डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती विशेषांकाचे राजीव तांबे यांच्या हस्ते प्रकाशन संपन्न

-

“डॉ. दाभोलकर हा एवढा मोठा माणूस होता की, त्यांनी केलेले संस्कार केवळ एका पिढीपुरतेच मर्यादित नव्हते, तर त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढील पिढ्यांवरही झाला. पण हे संस्कार त्यांनी संस्कार करतो म्हणून केलेले नाहीत. त्यांनी ना तात्पर्य सांगितले, ना सुविचार सांगितले तर त्यांनी प्रत्यक्ष कृती केली आणि हेच त्यांचे कृतिशील वर्तन आदर्श ठरले आणि त्यांनी त्यातून संस्कार होत गेले,” असे उद्गार लेखक, कवी, नाटककार व सातत्याने मुलांमध्ये व मुलांसाठी काम करणारे सर्जनशील बालसाहित्यकार राजीव तांबे यांनी काढले. ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अकराव्या स्मृती विशेषांकांचे ऑनलाइन प्रकाशन समारंभात ते बोलत होते.

गेली दहा वर्षे विशेषांकाच्या माध्यमातून डॉ. दाभोलकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे व विचारांच्या, कार्याच्या विविध पैलूंबद्दलची मांडणी त्यांच्या सहकार्‍यांच्या, कार्यकर्त्यांच्या, कुटुंबीयांच्या नजरेतून केलेली आहे. या अकराव्या विशेषांकात कार्यकर्त्यांच्या पुढच्या पिढीतील मुलांनी आपल्यावर दाभोलकरांच्या विचारांचा कसा प्रभाव पडला आहे याबद्दल लिहिले आहे.

त्या अनुषंगाने ‘विवेकी पालकत्व’ या विषयावर बोलताना ते म्हणाले, मुले चुका करतात म्हणजे ते काहीतरी वेगळा विचार करत असतात. त्यामुळे आपल्या मुलाने चूक केली तर लगेच त्याची चूक त्याला दाखवू नका तर काय बरोबर आहे ते त्याला सांगा. चूक सुधारण्याची शिकण्याची त्याला संधी द्या. अशी संधी देणे, आपणच शहाणे हा भ्रम बाजूला ठेवत मुलावर विश्वास ठेवणे, मुलावर तू बावळट, चेंगट आहेस अशा प्रकारची कोणतीही ‘लेबले’ न लावणे म्हणजेच विवेकी पालकत्व असे सांगून त्यांनी पुढे मुलांना पालकांसारखा भूतकाळ नसतो, मुले वर्तमानकाळात जगत असतात, भविष्याचा वेध घेत असतात. त्यामुळे पालकांनी आपल्या लहानपणाच्या परिस्थितीशी तुलना न करता मुलांबरोबर आपणही लहान झाले पाहिजे असे प्रतिपादन करून पुढे ते म्हणाले, मुलांनी पालकांशी संवाद साधावा असे वाटत असेल तर आपल्या कृतीतून आपण मुलासोबत शिकावयास तयार आहोत हा संदेश पालकांनी मुलांना आपल्या कृतीतून देणे, मुलाला तू शिकू शकतोस असा विश्वास देत शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे, चांगल्या वाईट परिस्थितीत मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, समकालीन महान लोकांचे कार्य मुलांपुढे आणणे, मुलांच्या भावनाशी समरस होणे, ही ‘विवेकी पालकत्वाची लक्षणे’ सांगून तुमची मुले ही तुमची नसतात, तुमच्या धनुष्यातून सुटलेले ते बाण असतात. तेव्हा तुमचे विचार त्यांना देऊ नका, तुमचे प्रेम त्यांना द्या, हे खलील जिब्रानचे वाक्य सांगितले व आपण मुलांना देणारे नाही तर मुलांकडून घेणारे व्हावयास हवे असे सांगणारी विंदा करंदीकरांची कविता सांगत त्यांनी आपले भाषण संपवले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या संपादक मंडळाच्या सदस्य मुक्ता दाभोलकर यांनी विशेषांकाचे वैशिष्ट्य सांगताना म्हटले, विचार जगण्याचे बळ नकीच देतात आणि एखादा विचार एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे पिढ्यान्पिढ्या कसा संक्रमित होत राहतो आणि त्यातून तो दुसर्‍या पिढीत कसा कार्यरत होतो याची कल्पना या विशेषांकातील कार्यकर्त्याच्या मुलांच्या मनोगतातून येते. कार्यक्रमाची सुरुवात नाशिकच्या आनंदी जाधव यांच्या गाण्याने झाली. प्राचार्या प्रमोदिनी मंडपे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. अनिल चव्हाण यांनी आभारप्रदर्शन केले, अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे व्यवस्थापकीय संपादक राहुल थोरात यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]