डॉ. दाभोलकर व माझे विवेकवादी मैत्रीचे ऋणानुबंध

डॉ. बी. वाय. यादव -

२० ऑगस्ट, डॉ. दाभोलकर यांचा स्मृतीदिन. यानिमित्त डॉ. दाभोलकर यांचे मित्र व कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे स्थापित श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शीचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव यांची कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शीचे प्राचार्य डॉ. एस. एस. गोरे यांनी घेतलेली मुलाखत…

प्रश्न : डॉ. दाभोलकरांविषयी आपले मत?

डॉ. यादव : बुद्धिवादी, विज्ञानवादी,समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते म्हणून अखंड लोकप्रिय असणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर. डॉ. नरेंद्र दाभोलकर हे महाराष्ट्राच्या विवेकवादी चळवळीतले महत्त्वाचे कार्यकर्ते होते. दैनंदिन जीवनातील अघोर्‍या चालीरीती, सामाजिक प्रथा व अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संघटनेद्वारे त्यांनी अविरत काम केलेे. अंधश्रद्धेविरोधात त्यांनी आयुष्यभर लढा दिला. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करुन या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ठ रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन केले, म्हणूनच महाराष्ट्राला ‘तिमिरातून तेजाकडे’ नेऊ पाहणारा एक पथिक ही त्यांची ओळख निर्माण झाली आहे.

प्रश्न : डॉ. दाभोलकरांशी आपली मैत्री कशी व केव्हा झाली?

डॉ. यादव : सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून दाभोलकरांनी उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्यांनी मिरज येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं. वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत असतानाच डॉ. दाभोलकर व मी एकत्र आलो ते कायमचेच. समाजसुधारणा या एकाच विचारधारेच्या जोरावर डॉ. दाभोळकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले आहे. डॉ. दाभोळकर व माझी अतूट मैत्री होती. सन १९६५ मध्ये दोघांनीही मिरज येथे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला.

प्रश्न : विद्यार्थीदशेतील त्यांच्यासोबतचे अनुभव विशद करा.

डॉ. यादव : कॉलेजमध्ये डॉ. दाभोलकर यांना उत्कृष्ठ विद्यार्थी म्हणून त्याकाळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. दाभोळकर यांच्या अंगी सुरुवातीपासूनच नेतृत्व क्षमता होती. जीवनात विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले. त्यावेळी मिरज मेडिकल कॉलेजला इंडियन मेडिकल कौन्सिलची मान्यता नव्हती. कारण विद्यार्थ्यांना वसतीगृहाची सोय नव्हती, वैद्यकीय शिक्षणासाठी आवश्यक असणार्‍या साहित्याची वानवा होती, अद्ययावत प्रयोगशाळा नव्हत्या, त्याचप्रमाणे अनुभवी शिक्षकही उपलब्ध नव्हते. परिणामी आमच्या महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांना डॉक्टर म्हणून व्यवसाय करण्यास मान्यता मिळणार नव्हती. आमचे भविष्य अंधकारमय होते. यामुळे डॉ. दाभोलकरांनी मिरज कॉलेजमधील वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना संघटित केले व संघर्ष सुरु केला. त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठी चळवळ उभी राहिली. हा लढा सलग २६ दिवस सुरु होता. वैद्यकीय शिक्षण घेणारे काही विद्यार्थी आपण संप करायला नको अशी भूमिका घेत होते, मात्र दाभोलकरांनी विद्यार्थ्यांमध्ये आंदोलनाची धग वाढविण्यासाठी ‘सरकारला भीमटोला दिल्या शिवाय जाग येणार नाही’ म्हणून आपण निकाराने लढा देऊ अशी गर्जना केली. याची दखल घेत तत्कालीन मुख्यमंत्री मा. वसंतदादा पाटील यांनी मिरज मेडिकल कॉलेजला भेट दिली. आम्हा सर्व विद्यार्थ्यांना विश्वासात घेवून ना. दादांनी आम्हाला सर्व बाबी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आणि शासकीय पातळीवर सर्व अडचणींचे निराकरण करण्याचे अधिकार्‍यांना त्यांनी तात्काळ आदेश दिले आणि हा लढा यशस्वी झाला.

प्रश्न : आणखीही काही अनुभव असल्यास सांगावेत.

