या योद्ध्यांना साथ द्या…

वाघेश साळुंखे -

एखादा बाबा हवेतून अंगारा काढतो आणि त्याचा व्हिडिओ हजारो लोक भक्तिभावाने शेअर करतात. त्याच वेळी दुसरा माणूस तोच ‘चमत्कार’ करून त्यामागची हातचलाखी उघड करतो. पण तो व्हिडिओ किती लोक शेअर करतात? चमत्कार करून त्याचे व्हिडिओ बनवणारे हजारो असतील; पण त्या चमत्कारांचा भांडाफोड करणारे लोक दोन अंकी संख्येत तरी नक्कीच आहेत. सोशल मीडिया केवळ एक साधन आहे. जसा अन्य कोणत्याही साधनाचा सदुपयोग आणि दुरुपयोगही करता येतो. तसेच सोशल मीडियाचे आहे. याचा सदुपयोगही करता येतो आणि दुरुपयोगही करता येतो. सध्या सोशल मीडियाचा वापर करून अंधश्रद्धा पसरवणारे लोक खूप आहेत. पण त्याचवेळी त्या अंधश्रद्धांविरोधात जनजागृती करणारे लोकही बरेच आहेत. पण लोकांच्या प्रतिसादाअभावी त्यांची पोहोच मर्यादित राहतेय. पण हा प्रवाह सोशल मीडियामध्ये आहे याची जाणीव करून देणे हेच या लेखाचे प्रयोजन आहे.

सुरुवातीला हिंदी व इंग्रजी मध्ये होत असलेल्या काही कामांची माहिती घेऊ.

प्रणव राधाकृष्णन : हे Science is dope आणि D.D. Rational अशी दोन यू ट्यूब चॅनेल्स चालवतात. Science is dope हे भारतातील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि छद्मविज्ञानाविरुद्ध काम करणार्‍या प्रमुख यू ट्यूब चॅनल पैकी एक आहे. ज्योतिष, होमिओपॅथी, तथाकथित प्राचीन विज्ञान, आरोग्यविषयक दावे आणि धार्मिक प्रथांमागे सांगितले जाणारे खोटे विज्ञान अशा विषयांवर त्यात चर्चा केली जाते. प्रणव राधाकृष्णन यांनी आपले उद्दिष्ट देशभर विज्ञान आणि विवेकवाद सुलभपणे पोहोचवणे असे सांगितले आहे. D.D. Rational हे यू ट्यूब चॅनल सुद्धा प्रणव राधाकृष्णन चालवतात. या चॅनेलची ओळख Rationality through science अशी आहे. विज्ञान, छद्मविज्ञान, AYUSH विषयक दावे आणि तर्कदोष यांवर व्हिडिओ प्रसिद्ध केले जातात. प्रणव राधाकृष्णन यांनी फॅक्ट चेकिंगसाठी Fact Lense नावाचे एक वेब अ‍ॅप बनवायला घेतले आहे. सध्या ते प्रयोगावस्थेत आहे.

विजयेंद्र मोहन्टी : हे Vimoh या नावाचे यू ट्यूब चॅनल चालवतात. हिंदी आणि इंग्रजीतून धर्म, भारतीय संस्कृती, सामाजिक समजुती आणि विवेकवाद यांवर भाष्य करतात. Law of Attraction, कर्मसिद्धांत आणि छद्मवैज्ञानिक दावे यांवर त्यांनी सखोल चर्चा केली आहे. त्यांनी राजकारणावरही भाष्य करणारे व्हिडिओ बनवले आहेत.

डॉ. सिरिएक अ‍ॅबी फिलिप्स :  यू ट्यूबवर The Liver Doc म्हणून परिचित असलेले डॉ. सिरिएक अ‍ॅबी फिलिप्स हे यकृतरोगतज्ज्ञ आहेत. ते आरोग्यविषयक चुकीची माहिती, चमत्कारी औषधे, अप्रमाणित पूरक उत्पादने आणि छद्मवैद्यकीय दाव्यांची संशोधनांच्या आधारे चिकित्सा करतात. त्यांचे काम पारंपरिक अर्थाने अंधश्रद्धा निर्मूलनाचे नसले, तरी आरोग्यविषयक अंधश्रद्धा आणि अवैज्ञानिक उपचारांविरोधातील सोशल मीडिया हस्तक्षेपाचे महत्त्वाचे उदाहरण आहे.

अंकित वर्मा : हा एक खूप चांगला कंटेंट क्रिएटर आहे. त्याला तुम्ही इंस्टाग्राम आणि यू ट्यूबवर Baioshala नावाने शोधू शकता. जीवशास्त्र, उत्क्रांती, आरोग्यविषयक मिथके, धार्मिक दावे यांवर हिंदीतून खूप चांगले व्हिडिओ बनवले आहेत.

अर्पित द्विवेदी : हे Arpit Explains या चॅनलवरून ईश्वर, आत्मा, पुनर्जन्म, जातिव्यवस्था आणि अशाच अनेक विषयांवर प्रबोधन करत आहेत. त्यांनी वेगवेळ्या बाबा-बुवांची केलेली चिकित्सा ऐकण्यासारखी आहे.

Breakthrough Science Society : ही विज्ञान, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि विवेकवादी विचारांचा प्रसार करणारी स्वयंसेवी संस्था आहे. विद्यार्थी, शिक्षक, संशोधक आणि सर्वसामान्यांसाठी व्याख्याने, विज्ञान कार्यक्रम आणि सोशल मीडिया सामग्री प्रसिद्ध केली जाते.

All India People’s Science Network-AIPSN :  AIPSN हे भारतातील विविध जनविज्ञान संघटनांचे व्यापक जाळे आहे. विज्ञान, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि चुकीच्या माहितीविरुद्ध त्याच्या सदस्य संस्था काम करतात. AIPSN च्या यु ट्यूब चॅनलवर बुवाबाजी, फलज्योतिष आणि इतर अंधश्रद्धांवर प्रबोधनात्मक साहित्य उपलब्ध आहे.

Science Journey / Rational world : ही दोन्ही यू ट्यूब चॅनेल्स एकाच टीमद्वारे चालवली जातात. यांवरील सामग्री सुद्धा खूप चांगली आहे. धर्म, अंधश्रद्धा, बुवाबाजी, विषमता, जात व्यवस्था इत्यादी विषयांवर अनेक व्हिडिओ त्यांनी बनवलेले आहेत.

Pale Blue Thoughts : हे इंग्रजी यू ट्यूब चॅनल आनंद नावाचे कंटेंट क्रिएटर चालवतात. या चॅनलवर अतिशय चांगली सामग्री असूनही त्याचे सबस्क्रायबर्स खूपच कमी आहेत. छद्मविज्ञान, होमिओपॅथी, मिड-ब्रेन अ‍ॅक्टिव्हेशन, कुंभमेळा अशा अनेक विषयांवर त्यांनी व्हिडिओ बनवले आहेत. आनंद Pale Blue Thoughts याच नावाने फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स वरही कंटेन्ट बनवत आहेत.

Logical Aayaam : अंधश्रद्धांविरोधात व्हिडिओ असून सुद्धा चांगले views असणारे चॅनेल म्हणजे, Logical Aayaam. डॉ. रवी नावाचे यू ट्यूबर ते चालवतात.

अशी अजूनही काही यू ट्यूब चॅनेल्स आहेत. यू ट्यूबवर जे नाव आहे त्याच नावाने इन्स्टाग्रामवरही ते सापडतात.

मराठीत अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोडून इतरही काही लोक सोशल मिडियामध्ये ही लढाई लढत आहेत. त्यातील काहींचा फक्त उल्लेख करतो. विचारवेध, अभिव्यक्ती, मॅक्स महाराष्ट्र, निखिल वागळे ओरिजिनल, ईंडी जर्नल, सामाजिक परिवर्तन, बीबीसी मराठी या चॅनेल्सवरून अधूनमधून अंधश्रद्धाविरोधी व्हिडिओ प्रसारित केले जातात. डॉ. शंतनू अभ्यंकर यांनी तयार केलेले व्हिडिओ त्यांच्या मृत्यूनंतरही पाहिले जात आहेत. प्रा. प. रा. आर्डे यांचे व्हिडिओ म्हणजे तर अंधश्रद्धा निर्मूलनाचा बेसिक अभ्यासक्रमच आहे. आणि या सर्वांबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे काम करत असलेले अनेक कार्यकर्ते सोशल मीडियातून सतत जनजागृती करत असतातच.

आपली जबाबदारी : वरील लोक म्हणजे, अंधश्रद्धा निर्मूलनाच्या लढाईतील सोशल मीडियावरील योद्धे आहेत. ट्रोलिंग, शिव्या, धमक्या, कोर्ट केसेस अशा अनेक प्रकारचा त्रास सोसून हे लोक काम करत आहेत. या लोकांना यू ट्यूबबरोबर इतर सोशल मिडियाच्या इतर प्लॅटफॉर्म्सवर सुद्धा शोधून पहा. तुमच्या लक्षात येईल की, काही अपवाद सोडले तर सर्वांनाच दर्शकांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे. जे लोक सत्य सांगतात त्यांना अल्प प्रतिसाद मिळणे अतिशय धोकादायक आहे. आपण अंधश्रद्धा पसरवणार्‍या व्हिडिओच्या खाली ते कसे खोटे आहेत हे सांगण्यासाठी कमेंट करतो. पण त्यामुळे उलट त्या व्हिडिओचा रिच खूप वाढतो. आपण याउलट केले पाहिजे. आपण सत्य सांगणार्‍या व्हिडिओच्या खाली कमेंट करायला हवी. अशा व्हिडिओंना लाईक केले पाहिजे. आणि ते व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर केले पाहिजेत. अंधश्रद्धा पसरवणार्‍या सामग्रीला दुर्लक्षित करणे आणि अंधश्रद्धेविरोधात असणार्‍या सामग्रीला लाईक, कमेंट आणि शेअर करून प्रोत्साहन देणे ही आपली जबाबदारी आहे. यापुढे तुम्हाला कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अंधश्रद्धेविरोधात काही मजकूर, इमेज अथवा व्हिडिओ दिसला तर त्या ठिकाणी या तीन गोष्टी (लाईक, कमेंट आणि शेअर) करायला विसरू नका. तसेच यू ट्यूबवर hype नावाचे एक बटण आहे. चांगल्या, सत्य सांगणार्‍या व्हिडिओसाठी या बटणाचा जरूर उपयोग करा. व्हिडिओ hype केला की यू ट्यूब तो व्हिडिओ आणखी जास्त लोकांना दाखवते. लक्षात ठेवा, चांगल्या लोकांची निष्क्रियता वाईट लोकांच्या पथ्यावर पडत असते.

– वाघेश साळुंखे


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ] [ 134 ] [ 135 ] [ 136 ] [ 137 ] [ 138 ] [ 139 ] [ 140 ] [ 141 ] [ 142 ] [ 143 ] [ 144 ]