मला मेलीला काय कळतंय?

अनिल चव्हाण - 9764147483

हे पाहा, मध्ये एक नेते म्हणाले, ‘गाय हा एकमेव पशू असा आहे की, जो ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजनच सोडतो.”

हे, हे तपासता येईल! मी प्लास्टिकची पिशवी घेतो, त्यात गोमातेचा उच्छवास घेऊ या.” राघूने मार्ग सांगितला आणि पिशवी घेऊन बाहेर पळालाही!.

“मला मेलीला काय कळतंय? अय्या, भाऊजी वाटतं. गाय घेऊन आलेत.” कावेरीच्या आश्चर्योद्गाराने मी दचकलो. हातातले वृत्तपत्र बाजूला करून दरवाजातून रस्त्याकडे नजर लावली. एका हातात सोटा आणि दुसर्‍या हातात गायीचा कासरा धरून आपल्या पैलवानकी चालीने गुंड्याभाऊ येत होता. त्याने दारातल्या विजेच्या खांबाला कासरा गुंडाळला आणि सोटा आपटतच आत आला. कावेरी आत गेली.

भाकरीचा तुकडा आणि पाण्याचा तांब्या घेऊन बाहेर आली. “अगं… अगं… चहा आणायचा सोडून भाकरीचा तुकडा, कसला आणलास?” मी म्हणालो.

“इथंं, भाकरी काही भाऊजींच्यासाठी नाही आणलेली; ती गोमातेसाठी आहे,” असे म्हणत ती बाहेर गेली. तिच्या मागोमाग हळदी-कुंकवाचा करंडा घेऊन मैनाही गेली.

“वहिनी, अजून संस्कार सांभाळलेत हं तुम्ही! संस्कार आहेत तर धर्म आहे आणि धर्म आहे तर देश आहे,” गुंड्याभाऊ म्हणाला.

“काही नाही. बिनधर्माचेही देश आहेत – निधार्मिक; आणि तेच पुढे आहेत.” मी प्रत्युत्तर केले.

“पण मला सांगा, हे काय खूळ काढलंय? ही गाय कोठून आणलिसा?”

“गाय नव्हे; गोमाता म्हण, चिमण. हिचं महत्त्व तुला कळायचं नाही. अखिल भारतीय गोमाता संरक्षण समितीचा अध्यक्ष झालोय मी. प्रत्येकाला गोमय आणि गोमूत्र सहज उपलब्ध झालं पाहिजे, याची काळजी घेतोय आम्ही.” गुंड्याभाऊने एका दमात सांगितले.

“हां, पण आमच्या दारात गोठा करणारेस काय? रस्ता स्वच्छ कोण करणार?”

“त्याची काळजी नको, समाज घेतोय जबाबदारी.” मी बाहेर पाहिले, तर खरेच समाजाने त्याची जबाबदारी घेतली होती. पुढच्या पायावर काऊने एक तांब्या पाणी ओतताच मागे, शेपटीखालून दोन तांब्यांची धार लागली; पण त्यातील एक थेंबही जमिनीवर पडला नाही! साळूवहिनी आणि कोकिळाबेननी भांडे पुढे केले होते.

“काय करणारेस एवढे गोमूत्र?”

“त्यांच्याकडे धार्मिक कार्यक्रम आहेत काय,” मी शंका व्यक्त केली. “धार्मिकच काय; त्याचे औषधी गुणही माहीत करून घे. आपल्या साध्वींनी स्वत:चा कॅन्सर बरा केला गोमूत्राच्या औषधाने.”

“साध्वी म्हणजे त्या प्रज्ञासिंह ठाकूर काय, खासदार झालेल्या? शहीद हेमंत करकरेंनी मालेगाव बाँबस्फोटात पकडलेल्या?” राघूने साळसूदपणे प्रश्न विचारला.

“होय, त्याच; आणि निर्दोष सुटल्यात, हे लक्षात घे.”

“सुटल्या की सोडल्या? त्यांचे ऑपरेशन झाल्याचे ऐकले,” राघूने आपला मुद्दा सोडला नाही.

“कॅन्सरचे ऑपेरशन झाले हे बरोबर आहे; पण त्यांनी स्वत:च सांगितले ना, आपण गोमूत्राचे औषध घेतले म्हणून!”

“बाबा, जगभर कॅन्सरवर संशोधन चाललंय. अब्जावधी डॉलर खर्च करताहेत, त्यांना औषध सापडत नाही; आणि इथे शेण खाऊन आणि मूत पिऊन कॅन्सर बरा करणार्‍या साध्वी आहेत. ते कळाले तर त्यांचे पुतळे उभे करतील – सोन्याचे…” राघू बोलला.

“नाही बाळा राघू, सोन्याचे नव्हे, रेडियमचे. सर्वांत महाग धातू रेडियम आहे.” मी म्हणालो.

“बाबा, गायीसह करतील नाही का पुतळा उभा,” मैनाने चान्स घेतला.

“मला मेलीला काय कळतंय; पण रेडियमचे पुतळे का हो?” कावेरीची शंका.

“नासा’ने गोबरवर संशोधन केलंय, रेडिएशन जिथल्या तिथे थांबलेय.”

“काका, रेडिएशन कसे थांबवणार?” राघूचा प्रश्न.

“आपल्या घरात तळघर करायचं! आणि वरच्या जमिनीवर गोबरचा लेप द्यायचा. रेडिएशन खाली नाही येत.”

“गायीपासून मिळणारे सगळेच पदार्थ उपयोगी असतात बरं!” गोंधळ ऐकून आई बाहेर आली. गोमातेला नमस्कार करून तिने आपलेही ज्ञान पाजळले.

“आई, तुम्हीच सांगा या चिमणला. गायीच्या दुधात सोने असते, असे बंगालचे प्रमुख दिलीप घोष यानी टीव्हीवर सांगितले. त्यामुळेच दूध पिवळसर दिसते.”

“गुंड्या भाऊ, अरे आमचे दातही आता पिवळे व्हायला लागलेत. त्यातही सोनं आहे का? आणि तसे खूप पदार्थ पिवळे असतात.” आई उत्तरली.

हाऽहाऽऽ हाऽऽऽ. मी हसलो.

“अहो, एक गवळी तर गायीचे दूध घेऊन बँकेत गेला, गोल्डलोन मागायला.” राघूने भर घातली.

“संबित पात्रा तर म्हणतात, गाय का गोबर जो होता है ना, वो हिरेसे भी जादा महंगा होता है।”

“हो, मी ही ऐकलेच हे. गायीच्या दुधात सोने, शेणात हिरे आणि मूत्राने कॅन्सर बरा होतोय. किती बहुगुणी आहे गाय!” आई गहिवरली.

“पूर्वी आपल्याकडे खूप गोष्टी होत्या. रामायणात विमान होतं, मिसाईल होतं – महाभारतात इंटरनेट होतं. मला मेलीला काय कळतंय; पण कोणीतरी मोठी माणसंच असं सांगत होती,” चहा घेऊन आलेली काऊ म्हणाली.

“हो, ते इंडियन सायन्स काँग्रेसचे प्रमुख नागेश्वर राव आणि विप्लव देव यांनी म्हटलंय.” राघूने माहिती अद्ययावत केली, “अशा खूप गोष्टी आहेत. राजस्थान हायकोर्टाच्या जज्जनी मोराचे वेगळेपण सांगितले – मोर कभी भी मोरनी से सेक्स नहीं करता, आपने आँसू डालता है, मोरनी आँसू से बच्चे पैदा करती है! ”

“राघू, यातील काही खरं वाटतं का तुला? अश्रू पिऊन किंवा आंबा खाऊन पोरं होतील का? आपण तपासायला हवे,” मी राघूला अडवले.

“कसं तपासणार बाबा?”

“हे पाहा, मध्ये एक नेते म्हणाले, ‘गाय हा एकमेव पशू असा आहे की, जो ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजनच सोडतो.”

“हे, हे तपासता येईल! मी प्लास्टिकची पिशवी घेतो, त्यात गोमातेचा उच्छवास घेऊ या.” राघूने मार्ग सांगितला आणि पिशवी घेऊन बाहेर पळालाही!.

त्याने गायीच्या नाकासमोर हवा काढलेली रिकामी पिशवी धरली. उच्छवासाने ती भरली. तेव्हा पळतच घेऊन आला, “यात पेटती मेणबत्ती सोडा.”

त्याच्या मदतीला मैना आली. तिने तारेला टोचून पेटलेली मेणबत्ती हळूच पिशवीत सोडली. मेणबत्ती विझली.

“बाबा, यात ऑक्सिजन नाही. तो कार्बन डायऑक्साईड असेल तर चुन्याची निवाळी पांढरी करेल!”

मैना लगेच शेजारी गेली. त्यांनी रंगवण्यासाठी चुना भिजत घातला होता. त्याचे वरचे पाणी घेऊन आली. ते पिशवीत टाकून हलवले. “पाणी पांढरे झाले म्हणजे हा कार्बन डार्य ऑक्साईडच आहे,” आनंदाने मैना ओरडली.

“मला मेलीला काय कळतंय; पण मग हे मोठे पुढारी, पंतप्रधानांसारखे नेते काय खोटे बोलताहेत?” कावेरीचा सवाल.

“अगं काऊ! ते राजकारणी आहेत. असल्या विषयात लोकांना गुंतवले की, ते महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देत नाहीत; नाही तर कामगारविरोधी कायदे, शेतकरीविरोधी कायदे, वाढती बेरोजगारी यांचा विचार करतील,” मी स्पष्टीकरण दिले.

“म्हणजे सर्कशीत विदूषक असतो तसे म्हणा की बाबा. विदुषकाचे चाळे पाहिले की, मनोरंजन होते आणि मुख्य कलाकरांच्या चुका लक्षात येत नाहीत.” राघूने उदाहरण दिले.

“म्हणजे गोमातेच्या शेण आणि मूत्राचे काहीच उपयोग नाहीत काय?” गुंड्याभाऊने वैतागतच विचारले.

“आहेत की, म्हशीच्या शेणाचे खत होते, शेणी लावता येतात; तसेच गायीच्या शेणा-मुताचे खतच होते. दोघींचे दूध पौष्टिक असते. त्यात स्निग्धाचे प्रमाण भिन्न असते. त्याप्रमाणे त्याचा वेगवेगळा उपयोग करावा. आपल्या भागात गायीपेक्षा म्हैस पाळणे फायदेशीर आहे.” – मी

“म्हणजे माताच म्हणायची तर म्हशीला म्हणावे.” – राघूचा अभिप्राय.

“नाही, माता-पिता कोणी नाही. हे केवळ उपयुक्त पशू आहेत.” – मी.

“हे पाहा चिमण, गोबरपासून उदबत्ती, धूपबत्ती, डासाची अगरबत्ती, शेणी, बुडुकली अशा खूप वस्तू होतात. त्यांची ऑनलाईन विक्री सुरू असते. ते काय उगाच?”

“गुंड्याभाऊ जगात गाढवाना तोटा नाही! एवढंच यावरून सिद्ध होतंय. तुझंच उदाहरण घे!”

“मला मेलीला काय कळतंय; पण प्रत्येक गोष्ट तपासून घ्यावी, हे बरोबर आहे हो,” कधी नव्हे ते कावेरी माझ्या बाजूने बोलली.

गुंड्याभाऊने कप खाली ठेवला, सोटा उचलला आणि कासरा सोडून चालू लागला. मागे गर्दी गायीला हात लावून नमस्कार करत होती आणि गाय मुतात भिजलेली शेपटी त्यांच्या भोवती ओवाळत होती. प्रत्येक गोष्ट तपासून घ्यायला हवी. गुंड्याभाऊंच्या मनात विचार घोळत होता.

लेखक संपर्क – 97641 47483


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]