तानाजी खिलारे : व्यक्ती व विचार

प्रभाकर नानावटी - 9403334895

अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी सहसंपादक टी.बी.खिलारे यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन म्हणून प्रभाकर नानावटी आणि डॉ.प्रदीप पाटील यांनी लिहिलेले अभिवादन लेख वाचकांच्यासाठी देत आहोत. या दोन्ही लेखातून खिलारे यांच्या कार्याचा आणि जीवनाचा वाचकांना परिचय होईल.

खिलारे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र अंनिस आणि वार्तापत्र संपादक मंडळ सहभागी आहेत.

खरे पाहता आज अशा प्रकारे या शीर्षकाविषयी लेख लिहावा, याचेच फार मोठे दुःख होत आहे. कारण वयाच्या 61 व्या वर्षी आपल्यातून कायमचे निघून गेलेले तानाजी खिलारे या व्यक्तिविषयी, त्यांनी उराशी बाळगलेल्या स्वप्नांविषयी, त्यांच्या जोखून जाणार्‍या वृत्तीविषयी, त्यांच्या विचारप्रक्रियेविषयी सांगण्यासारखे भरपूर आहे. त्यातही शेवटच्या काही वर्षांचा अपवाद वगळता अनेक वर्षेमी त्यांच्या सहवासात असल्यामुळे केवळ अभिवादन करून वा आदरांजली वाहून खिलारे यांना तरी विसरू शकत नाही.

1993-94 साली माझी केव्हातरी त्यांच्याशी भेट झाली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे ते सुरुवातीचे दिवस होते. ते व मी एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्यामुळे थोडीशी तोंडओळख होती. इतर सहकार्‍यांप्रमाणे हेही असावेत, म्हणून मी आपणहून कधीच त्यांची विचारपूस केली नाही व त्यांनीही पुढाकार घेऊन कधी आपल्याविषयी माहिती सांगितली नाही. माझ्या दृष्टीने ही तरुण मंडळी ‘यंग सायंटिस्ट’च्या कॅटेगरीतील होती. त्यांची जडण-घडण, सवयी-छंद माझ्यासारख्यांच्या पेक्षा वेगळे असणार, याची मला खात्री होती. परंतु या माझ्या गृहितकाला खिलारे यांनी धक्का दिला.

‘अंनिस’च्या कार्यक्रमाविषयी पुण्यातील कुठल्या तरी वृत्तपत्रात फोटोसकट बातमी आली होती. माझ्या नजरेत फोटोतील खिलारे यांच्याकडे लक्ष गेले व मी त्यासंबंधी थोडीशी विचारपूस केली. तेव्हा त्यांनी ‘अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्रा’चे काही जुने अंक वाचण्यासाठी दिले. कदाचित त्यात त्यांचाही लेख असावा. लेख मुद्देसूद होता. नेमके काय सांगायचे हे स्पष्ट शब्दांत होते. अलंकारिक, साहित्यिक भाषा नव्हती. त्यामुळे मला सरकारी ऑफिसमध्ये काम करणार्‍या या तरुण सहकार्‍याविषयी उत्सुकता वाटली. थोडीशी जुजबी माहिती विचारल्यावर त्यांनी डॉ. दाभोलकर करत असलेले कार्य, वार्तापत्राची वाटचाल व पुणे शाखेतील कार्यक्रमाविषयी सांगितले व त्यांनी साप्ताहिक बैठकीला येण्याचे आमंत्रण दिले. त्यावेळच्या आमच्या संवादात आपण काहीतरी वेगळे काम करत आहोत, याचा खिलारेंमध्ये लवलेशही नव्हता, सर्व काही सहज व अकृत्रिम असे ते होते.

त्यानंतर मी दर शनिवारी पुण्यातील आपटे प्रशालेतील साप्ताहिक बैठकांना जाऊ लागलो. डॉ. बोरकर, मिलिंद जोशी आदींशी ओळख झाली. साप्ताहिक बैठकीला शुभांगी व चंदू चव्हाण, प्रकाश घाटपांडे, अनिल तिकोनकर, पराग मुळे, मिलिंद देशमुख, अनंत लिमये, विवेक सांबारे, रासकर, दीपक गिरमे, वैशाली व भालचंद्र जोशी आदींच्या सहभागामुळे चर्चा रंगत होती व मला त्या बैठकीतील वाद-प्रतिवाद-संवाद यांची सवय जडली. चर्चेसाठी विषय भरपूर होते. प्रत्यक्ष कार्यक्रमांचे नियोजन, अंमलबजावणी आदींबद्दलची मतं मांडली जात होती. या सर्व चर्चेत, नियोजनात खिलारे यांचा सहभाग मोठा होता. अधून-मधून एखाद्या बाहेरच्या समविचारी कार्यकर्ता/वक्त्याला बोलवून त्याच्या मांडणीवर चर्चा केली जात होती. त्याची पूर्ण तयारी खिलारे करत होते. त्यामुळे साप्ताहिक बैठकांची सर्वजण उत्कंठेने इतर वाट पाहत असत. अत्यंत उत्साहाने मांडणी ते करत होते. नवीन कार्यकर्त्याला ‘आपलेसे’ करून घेण्यात ते तरबेज होते. या साप्ताहिक बैठका अखंडपणे वर्षानुवर्षेचालल्या. त्यामुळे ‘अंनिस’ची वाढ होऊ लागली. मिलिंद जोशी यांनी उल्लेख केल्याप्रमाणे दर शनिवारी आपटे प्रशालेमध्ये होणार्‍या मीटिंगचा त्यानंतर टी. बी. अविभाज्य भाग बनले. आधीच हुशार आणि अभ्यासू होतेच; त्यामुळे बर्‍याच पेपर आणि मासिकांमधली अंधश्रद्धाविषयक बातम्यांची कात्रणे वाचून त्यावर ते अनेक वर्षेनिष्ठेने चर्चा चालवत होते. मराठी दिवाळी अंकांचा आढावा घेत कुठल्या अंकातील लेख कार्यकर्त्यांना वाचण्यायोग्य आहेत, याचे मार्गदर्शन ते करत असत. त्यांची मतं नेहमी स्ट्राँग आणि आग्रही असायची. एखादा बुद्धिजीवी एकदा जरी चुकीचं वागला, बोलला तरी त्यावर ताबडतोब मोठी फुली पडायची. या ‘ब्लॅक अँड व्हाईट’मध्ये पाहण्याच्या सवयींवर आम्ही कायम संघर्ष करत असू. लवकरच ते अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पुणे शाखेचे कार्याध्यक्ष झाले. इतक्या वर्षांमध्ये त्यांनी कधीही पुढे येऊन प्रसिद्धी मिळवली, असं घडलं नाही. तडफेने ते मागे काम करत राहिले. साप्ताहिक बैठकांचे स्वरूप कसे असावे, या विषयीसुद्धा तेथे चर्चा होत असे. ती कल्पना डॉ. दाभोलकरांनी उचलून धरली व सुरुवातीला आम्ही त्याचा कच्चा आराखडा लिहिला. यातील बहुतेक कल्पना नंतरच्या काळात कार्यान्वित झाल्या व त्याचे श्रेय तानाजी खिलारेंना द्यायला हवे.

त्यांनी दिलेले वार्तापत्राचे अंक वाचत असताना त्यात भरपूर काही करण्यासारखे आहे, याची मला जाणीव झाली. त्याविषयी मी खिलारे यांच्याशी चर्चा केली. व्याकरणातील व लेखाच्या आशयातील काही ढोबळ चुका असल्यास लेखकाला पुन:पुन्हा सांगून दुरुस्त करून घेण्यापेक्षा आपणच दुरुस्त करणे योग्य, असे आम्हा दोघांना वाटले. त्याला संपादक डॉ. प्रदीप पाटील व इतर सहसंपादकांची मान्यता मिळाली व आम्ही जोमाने काम करू लागलो. वार्तापत्राच्या मीटिंग्स सांगलीत होत असल्यामुळे मला ते अत्यंत उत्साहाने त्यांच्या बाईकवरून स्टेशनपर्यंत घेऊन जात होते, तिकिटाची सोय करत होते व मला परत रात्री-अपरात्री घरी आणून सोडत होते. ही ने-आण कित्येक वर्षे चालली.

वार्तापत्राची दर महिन्याला होणारी बैठक ही माझ्या दृष्टीने वैचारिक मेजवानीच होती. हिरिरीने चर्चा घडत होती, टोकाची मतं मांडली जात होती; परंतु यात कुणालाही दुखवण्याचा किंवा अनुद्गार काढण्याचा उद्देश नसे. विवेकवाद वा अंधश्रद्धेच्या संबंधातील कुठलाही विषय असला तरी खिलारे पुढाकार घेऊन लिहित होते. त्यामुळे संपादकाला पुढील अंकात काय छापावे, हा प्रश्न कधीच पडला नसेल.

या कालखंडात खिलारे यांनी अनेक विषयांवर लेख लिहिले. इतर इंग्रजी/मराठी नियतकालिकांमधील नोंद घेण्यासारखे लेख वाचून त्याबद्दलची माहिती देणारे एक सदर ते लिहू लागले. दिवाळी अंकात वाचण्यायोग्य काय आहे, याविषयी ते लेख लिहित होते. आधुनिक भ्रम, जिज्ञासा, भ्रमवार्ता या सदरांमधून महाराष्ट्रातील विविध प्रकारच्या अंधश्रद्धांबद्दल सामान्यांच्या मनात आलेल्या प्रश्नांबद्दल ते लिहू लागले. समाजसुधारकांचा धर्मविचार व परिवर्तनाची चळवळ या विषयावरील राम बापट यांच्या लेखाचे शब्दांकन त्यांनी केले. वसंत पोतदार यांचे गाडगेबाबांवरील एकपात्री प्रयोगावर लेख त्यांनी लिहिले. परिणामशून्य होमिओपथी, अंनिस कार्यकर्त्यांनी उत्सवात भाग घ्यावा, उपवासातील फोलपणा, दीपक चोप्राचे आधुनिक भ्रम, दूध लबाडी, अ‍ॅल्युमिनियमची भांडी स्वयंपाकास योग्य आहेत का?, शाकाहार की मांसाहार?, जातिव्यवस्थेचे बदलते स्वरूप, विवेकवादाचा इतिहास व महत्त्व आदी लेख लिहून ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या ज्ञानात भर घातली. त्यांना नवी प्रेरणा दिली. राज्यव्यापी मेळाव्यांचे व शिबिरांचे वार्तांकन त्यांनी केले. ‘अथिस्ट सेंटर’सारख्या इतर राज्यातील संघ-संस्थांचा परिचय करून दिला. असे एक-ना-दोन, अनेक विषयांवर मुद्देसूदपणे व त्यातून वाचकांच्या ज्ञानात भर पडण्यासारखी माहिती ते देत होते.

त्यांचे लेखनकार्य केवळ वार्तापत्रापुरते मर्यादित न राहता इतर मराठी नियतकालिकांसाठीसुद्धा ते लिहू लागले. ‘आजचा सुधारक’मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या कित्येक लेखनात विवेकवादाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकलेला जाणवत होता. त्यात एक प्रकारचा निर्भीडपणा होता व कुणाच्या तरी दबावाखाली उगीच काही तरी लिहिलेले आहे, असे ते अजिबात वाटत नव्हते. ‘रॅशनॅलिजम’वर छुपी वा उघड टीका त्यांना कधीच सहन होत नसे व त्याविरुद्घ लढण्यासाठी त्यांची लेखणी सदैव तयार असे. ‘रुची’ या ‘ग्रंथाली’तर्फे प्रसिद्ध होणार्‍या मासिकात प्रकाशित झालेल्या ‘अंधश्रद्धा निर्मूलन ः काही मर्यादा व काही प्रश्न’ या लेखाचा समाचार घेत असताना त्या लेखातील अनेक मुद्द्यांतील फोलपणा त्यांनी उघड केला होता.

तानाजी खिलारे यांच्या वाचनात विविधता होती. त्यासाठी त्यांनी घेतलेल्या कष्टाची कल्पना त्यांच्याकडील वैयक्तिक पुस्तकसंग्रहातून जाणवते. विल्यम जेम्स, रिचर्ड डॉकिन्स, जेम्स रँडी, बर्ट्रांड रसेल, डी. डी. बंदिष्टे आदींच्या इंग्रजी ग्रंथांच्या व सेमिनार, स्केप्टिकल इन्क्वायरर, संडे, इंडिया टुडे आदी नियतकालिकांच्या वाचनाच्या सातत्यामुळे तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, बुद्धिप्रामाण्यवाद, रीजन, वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद, वंचिताबद्दल अनुकंपा आदींवरील त्यांची मतं धारदार झाली होती. डी.डी. बंदिष्टे यांना समितीतर्फे बोलावून एका शिबिराचे आयोजनही त्यांनी केले होते. महाराष्ट्रातील समाजसुधारकांवरील पुस्तकांच्या वाचनामुळे त्यांची बलस्थाने व मर्यादा याची त्यांना जाण होती. त्यामुळे कुठल्याही चर्चेत संदर्भासकट स्पष्टीकरण ते देत असल्यामुळे त्यांनी उपस्थित केलेले मुद्दे सहजासहजी खोडून काढता येत नसत. मे. पु. रेगे, डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, आर. ए. जागिरदार, राम बापट आदी मान्यवरांच्या बरोबरील चर्चेत नेमके मुद्दे मांडून त्यांना बोलते करण्यास ते भाग पाडत होते.

एकदा 19 व्या शतकातील ‘ग्रंथ हेच गुरू’ या विधानामुळे प्रसिद्ध असलेल्या ‘लोकहितवादींची शतपत्रे’ या पुस्तकातील पत्र नंबर 22 आमच्या दोघांच्या वाचनात आले. त्यात – “हिंदू लोकांचें काही लिहावयाचे असले तर मुख्यत्वेंकरून ब्राह्मण लोकांचें लिहावे. म्हणजे त्यात सर्व लोकांचें स्थितीचें वर्णन आले; कारण हिंदू लोकांत विद्येचे महत्त्वाचे मालक ब्राह्मण आहेत; व त्यांची मते लोकांमध्ये प्रबळ आहेत. यास्तव आम्ही बहुधा हिंदू लोकांचे वर्णन लिहावयाचे असले, म्हणजे ब्राह्मणाचेच लिहू व तेणेकरून सर्वांचे वर्णन आले, असे समजावे.” असा उल्लेख होता. 170 वर्षांपूर्वी लिहिलेले हे पत्र कदाचित त्याकाळासाठी योग्यही असेल, असे आमचे मत होते. परंतु याची पुन्हा एकदा तपासणी करावी म्हणून ‘आजचा सुधारक’चेच नमूना म्हणून घ्यायचे ठरवले. त्या अनुषंगाने आम्ही ‘आजचा सुधारक’मध्ये त्यावर्षी प्रकाशित झालेल्या लेखक, पत्रलेखक व आजीव सदस्यसूचींचा अभ्यास करून विदा गोळा केल्या. इतर कुठलेही निकष नसल्यामुळे आम्ही सूचीतील आडनावावरून ब्राह्मण व इतर असे वर्गीकरण केले व विश्लेषणाचे तक्ते भरून ‘आ. सु.’च्या संपादकांना पत्र लिहून कळविले. ते पत्र व त्यावरील संपादकांचा प्रतिसाद ‘ब्राह्मणेतर समाजवर्ग व आजचा सुधारक’ या नावाने लेखाच्या स्वरुपात प्रसिद्ध झाले. मुळात आडनावावरून जात ओळखण्यावरच नंतरच्या प्रतिसादकर्त्यांनी भर दिला होता, हेही आपण विसरू शकत नाही. एक मात्र खरे की, ‘आ. सु.’चे लेखक ब्राह्मण्याचे समर्थक नव्हते, हे मान्य केले तरी ब्राह्मणेतरांना ‘आ. सु.’विषयी आत्मीयता का वाटत नाही, हे अनुत्तरितच राहिले. खिलारे यांनी पुढाकार घेतल्यामुळेच असे काही तरी करण्यास आम्ही धजावलो, असे आवर्जून नमूद करावेसे वाटते.

जरी अशा प्रकारे जहरिली टीका केली असली, तरी ‘आ. सु.’ने आम्हाला एका विशेषांकाचे अतिथी संपादक म्हणून ‘जात-आरक्षण’ हा विषय दिला. खिलारे यांना हे एक आव्हान वाटल्यामुळे लेखांचा आराखडा त्यांनी तयार केला, कुठल्या लेखकाशी संपर्क साधावा, कुठल्या लेखावर त्यांना लिहिते करावे आदी तपशील ठरवून खिलारे झपाटल्यासारखे कामाला लागले. ‘यशदा’च्या लायब्ररीतून हवी असलेली पुस्तकं आणून वाचण्याचा व नोट्स काढण्याचा सपाटा लावला. मुळात आपल्या येथे जात-भेदभाव आहे कुठे? अशा ‘डिनायल मोड’मध्ये असलेल्या समाजाला जातीमधून आलेली विषमता समजून सांगणे फार कठीण होते. परंतु या विशेषांकाने नेमकी परिस्थिती काय आहे, हे पुराव्यानिशी विषद करून सांगितले.

दलित, शूद्र-अतिशूद्र, अस्पृश्य, हरिजन, आदिवासी, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, विमुक्त जाती, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.), विशेष मागास वर्ग (एस.बी.सी), पुढारलेल्या जाती (उच्च जाती), क्रिमीलेयर, गरिबी रेषा इत्यादी संज्ञांचे अर्थ समजावून सांगण्यापासून भेदभाव व आरक्षण, आरक्षण व गुणवत्ता, राखीव जागा ः आक्षेप आणि उत्तरे, ओबीसी आणि आरक्षण, आरक्षण आणि खाजगी क्षेत्र आदी अनेक विषयांचा समावेश असलेला विशेषांक प्रसिद्ध करण्यात खिलारे यांचा सिंहाचा वाटा होता. या विशेषांकासाठी ‘सेमिनार’ या इंग्रजी मासिकांचे अंक मिळत नव्हते. परंतु खिलारे यांनी भरपूर प्रयत्न करून ते अंक मिळविले व त्याचा सारांश करून या विशेषांकात प्रसिद्ध केले. एखादी गोष्ट हातात घेतली की, ती तडीस नेण्यासाठी कितीही कष्ट लागत असले, तरी ती करण्यास ते कधीही मागे पुढे पाहत नव्हते.

यानंतर आर. ए. जागिरदार यांच्या ‘रॅशनॅलिस्ट फौंडेशन’तर्फे ‘जात-आरक्षण’ या नावाने ते पुस्तकाच्या स्वरुपात प्रसिद्ध करण्यात आले. याच फौंडेशनच्या वतीने आर. ए. जागिरदार यांच्या इंग्रजीतील लेखांचे संकलन करून दोन भागात प्रसिद्ध करण्यात आले व त्याच्या वितरणासाठीसुद्धा खिलारे यांनी भरपूर श्रम घेतले. ठिकठिकाणच्या लायब्ररीत जाऊन ही पुस्तक त्यांनी वितरित केली.

नंतरच्या काळात त्यांच्या कार्यालयीन व कौटुंबिक जबाबदारीमुळे ‘अंनिस’च्या कामातील उत्साह कमी-कमी होत गेला. नंतरची काही वर्षेत्यांचा संपर्क तुटला. राहुल थोरात, प्रकाश घाटपांडे, मिलिंद जोशी आदींच्या संपर्कात ते होते. वार्तापत्राच्या सहसंपादक पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर फक्त डॉ. आंबेडकराचे इंग्रजी साहित्य अभ्यास करण्याचा त्यांचा विचार होता. कदाचित डॉ. आंबेडकर व विवेकवाद नावाचे एखादे पुस्तक या अभ्यासातून त्यांच्या हातून लिहून झाले असते. परंतु त्यांच्या अकाली निधनामुळे हे आता शक्य होणार नाही. मृत्यू अटळ आहे, हे मान्य करूनही खिलारे यांचे हे असे कायमचे पडद्याआड जाणे, यावर अजूनही माझा विश्वास बसत नाही.

त्यांना हृदयपूर्वक आदरांजली!