डॉ. अजिंक्य गायकवाड -
प्रस्तुत लेखात डॉ. आंबेडकरांच्या धर्मचिकित्सेची चर्चा केली आहे. यात हिंदू धर्मावरील त्यांची टीका, त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची मीमांसा, त्याच्या विवेचनातून बौद्ध धर्माच्या दिशेने झालेल्या त्यांचा प्रवासाची मांडणी केली आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार ही निव्वळ धर्म परिवर्तनाची घटना नसून त्यातही आंबेडकरांनी चिकित्सक आणि टीकात्मक दृष्टीने ‘नवयान बौद्ध धम्म’ हे नवे तत्त्वज्ञान मांडल्याचे दिसते. डॉ. आंबेडकरांची धर्मचिकित्सेचे तीन प्रमुख आयाम आहेत; बौद्धिक (चिंतनात्मक), सामाजिक आणि राजकीय. त्यांच्या धर्मचिकित्सेचे या आधारे विवेचन करता येईल.
१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षाभूमी (नागपूर) येथे अभूतपूर्व अशा सभेत आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. जगाच्या इतिहासातील हे एक सर्वांत मोठे धर्मांतर होते. भारतात याआधीही धर्मांतराच्या घटना घडल्या होत्या, परंतु या घटनेने स्वतंत्र भारतात धर्मांतराच्या संकल्पनेला एक नवे राजकीय आणि तात्त्विक परिमाण प्राप्त करून दिले. याआधी नाशिकजवळील येवला येथे १३ ऑक्टोबर १९३५ रोजी डॉ. आंबेडकरांनी ऐतिहासिक भाषण केले. आंबेडकर म्हणाले, “मी हिंदू म्हणून जन्मलो; पण हिंदू म्हणून मरणार नाही.” या घोषणेद्वारे त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्था आणि त्यातून निर्माण झालेल्या अस्पृश्यतेवर हल्ला केला. तथापि, धर्मांतराच्या अंतिम निर्णयापर्यंत येण्यासाठी त्यांना पुढील दोन दशके लागली.
प्रस्तुत लेखात डॉ. आंबेडकरांच्या धर्मचिकित्सेची चर्चा केली आहे. यात हिंदू धर्मावरील त्यांची टीका, त्यातून निर्माण झालेल्या प्रश्नांची मीमांसा, त्याच्या विवेचनातून बौद्ध धर्माच्या दिशेने झालेल्या त्यांचा प्रवासाची मांडणी केली आहे. बौद्ध धर्माचा स्वीकार ही निव्वळ धर्म परिवर्तनाची घटना नसून त्यातही आंबेडकरांनी चिकित्सक आणि टीकात्मक दृष्टीने ‘नवयान बौद्ध धम्म’ हे नवे तत्त्वज्ञान मांडल्याचे दिसते.
धार्मिक चिंतन आणि विवेचन
डॉ. आंबेडकरांची धर्मचिकित्सेचे तीन प्रमुख आयाम आहेत; बौद्धिक (चिंतनात्मक), सामाजिक आणि राजकीय. त्यांच्या धर्मचिकित्सेचे या आधारे विवेचन करता येईल.
सामाजिक, राजकीय व आर्थिक विकासाला तत्त्वज्ञानाची जोड हवी असे आंबेडकरांचे मत होते आणि त्यासाठी धर्म महत्त्वाचा आहे हे त्यांच्या लक्षात आले. १९३६ नंतरच्या काळात त्यांनी विविध जागतिक धर्मांचा सखोल अभ्यास केला. हा शोध होता समता, नैतिकता आणि मानवी प्रतिष्ठेवर आधारित धर्माचा आणि अखेर हा शोध संपला तो बौद्ध धम्माच्या दीक्षेने. दरम्यानच्या काळात त्यांनी अस्पृश्य जातींना सामाजिक, राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनेक संघर्ष केले. यात मंदिर प्रवेशाच्या चळवळी, पाणी हकासाठीचा सत्याग्रह, स्वतंत्र मतदारसंघाची मागणी, अस्पृश्यांच्या आर्थिक उत्थानासाठी धोरणात्मक तरतुदी, हकाधिष्ठित समाजनिर्मितीसाठी घटना समितीतील कार्य आणि शेवटी हिंदू कोड बिलमार्फत हिंदू सुधारणवादात कायदेशीर हस्तक्षेप केला. या सर्व घटनांमधून डॉ. आंबेडकरांच्या धर्मविषयक चिंतन, चिकित्सा व धर्मांतराबद्दलचे विचार स्पष्ट होतात.
धर्मांतर झाले तो आणि त्या आधीच्या काळातील सामाजिक आणि राजकीय परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. ब्रिटिश वसाहतवाद व सामाजिक-आर्थिक विषमतेचा सामना करताना आधुनिकतेचे आव्हान अधिक तीव्र झाले होते. विवेकवाद आणि सामाजिक न्यायावर बेतलेली आधुनिकतेची संकल्पना परंपरावादी, रूढीवादी धर्मांना न पटणारे होते. याचबरोबर एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील सामाजिक-धार्मिक सुधारणावादी चळवळींचा व बंडाचा इतिहास असलेल्या प्रांतात नैतिक, वैचारिक आणि बुद्धिवादी उठाव हे निश्चित होते. पाश्चात्त्य विचारवंतांनी कालांतराने धर्म लोप पावेल अशी भाकिते जरी वर्तवली असली, तरी धर्म टिकला. त्याच्यात कधी लहान तर कधी आमूलाग्र बदल झाले. परंतु जनमानसातून तो कधीच पूर्णपणे हद्दपार झाला नाही.
धर्मांतराच्या प्रक्रियेत डॉ. आंबेडकर धर्म आणि धर्मनिरपेक्षतेच्या द्वैताला आव्हान देतात. आंबेडकर धर्मसंस्थेच्या शोषणाविरुद्ध ठाम भूमिका घेतात. परंतु ते धर्माला नाकारत नाहीत. याउलट ते धर्म व आध्यात्मिकतेच्या परिवर्तनक्षम शक्यतांचे स्वागत करतात. आंबेडकरांच्या विचारात धर्म आणि आध्यात्मिकता हा प्रतिकार, सामूहिक ऐक्य आणि नैतिक पुनर्रचनेचे अधिष्ठान आहे. यातून एक स्पष्ट होती की, राजकीय अस्मिता ही भौतिक संघर्षातूनच नव्हे तर आध्यात्मिक पुनर्रचनेद्वारेही साकारता येते. डॉ. आंबेडकरांच्या धर्मचिंतनालाही या दृष्टीने पाहायला हवे.
डॉ. आंबेडकरांनी केलेली नवयान बौद्ध धर्माची मांडणी हीसुद्धा गतकाळातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक घडामोडींतून निर्माण झालेली आहे. याची मुळे भारतातील आणि प्रामुख्याने महाराष्ट्रातील सामाजिक-धार्मिक सुधारणावादी चळवळींमध्ये सापडतात. परमहंस पंथातील विचारवंतांपासून व सर्वच सुधारकांनी वंशपरंपरागत ब्राह्मणी पुरोहितशाही व्यवस्था हे सामाजिक विषमतेचे मूळ आहे, अशी कठोर टीका केली. शिवाय या सर्व चळवळींनी व्यक्तीची प्रतिष्ठा, तर्क आणि विवेकाला धर्माचे आधारस्तंभ मानले. धर्म म्हणजे उपासना नव्हे, तर सेवा आणि नैतिक कृती होय, असाही दृष्टिकोन रुजू पहात होता. या सर्व सुधारणावादी विचारांचा आंबेडकरांच्या विचारविश्वावर खोल ठसा उमटला यात शंका नाही. डॉ. आंबेडकरांच्या धर्मविचारात आणि चिकित्सेत सर्वच चळवळींचे मोठे योगदान आहे असे दिसून येते.
१९३० च्या दशकात आंबेडकरांनी अनेक महत्त्वाच्या चळवळींचे नेतृत्व केले. चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आणि त्यानंतर अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारसंघ निर्माण करण्याची मागणी आणि महात्मा गांधींशी झालेले मतभेद हे सर्वश्रुत आहे. या सगळ्या लढ्यांमधील एक समान बाब म्हणजे, आंबेडकरांना सवर्ण हिंदू समाजाचा प्रखर विरोध सहन करावा लागला.
येथे अस्पृश्य समाजाला स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करून देण्याचे प्रयत्न सुरू असताना मंदिर प्रवेशाच्या चळवळींचे नेतृत्व करणे विरोधाभासी वाटू शकते. परंतु ही चळवळ या शोषित-उपेक्षित समाजात ऊर्जा निर्माण करण्यासाठी व हिंदू धर्मातील त्यांच्या स्थानाची जाणीव करून देण्यासाठी योजिली होती. काळाराम मंदिराच्या सत्याग्रहासंदर्भात म्हणायचे झाल्यास डॉ. आंबेडकरांनी ही चळवळ अनेक वर्षे चालवली. पण पुढे महात्मा गांधींच्या मध्यस्थीने १९३३ मध्ये आलेल्या मंदिर प्रवेशासंदर्भातील विधेयक नाकारले. सततच्या संघर्षामुळे आणि सवर्ण समाजाकडून झालेल्या उपेक्षेमुळे आंबेडकर व्यथित झाले होते. हिंदू धर्मात सुधारणा होणे अशक्यप्राय गोष्ट आहे, हे त्यांना पटले होते. यामुळे धर्मांतराबद्दलचा त्यांचा विचार अधिक दृढ होत गेला. १९३२ मध्ये ते लिहितात, ‘भारतात अनेक महात्म्यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचे अनेक प्रयत्न केले. बुद्ध, रामानुज व आधुनिक काळात वैष्णव संतांनी असे प्रयत्न केलेले दिसतात. इतके हल्ले पचवून शाबूत राहिलेली ही व्यवस्था मोडून पडेल असा विचारच मुळात फोल आहे.
शोषक (हिंदू) धर्माची चिकित्सा व त्याग
यानंतर १३ ऑक्टोबर १९३५ रोजी येवल्याच्या परिषदेत त्यांनी एकप्रकारे धर्मांतराची घोषणाच केली. ‘दुर्दैवाने, माझा जन्म हिंदू अस्पृश्य म्हणून झाला. हे माझ्या हातात नव्हते, परंतु अपमानास्पद आणि हीन स्थितीत जगण्यास नकार देणे हे माझ्या हातात आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की, मी हिंदू म्हणून मरणार नाही.’ हे विधान धार्मिक नव्हे, तर राजकीय व नैतिक क्रांतीची घोषणा होती. इथून पुढच्या काळात खर्या अर्थाने धर्मपरिवर्तनावर चर्चा व विमर्श सुरू झाला. दलितांतील वेगवेगळ्या जातिसमूहांना भेटून धर्मांतराबाबत त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न बाबासाहेब करताना दिसतात. आपल्या टीकाकारांना उत्तरे देत देता आंबेडकर वेगवेगळ्या धर्मगुरूंना भेटी घेऊन निवडीच्या दृष्टीने या धर्मांचे परीक्षण करतात. या काळात त्यांनी सर्व धर्मांचा तौलनिक अभ्यास केला आणि शेवटी दोन दशकांनंतर बौद्ध धर्माचा स्वीकार केला.
‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’(१९३६) या ऐतिहासिक ग्रंथात आंबेडकरांनी धर्माच्या तीन मूलभूत कसोट्या मांडल्या आहेत; कुठल्याही धर्माने स्वातंत्र्य (liberty), समता (equality) आणि बंधुता (fraternity) या तीन तत्त्वांचा पुरस्कार केला पाहिजे. ते पुढे म्हणतात, ‘ज्या धर्मव्यवस्थेत या तीन तत्त्वांपैकी एकाचाही अभाव असेल, तर ती व्यवस्था मानवी समाजासाठी अनुपयुक्त आहे.’ आंबेडकरांच्या हिंदू धर्मावरील टीकेचा केंद्रबिंदू चातुर्वर्ण्य व त्यावर आधारलेली वर्णाश्रम धर्मव्यवस्था होती. त्यांच्या मते, हिंदू धर्म ही धर्मव्यवस्था नसून एक सामाजिक व्यवस्था आहे जी असमानतेवर उभी आहे. ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’मध्ये ते स्पष्टपणे म्हणतात, ‘बहिष्कृत समाज हा जातिव्यवस्थेतूनच आलेला आहे. जोपर्यंत जाती आहेत तोपर्यंत बहिष्कृतही असतील.’
हिंदू धर्माने चातुर्वर्ण्याला धार्मिक अधिष्ठान तर दिलेच, शिवाय ती परमेश्वराने निर्माण केलेली, शाश्वत आणि अपरिवर्तनीय व्यवस्था म्हणून प्रस्तुत केले. ऋग्वेदातील पुरुषसूक्तात वर्णव्यवस्थेला ब्रह्मदेवाच्या शरीराशी जोडले गेले आहे – ‘ब्रह्ममुखातून ब्राह्मण, बाहूंतून क्षत्रिय, मांड्यांतून वैश्य आणि शूद्र पायांतून निर्माण झाले.’ आंबेडकरांनी ही मिथकीय संकल्पना नाकारत ती काही विशिष्ट वर्गाच्या हितासाठी निर्माण केलेली सामाजिक रचना आहे, असा युक्तिवाद केला. डॉ. आंबेडकरांच्या धर्मचिकित्सेचा पाया हा हिंदू धर्मातील अनिष्ट रूढी-परंपरा, जात-विटाळ आणि अस्पृश्यता व श्रेणीबद्ध विषमतेवर केलेल्या बौद्धिक आणि तात्त्विक टीकेवर आधारलेला आहे. त्याच्या ‘अॅनिहिलेशन ऑफ कास्ट’ आणि ‘रिडल्स इन हिंदुइझम’ या पुस्तकांमधून त्यांनी हिंदू धर्मांतील रूढी, परंपरांचे खंडन केले आहे. आंबेडकरांच्या मते, हिंदू धर्मातील तत्त्वप्रणाली ही ब्राह्मणी वर्चस्ववादाच्या चौकटीतून तयार झाल्याचे दिसते. ब्राह्मण अभिजनांनी जातवर्चस्वावर आधारलेली उतरंड निर्माण केली. पुढे आध्यात्मिक आणि सामाजिक रचनांद्वारे कालांतराने ही उतरंड अधिक बळकट होत गेली.
डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराच्या विषयावर आपले विचार मांडण्यासाठी नायगाव येथे ३१ मे १९३६ रोजी अखिल मुंबई इलाखा महार परिषद भरवली. तिथे झालेल्या ऐतिहासिक ‘मुक्ती कोण पथे?’ या भाषणात डॉ. आंबेडकरांनी धर्माच्या स्वरूपावर, त्याच्या सामाजिक परिणामांवर आणि मुतीच्या तत्त्वावर सखोल चिंतन केले. ते म्हणतात, ‘धर्म हा माणसाकरिता आहे, माणूस धर्माकरिता नाही.’ हा वाक्यांश त्यांच्या धर्मविषयक टीकेचा केंद्रबिंदू आहे. धर्म माणसाच्या उन्नतीसाठी, त्याच्या स्वाभिमानासाठी आणि समाजातील समतेसाठी असला पाहिजे. हिंदू धर्माला उद्देशून ते म्हणतात, ‘जर धर्माने माणसाला गुलामीत ठेवले, तर तो धर्म नव्हे तर अधर्म ठरतो.’
स्वतंत्र भारतातील न बदललेले (न बदलणारे) जातीवर्चस्व आणि काँग्रेसप्रणित बहुसंख्यत्वाचे राजकारण यामुळे संविधानावर आधारित राज्यसंस्था मोठे बदल घडवून आणण्यासाठी कितपत सक्षम आहे, यावर त्यांना शंका होती. याच काळात हिंदू कोड बिलावरून काँग्रेस नेतृत्वाशी झालेल्या वादामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी राज्यसंस्थेला काही मर्यादा आहेत, हे एव्हाना स्पष्ट झाले होते. त्यामुळे सामाजिक बदल साधायचा असेल तर त्याला आर्थिक समृद्धीसोबतच आंतरिक बदल घडवून आणावा लागेल. हा बदल अर्थातच प्रामुख्याने मानसिक असेल, यावर ते ठाम होते. बहुतांश दलित समाज खालच्या दर्जाची समजली जाणारी हलकी कामे करीत होता. सततच्या अपमान आणि हेटाळणीमुळे स्वाभिमान गमावून बसलेल्या समाजाला स्वतःच्या उत्थानासाठी आणि परिवर्तनासाठी आध्यात्मिक आणि धार्मिक मार्गाची कास धरावी लागेल, असे त्यांचे मत झाले होते.
