डॉ. स्वाती लावंड -
आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता सध्या फारच चर्चेत आहे. हे नेमके काय आहे, हे जाणून घेऊ या. माणूस बुद्धिमान असतो, हुशार असतो म्हणजे काय? हुशार माणूस म्हणजे ज्याला खूप काही माहीत आहे आणि जो सारासार विचार करून निर्णय घेऊ शकतो. माणूस ही क्षमता कशी मिळवतो? तर सतत माहिती घेत राहणे आणि स्वतःच्या चुकांमधून शिकत राहणे! अगदी तसेच जेव्हा एखाद्या कॉम्प्युटर प्रोग्रॅमद्वारे केले जाते, तेव्हा त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणता येते. इथे एक फरक लक्षात घ्यायला हवा की, हे यंत्र माणसाप्रमाणे भावनिकरित्या किंवा उत्स्फूर्तपणे विचार करू शकत नाही. उदाहरणार्थ, सध्या अतिशय प्रचलित असलेले भाषाविषयक ए आय टूल म्हणजे चॅट जीपीटी. हे विकसित करण्यासाठी अक्षरशः लाखो पुस्तके, मासिके, वेबसाइटस् यातील शब्द भांडार वापरून त्याला ट्रेन केले गेले किंवा प्रशिक्षित केले गेले. या ट्रेनिंगमध्ये कोणत्या शब्दानंतर कोणते शब्द येतात किंवा कोणत्या वाक्यानंतर कोणते वाक्य येते, याचे ट्रेनिंग होते. आता समजा, त्याला पावसावर एखादी कविता बनवायला सांगितली, तर ते यंत्र पाऊस या शब्दापुढे येणार्या शब्दाच्या असंख्य शक्यतांमधून एखादी शक्यता निवडेल. यामध्ये अचूकता येण्यासाठी ते यंत्र वापरकर्त्यालाच काही प्रश्न विचारून नेमकी कशा पद्धतीची कविता हवी आहे ते जाणून घेईल. जसे की वातावरण, कवितेचा मूड इत्यादी. त्यामुळे चुकीच्या शक्यतांची संख्या कमी होते आणि कविता अधिकाधिक अचूक बनते. अशी कविता पूर्णतः नवीन वाटू शकते. मात्र, त्यातील प्रत्येक शब्द हा कधी ना कधी त्या यंत्राला ट्रेन्ड् करायला वापरला गेलेला असतोच.
दुसरे उदाहरण म्हणजे ‘ए आय’ वापरून केले गेलेले कॅन्सर किंवा हृदयरोगासारख्या आजाराचे निदान. यामध्ये ECG च्या असंख्य प्रतिमा AI ला ट्रेन्ड् करण्यासाठी वापरल्या जातात. मग नवीन पेशंटच्या ECG चा तुलनात्मक अभ्यास करून AI अचूक निदान करू शकते.
AI चे फायदे –
आधी म्हटल्याप्रमाणे रोगाचे निदान असेल नाही तर मग रोबोटच्या साहाय्याने केलेली सर्जरी, शेतकर्यांसाठी पिकांची पाहणी नाही तर हवामानाचा अंदाज, AI यांच्या साहाय्याने अतिशय कठीण वाटणारी, गुंतागुंतीची किंवा किचकट, जिथे माणसाच्या हस्तक्षेपाने नुकसान अथवा चूक होण्याची शक्यता आहे अशा प्रत्येक बाबींमध्ये AI चा उपयोग होत आहे. परदेशात AI मार्फत ट्रॅफिकचे नियंत्रण, बिन चालकाच्या गाड्या, विमाने दिसू लागली आहेत. AI वापरून बनवलेले सिनेमे, चित्र, संगीत, कथा इतकेच नव्हे, तर कंपन्या आपला दैनंदिन व्यवहारही ए आय मार्फतच करू लागल्या आहेत. शिक्षण, वित्त, करमणूक इतकेच नव्हे तर युद्ध क्षेत्रातही या तंत्रज्ञानाचा खूपच वापर होऊ लागला आहे. याशिवाय एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी ए आय तयार करणारे अनेक देश-विदेशी स्टार्टअप किंवा लहान-मोठ्या कंपन्या आहेत. जसे की हवामानाचा, वातावरणीय बदलांचा अंदाज, शेतकर्यांसाठी ड्रोन, पिकांचा अभ्यास किंवा गुगल अर्थ किंवा एखादे शैक्षणिक अॅप. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ए आय वापरून केलेला नैसर्गिक आपत्तीचा भविष्यवेध, यामुळे पुढचे व्यवस्थापनही सोपे होईल आणि जीवितहानी तसेच वित्तहानी टळेल. AI चा सगळ्यात मोठा फायदा आहे; तो म्हणजे, त्याचे भविष्यवेधी असणे. म्हणजेच घडून गेलेल्या घटनांचा क्रम जर त्याच्या ट्रेनिंगसाठी वापरला तर AI चे टूल पुढे काय होऊ शकते याची देखील शक्यता वर्तवू शकते. याचा उपयोग हवामानाचा अंदाज बांधण्यापासून ते माणसाच्या आजारपणाची कोणती स्टेज कधी येऊ शकेल, याचा अंदाज बांधण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. भारतासारख्या कृषी प्रधान देशात तर याचा शेतकर्यांना प्रचंड फायदा होईल. जसे की पिकांच्या वाढीचा पद्धतशीर डेटा वापरून त्याला कोणती फवारणी कधी लागेल किंवा नैसर्गिक आपत्तीचे अगोदरच निदान झाले, तर शेतकरी आपल्या पिकांचे संरक्षण आणि जनता आपल्या मालमत्तेचे रक्षण जरूर करू शकेल. अशा विधायक कामांसाठी ए आय तंत्रज्ञान वापरले गेले तर उत्तमच. आजच्या घडीला देश-विदेशातील गोरगरीब जनतेला अन्नधान्य सुरक्षा, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातील त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, पर्यावरण संबंधित प्रश्नांसाठी जर AI तंत्रज्ञानाची मदत होत असेल तर त्याचे जरूर स्वागत केले पाहिजे.
AI मुळे नोकर्यांवर काय परिणाम होतील?
AI प्रचंड गतीने रोबोटिक्स आणि ऑटोमेशन इंडस्ट्रीमध्ये बदल घडवत आहे. इंटरनेट ऑफ थिंग्जमुळे सर्व तर्हेचा डिव्हाईस सेन्सर डाटा, इंटरनेटच्या मदतीने एका ठिकाणी गोळा करता येत आहे. उदा. घरात बसवलेल्या CCTV कॅमेर्याचा डेटा मोबाईलवर घेता येतो. तोच डेटा AI टूलसाठी वापरला तर अख च्या मदतीने घराचे दरवाजे आपोआप उघडणे, बंद करणे अख च्या मदतीने शक्य होऊ शकते. अशा रीतीने कामगारांची गरज कमी होऊन जाते. उद्या अतिप्रगत रोबोटिक तंत्रज्ञान भारतासारख्या देशात आले, तर येथील कारखान्यांमध्ये काम करणार्या कामगारांमध्ये नकीच कपात केली जाईल, मात्र तूर्तास तरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये स्वस्त कामगार मिळत असल्याने एमआयडीसी सारख्या ठिकाणी AI चा विचार होणार नाही. मात्र कॉम्प्युटर आयटी क्षेत्राला मंदीचे चित्र पहावे लागेल. आज भारतात कॉम्प्युटर आणि आय टी क्षेत्रातच प्रामुख्याने भरपूर पगाराच्या नोकर्या आहेत आणि त्या मिळवण्याचा प्रत्येक तरुण स्वप्न पहात आहे. त्यासाठी लाखो रुपये मोजून शिक्षण घेत आहे. मात्र अख च्या येण्याने यातल्या कित्येकांची गरज उरणार नाही, हे खरे आहे. ज्या नोकर्या पुनरावृत्तीच्या स्वरूपाच्या आहेत जसे की, डेटा एन्ट्री ऑपरेटर, डेटा अॅनालिस्ट, डेटा बेस मॅनेजमेंट, एन्ट्री लेवल सॉफ्टवेअर डेव्हलपर, सॉफ्टवेअर टेस्टिंग अशी कामे आता AI करू शकतो. त्यामुळे मोठ्या संख्येने लागणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर्स आता लागणार नाहीत. याशिवाय इतर अनेक क्षेत्रात जसे की, मार्केटिंग, जाहिरात, कंपनी सेक्रेटरी, अकौंटंट, ग्राहक सेवा किंवा मूलभूत भाषांतर AI च्या मदतीने होत आहे. त्यामुळे प्राथमिक स्वरूपाचे किंवा कारकुनी पद्धतीचे काम करणार्या लोकांची गरज संपुष्टात येत आहे. त्याचवेळी AI मुळे अत्यंत नवीन प्रकारचे जॉब तयार देखील होत आहेत. यात प्रामुख्याने AI चा प्रभावी वापर करू शकणार्या तंत्रज्ञांची आवश्यकता भासत आहे. मानवी सर्जनशीलता, तर्कशक्ती, भावना आणि नैतिक निर्णय घेण्याची क्षमता आवश्यक असलेल्या क्षेत्रांमध्ये ए. आय. आधारित नव्या नोकर्या वाढत आहेत. उदा. ‘प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग’! ए.आय. मॉडेल्सजसे की चॅट जीपीटी, क्लाऊड, जेमिनी, मीडजर्नी यांना योग्य प्रश्न, सूचना आणि संदर्भ देऊन अपेक्षित आणि अचूक उत्तर मिळवणे ही या कामाची कला आहे. या मॉडेल्सना दिलेल्या सूचनेला प्रॉम्प्ट म्हणतात. चांगला प्रॉम्प्ट म्हणजे ए. आय.कडून योग्य प्रकारची, सखोल आणि तर्कशुद्ध माहिती मिळवण्याची गुरुकिल्ली. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग हे एक प्रकारे भाषिक आणि तांत्रिक कौशल्यांचा संगम आहे. आज अनेक कंपन्या ‘ए.आय. इंटरॅक्शन डिझायनर, प्रॉम्प्ट आर्किटेक्ट, ए.आय. कंटेंट स्पेशालिस्ट,’ अशा पदांसाठी भरती करत आहेत. ए. आय.च्या मदतीने आता लेखन, चित्रकला, संगीतनिर्मिती, व्हिडिओ एडिटिंग आणि डिझाइन या सर्जनशील क्षेत्रांत प्रचंड बदल घडला आहे. ‘जनरेटिव्ह ए.आय.’ ही अशी प्रणाली आहे जी मजकूर, प्रतिमा, ध्वनी किंवा व्हिडिओ तयार करू शकते. त्यामुळे ‘ए आय कंटेंट क्रिएटर,’ ‘ए आय व्हिडिओ एडिटर,’ ‘ए आय म्युझिक कंपोजर,’ ‘ए आय आर्ट क्रिएटर’ अशा अनेक नव्या पदांची मागणी वाढली आहे. याशिवाय अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे शेती, पर्यावरण, वित्त व्यवस्थापन, बँक अशा असंख्य क्षेत्रात अख आधारित नवनवे उद्योग उभे राहू शकतात.
AI चा दुरुपयोग : जागतिक व्यापाराची, राजकारणाची, आणि युद्धाचीही परिभाषा बदलली
आपल्या हातातील स्मार्टफोन आता आपल्या शरीराचाच एक भाग बनलेला आहे. त्यात बघितले जाणारे रिल्स, व्हिडिओ, फेसबुक, व्हॉट्सअप इतकेच काय, गुगल सर्च इंजिन सुद्धा AI ला जोडलेले आहे. फोनचा वापर करणारा मनुष्य फेसबुक किंवा यू ट्यूबवर काय बघतो, काय वाचतो, मेसेजमध्ये काय लिहितो, इतकेच नव्हे काय बोलतो त्याच्याकडे असलेले फोन नंबर्स, इमेल्स इतकेच नव्हे, तर जर का त्याचं जीपीएस लोकेशन चालू असेल तर तो कुठे जातो, नेमका कुठे प्रवास करतो, त्याच्या आवडीनिवडी या सगळ्याची माहिती त्या फोनमधून डेटाच्या स्वरूपात उचलली जाते. यातूनच त्या व्यक्तीचा अभ्यास केला जातो. जगभरातील अशा असंख्य लोकांचा अभ्यास करून AI मार्फत जनमानसाचा अंदाज करता येतो.
या अभ्यासाचा उपयोग आजच्या घडीला जगातील मोठमोठ्या कंपन्या आपल्या प्रॉडक्टसच्या विक्रीचा अंदाज घेण्यासाठी करतात, वित्त कंपन्या, शिक्षण क्षेत्रात काम करणार्या खाजगी कंपन्या तरुणांच्या मनाचा अंदाज घेऊन आपले व्यवसाय वृद्धी करतात. राजकारणी जनमताचा अंदाज घेऊ शकतात. इतकेच नाही, तर आता AI ने एवढी प्रगती केली आहे की, ते तरुणांच्या मनावर प्रभावही टाकू शकते. कित्येक ठिकाणच्या निवडणुकांमध्ये AI वापरून मतदारांवर प्रभाव टाकण्यात येतो किंवा विशिष्ट धर्माच्या किंवा जाती समूहाच्या विरुद्ध जनमत तयार करण्यात येते. यामध्ये सामान्य लोकांना सतत काही विशिष्ट विचारांचे व्हिडिओ, मेसेजेस, फोटो दाखवण्यात येऊन की ज्यामध्ये कित्येकदा खोट्या माहितीचा अंतर्भाव असतो, लोकांचे मत कलुषित केले जाते. एकाच वेळी लाखो लोकांना प्रभावित करण्याकरिता AI अतिशय उपयुक्त तंत्रज्ञान ठरले आहे.
AI मुळे युद्धाचे तंत्रज्ञान देखील बदलत आहे. आता ते निव्वळ दोन देशांच्या सीमेपुरते मर्यादित राहिले नाही, तर मनुष्यविरहित ड्रोन्स किंवा विमाने वापरून एखाद्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहराला देखील किंवा विशिष्ट भागाला, एखाद्या धरणाला टार्गेट केले जाऊ शकते किंवा प्रत्यक्ष हल्ले न करता, बँक प्रणाली किंवा इलेक्ट्रिक पॉवर ग्रीडवरती एखादा सायबर हल्ला करवून एखाद्या देशाचे प्रचंड नुकसान करता येऊ शकते. एखाद्या देशातील सत्ता उलथवून टाकण्यासाठी, दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी अख आधारित आज्ञाप्रणाली विकसित केली जाऊ शकते. २०२४ मधील इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षात इस्रायलने AI चा प्रचंड वापर केला. त्यासाठी खास अरबी भाषेतील चॅट जीपीटी सारखे लार्ज लँगवेज मॉडेल विकसित केले गेले. पॅलेस्टाईन नागरीकांचे सोशल मीडिया अकाउंट, सॅटेलाईट छायाचित्र, ड्रोन्स वापरून घेतलेल्या डेटावरून AI मार्फत हमासशी तथाकथित संबंध शोधला जात होता, आणि निवडक पद्धतीने AI तर्फेच ड्रोन्सने हल्ले केले जात होते. अर्थात, या हल्ल्यामध्ये आसपासचे लोकही विनाकारण जखमी किंवा मृत होत होते. अशा रीतीने ते युद्ध नैतिकता हरवून बसले होते.
AI चे नियंत्रण कोणाकडे?
