महर्षी अण्णासाहेब शिंदे : एक उपेक्षित महात्मा

प्रा. एन. डी. पाटील -

भारतीय समाजाला प्रगतीची दिशा दाखविण्यासाठी ज्या व्यक्ती स्वयंस्फूर्तीने पुढे आल्या, त्यामधील एक म्हणजे महर्षी विठ्ठल रामजी ऊर्फ अण्णासाहेब शिंदे. त्यांचा जन्म 23 एप्रिल, 1873 चा आणि 2 जानेवारी, 1944 रोजी ते आपल्यातून निघून गेले.

साम्राज्यसत्तेला विरोध आणि आधुनिक संस्कृतीचे स्वागत, अशी त्यांची द्विगुणी प्रवृत्ती होती. उच्च समजल्या जाणार्‍या मराठा समाजात त्यांचा जन्म झाला. दारिद्य्र वाटणीला आले तरी त्यांनी आईला साक्षर केले आणि बहिणीला मॅट्रिक पास.

स्वतः परदेशात जाऊन शिक्षण घेतले आणि आपली गुणवत्ता सरकारी नोकरीत वाया न घालवता समाजपरिवर्तनासाठी वापरली. महारवाड्यात राहून अस्पृश्यतेचे निर्मूलन करण्यासाठी स्वतःला गुंतवून घेतले.

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांना आपला आदर्श मानत त्यांचे विचारधन बाळगणार्‍या एन. डी. सरांनी महर्षी शिंदे यांची ओळख करून देण्यासाठी एक पुस्तक लिहिले, “महर्षी अण्णासाहेब शिंदे एक उपेक्षित महात्मा.” या पुस्तकाची तोंड ओळख व्हावी म्हणून त्यातील काही उतारे आम्ही पुढे देत आहे

संपादक मंडळ

उपेक्षित महात्मा

महाराष्ट्रातले एक पुरोगामी, व्यासंगी आणि साक्षेपी विचारवंत प्रा. गं. बा. सरदार यांनी महाराष्ट्रातल्या काही उपेक्षित समाजपुरुषांना न्याय देण्यासाठी ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी’ या मथळ्याखाली एक पुस्तक प्रकाशित केले. त्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या उपेक्षित समाजसुधारकांच्या कार्यांची माहिती संकलित करण्याचे ऐतिहासिक कार्य पार पाडले. तथापि, अण्णासाहेबांचं नाव प्रा. गं. बा. सरदारांच्याही उपेक्षितांच्या यादीत अंतर्भूत होऊ शकले नाही! त्या ‘उपेक्षित मानकर्‍यां’च्या यादीतही आपले अण्णासाहेब पुन्हा उपेक्षित ते उपेक्षितच!

पहिला आवाज

अण्णासाहेबांनी भारतीय समाजाच्या एका प्रमुख समस्येला हात घालण्याचे अभूतपूर्व कार्य केले. भारतीय स्तरावर अस्पृश्यता निवारणाचे कार्य करण्यासाठी त्यांनी 18 ऑक्टोबर, 1906 रोजी ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया’ (डी. सी. मिशन) ही संस्था स्थापन केली. सर्वसाधारणपणे अस्पृश्यता निवारणाच्या कार्याशी महात्मा गांधींचा निकटचा संबंध मानला जातो. या प्रश्नाला राष्ट्रीय पातळीवर स्थान देण्याचेही श्रेय महात्मा गांधींच्या पदरात टाकले जाते. तथापि, याबाबतचे वास्तव मात्र वेगळेच आहे.

महात्मा गांधींचा भारताच्या राजकीय क्षितिजावर उदय झाला तोच मुळी 1920 साली. त्यांनी त्यांच्या कार्यक्रमामध्ये अस्पृश्यता निवारणाच्या कार्यक्रमाला स्थान दिले होते, हेही खरे आहे. परंतु गांधीजींचा उदय होण्यापूर्वी एक नव्हे, दोन नव्हे; तर तब्बल 14 वर्षे अगोदरच (1906 मध्ये) अण्णासाहेबांनी या समस्येच्या सोडवणुकीसाठी भारतीय पातळीवर संस्थापक प्रयत्न सुरू केलेला होता. अण्णासाहेबांचे हे कार्य म्हणजे त्यांच्या एकूण सामाजिक क्रांतिकार्याचा मेरूमणीच म्हटला पाहिजे.