हिंदू सुधारकांनी अस्पृश्यता निवारणाचा प्रयत्न केला, परंतु त्यात जातिव्यवस्था आणि वर्णाश्रम धर्मावर मते अभावानेच दिसत. त्यामुळे दलितांची अवस्था जैसे थे राहिली. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांचे आणि भारतातील अस्पृश्यांची स्थिती सारखी वाटत असली, तरी त्यात एक मोठा फरक होता. तो म्हणजे अमरिकेतील गुलामगिरीला कायद्याची अनुज्ञा होती, तर अस्पृश्यतेला धर्माचे संरक्षण होते. जातीचे समूळ उच्चाटन करण्यासाठी फारसे प्रयत्न हिंदू समाजसुधारकांकडून झाले नाहीत. अमेरिकेत मात्र श्वेतवर्णीयांनी गुलामगिरी नष्ट करण्याचे खर्या अर्थाने प्रयत्न केले. काही श्वेतवर्णीयांनी तर गुलामगिरीविरुद्ध यादवी युद्धातही सहभाग घेतला. ‘हिंदू समाजसुधारक असा लढा लढतील का?’ असा प्रश्न आंबेडकर विचारतात. थोडक्यात, आंबेडकरांच्या मते समाजसुधारकांचे प्रयत्न अगदी वरवरचे होते त्यात जातिव्यवस्थेवर वचितच भाष्य केले जाते.
धर्मांतराचा निर्णय हा अनेक घटनांचा परिपाक आहे. स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीला गांधींकडून झालेल्या विरोधानंतर आंबेडकर व्यथित होते. मात्र राजकीय हकांना मर्यादा असू शकतात, हे त्यांच्या लक्षात आले होते. राजकीय हकांना नैतिक सामर्थ्याची जोड हवी म्हणून धर्मांतराचा विचार पुढे आला.
१९३६ मधील येवला येथील भाषण, हिंदू धर्मावरील परखड लेखन, बौद्ध देशांतील दौरे व भाषणे, बुद्ध आणि त्याचा धम्म (१९५७) हा ग्रंथ आणि १९५६ मधील प्रत्यक्ष धर्मांतराची कृती यांबद्दल अनेकदा चर्चा होते. अर्थात हे महत्त्वाचेच आहे. परंतु आंबेडकरांच्या धर्मचिकित्सेबद्दल बोलायचे असेल तर धर्मांतर व धर्माबद्दलचे त्यांच्या विचारांच्या पलीकडे जावे लागेल.
बौद्ध धम्माकडे वाटचाल
मे १९५६ मध्ये बीबीसीने आंबेडकरांचे एक भाषण प्रसिद्ध केलं. भाषणाचा विषय होता ‘मला बौद्ध धर्म का भावतो?’ या प्रश्नाचं उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात, “मला बौद्ध धर्म आवडतो. कारण जी तत्त्वे इतर कोणत्याही धर्मात सापडत नाहीत, ती मला फक्त बौद्ध धर्मात सापडतात. बौद्ध धर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा, चमत्कार आणि अद्भुतता शिकवत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तत्त्वे शिकवतो. मनुष्याच्या चांगल्या आणि सुखी जीवनासाठी याची आवश्यकता आहे.”
‘दि अनटचेबल्स : व्हू वेअर दे? अँड व्हाय दे बिकेम अनटचेबल्स’(१९४८) या पुस्तकात बाबासाहेबांनी केलेल्या मांडणीत भारतातील निम्न जातींतील लोक हे मुळात बौद्ध होते, असे प्रतिपादन केलेले आहे. ब्राह्मणसत्तेने त्यांचे शतकानुशतके त्यांचे दमन केले आणि कालांतराने त्यांच्यावर अस्पृश्यता लादली. गेल ऑम्वेट (२००३) यांच्या विवेचनात आंबेडकरांसोबत केरळमधील दलित समाजसुधारक इयोथी थास यांनीदेखील अशीच मांडणी केली आहे. डी. डी. कोसंबी आणि राहुल संस्कृतायन या मार्क्सवादी विचारवंतांनी भारतातील बौद्ध धर्माचा र्हास आणि ब्राह्मणवादाच्या उदयाबद्दल चर्चा केली आहे. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर जवळजवळ एक हजार वर्षे (सहस्त्रक) त्याचा धम्म हा भारतीय संस्कृती आणि सभ्यतेचा एक महत्त्वाचा घटक मानला जाई. या दरम्यान बौद्ध धम्माचे ब्राह्मणवादातील वर्णाश्रमधर्म या संकल्पनेसोबत वैचारिक वाद होते.
आंबेडकरांच्या ‘रिव्होल्यूशन अँड काउंटर-रिव्होल्यूशन इन एन्शन्ट इंडिया’(१९८७) या पुस्तकात भारताचा पुरातन इतिहास हा मुळात ब्राह्मण-बौद्ध वादावर आधारलेला आहे, अशी मांडणी केली आहे. सिद्धार्थ गौतमाच्या परित्यागाबद्दल चर्चा करताना, आंबेडकर त्याची राजकीय दृष्टीने मीमांसा करतात. शाक्य आणि कोलीया या राज्यांमध्ये रोहिणी नदीच्या पात्रातील पाण्याच्या वाटपावरून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या वेळी सिद्धार्थने युद्धविरोधी भूमिका घेतली. शाक्य संघाशी झालेल्या या मतभेदांमुळे सिद्धार्थने परित्यागाचा मार्ग निवडला. आंबेडकरांनी केलेल्या भगवद्गीतेच्या समीक्षणात धर्माचे रक्षण, क्षत्रियधर्माची परिपूर्ती म्हणून स्वकीयांविरुद्धच्या युद्धाचे समर्थन हा मुद्दा अधोरेखित होतो. याउलट, आंबेडकरांच्या विवेचनात बुद्ध हा विवेकी आहे. त्याने युद्धजन्य परिस्थितीत क्षत्रियधर्म नाकारला आणि शांतीमार्ग स्वीकारला.
डॉ. आंबेडकरांच्या मते, हिंदू धर्म हा नियमांचा धर्म आहे.मानवतेसाठी नव्हे, तर वर्णव्यवस्था टिकवण्यासाठी उभारलेली व्यवस्था आहे. या धर्माने व्यतीच्या इच्छाशक्तीला बांधून ठेवले व कर्मसिद्धांताच्या नावाने अन्यायाला अधिमान्यता दिली. याउलट त्यांनी शोधलेला बौद्ध धर्म हा तत्त्वांचा धर्म ठरतो – विवेक, करुणा आणि नैतिक स्वावलंबन यांवर उभारलेला. हिंदू धर्म जिथे आज्ञाधारकतेवर भर देतो, तिथे बौद्ध धर्म माणसाच्या विवेकाधारित नैतिक जबाबदारीवर भर देतो.
आंबेडकरांनी धर्माचा केंद्रबिंदू ईश्वर-मनुष्य संबंधापासून मनुष्य-मनुष्य संबंधाकडे नेला. हा परिवर्तनकारी दृष्टिकोन आहे, कारण त्याने धर्माला नैतिक सामाजिक राजकारणात रूपांतरित केले. आंबेडकर आपल्या धर्मविचाराला धम्म म्हणून संबोधतात आणि ‘धम्मा’ची व्याख्या धर्मापेक्षा भिन्न असल्याचे अधोरेखित करतात. त्यांच्या मते, धर्म म्हणजे कर्मकांड, रूढी, विधी, देवपूजा आणि पुरोहितवाद यांवर आधारित व्यवस्था आहे; परंतु धम्म म्हणजे नैतिक तत्त्वांवर आधारित जीवनपद्धती व मनुष्यांमधील समानतेवर आधारित नाते आहे. सामाजिक समता व न्याय हे धम्माच्या केंद्रस्थानी आहेत. १९५६ सालच्या ऐतिहासिक धर्मांतराप्रसंगी त्यांनी घेतलेल्या २२ प्रतिज्ञा म्हणजे, हिंदू धर्मातील अन्यायकारक जातिव्यवस्थेपासून पूर्णतः फारकत घेण्याची सार्वजनिक घोषणा होती. ही क्रिया प्रतीकात्मक असली, तरी त्यातील थेट आणि नेमकेपणा नव्या धर्मात येणार्या लोकांसाठी अतिशय महत्त्वाचा दिशादर्शक आहे. या प्रतिज्ञांमध्ये त्यांनी हिंदू देवतांची पूजा न करण्याचा, ब्राह्मणांकडून कोणतेही धार्मिक विधी न करवण्याचा, जातिव्यवस्थेचा त्याग करण्याचा आणि बौद्ध धर्माच्या नैतिक मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा संकल्प केला. या प्रतिज्ञा म्हणजे, नवयान बौद्ध धर्माच्या तत्त्वज्ञानाचे मूर्त रूप होय, ज्यात धर्माला सामाजिक परिवर्तनाचे साधन मानले गेले.
आंबेडकरांनी केलेली धर्माची पुनर्मांडणी
डॉ. आंबेडकरांसाठी धर्म म्हणजे निव्वळ आध्यात्मिक भावना व धारणा नसून तर्क आणि विवेकावर आधारित सामूहिक, सामुदायिक पद्धतीचा एक विद्रोह आहे. धर्मांतर ही कृती आध्यात्मिक व सामाजिक आहे. आंबेडकरांच्या बौद्ध धर्मांतराने उपेक्षित व वंचित घटकांमध्ये नवचेतना निर्माण होऊन सामाजिक एकजूट आणि समताधिष्ठित मूल्यांची रुजवात झाली.
आंबेडकरांचे धर्मचिंतन हिंदू धर्मावरील टीकेपुरते सीमित नव्हते. या चिंतनातून त्यांनी हिंदू धर्माला पर्याय म्हणून बौद्ध धर्माचेही विवेचन मांडले आहे. त्यातही आहे त्या अवस्थेतील बौद्ध धर्म न स्वीकारता त्याचीही पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला आहे.
नवयान बौद्ध धर्म ही आंबेडकरांनी बौद्ध धर्माची नव्याने केलेली मांडणी आहे. ‘नवयान’ म्हणजे ‘नवीन मार्ग’- यात बौद्ध धर्मातील परंपरागत अंधश्रद्धा, कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर आधारित प्रथांना नाकारून, केवळ विवेकावर आधारित ‘शुद्ध’ बौद्ध धर्माचा स्वीकार केला. आंबेडकरांच्या विचारातील बौद्ध धर्म हा विवेकवाद आणि मानवतावादावर आधारित आहे. त्यामुळेच धर्मांतर्गत अतिभौतिक आणि गूढ गोष्टी, तसेच भिक्खू संघाच्या वर्चस्वावर आंबेडकरांनी भाष्य केले आहे. या मांडणीत प्रज्ञा, करुणा आणि मैत्री ही त्रिसूत्री महत्त्वाची आहे. दलितांचे धर्मांतर हे मुक्तीचे साधन आणि माध्यम म्हणून त्यांनी पाहिले. यात धर्म हा जातवर्चस्वाची वैचारिक चौकट मोडण्यासाठी वापरला आहे. या नव्या मांडणीतून आंबेडकर सामाजिक ऐक्य, राजकीय आत्मभान आणि सामाजिक बदलासाठीचा कृतिकार्यक्रम देतात.
धर्म व आध्यात्मिक विचारांवर उच्चजातीयांचे वर्चस्व होते. या वर्चस्वातून निम्न जातीयांचे शोषण करण्यासाठीची अंधश्रद्धा आणि अतार्किक विचारांवर आधारलेली धर्माधिष्ठित व्यवस्था उदयास येते.
आंबेडकरांनी आत्मा, ईश्वर, पुनर्जन्म आणि कर्मसिद्धांत यांसारख्या ब्राह्मणवादी संकल्पनांना नाकारले. बुद्ध देवदूत नव्हे, तर मार्गदर्शक आहे, त्यामुळे त्यांचा धर्म पारलौकिक नसून सामाजिक आहे हे ठसवले. पारंपरिक बौद्ध धर्म वैयक्तिक मुती व निर्वाणाच्या संकल्पनांना केंद्रबिंदू मानत होता. मात्र, डॉ. आंबेडकरांनी तो सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पुनर्परिभाषित केला. भारतातील जातिव्यवस्थेमुळे निर्माण झालेल्या विषमतेला केंद्रस्थानी ठेवून त्यांनी बौद्ध तत्त्वज्ञानातील ‘दुःख’ या संकल्पनेची पुनर्व्याख्या केली. आंबेडकरांच्या मते, दुःख म्हणजे मानवाच्या सामाजिक-आर्थिक शोषणाचा परिणाम. त्यामुळे तो वैयक्तिक क्लेश नसून सामाजिक अन्याय आहे. त्यामुळे दुःख-निवारणाचा मार्ग म्हणजे सत्ता-संबंधांची न्याय्य पुनर्बांधणी.
डॉ. आंबेडकरांनी कर्म आणि पुनर्जन्म या संकल्पनांची नैतिक दृष्टिकोनातून मांडणी केली. व्यक्तीच्या कुठल्याही कृतीचे परिणाम हे तिच्या याच जन्मातील कृतींची निष्पत्ती असते आणि त्याची नैतिक जबाबदारीही त्याच व्यक्तीची असते. त्यासाठी मागल्या अथवा पुढल्या जन्मावर विसंबून राहता येत नाही. थोडक्यात, मनुष्यजीवनाची मीमांसा त्यांनी वास्तव जगात, याच जन्मात केली. त्याला कुठलेही पारलौकिक परिमाण जोडले नाही. त्यामुळे मोक्षाची कल्पना ही समाजसुधारणेच्या स्वरूपात उतरते.
डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्मातील भिक्खूंच्या भूमिकेसंबंधी अतिशय तार्किक मते मांडली. भिक्खू हा संघातील पूर्णवेळ सदस्य आहे. पारंपरिक दृष्टिकोनानुसार भिक्षूचा उद्देश ‘परिपूर्ण मनुष्य’ बनणे आणि केवळ वैयक्तिक मुती साधणे हा आहे. परंतु आंबेडकरांच्या मते, अशी व्यती जरी परिपूर्ण असली, तरी समाजासाठी निरुपयोगी ठरेल. त्यांच्या मते, भिक्खू हा समाजसेवक आहे, संन्यासी नव्हे. तो गृहत्याग करून समाजातील पीडितांना मदत करण्याचे कार्य करतो. पारंपरिक संघ जिथे आंतरिक आध्यात्मिक साधनेवर भर देतो, तिथे आंबेडकर संघाला ‘सामाजिक सेवेसाठी समर्पित समुदाय’ म्हणून पाहतात. याच संघाच्या माध्यमातून धम्म आधुनिक समाजाशी जोडला जातो. आंबेडकरांची भिक्खूंबद्दलची भूमिका पारंपरिक बौद्ध धम्मातील तत्त्वांशी सुसंगत नव्हती, तर ती तर भारतात बौद्ध धर्म कसा रुजेल आणि वाढेल, या दृष्टिकोनातून साकारलेली होती.
कुठल्याही राजकीय क्रांतीपूर्वी सामाजिक आणि धार्मिक क्रांती घडणे आवश्यक असते, असे मत डॉ. आंबेडकर मांडतात. धर्मांतर हे केवळ वैयक्तिक श्रद्धेचे नव्हे, तर राजकीय-सांस्कृतिक परिवर्तनाचे वाहन आहे. आंबेडकरांचे धर्मांतर हे हिंदू धर्माच्या तात्त्विक चौकटीत घट्ट रुजलेल्या जातिव्यवस्थेला मोडीत काढून तिला कायमची नष्ट करण्यासाठी सामाजिक क्रांती आणि भौतिक परिवर्तन घडविण्याचा प्रकल्प आहे. सामाजिक बदलासाठीची ही बांधिलकीच आंबेडकरांच्या विचारांना आजपर्यंतच्या जातविरोधी संघर्षात प्रभावी बनवते.
