चार्वाकाची गोष्ट

किरण माने -

लै भारी गोष्ट हाय भावांनो. चार्वाकाची. चार्वाक, प्राचीन भारतातला पहिला समाज-सुधारक… त्याच्या बायकोच्या लक्षात येत नव्हतं की नवरा नेमकं का करतोय हे काम? “आपला नवरा उगीचंच लोकांना ‘बुद्धी वापरा, अंधविश्वास ठेवू नका’ असं सांगत फिरतोय. चमत्कार म्हणून कायतरी असतं की.. जुनीजाणती माणसं काय येडी हायेत का?” असं तिचं म्हणनं होतं. एका मध्यरात्री चार्वाकानं आपल्या बायकोला गावच्या वेशीजवळ नेलं. तिथनं धुळीच्या रस्त्यावर हाताचे पंजे विशिष्ट पद्धतीनं उठवत उठवत तो गावातल्या चौकापर्यंत आला. नंतर दोघंबी घरी गेले…

दुसर्‍या दिवशी सकाळी तो पुन्हा बायकोला घेऊन चौकात आला. धुळीतल्या खुणा बघून गांवातली लोकं एकमेकांत चर्चा करायला लागलेवते. एका बुजुर्गानं सांगितलं. “हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत.” सगळ्यांनी त्यावर विश्वास ठेवला. ‘रात्रीच्या वेळी लांडगा येतोय’, अशी अफवा पंचक्रोशीतल्या घराघरांत पसरली.

…हे सगळं चार्वाक आणि त्याची बायको यांच्यासमोर घडलं. चार्वाकानं बायकोला विचारलं, “या धुळीत हे काय आहे?” ती म्हणाली, ‘हे तुमच्या हाताचे ठसे आहेत!’ तो म्हणाला, “कायतरीच काय? गांवच काय अख्खी पंचक्रोशी म्हणतीय, हे लांडग्याच्या पावलांचे ठसे आहेत.. ते काय वेडे आहेत का?” यावर ती म्हणली, पंचक्रोशीतल्याच काय, सगळ्या जगातल्या लोकांनी येऊन मला तसं सांगितलं, तरी मी ते खरं मानणार नाही. कारण, हे ठसे तुम्ही आपल्या हातांनी उठवल्याचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे.”

चार्वाक म्हणाला, “मग इतकी वर्षं मी तरी लोकांना दुसरं काय करायला सांगतोय?”

…विवेकी विचार म्हणजे काय? याचं याहून चांगलं उदाहरण नाय माझ्या भावांनो. विवेकी माणूस ऐकलेली गोष्ट नीट पडताळून पाहून, परीक्षा करून मग खरं-खोटं, योग्य-अयोग्य ठरवतो. मूर्ख माणूस दुसरा सांगेल ते ऐकून आंधळा विश्वास ठेवतो.

आज आपण सगळे सुशिक्षित आहोत. कुठलीबी गोष्ट असूद्या… व्हॉटस्अ‍ॅपवरचा फॉर्वर्डेड मेसेज असूद्या, नायतर न्यूज चॅनेलवरची बातमी असूद्या… त्या गोष्टीची नीट, चारीबाजूनी, मेंदू वापरून चिकित्सा केल्याशिवाय आंधळेपणानं विश्वास कसा ठेवू शकतो आपण? ‘आपली बुद्धी वापरायचं स्वातंत्र्य’, ‘आपला विवेक वापरायचा अधिकार’ या निसर्गानं आपल्याला दिलेली लै लै लै मोलाच्या देणग्या हायेत, त्याचा व्यवस्थित वापर करा, हे सांगीतलंवतं पाच हजार वर्षांपूर्वीच्या चार्वाकांनी… अडीच हजार वर्षांपूर्वीच्या बुद्ध, बसवण्णा, चक्रधरस्वामींनी… तीनशे वर्षांपूर्वीच्या तुकोबारायांनी.. आणि आजच्या दाभोलकरांपर्यंत सगळ्यांनी! चार्वाकाला लोकांनी जाळून मारलं… चक्रधरस्वामी आणि तुकोबाराया अचानक बेपत्ता झाले…कुणी म्हणे तुकोबा गरूडावरून वैकुंठी गेले..कुणी म्हणे चक्रधर उत्तरेकडे निघून गेले.. आणि दाभोलकरांना तर… असो.

आजच्या दिवशी फक्त अभिवादन करण्यापेक्षा त्यांचा ‘विचार’ पुढच्या पिढीत रूजवूया, मुरवूया, भक्कम करूया… चार्वाकासारखं किमान आपल्या घरात तरी ते आपण करू शकतो. एवढं जरी आपण केलं, तरी या महापुरुषांचं आपल्यासाठी जगणं आणि आपल्या सगळ्यांच्या हितासाठी मरणंबी सार्थकी लागंल.!

किरण माने

सिने अभिनेते


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ]