मित्र पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

निवृत्तीनंतर सरोजताईंनी त्यांचे गाव ढवळी येथील शाळेकडे लक्ष दिले. येथील शाळा अशी बनवली की, हजार लोकसंख्येच्या गावातील या शाळेत आज आजूबाजूच्या 12 गावांतून मुले येतात. इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या त्या सचिव आहेत. NACC ची अ श्रेणी प्राप्त असलेले हे महाविद्यालय, ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी अत्यंत अल्प शुल्क घेऊन स्पर्धा परीक्षा केंद्रदेखील चालवते. त्यासाठीची अभ्यासिका सकाळी साडेपाच ते रात्री साडेबारापर्यंत खुली असते. महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहणार्‍या मुलींनी जेव्हा रात्री साडेबारापर्यंत त्यांना अभ्यासिकेत थांबता येत नाही, अशी त्यांची अडचण बोलून दाखवली तेव्हा सरोजताईंनी रात्री वसतिगृहापर्यंत मुलींची सोबत करण्यासाठी एक महिला कर्मचारी नेमली. प्रश्नांचा बाऊ न करता उत्तरे शोधणे, हा सरोजताईंचा स्वभाव आहे. सरोजताई रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळ सदस्य आहेत. कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांतील कठीण परिस्थितीत धडपडणार्‍या 10 शाळांवर त्यांनी सध्या लक्ष केंद्रित केलेले आहे.


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]