डॉ. आंबेडकरांनी धर्माचे लोकशाहीकरण केले. म्हणजेच, त्यांनी धर्माला लोकशाहीच्या चौकटीत आणून बसवले. घटना समितीत समता, स्वातंत्र्य आणि बंधुतेचे तत्त्व अंमलात आणताना व नंतर कायदेमंत्री असताना हिंदू कोड बिलाची मांडणी हीसुद्धा धर्मचिकित्साच होती. हिंदूंमध्ये अनेक सुधारणावादी चळवळी सक्रिय होत्या, परंतु सामाजिक सुधारणा या मंदगतीने प्रवास करत होत्या, अजूनही ती गती मंदच आहे. हिंदू कोड बिल हा कायदेशीर हस्तक्षेप या सुधारणांना मूलगामी स्वरूप प्राप्त करून देण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
बुद्ध की मार्क्स?
धर्मांतरापूर्वी व धर्मांतर घडताना तत्कालीन राजकीय परिस्थितीचा आढावा घेणेसुद्धा गरजेचे आहे. तत्कालीन परिस्थितीत जगात समाजवादी आणि साम्यवादी विचारधारा मोठ्या प्रमाणात रुजली होती. धर्मांतराच्या प्रक्रियेत डॉ. आंबेडकर सभोवतालच्या राजकारणाचे विवेचन करतात. मुळात आंबेडकर हे निव्वळ धर्म शोधत नव्हते, तर ते एका सामाजिक तत्त्वज्ञानाच्या शोधात होते. या दृष्टीने त्यांनी बौद्ध धर्माचे समर्थन करताना मार्क्सवादी विचारांचे परखड विवेचन केले आहे.
बुद्ध आणि मार्क्स हे दोघेही शोषणाविरुद्ध लढले, त्यांनी सामाजिक समतेचा विचार मांडला. अर्थात, बुद्धाने हा विचार मार्क्सच्या बराच आधी मांडला. बौद्ध आणि मार्क्सवादी तत्त्वज्ञानात दुःखाची संकल्पना मांडली आहे. दोन्ही तत्त्वज्ञानांमध्ये शोषणाबद्दल ऊहापोह केला आहे. खासगी मालमत्तेवरची मालकी हे कुठेतरी समाजातील दुःखाचे आणि शोषणाचे कारण आहे यावर एकमत आहे. बुद्धाच्या तत्त्वज्ञानात संघाची संकल्पना दिसते. संसाधनांच्या समान वाटपावर आधारित सामूहिक जीवन अशी साम्यवादाच्या जवळ जाणारा विचार बुद्धाच्या संघात दिसतो.
दोन्ही तत्त्वज्ञानांमध्ये सामाजिक बदल हा मध्यवर्ती मुद्दा आहे. परंतु त्यांचे साध्य जरी सारखे असले, तरी साधने मात्र वेगळी आहेत. मार्क्सवादी विचार वर्गसंघर्षातून सामाजिक बदल साधू पाहतो. हा बदल घडवून आणण्यासाठी बळाच्या आणि हिंसेच्या वापराचे समर्थनदेखील करतो. बुद्धाचे तत्त्वज्ञान मात्र शांततेच्या मार्गाने हृदयपरिवर्तनाचा पुरस्कार करते. आंबेडकर बुद्धाच्या रतविहीन क्रांतीवर भर देतात. इथे त्यांची लोकशाहीवादी विचारांशी एकनिष्ठता दिसून येते. याच अंगाने पुढे कम्युनिस्ट क्रांतीच्या मूळ उद्धिष्टांपैकी एक म्हणजे सत्ताबदल आणि त्यानंतर स्थापन झालेली ‘सर्वहारा वर्गाची हुकूमशाही’ या तत्त्वाची मीमांसा करताना ते पुन्हा लोकशाहीवादी विचाराची कास धरत मार्क्सवादी विचारातील हुकूमशाहीचे धोके अधोरेखित करतात. म्हणजेच एका प्रकारे मार्क्सवादी तत्त्वज्ञानातील समताधिष्ठित राजकारणात स्वातंत्र्य आणि बंधुतेचा अपाय होऊ शकतो, हा धोका सांगत ही तिन्ही तत्त्वे तितकीच महत्त्वाची आहेत हे नमूद करतात.
आत्मभानाचा प्रवास
डॉ. आंबेडकरांचा धर्म व्यतीला निष्क्रिय न ठेवता सक्रिय व कृतिशील बनवण्याचा प्रयत्न करतो. धर्मांतराने एका उपेक्षित समाजाला नवे आयुष्य प्राप्त होईल. धर्मांतराच्या अनुषंगाने पारंपरिक बौद्ध मान्यतेतील कर्म सिद्धांतावर आधारित पुनर्जन्माच्या व्याख्येला समांतर अशी सामाजिक परिवर्तनाची व्याख्या त्यांनी योजली. या प्रक्रियेचे काही भौतिक संदर्भ देता येतील. जसे, धर्मांतरित व्यक्तीच्या अथवा समूहाच्या विचार व आचरणात बदल होतो. बौद्ध धर्मांतरानंतर स्तूप आणि विहारांच्या रूपाने धर्म उपासनेची नवी ठिकाणे उदयास आली. याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिन, बुद्ध जयंती असे नवे सण आले, प्रचलित भाषांमध्ये धर्मसंहिता व प्रार्थनाविधीची साधने निर्माण झाली, देवी-देवता बदलले व वैयतिक आणि सार्वजनिक अवकाशात बौद्ध प्रतीके ठळकपणे दिसू लागली.
अशा प्रकारे हिंदू संस्कृतीतील दुय्यम स्थान झुगारत भारतीय सभ्यतेतील ऐतिहासिक बौद्ध पर्वाशी नाते सांगत सांस्कृतिक अधिमान्यता मिळवण्याचा प्रयत्न केला गेला. स्वतःचा शोध घेऊन आपली स्वतंत्र ओळख आणि अस्तित्व निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. धर्मांतर म्हणजे त्याचा शेवटचा टप्पा होता. धर्मांतराच्या प्रक्रियेत दलितांना आपण कोण आहोत? कुठून आलोत? आपले पूर्वज कोण होते? या प्रश्नांची उत्तरे मिळाली. धर्मांतरामुळे केवळ धार्मिक अवकाशात बदल घडला नाही तर त्याला वैयक्तिक, सामाजिक, राजकीय पैलूही आहेत. वैयक्तिक परिप्रेक्ष्यात आत्मसन्मान आणि आत्मभान, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात नागरिकत्वातून आलेली प्रतिष्ठा व हकांवर दावा सांगणे, आणि ज्ञानशास्त्रीय दृष्टीने ज्ञानाचे स्रोत आणि साधनेसुद्धा बदलली.
आंबेडकरांच्या धर्म परिवर्तनाला व्यवहार्य बाजूदेखील होतीच. देश स्वतंत्र होऊन दशकभरही उलटले नव्हते, समाजात अजूनही जातीयता होती. अशात धर्मांध व जातीय शतींचा विचार करता भारतात उगम पावलेला असा बौद्ध धम्माची निवड करणे अधिक श्रेयस्कर होते. आशियातील पूर्व, दक्षिण पूर्व भागातील अनेक देशांमध्ये बौद्ध धर्माचे वर्चस्व होते. इतर पाश्चिमात्य देशांमध्ये सुद्धा बौद्ध धर्माचे पुरस्कर्ते व प्रचारक होते. त्यामुळे बौद्ध धर्म हा आंतरराष्ट्रीय पातळीवरील धर्म होता. भारतातील बौद्धांना जागतिक स्तरावरील समूहाशी जोडून घेण्याच्या शक्यता निर्माण होतील, असाही यामागचा हेतू होता.
आंबेडकरांचे बौद्ध धर्मांतर हा केवळ वैयतिक-आध्यात्मिक निर्णय नव्हता. या निर्णयाने ते प्राचीन भारतीय तत्त्वज्ञानावर दावा सांगत होते. स्वधर्मानेच नाकारलेल्या वंचित समाजाला या कृतीमुळे बळ मिळाले. बौद्ध धर्म हा इतर धर्मांपेक्षा वेगळा होता, कारण तो जातिव्यवस्थेविरुद्धच्या संघर्षातून उदयास आला. ‘नवयान’ हा केवळ दलितांसाठीचा धर्म नसून समानता आणि न्यायप्राप्तीसाठीचे साधन होय. डॉ. आंबेडकरांचे नवयान वर्गविहीन, उदारमतवादी, मुत, विवेकी आणि नैतिक नागरिकांच्या समाजाच्या निर्मितीच्या प्रक्रियेत मोठा वाटा उचलतो.
२०११ च्या जनगणनेतील आकडेवारीनुसार, आंबेडकरवादी बौद्ध धर्म स्वीकारलेल्या समूहाची संख्या सुमारे ६५ लाख इतकी आहे. महाराष्ट्र राज्याच्या एकूण लोकसंख्येत हे प्रमाण ५.८१ टके इतके आहे. या समाजात अजूनही मागास घटक आहेत. जातीमुळे वाट्याला आलेली पारंपरिक कामांमधून अजूनही सुटका न झालेले अनेक लोक आहेत. असे असले तरीही साक्षरता, लिंग गुणोत्तर आणि कामगार दलांमधील सहभागाच्या बाबतीत हिंदू दलितांपेक्षा त्यांच्यात अधिक प्रगती दिसून येते. इतकेच नव्हे, तर ते इतर दलित समूहांपेक्षा अधिक शिक्षणाभिमुख आहेत, नियतीवादापासून मुत आहेत आणि धर्माच्या नावाखाली होणार्या आर्थिक शोषणापासूनही दूर आहेत. ही समज आणि सजगता केवळ घटनात्मक तरतुदी, राज्यसंस्थेच्या कल्याणकारी धोरणांमधून येणे शक्य नाही.
अर्थात, धर्मांतर हा सर्व समस्यांसाठीचा उपाय ठरत नाही. आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठा अजूनही जात-अस्तित्वात रुतून बसलेली आहे. जातीयवादाच्या, जातीय हिंसाचाराच्या अनेक घटना नित्याने घडत असतात. धर्मांतरामुळे स्वतंत्र ओळख मिळालेल्या पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजात जसे आत्मभान आले, तशाच जातजाणिवाही अधिक घट्ट होत गेल्या. दलितांतील वेगवेगळ्या जातीसमूहांमधले अंतर वाढत गेले. यात हिंदुत्ववादी राजकारणाने अधिक भर टाकली. त्यामुळे डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या ‘नवयाना’चा, आत्मभानाचा प्रवास आणखी डोळसपणे करण्याची नितांत आवश्यकता आहे. असे असले, तरीही व्यतिगत आणि सामूहिक पातळीवर धम्मदीक्षेने दिलेली वेगळी ओळख, आत्मभान व आत्मसन्मान हेही तितकेच महत्त्वाचे आहे. धर्माची एकसाची व्याख्या मुख्य प्रवाही होण्याच्या काळात, विशेषतः तरुणांमध्ये हे भान येण्याची गरज आहे.

- डॉ. अजिंक्य गायकवाड, पुणे (राज्यशास्त्राचे प्राध्यापक, एस.आय.ई.एस. महाविद्यालय, मुंबई.) संपर्क : ९८३३२ ८६२६२