कोणतेही नवे तंत्रज्ञान हे चांगले किंवा वाईट नसते, हे आपण याही पूर्वी बघितले आहे. उदा. अणुतंत्रज्ञानाचा किंवा कॉम्प्युटर्सचा विकास. मुद्दा असतो, ते तंत्रज्ञान कशासाठी वापरले जाणार आणि त्याची मालकी कोणाकडे राहणार, ते अनिर्बंध नफ्यासाठी वापरले जाणार का? उदा. विंडोज ही ऑपरेटिंग सिस्टिम जेव्हा बिल गेट्स यांच्या मायक्रोसॉफ्ट कंपनीने बाजारात आणली त्या वेळी ओपन सोर्स म्हणजे ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर काम करणारे लहानमोठे अनेक तंत्रज्ञ पर्यायी ऑपरेटिंग सिस्टिम्स तयार करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, प्रभावी तंत्रज्ञान आणि प्रभावी मार्केटिंगअभावी ते विशेष यशस्वी झाले नाहीत आणि जगभर विंडोज वापरला जात असल्याने बिल गेट्स मात्र अब्जाधीश झाले. जसे मोठे मासे लहान माशांना गिळून टाकतात त्याप्रमाणे बिझनेस टॅक्टिक्स वापरून, लहान कंपन्या टेकओव्हर करून, तंत्रज्ञ आपल्या बाजूला वळवून, आपले प्रतिस्पर्धी संपवले जातात. उदा. एके काळी व्हॉट्सअप, इन्स्टाग्राम आणि फेसबुक या वेगवेगळ्या कंपन्या होत्या. मात्र फेसबुकने (सध्याचे नाव मेटा) २०१२ मध्ये इन्स्टाग्राम जी की तेव्हा अगदी लहान कंपनी होती, विकत घेतली आणि २०१४ मध्ये व्हॉट्सअपचे मालकी हक विकत घेतले. परिणामी, आज जगात एकच कंपनी कोट्यवधी लोकांचा सोशल मीडिया हाताळत आहे, कंट्रोल करत आहे. अगदी तसेच आजच्या घडीला जगभरामध्ये ए आय तंत्रज्ञान विकसित करणार्या काही मूठभरच कंपन्या आहेत. ओपन ए आय, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि इनव्हिडिया अशा काही पश्चिम देशातील कंपन्या तसेच चायनाचे स्वतःचे ‘डीप सीक’ या नावाचे AI तंत्रज्ञान आहे. जरी हे तंत्रज्ञान वापरणारे जगभरातील कोट्यवधी लोक असले, तरी त्यातून होणारा प्रचंड आर्थिक नफा हा मूठभर कंपन्यांचाच होत आहे. या कंपन्यांची मिळकत तीन स्वरूपाची आहे. एक तर सामान्य लोक दैनंदिन आयुष्यात जे ए. आय. वापरतात त्यातून होणारा नफा आणि दुसरे त्या लोकांचीच माहिती जी डेटाच्या स्वरूपात मिळवली जाते ती आवश्यक त्या कॉर्पोरेट्सना किंवा राजकीय पक्षांना विकून आणि तिसरे या कंपन्यांकरिता किंवा राजकीय पक्षांकरिता लोकांचे अनुकूल मत बनवण्यामध्ये सामील होऊन या ए.आय. कंपन्या प्रचंड नफा मिळवत आहेत. ही बाब गंभीर आहे.
डेटा सेंटर्सचा भस्मासूर
AI तंत्रज्ञानासोबतच अजून एक मोठा प्रश्न निर्माण होत आहे तो म्हणजे डेटा सेंटरचा. AI च्या विश्लेषणासाठी जगभरातून जी असंख्य माहिती डेटाच्या स्वरूपात गोळा केली जाते ती साठवण्याकरिता मोठमोठाल्या डेटा सेंटरची आवश्यकता पडत आहे. ती इलेक्ट्रॉनिक चिप्सच्या स्वरूपात असल्याने त्याला थंड ठेवण्यासाठी प्रचंड स्वरूपात पाणी आणि विजेची गरज पडते. बहुतांश एआय कंपन्या या जरी उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये असल्या, तरी त्यांचे डेटा सेंटर हे दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तसेच काही आशियाई देशांमध्ये ठेवलेले आहेत. हेनरिक बोल फाउंडेशनच्या अलीकडच्या अभ्यासामध्ये मांडण्यात आले आहे की अख च्या वेगवान वाढ आणि वापरामुळे दुष्काळग्रस्त चिली देशापासून ते दक्षिण आफ्रिकेपर्यंत जगातील ठिकाणचे गोड्या पाण्याचे स्थानिक साठे कमी होत चालले आहेत. चॅट जीपीटीच्या नुसत्या एका व्हर्जनच्या ट्रेनिंग दरम्यान यंत्रणा थंड ठेवण्यासाठी सात लाख लिटर पाणी लागले. आजघडीला आधीच पाण्याची कमतरता असणारे उरुग्वे, ब्राझील, मेक्सिको, चिली तसेच दक्षिण आफ्रिकेतील देशातील स्थानिक जनता या डेटा सेंटरचा विरोध करत आहे. त्यानिमित्ताने ए आय तंत्रज्ञानाचा फायदा कोणाला आणि किंमत कोण मोजणार हा प्रश्न देखील आता ऐरणीवर येत आहे.
सोशल मीडिया, AI आणि एकटेपणा
या निमित्ताने आणखी एक भीती जगभर दाटून येत आहे, ती म्हणजे मानसिक आरोग्य, नैराश्य, एकटेपणा. एके काळी लोक, परगावी असणार्या आपल्या सुहृदांना पत्र लिहून खुशाली कळवत. गरज असेल तरच फोन करत आणि आसपासच्या लोकांमधूनच शक्यतो मानसिक आधार मिळवत. ते फारच उत्तम होते असे नाही. लोक त्या काळी जास्त समाजावलंबी होते आणि पर्यायाने व्यक्तिस्वातंत्र्य फारसे नव्हते. आज तसे नाही. स्मार्ट फोन आणि त्यावरील सोशल मीडियामुळे दूरचे लोकही जवळ वाटू लागले आहेत. लोक सतत आणि सतत इतर कोणाशी तरी, जे की आसपास नाहीत आणि असण्याची शक्यताही नाही अशांशी सतत जोडलेले असतात. या आभासी जोडण्यातून एकटेपणाची भावना नष्ट झाल्यागत वाटते. रिकामा वेळ भरून काढला जातो. प्रत्यक्ष सोबतीची गरज वाटत नाही. त्यात अख तुमच्या आवडीनिवडीनुसारच रील्स किंवा व्हिडिओ पाठवत असल्याने करमणूक होण्याचा भास होत राहतो. पण ज्या क्षणी तो स्मार्ट फोन बाजूला ठेवला जातो, जास्तच पोकळी आणि असहाय्य वाटू लागते, चिडचिड होते. कारण मेंदूला इतर व्यक्तीच्या सहवासातून जे रंग, वास, चव, स्वर आणि स्पर्श अशी पंचेद्रियांमधून आनंदाची अनुभूती मिळण्याची अपेक्षा असते ते काहीच मिळालेले नसते. पर्यायाने आभासी जगातच कायम वावरण्याची इच्छा कायम राहते. विशेषतः आजकालची लहान मुले, तरुण त्यामुळे चिडचिडी, एकलकोंडी होत आहेत. इतरांशी बोलण्याचे किंवा वागण्याचे कसब तयार होत नाहीये. समूह भावना नष्ट होत आहे. इतरांना लहानसहान मतभेदांवरून ट्रोल करणे, समूहाने तुटून पडणे अशा विकृती वाढत आहेत. तरुणांच्या नैराश्येतून समाज हिंसक आणि असहिष्णू होण्याकडे कल वाढत आहे.
या सगळ्यातून मार्ग कसा काढायचा?
आपल्याला दोनच पर्याय आहेत. एक तर असेच सोशल मीडियाच्या आहारी जाऊन या जागतिक वर्चस्ववादी खेळाचे मूक प्रेक्षक नव्हे, तर मूक बाहुल्या बनायचे किंवा आताच सावध होऊन यांचा ‘डेटा’बनणे साफ नाकारायचे. मग काय सोशल मीडिया, स्मार्ट फोन बंद करायचा? तर नाही, पण आपल्याला काय दाखवले, ऐकवले जाते ते डोळसपणे पाहायचे, त्यामागचे राजकारण समजून घ्यायचे. जे जे चुकीचे, ज्यातून इतरांविषयी असूया, द्वेष, राग, उत्पन्न करेल ते नाकारायचे. AI हे फक्त एक तंत्रज्ञान आहे, नवे विज्ञान आहे, त्यातून नफेखोरी नाही तर समाजकल्याण साधले जात आहे ना यासाठी जागरूक राहायचे. थोडक्यात, सांगायचे तर गौतम बुद्धाचा सम्यक मार्ग निवडावा लागेल.
-डॉ. स्वाती लावंड
लेखिका संपर्क : ९९३०५ ०५४६८
लेखिका सरदार पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय, मुंबई येथे प्राध्यापिका आहेत.