डॉ. यादव : डॉ. नरेंद्र दाभोलकर व मी होस्टेलचे विद्यार्थी होतो. होस्टेलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. या कार्यक्रमात डॉ. दाभोलकर हिरीरिने भाग घेत असत. अनेक नामवंत समाजसेवकांना निमंत्रित केले जायचे. मला आठवते वार्षिक स्नेह संमेलनासाठी त्यांनी मा. पी. जी. पाटील, कुलगुरु शिवाजी विद्यापीठ यांना आमंत्रित केले होते.

प्रश्न : डॉ. दाभोलकरांची ‘हनुमान उडी’ प्रसिद्ध आहे. त्याविषयी कांही आठवण?

डॉ. यादव : डॉ. नरेंद्र दाभोलकर हे त्या काळातील नावाजलेले कबड्डीपटू होते. शालेय किंवा महाविद्यालयीन स्पर्धांपुरतं नव्हे तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी कबड्डी स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. प्रतिस्पर्ध्यांच्या हाती न लागण्यासाठी पायात स्प्रिंग लावल्यागत उडी मारण्याचे म्हणजे ‘हनुमान उडी’ घेण्याचं कसब दाभोलकरांमध्ये होतं. कबड्डी संघाचा कर्णधार म्हणून देखील त्यांनी उत्कृष्ठ कार्य केले आहे. लढण्याची प्रेरणा मला कबड्डीतून मिळाल्याचे डॉ. दाभोलकर नेहमी म्हणत.

प्रश्न : आपल्या संस्थेत डॉ. दाभोळकर आले तेव्हाचा प्रसंग सांगा.

डॉ. यादव : अंधश्रद्धा निर्मूलन हे डॉ. दाभोलकर यांचे जीवित कार्य होते. या निमित्ताने त्यांचे अनेक ठिकाणी दौरे होत असत. कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांनी स्थापन केलेल्या व सर्व क्षेत्रात नामांकित असलेल्या बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या प्रचंड गर्दीत त्यांचे अंधश्रद्धेवर उद्बोधक व्याख्यान झाले. त्याने सारा श्रोतृवर्ग भारावून गेला होता. त्याच कॉलेजचा मी विद्यार्थी आहे ही भाग्याची गोष्ट. डॉ. नरेंद्र दाभोलकर त्यावेळी माझ्याकडे भोजनासाठी न येता त्यांचा कार्यकर्ता डॉ. मस्तुद यांचेकडे गेले. त्यांना पुन्हा व्याख्यानाला संस्थेत येऊन मार्गदर्शन करण्याविषयी मी विनंती केली व त्यावेळी माझ्या घरी जेवणाचे आवर्जून आमंत्रणही दिले ते त्यांनी मान्य केले. परंतु तो योग आला नाही, ही बाब आजही माझ्या मनात सल करुन राहिली आहे.

डॉ. दाभोलकर यांचे सामाजिक कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे. सामजिक चळवळ अखंड टिकली पाहिजे असा त्यांचा ध्यास होता. डॉ. दाभोलकरांच्या याच उत्तुंग सामाजिक सेवेबद्दल २०१६ साली आमच्या श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी या नामांकित व लोकप्रिय शैक्षणिक संस्थेने सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व रोख रक्कम रुपये २५ हजार असा ‘कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे समाज परिवर्तन गौरव पुरस्कार’ मरणोत्तर प्रदान केला. तो त्यांचे सुपुत्र डॉ. हमीद दाभोलकर व सुकन्या अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर यांनी भावपूर्ण वातावरणात स्वीकारला.

प्रश्न : डॉ. दाभोलकरांविषयी आपण काही साहित्य निर्मिती केली आहे त्याविषयी

डॉ. यादव : बार्शी येथे सयाजीराव गायकवाड व नरेंद्र दाभोलकर यांच्या साहित्याचे हिंदी भाषेत अनुवादित करण्यासाठी सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मी पुढाकार घेऊन ही चळवळ सुरू ठेवली. यात डॉ. सुनिलकुमार लवटे यांचे देखील मोठे योगदान आहे. त्यामुळेच नरेंद्र दाभोलकर यांचे साहित्य हिंदी व इतर भाषेत समाजापर्यंत पोहोचले.

सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले त्या पुरोगामी विचार असलेल्या महान व्यक्तीमत्त्वास विनम्र अभिवादन ! संपूर्ण हयातभर डॉ. दाभोलकर यांनी समाजसेवेसाठी लढा उभारला. अनेक वेळा संघर्ष करावा लागला तरी देखील आपल्या संकल्पास मूर्त स्वरुप धारण करुन देण्यात ते यशस्वी झाले. अशा या निःस्वार्थी विवेकवादी कार्य कर्तृत्त्वास विनम्र अभिवादन…!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ]