-
पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील घोलपवाडी येथील उत्तम लक्ष्मण भागवत या देवऋषीचा बाजार अखेर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उठवला असून, उत्तम भागवत याच्याविरोधात फलटण तालुक्यातील आसू येथील दादासाहेब ज्ञानदेव कामाने यांची सुमारे 12 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली.
उत्तम भागवत याने दादासाहेब कामाने यांच्या शेतातील ठिबक सिंचनाचे कोणीतरी नुकसान केले होते; तसेच त्यांच्या गायी दूध देत नाहीत, यावर विचारले असता त्याने अंगात दैवी शक्ती संचारल्याचा आव आणून, “मी सर्व प्रकारचा तोडगा काढतो, तुम्हाला करणी केलेली आहे,” असे सांगून दैवीशक्तीमार्फत सर्व नुकसान भरून देतो, असे त्याने सांगितले. त्याने सर्व साहित्यासाठी लागणारे पैसे सांगितले. त्याचप्रमाणे वेळोवेळी त्याने पैशाची मागणी केली व “पैसे न दिल्यास गोमूत्राने तुम्हाला बेशुद्ध करून टाकीन,” अशा प्रकारची धमकी दिली.
त्याचबरोबर भागवत याने ठिबक सिंचनाचे नुकसान केलेला माणूस धावजी पाटलांची समाधी, सातारा जिल्ह्यात आहे, तेथे जाऊन कौल लावून दोन दिवसांत शोध लावू, असे सांगितले. त्यासाठी दहा हजार रुपये रोख स्वरुपात घेतले. उत्तम भागवत हा वेळोवेळी पैसे घेत असल्याने आपल्या आर्थिक, मानसिक व शारीरिक फसवणूक झालेली आहे, असे कामाने यांच्या लक्षात आले.
त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव, मिलिंद देशमुख, भारत विठ्ठलदास, राम सर्वगौड, अरविंद आढाव यांची भेट घेतली व त्यांना सर्व माहिती दिली. त्यांना घेऊन कामाने यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तम भागवत याच्याविरोधात आर्थिक फसवणूक, जादूटोणा प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वालचंदनगर पोलीस करत आहेत.