कुटुंब

अण्णासाहेबांच्या कुटुंबातील एकूण एक व्यक्ती त्यांच्याबरोबर समाजकार्यात सहभागी होती. आई, वडील, पत्नी, बहिणी या सर्वांनीच उपासमार, कोंडमारा व निंदा सहन करून समाजसेवा केली. या भयानक दारिद्य्राच्या पार्श्वभूमीवर अण्णासाहेबांच्या कुटुंबातील व्यक्तींचे जीवनविषयक तत्त्वज्ञान विलोभनीय वाटल्यास त्यात नवल नाही. असल्या दारिद्य्राला तोंड देत असतानाही रामजीबाबा आपल्या मुला-मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था करतात. मुले व मुली यांच्या दरम्यान कसलाही भेदाभेद करीत नाहीत. कुटुंबातली शांती, तृप्ती आणि प्रीती या तिन्ही गोष्टी दृष्ट लागण्यासारख्या सांभाळल्या जात होत्या, हे कोडे सहजासहजी उलगडण्यासारखे नाही. अण्णासाहेबांचे कुटुंब अनन्यसाधारणच म्हटले पाहिजे.

दारिद्य्राला तोंड देत असतानाच आपला स्वाभिमान आणि बाणेदारपणा यांना यत्किंचितही धक्का लावू न देता या कुटुंबातील व्यक्तींनी निर्णय घेतलेले आहेत. अण्णासाहेब जमखंडी हायस्कूलमधून प्रथम क्रमांकाने मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर 1892 मध्ये त्यांनी काही काळ जमखंडी हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरी केली. तथापि, त्यांची ही नोकरी फार काळ टिकू शकली नाही.

वर्षानुवर्षे भयानक दारिद्य्राचे चटके सहन केलेल्या आपल्या आई-वडिलांना, बहिणींना व पत्नीला सुखासीन जीवन उपलब्ध करून देण्याची संधी हातातोंडाशी आली असताना एका उदात्त ध्येयाला कवटाळण्यासाठी अण्णासाहेबांनी ती सुवर्णसंधी निर्धारपूर्वक नाकारली. आयुष्यभर ‘असिधारा’व्रत निभावण्याचा संकल्प त्यांनी घोषित केला.

क्षयाची बाधा झालेल्या आणि हुजूरपाडीत शिक्षण घेत असलेल्या एका मुलीची सेवाशुश्रुषा करीत राहिल्यामुळे अण्णासाहेबांच्या एका बहिणीला क्षय रोग झाला व त्यातच त्या बिचारीचा अंत झाला.

बडोदा नरेश सयाजीराव गायकवाड व अण्णासाहेब

दोघेही आपापल्या परीने महान. दोघेही एकमेकाला उत्तम रीतीने ओळखणारे. त्यांच्या भेटीचा वृत्तांत अण्णासाहेबांनी पुढील शब्दांत नोंदवलेला आढळतो – ‘महाराज खरे दिलदार. ते हसून म्हणाले, “काय शिंदे, आमच्या पैशाची काय वाट?” मी अत्यंत नम्रपणे उत्तर केले, “महाराज, पत्करलेले कार्य ईश्वराचे आहे आणि ते आपल्या पसंत पडण्यासारखेच आहे. धर्मसुधारणा, समाजसुधारणा इत्यादी प्रागतिक गोष्टींचे बाळकडू आपणच आजपर्यंत पाजीत आला आहात. आता तर विलायतेतील युनिटेरियन समाजात माझा अर्ज पसंत केल्यावर ही चालून आलेली संधी आपण दवडणार नाही, अशा भरवशावरच आपणाकडे आलो आहे. मला प्रवासाला लागणारे सुमारे दीड हजार रुपये जर आपण कृपाळूपणे द्याल, तर अर्थातच माझे मागचे दीड हजार रुपयांचे ऋण फिटले असेच मी समजेन.”

ऋण फेडण्याचा हा अजब प्रकार पाहून महाराज हसले आणि म्हणाले, “खरे आहे शिंदे, तुम्ही यशस्वी होऊन या!” सेकंड क्लासचे डेकचे जाण्या-येण्याचे भाडे देण्याची हुजुराज्ञा झाली.

अस्पृश्यता निवारण डी. सी. मिशन

अण्णासाहेबांनी बडोदा येथे महाराजांची भेट घेऊन त्यांनी चालविलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्यक्रमाबाबत विचारविनिमय केला. बडोदा संस्थानच्या वतीने चालविण्यात येणार्‍या अस्पृश्यांच्या शाळांची त्यांनी तपासणी केली. एवढेच नव्हे; तर अस्पृश्य विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांच्या उच्च शिक्षणाची सोय करण्याबाबत अण्णासाहेबांनी ज्या-ज्या शिफारशी केल्या त्या-त्या सयाजीराव महाराजांनी स्वीकारून त्यांची अंमलबजावणीही सुरू केली.

बडोदा नरेश सयाजीराव महाराजांनी भीमराव रामजी आंबेडकर (नंतरचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर) या तरुण विद्यार्थ्याला भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी आणि त्यानंतर कोलंबिया विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी जी भरघोस स्कॉलरशिप मंजूर केली, तिचे मूळ अण्णासाहेबांनी या संदर्भात केलेल्या व्यवस्थेमध्ये होते, हे लक्षात घेतले पाहिजे.

अस्पृश्यतेच्या प्रश्नाने अण्णासाहेबांच्या मनाची पकड घेतली असतानाच 1901 च्या शिरगणतीचा त्यांनी अधिक बारकाईने अभ्यास केला. या मानवी अस्पृश्यांची संख्या एकूण लोकसंख्येच्या 1/6 (एक षष्ठांश) असल्याची त्यांची खात्री झाली. या नव्या जाणिवेने ते अस्वस्थ झाले.

नेमक्या याच सुमारास; 1905 च्या उन्हाळ्यात अण्णासाहेबांच्या जीवनात हा दुसरा क्रांतिकारक क्षण येऊन ठेपला. अण्णासाहेबांच्या जीवनात झालेल्या या क्रांतीला अन्यत्र तोड सापडणे कठीण. त्याचे असे झाले – अण्णासाहेब ‘प्रार्थना समाज’च्या प्रचारकार्यासाठी अहमदनगर येथे गेलेले. तेथील व्याख्यान आटोपल्यानंतर रात्री दहाच्या सुमारास त्यांनी विश्रांतीसाठी अंग टाकले. झोपेची आराधना चालू असतानाच त्यांच्या खोलीवर थाप पडली. दार उघडून पाहतात, तो ज्यांचे चेहरे उन्हाने करपून गेलेले आहेत, कपड्यांच्या नावावर अंगावर पांघरलेल्या चिंध्यादेखील कमालीच्या मलीन झालेल्या आहेत, अशी दहा-बारा मंडळी दारात उभी. अण्णासाहेबांनी त्यांच्या येण्याचे कारण विचारल्यावर त्यांनी जो खुलासा केला तो ऐकून अण्णासाहेब अक्षरश: अवाक् झाले. ही माणसं अस्पृश्य समाजातली होती आणि शेजारच्या भिंगार गावातून ती अण्णासाहेबांना त्यांच्या वस्तीत व्याख्यान देण्यासाठी बोलावत होती. रात्रीचे बारा वाजलेले होते. अण्णासाहेब म्हणाले, “अरे बाबांनो, ही काय सभेची वेळ झाली काय? मध्यरात्री कसली सभा घेताय?” अण्णासाहेबांच्या या प्रश्नावर त्या मंडळींनी दिलेले उत्तरही मासलेवाईक होते. ते म्हणाले, “एक तर आम्ही काबाडकष्ट करून पोट भरणारी माणसं आहोत. आम्हाला दिवसा सभा घेणे व त्या सभेला हजर राहणे कसे शक्य आहे? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की, आमच्या वस्तीत आम्ही सभा घेतलेली गावातल्या मंडळींना आवडणार नसल्याने आम्हा मंडळींना मध्यरात्रीलाच सभा घेणे भाग आहे.”

अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नासाठीच आपली सारी हयात पणाला लावण्याचा निर्धार केल्यानंतर अण्णासाहेबांनी यापूर्वी मी उल्लेख केलेल्या अखिल भारतीय निराश्रित सहाय्यकारी मंडळींची (डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया) स्थापना केली. त्यांच्या या संस्थेचा उल्लेख मी संक्षिप्तपणे ‘डी.सी. मिशन’ असा करतो.

हे मिशन स्थापन केल्यानंतर अण्णासाहेबांनी राममोहन आश्रमात असलेले अपले बिर्‍हाड परेलच्या महार वस्तीत हलविले. त्या काळात ही घटना असामान्यच म्हटली पाहिजे. महात्मा गांधी दिल्लीमध्ये भंगी कॉलनीत राहत असल्याचा उल्लेख केला जातो. ती गोष्ट निश्चितच गांधीजींच्या मनाच्या मोठेपणाची निदर्शक आहे, यात वादच नाही; परंतु गांधीजींच्याही अगोदर किमान चाळीस वर्षेअण्णासाहेब आपले आई, वडील, पत्नी, बहिणी, मुले-बाळे यांच्यासह महार वस्तीत राहायला गेलेले होते. या ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनेकडे आपण दुर्लक्ष करीत असतो.

अस्पृश्यता निवारणाच्या प्रश्नाचा एक भाग म्हणून प्रत्यक्ष महार वस्तीमध्ये आपले माता-पिता आणि मुलाबाळांसह बिर्‍हाड करून राहायला गेलेले अण्णासाहेब हेच पहिले समाजसुधारक आहेत.

यासंदर्भात मी आणखी एका ऐतिहासिक सत्याचा या ठिकाणी पुनरुच्चार करू इच्छितो. अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात – राष्ट्रीय नेतृत्वाचा येथे संबंध नाही – अण्णासाहेबांचे स्थान महात्मा गांधीजींपेक्षाही वरच्या दर्जाचे होते. गांधीजी व अण्णासाहेब यांच्या दरम्यान त्या काळात जो पत्रव्यवहार झालेला आहे, त्यामधून या बाबींवर प्रकाश पडू शकतो. अण्णासाहेबांनी डी. सी. मिशनच्या कार्यात त्यांचे जीवनसर्वस्व अर्पण केले. केवळ भारताचा कानाकोपराच नव्हे, तर ब्रह्मदेशाचाही भाग त्यांनी पिंजून काढला. अनेक अस्पृश्यता निवारण परिषदा त्यांनी संघटित केल्या. 23 मार्च, 1918 रोजी बडोदानरेश सयाजीराव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी ‘अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद’ मुंबई येते आयोजित केली होती. ही परिषद 24 व 25 मार्चअखेर चालली. या परिषदेत बॅ. एम. आर. जयकर यांनी पुढील ठराव मांडला –

“विवक्षित जातींच्या जाती ऊर्फ राष्ट्र वंशपरंपरेने अस्पृश्य मानणे, त्या जाती अशा अस्पृश्य राहाव्यात म्हणून त्यांना अगदी गावाबाहेर; पण फार दूर नाही, अशा निराळ्या वस्तीत डांबणे वर जर कोणी स्पृश्यांनी किंवा अस्पृश्यांनी हा बहिष्काराचा नियम मोडला, तर त्या दोघांवरही प्रचलित धार्मिक व राजकीय कायद्यांची अंमलबजावणी करणे, या तीन लक्षणांनी युक्त अशी राष्ट्रीय (जातीय) संस्था म्हणजे अस्पृश्यता होय,”अशी भूमिका अण्णासाहेबांनी या ग्रंथात मांडलेली आहे.

“हिंदू राजे व बौद्ध राजे यांच्या लढ्यातून जिंकले गेलेले क्षत्रिय बौद्ध यांना बहिष्कृत ठरविण्यात आले. बौद्धांच्या ठिकाणी ब्राह्मणांनी क्षत्रिय राजांच्या मदतीने त्यावेळच्या समाजाची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न केला. त्या प्रक्रियेत हिंदूंना शरण येण्यास नकार देणार्‍या बौद्धांना सर्व सामर्थ्यानिशी दडपून टाकून अस्पृश्य करण्यात आले,” असे अण्णासाहेबांचे प्रतिपादन होते.

1921 साली त्यांनी डी. सी. मिशनच्या (मातृसंस्था, मुंबई) एक्झिक्युटिव्ह कमिटीच्या जनरल सेक्रेटरी पदाचा राजीनामा दिलेला होताच. त्यानंतर दिनांक 15 एप्रिल, 1923 रोजी त्यांनी डी. सी. मिशन सर्व मालमत्तेसह एकूणएक अधिकारासह अस्पृश्य समाजाच्या स्वाधीन केले. त्यांनी स्वत:कडे कसलाही अधिकार ठेवला नाही! त्यानंतर संस्थापक-विश्वस्त एवढाच त्यांचा दर्जा राहिला.

डॉ. आंबेडकरांशी मतभेद

अण्णासाहेबांनी 1918 साली त्यावेळच्या साऊथ-बरो कमिशनपुढे जी साक्ष दिली, त्यामधून त्यांच्यामध्ये व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यादरम्यान मतभेद निर्माण झाले. अस्पृश्य समाजाला मुंबई कायदे मंडळात 9 जागा राखीव द्याव्यात, अशी त्यांची सूचना होती.

