मुक्ता दाभोलकर -
प्रा. प. रा. आर्डे यांच्या ‘लढे विवेकवादाचे’ या पुस्तकाचे उपशीर्षक ‘विवेकवादाचा इतिहास, तत्त्वज्ञान, संघर्ष आणि चरित्र यांची रोमांचक सफर’ असे आहे. पुस्तक वाचताना या उपशीर्षकाची प्रस्तुतता मनोमन पटते. प्रा. आर्डे हे पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक होते. अंधश्रद्धा निर्मूलन व विवेकवादाचा प्रसार हे स्वतःचे जीवनध्येय म्हणून त्यांनी स्वीकारले होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या तत्त्वज्ञानाचा विकास व त्यासाठीचा सामाजिक संघर्ष यासंबंधी गेली अनेक वर्षे त्यांनी वाचन, मनन–चिंतन व प्रत्यक्ष काम केलेले होते. त्यामुळे समकालीन महाराष्ट्रात जगणार्या आणि विवेकवाद जाणून घेण्याची इच्छा असलेल्या वाचकाला या पुस्तकातून विवेकवादाच्या इतिहासाची माहिती मिळतेच; त्याचबरोबर स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे काळाच्या व माहितीच्या व्यापक चौकटीत शोधायला देखील मदत होते.
प्रा. प. रा. आर्डे यांच्या ‘लढे विवेकवादाचे’ या पुस्तकाचे उपशीर्षक ‘विवेकवादाचा इतिहास, तत्त्वज्ञान, संघर्ष आणि चरित्र यांची रोमांचक सफर’ असे आहे. पुस्तक वाचताना या उपशीर्षकाची प्रस्तुतता मनोमन पटते. प्रा. आर्डे हे पदार्थविज्ञानाचे प्राध्यापक होते. अंधश्रद्धा निर्मूलन व विवेकवादाचा प्रसार हे स्वतःचे जीवनध्येय समजून त्यांनी स्वीकारले होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या तत्त्वज्ञानाचा विकास व त्यासाठीचा सामाजिक संघर्ष यासंबंधी गेली अनेक वर्षे त्यांनी वाचन, मनन-चिंतन व प्रत्यक्ष काम केलेले होते. त्यामुळे समकालीन महाराष्ट्रात जगणार्या आणि विवेकवाद जाणून घेण्याची इच्छा असलेल्या वाचकाला या पुस्तकातून विवेकवादाच्या इतिहासाची माहिती मिळतेच; त्याचबरोबर स्वतःला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे काळाच्या व माहितीच्या व्यापक चौकटीत शोधायला देखील मदत होते. उदा. आर्डे सर लिहितात की, ‘युरोपातील ज्ञानोदयाच्या काळात तीन महत्त्वाच्या वैचारिक चळवळी आकाराला आल्या – बुद्धिप्रामाण्याला प्रतिष्ठा, विज्ञानातील क्रांतिकारक शोध व स्वर्गातील देवांपेक्षा पृथ्वीवरील मानवाला मिळालेली प्रतिष्ठा म्हणजे मानवतावाद.’ अंधश्रद्धेची व्याख्या करताना हा तिसरा मुद्दा दिशादर्शक आहे, असे मला हे वाचून वाटले.
लेखकाच्या शब्दांत सांगायचे तर या ग्रंथाची तीन वैशिष्ट्ये आहेत – पहिले, राजसत्तेने व धर्मसत्तेने जगात केलेल्या अनाचारांची माहिती दुसरे, युरोपातील ज्ञानोदय (Enlightenment) व त्यातून विज्ञानवाद व मानवतावाद यांचा झालेला विकास आणि तिसरे असे की, विवेकवादाच्या विकासासाठी विविध विचारवंतांनी केलेल्या कार्याची माहिती. तर्काच्या सहाय्याने कार्यकारणभाव शोधण्याची संस्कृती घडवणार्या ग्रीक तत्त्वज्ञांच्या काळापासून; म्हणजे इ. स. पूर्व २५०० पासून एकविसाव्या शतकापर्यंत विवेकवादाच्या तत्त्वज्ञानासाठी कृतिशील असलेल्या ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रातील लढवय्यांचा परिचय देत लेखकाने हा विषय उलगडला आहे. ‘विवेकवादाचा उषःकाल’ या पहिल्या प्रकरणात सॉक्रेटिस, प्लेटो, पाश्चात्त्य समाजात ज्याच्या तत्त्वज्ञानाचा दबदबा होता, असा अॅरिस्टॉटल, फारशी माहीत नसलेली महिला गणितज्ज्ञ हायपेशिया यांचे आयुष्य, विचार महत्त्वाचे काम उलगडते. इ. स. पूर्व ६०० ते इ. स.४०० अशी जवळपास एक हजार वर्षे विवेकाकडे वाटचाल करणारा समाज पुढील एक हजार वर्षे; म्हणजे रोमन सम्राटांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यानंतर धर्मसत्ता आणि राजसत्ता यांच्या युतीतून अंधारयुगात कसा गेला, याची कहाणी लेखकाने पुढील भागात सांगितली आहे. ख्रिश्चन, ज्यू, मुस्लिम यांच्यातील युद्धे (क्रूसेड्स), कॅथलिक आणि प्रोटेस्टंट यांच्यातील युद्ध, हजारो स्त्रियांना चेटकिणी म्हणून जाळण्याचा इतिहास वाचताना आजचे संदर्भ डोळ्यांसमोर येत राहतात. धर्माचे अतिरेकी वेड डोयात घेतलेला आणि हितसंबंधितांंच्या दावणीला बांधलेला समाज तब्बल हजार वर्षं मृत्यूच्या थैमानात सापडतो, ही जाणीव अंगावर काटा उभा करते. त्यानंतरच्या प्रकरणात युरोपातील पुनर्जागरणाची माहिती येते. कोपर्निकस, केप्लर, ब्रुनो, गॅलिलिओ, मार्टिन ल्युथर यांच्या नेमया कथा आपल्याला येथे वाचता येतात. विज्ञानाच्या क्षेत्रातील प्रगतीबरोबरच लेखक ज्ञानोदय किंवा पुनर्जागरणाबद्दल देखील बोलतो. तर्क बांधून तो अनुभवाच्या आधारे सिद्ध करण्याची पद्धत म्हणजेच बुद्धिप्रामाण्यवाद. हा विचार विज्ञानासोबतच राजकीय, सामाजिक क्षेत्रात कसा रूजला, याची माहिती लेखक देतो. देकार्त, स्पिनोझा, लेबनिझ, लॉक, व्हॉल्टेेअर यांच्या चिंतनातून विवेकवादाचे तत्त्वज्ञान कसे घडले, फ्रेंच राज्यक्रांती; तसेच इंग्लंडमध्ये लोकशाहीच्या स्थापनेवर त्याचा कसा प्रभाव पडला, ते या प्रकरणातून उलगडते.
पुढील प्रकरणांत लेखक विविध देशांतील समकालीन विवेकवादी विचारवंत, लेखक यांच्याबद्दल बोलतो. पॉल कुर्त्झ, जेम्स रँडी, अॅसिमॉव्ह, कार्ल सेगन, बर्ट्रांड रसेल, रिचर्ड डॉकिन्स यांच्यापासून अब्राहम कोवूर, पेरियार, पंडित नेहरू, हमीद दलवाई, आ. ह. साळुंखे, नरेंद्र दाभोलकर, तस्लिमा नसरीन यांचे व्यक्तिमत्त्व, विचार व कार्याची ओळख करून देतो. ‘तुम्हाला आम्ही तपासू इच्छितो,’ असे म्हणत अंधश्रद्धांना थेट भिडणार्या विवेकवादाच्या शिलेदारांच्या या कथा प्रेरक; तशाच रंजक देखील आहेत. विवेचनाच्या ओघात आपल्याला समजते की, तथाकथित गूढ घटनांचा भांडाफोड करण्यासाठी अमेरिकेतील विवेकवादी संस्था ‘सीएफआय’ जादूगारांचे सहकार्य घेते. कारण तपासणी करणारे मोठमोठे ज्ञानी शास्त्रज्ञ देखील हातचलाखीला बळी पडतात किंवा इराकवरील हल्ल्याचे समर्थन करताना अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी म्हटले होते, ‘हा हल्ला करण्याची मला प्रत्यक्ष देवानेच आज्ञा दिली आहे’ किंवा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष रेगन यांची पत्नी व्हाईट हाऊससंबंधीचे निर्णय घेताना ज्योतिषाचा सल्ला घ्यायला सांगत असे किंवा ‘चर्चवर वीज कोसळू शकत नाही,’ या गैरसमजुतीतून चर्चवर विद्युत निवारक न बसवता त्यात शंभर टन गंधकाचा साठा करणारे युरोपातील एक गाव १७६७ मध्ये चर्चवर कोसळलेल्या विजेमुळे गंंधकाचा स्फोट होऊन बेचिराख झाले आणि त्यानंतर लोकांनी विद्युत निवारक कामाचे आहेत, हे मान्य करायला हळूहळू सुरुवात केली. पौर्णिमेला समुद्राला जशी भरती येते, तसाच मानवी मनावर देखील चंद्राच्या कलांचा परिणाम होतो, असे आज देखील भारतातील अनेक लोक मानतात किंवा पाणाडे जमिनीखालील पाणी शोधू शकेल, असेही मानतात. वास्तविक, चंद्राच्या कला व मानवी वर्तन यांचा काहीही संबंध नसतो किंवा पाणी शोधण्याची अतींद्रिय शक्ती अस्तित्वात नसते, हे कोणत्या प्रयोगवीराने कसे सिद्ध केले, याची माहिती येथे विषयाच्या विवेचनाच्या ओघात आपल्याला वाचायला मिळते. भारत, ‘धर्मकलहाकडून विवेकवादाकडे’ या भागात वैदिक संस्कृतीतील विचारस्वातंत्र्य नाकारणार्या पुरोहितशाहीचा उदय, चार्वाकांचा उदय, जैन व बौद्ध धर्माचा उदय का झाला? याचा लेखक थोडयात ऊहापोह करतो. महाराष्ट्रातील धर्मचिकित्सेच्या चळवळी समवेतच, ज्यांच्याबद्दल मराठीमध्ये फारसे लिहिले जात नाही, असे तामिळनाडूचे पेरियार, श्रीलंकेचे अब्राहम कोवूर, बी. प्रेमानंद, आंध्र प्रदेशातील गोपराजू रामचंद्रराव ऊर्फ गोरा, भगतसिंग; तसेच पंजाबमधील तर्कशील सोसायटी, कर्नाटकातील नरसिंहय्या, तस्लिमा नसरीन यांच्या विवेकवादी विचार-आचार- लढ्याची माहिती या पुस्तकात आहे. कोवूरांचा पुस्तकात नमूद केलेला एक किस्सा पुढीलप्रमाणे आहे – सत्यसाईबाबांना चमत्कार सिद्ध करण्याचे वारंवार आव्हान देणारे कोवूर जाफना विद्यापीठात वनस्पतीशास्त्रासमवेत धर्मशास्त्रदेखील शिकवत. त्यांच्या सर्व विद्यार्थ्यांनी धर्मशास्त्रात उच्च श्रेणीचे गुण मिळवले, तरी त्यांच्याकडून तो विषय काढून घेण्यात आला. याचे स्पष्टीकरण मागायला गेलेल्या कोवूरांना त्यांच्या वरिष्ठांनी संगितले की, ‘तुमच्या विद्यार्थ्यांना उच्च श्रेणी मिळाली; परंतु ते धर्माची चिकित्सा करू लागले. त्यामुळे हा विषय तुमच्याकडे ठेवणे शय नाही.’ शेवटी ‘विवेकवादाचे समर्थन कशासाठी’, हा प्रश्न लेखक विचारतो आणि सांगतो की, विवेकवादामुळे मानवी समाज हळूहळू का होईना विकासाकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे धर्मांधता व जमातवाद यांच्या धोयाच्या पार्श्वभूमीवर विवेकाचा आवाज तेवत ठेवला पाहिजे. सौरव गर्गे यांच्या अर्थवाही मुखपृष्ठासह मधुश्री प्रकाशनने पुस्तकाची देखणी छपाई केली आहे. विवेकवादाची ऐतिहासिक वाटचाल समजून घेण्यासाठी अनेक संदर्भांनी युक्त असा हा संग्राह्य ग्रंथ आहे.
प्रा, आर्ड सरांचा संक्षिप्त परिचय
प्रा.परशराम राऊ आर्ड (एम. एस्सी. – भौतिकशास्त्र)
जन्म : १ जून १९४१, चोपडी, ता. पाटण, जि, सातारा
१९६८ ते २००१ पर्यंत रयत शिक्षण संस्थेत भौतिक विज्ञानाचे प्राध्यापक म्हणून सेवारत.
१९८५ पासून अंधश्रद्धा निर्मूलन कार्याच्या प्रबोधन व कृती कार्यक्रमात योगदान.
बुवाबाजी संघर्ष वैज्ञानिक जाणिवा शिबिरे, शाळा महाविद्यालयातून अंधश्रद्धा निर्मूलन विषयावर व्याख्याने, लेखन याद्वारे अंधश्रद्धांच्या विरोधात सातत्याने संघर्ष, वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर “हसत-खेळत विज्ञान* या द्विपात्री नाट्यप्रयोगाचे लेखन व दिग्दर्शन, या प्रयोगाचे महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये हजारभर प्रयोग. बालचित्रवाणीवर या नाट्यप्रयोगाचे अनेक वेळा प्रसारण.
१९९५ पासून महाराष्ट्र अंनिसचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रात सहसंपादक.
२००२ पासून ते २०१९ पर्यंत प्रमुख संपादक पदाचा कार्यभार सांभाळला. हल्ली वार्तापत्राच्या सल्लागार पदावर
कार्यरत.
विविध वृत्तपत्रांत व वार्तापत्रात अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक जाणिवा या विषयावर विपुल लेखन.
खालील ग्रंथाचे लेखन
१) अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम- डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा, प. रा. आर्ड
२) विज्ञान व अंधश्रद्धा. हा ग्रंथ महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ अनुदान पुरस्कृत
२) आत्मा-पुनर्जन्म-प्लँचेट
३) वेध विश्वाचा – मानवी शौर्याचा
पुरस्कार
१) डॉ.अरूण लिमये पुरस्कार
२) अंधश्रद्धा : प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम या ग्रंथास महाराष्ट्र शासनाचा उत्तम साहित्य पुरस्कार,
३) पी.डी.पाटील, कराड गौरव पुरस्कार.
४) मराठा समाज, सांगली यांचा अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता पुरस्कार.
५) महाराष्ट्र अनिसचा जीवनगौरव पुरस्कार,