दारूविक्री विरोध

समाज दारूच्या अधीन झाला, तर त्यामधून मिळणारा महसूल हा शिक्षणासाठी उपलब्ध होणार या सरकारी वृत्तीचा “शिक्षणाचे मंगळसूत्र सरकारने दारूच्या बाटलीच्या गळ्यात बांधून ठेवले आहे,” अशा शब्दांत अण्णासाहेबांनी त्यावेळच्या राज्यकर्त्यांची निर्भत्सना केलेली आहे.

भांडवलशाहीला विरोध

तथापि, अण्णासाहेब भांडवलशाहीची भलावण करणार्‍या भाडोत्री भाटांशी सहमत नव्हते. ते म्हणतात, “हल्लीच्या औद्योगिक क्रांतीच्या काळात भांडवलसुराचा जन्म झालेला आहे. हा चिरंजीव नाही. इतर प्राचीन असुराप्रमाणे हाही आपल्या कर्माने आणि इतरांच्या जागृतीने मरणार आहे.”

“साम्यवादाचा प्रणेता कार्ल मार्क्स यांनी भांडवलशाही समाजव्यवस्था ही एक ना एक दिवस निश्चितपणे संपणार आहे, तिचा विनाश अपरिहार्य आहे,” असे ठाम प्रतिपादन केले आहे. ‘भांडवलशाहीच्या विनाशाची बीजे तिच्या पोटातच वाढत असतात. भांडवलशाही समाजव्यवस्था आर्थिक अरिष्टापासून कदापि मुक्त होऊ शकत नसल्याने ती तिच्या पोटातल्या अंतर्विरोधातूनच नष्ट होते,’ हे शास्त्रीय समाजवादाचे मूलभूत सूत्र त्याही काळात अण्णासाहेबांनी आत्मसात केलेले होते. ही गोष्ट त्यांच्या अभ्यासाची व चिंतनाची निदर्शक आहे. अण्णासाहेबांनी या प्रश्नासंबंधीची मते विचारात घेता त्यावेळी; म्हणजे रशियात झालेल्या क्रांतीनंतर हिंदुस्थानात येऊ घातलेल्या साम्यवादी वाङ्मयाचा त्यांनी अभ्यास केलेला असावा, असे दिसते.

शेतकरी चळवळ

“शेतकर्‍यांची चळवळ यापुढे बाहेरच्या लोकांच्यावर कोणत्याही कारणास्तव अवलंबून ठेवून चालणार नाही. त्यांच्या चळवळीचे नेतृत्व शेतकर्‍यांनी स्वत:च केले पाहिजे. त्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी जमीनदार करतील, तर ते चालणार नाही. कारण काँग्रेस स्वत:च श्रीमंतांच्या हातचे बाहुले बनली आहे,” असे प्रतिपादन होते.

“शेतकरी परिषदांच्या व्यासपीठावरून शेतीमालाच्या किफायतशीर किमतीचाही प्रश्न त्यांनी धसाला लावलेला आहे. त्यांच्या मते, शेतकर्‍याने शेती उत्पादन वाढवीत असतानाच उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा म्हणून बाजारपेठेवर आपले वजन व नियंत्रण प्रस्थापित केले पाहिजे. शेती उत्पादनावर एक हात ठेवीत असताना दुसरा हात बाजारपेठेवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला पाहिजे – “ज्याची चंदी त्याचाच लगाम!”

आधुनिक ऋषी

भाई माधवरावजी बागल यांनी अण्णासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी जो भावपूर्ण उल्लेख केलेला आहे, तो उद्धृत करण्याचा मोह मी याप्रसंगी आवरू शकत नाही – “त्यांना पाहताच त्यांचे पाय धरावेसे वाटले मला. प्रथमदर्शनीच माझ्या मनावर त्यांची विलक्षण छाप पडली. मी जात्या चित्रकार. माझ्या दृष्टीसमोर जणू पुरातन काळचा ऋषी उभा होता. चित्रात पाहिलेले आणि कल्पनेत तरंगत असलेले वसिष्ठ-वाल्मिकी ऋषी यांची ती चालती-बोलती साकार मूर्ती होती. आधुनिक काळात वावरत असलेल्या त्या मूर्तीने मला पुरातन काळात खेचून नेले.”

अण्णासाहेबांनी त्यांना जिकडे जायचे होते, तिकडे जाण्यासाठी नवीन वाट मळविली, काटेकुटे सहन केले. पाय रक्तबंबाळ झाले, तरी त्याची कसलीही पर्वा केली नाही. हीच माणसं नवं जग शोधून काढतात; नवा माणूस, नवा समाज घडवतात.

संकलन : मीना चव्हाण

संपर्क : 7972272692


लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ]