भटक्या-विमुक्त जमातींच्या आयुष्याचा प्रातिनिधिक आढावा

माया पंडित -

सुनीता भोसले यांचे आत्मचरित्र ‘विंचवाचं तेल’

पारधी जमातीतल्या सुनीता भोसले यांचे ‘विंचवाचे तेल’ हे रोहित प्रकाशनाने प्रसिध्द केलेले आत्मचरित्र हे आपल्या डोळ्यांत एक झणझणीत अंजन घालणारे पुस्तक आहे, असे म्हटले तर गैरलागू होऊ नये. दलित स्त्रियांच्या आत्मचरित्रांमधून आपल्याला जातिव्यवस्थेचे भीषण रूप पाहायला मिळाले होते. पण विसाव्या शतकाच्या अखेरीला आणि या सहस्रकानंतरच्या पहिल्या दोन दशकांच्या काळात देखील या व्यवस्थेपलिकडच्या; म्हणजे अगदी दलित जाती-जमातींच्या पलिकडल्या पारधी जमातीसारख्या सामाजिक स्तरातल्या माणसांचे; विशेषत: स्त्रियांचे जीवन किती भीषण आहे, याचे चित्रण वा जाणीव साहित्यात आली नव्हती. ‘दलित जातीपलिकडल्या’ असे म्हणण्याचे कारण असे की, हे भीषण वास्तव आहे, ब्रिटिश सत्ताधार्‍यांनी ज्यांच्या कपाळी ‘गुन्हेगार जमाती’ असा शिक्का मारला होता, त्या जातीजमातींचे, त्यांच्या भयंकर जीवनाचे! 1871 साली केलेल्या ‘त्या’ गुन्हेगार जाती-जमातीच्या कायद्याला भारतीय स्वातंत्र्यानंतर आलेल्या जवाहरलाल नेहरूंच्या सरकारने 1952 साली रद्दबातल केले होते. (हे वास्तव मुद्दाम सांगायला हवे, कारण नेहरूंना बदनाम करायची एक मोहीमच आज चालू आहे!) त्या कायद्यानुसार आज भटक्या आणि विमुक्त म्हणून ओळखल्या जाणार्‍या लोकांना नृशंस अशा अत्याचारांचे बळी केले गेले होते. त्यांची वतने खालसा केली होती. ‘गुन्हेगार’ असा शिक्का मारून त्यांना काटेरी तारांआडच्या ‘सेटलमेंट्स’मध्ये बंदिस्त केले होते. विनामोबदला लुबाडले जात होते. शिक्षण, आरोग्य अशा सोयी-सुविधा नाकारल्या होत्या. जनावरांपेक्षा वाईट जिणे माथी मारले होते. आज कायदा रद्दबातल झाला, ‘सेटलमेंट्स’ मोडल्या. मात्र तरीही या लोकांना आपली पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था, सत्ताधारी सामाजिक व राजकीय शक्ती या त्यांच्या कपाळीचा ‘गुन्हेगार’ हा शिक्का पुसू देत नाहीत. स्वातंत्र्य, लोकशाही, विकास आणि प्रगती या एरव्ही डंका पिटण्यात येणार्‍या शब्दांना 21 व्या शतकातही संपूर्णपणे निरर्थक बनवणार्‍या या पारधी जमातीच्या जीवनाचा आढाया सुनीता भोसले यांनी या आत्मचरित्रात घेतला आहे. त्या स्वत:ही या समाजातील असल्याने हे चित्रण त्यांनी आतल्या नजरेने केले आहे. त्यांचे सहकारी प्रशांत रूपवते यांच्या सहकार्याने त्यांचे आत्मचरित्र लिखित रूप घेऊन आले आहे. भटक्या-विमुक्त जमातींच्या आयुष्याचा हा आढावा प्रातिनिधिक म्हणायला हवा.

पुस्तकाचे नाव ‘विंचवाचे तेल’ हेही नीट समजून घ्यायला हवे. त्याला ‘सूर्यनारायण तेल’ असेही नाव आहे. हे तेल भयंकर विस्तवी असते. स्पर्श झालेल्या ठिकाणची त्वचा ते भाजून सोलून काढते. पोलीस त्याचा वापर पारधी जमातीच्या कैद्यांवर करतात. त्यांनी गुन्हा केलेला असो वा नसो, पारध्यांना नेहमीच संशयावरून पकडले जाते किंवा इतरांनी, ‘थोरा-मोठ्यां’नी केलेल्या गुन्ह्यांचा आळ त्यांच्यावर घातला जातो. मग त्या कैद्यांच्या सर्वांगाला; विशेषत: गुप्तांगाला हे तेल लावले जाते आणि त्याच्या मरणप्राय दाहाने होणार्‍या वेदनांनी तडफडताना कैदी निरपराध असूनही गुन्हा कबूल करतो आणि गुन्ह्याचा छडा लावला म्हणून ‘मानाचा’ शिरपेच पोलीस यंत्रणेच्या मस्तकावर खोवला जातो. एकतर हे लोक भटक्या जमातीत मोडतात, ते सतत भ्रमंती करतात. ते हिंदू नाहीत (मात्र त्यांच्यातली काही मंडळी जमिनीचा प्रश्न आला की खुशाल हिंदू एकत्र पध्दतीचा अवलंब करून आपल्या नातेवाईकांच्या जमिनी लुबाडतात). बहुतेक मंडळी अन्यायाच्या दावणीला बांधलेली. शिक्षण नाही, सामाजिक स्थान नाही, मानवी हक्क माहिती नाहीत, आरोग्य सुविधा नाहीत, रेशन कार्ड, आधार कार्ड, जन्म-मृत्यू दाखला नाही. कारण एके ठिकाणी पन्नास वर्षांहून अधिक वस्तीचा रहिवासाचा पुरावा नाही. तो देणार तरी कुठून? त्यामुळे सरकारी योजनांचा फायदा नाही! सारे जीवन वार्‍यावरच्या पाचोळ्यासारखे. दाद-फिर्याद मागणार तरी कोणाला? ते भारताचे नागरिकच नाहीत जणू काही! पण केवळ पोलीस वा भ्रष्ट न्यायव्यवस्था आणि स्वार्थी राजकारणी हेच या जमातीवर अन्यायाचा वरवंटा फिरवतात, असे नाही. पोलीस या बाह्य यंत्रणेबरोबरच त्यांच्यावर सत्ता गाजवणारी एक अंतर्गत संस्थाही अस्तित्वात असते – तिचे नाव जातपंचायत. हे पंच/पाटील विविध अंधश्रध्दांची ‘पध्दतशीर’ जोपासना करतात, आपले स्वतंत्र नियम लोकांवर लादतात, सत्ता गाजवतात, लुबाडतात, मनमानी व दंडेली करतात, बारीक-सारीक गोष्टींना गुन्हे मानून लोकांवर दंड बसवतात. जमातीच्या लोकांना; विशेषत: स्त्रियांना जनावरांपेक्षाही वाईट जीवन जगायला भाग पाडतात. त्यांचे पोलिसांशी साटेलोटेही असते. आपल्याला हव्या त्या माणसाला पोलिसांच्या तावडीत व्यवस्थित अडकवण्यात ते ‘माहीर’ असतात. खुद्द वडील, काका आणि आणि इतर नातेवाईकांचे भयंकर अनुभव सुनीताने दिले आहेत. तिचे काका, वडील यांना तर मृत्यूलाच सामोरे जावे लागले. जातपंचायतीने स्त्रियांच्या वाट्याला किती भीषण जगणे दिले आहे, याचे विश्वास देखील बसणार नाही, असे जग आपल्यासमोर सुनीता उभे करते. पण सुनीताचे खास वेगळेपण असे की ती बाह्य जगातल्या आणि जमातीच्या अंतर्गत जगातल्या या सार्‍या कुप्रवृत्ती आणि सत्तांविरुध्द लढायला पाय रोवून उभी राहिली आहे; आणि त्यात तिला प्रेरणा आहे ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची, त्यांनी दिलेल्या घटनेची आणि एकनाथ आव्हाड यांच्या झुंजार व खंद्या नेतृत्वाची. केसेसपासून संरक्षण, शिक्षणाचा हक्क, रोजगार आणि रेशनकार्ड, आधारकार्ड, मतदानाचा हक्क, सर्व सरकारी जमिनीचे पुनर्वाटप, स्मशानभूमी, आश्रमशाळा अशा गोष्टी नागरिक म्हणून मिळायला हव्या असतील तर लढा हाच मार्ग आहे.

सुनीताच्या लढ्याचे अनुभव देखील रोमांचक आहेत. सगळ्यात सुरुवातीला तिने प्रश्न हाती घेतला, तो एका मराठा माणसाने लग्न करतो म्हणून दोन वर्षेसतत फसवलेल्या पारधी मुलीचा. हा माणूस खूप प्रतिष्ठित होता. त्याच्याविरुध्द कुणीही उभे राहू शकत नव्हते. पण तिने पोलिसांना नीडरपणे समजावून सांगितले आणि काही चांगल्या अधिकार्‍यांच्या मदतीने त्या मुलीला न्याय मिळवून दिला. त्या माणसाला शिक्षा झाली. या केसने आपण न्याय मिळवू शकतो, हा आत्मविश्वास तिला मिळाला. या वेळी ती फक्त 14 वा 15 वर्षांची होती. त्यानंतर तिने एक मोठा लढा हाती घेतला. शिरूर, अहमदनगर आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या 35 पारधी कुटुंबांना तिने संघर्ष करून सरकारी जमिनी मिळवून दिल्या. आज ती कुटुंबे आपली गुजराण त्यावर करतात. हे अर्थातच सहजपणे झाले नाही. तिथल्या गावकर्‍यांना हे मुळीच आवडले नव्हते. त्यांनी सातत्याने पारध्यांना त्रास दिला, त्यांच्यावर हल्ले केले. पण ती डगमगली नाही. डॉ. आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा दिलेला मूलमंत्र तिने मनोमन स्वीकारला, त्याची ऊर्जा इतर सहकार्‍यांच्या मनात जागविली, आपला आत्मसन्मान, आपले हक्क या गोष्टी आपल्याच हाती आहेत, ही त्यांची शिकवण तिच्या मनीमानसी भिनली; ती तिने इतरांच्या हृदयात चेतवली. तिने जातीचे प्रमाणपत्र आणि आधार व रेशनकार्ड मिळण्यासाठी, जन्म-मृत्यूचा दाखला देण्यासाठी, स्मशानभूमी मिळवण्यासाठी, गायराने मिळण्यासाठी गेल्या पन्नास वर्षांचा रहिवासाचा दाखला मानणार्‍या सरकारी अधिकार्‍यांबरोबर केलेला ‘पाल मोर्चा’चा संघर्ष तर सांस्कृतिक लढा कसा लढावा, याचेच प्रत्यंतर देतो. तिने आव्हाडांच्या मानवी हक्क अभियानाच्या धर्तीवर एक पारधी समाज संघटना काढली. त्या संघटनेच्या नेतृत्वाखाली दौंडमध्ये दहा हजार पारध्यांनी मोर्चाने जाऊन आपली पालं सरकारी ऑफिसेसच्या समोरच्या पटांगणावर टाकली, सरकारी अधिकारी दाखल्याच्या मागणीवर अडून बसले. मग त्यांनी सगळ्या शकली लढविल्या. त्यांनी प्रथम त्यांचे शिकारीसाठीचे सापळे मैदानात ठिकठिकाणी लावले. आपल्या बोलीत बोलायला सुरुवात केली. आपली नृत्ये आणि गाणी सादर केली. अधिकारी, पोलीस ऐकेनात; मग तितर, लाव्हा वगैरेंची शिकार, वालाना ती भाजून खाणे सुरू ठेवलेले. नंतर पंधरा-वीस किलो बोंबील आणून कचेरीसमोर भाजून खायला सुरुवात केली. त्या वासाने सरकारी अधिकार्‍यांना त्यांच्या ऑफिसात बसणे अशक्य करून सोडले. मग त्यांनी डुकरे, ससे, होलेही भाजून खायला सुरुवात केली आणि त्यांची हाडे वगैरे तिथेच टाकायला सुरुवात केली, कुत्र्या-मांजरा-कावळ्यांनी उच्छाद मांडला. गोंगाट, कलकलाट आणि वास यांनी अधिकार्‍यांना जेरीला आणले आणि वर हे पुरेसे नाही म्हणून त्यांना विचारले, ‘आता तुमच्या सायबांच्या घरावर, प्रांत अधिकारी, न्यायाधीश यांच्या घरांवर दरोडे टाकून दाखवू का? म्हणजे तरी आम्ही पारधी आहोत, याच्यावर तुमचा विश्वास बसेल.’ अधिकार्‍यांची बोलतीच बंद झाली. मग त्यांनी पारध्यांची जातीची प्रमाणपत्रे अगदी लॅमिनेट करून त्यांच्या घरी पोचवली. इतकेच नव्हे, तर त्यांच्या स्मशानभूमीसाठी पाच एकर जमीनही त्यांना दिली.

सुनीताने आपल्या जमातीतल्या जातपंचायतींविरुध्दही मोर्चा काढला. तिला आणि तिच्या पुरुष सहकार्‍यांच्या मार्गात भरपूर अडथळे देखील आणण्यात आले. इतकेच नव्हे, तर पुरुषांना बाट व्हावा म्हणून स्त्रियांचे कपडे देखील त्यांच्या मार्गात टांगले गेले. पण आता डॉ.आंबेडकरांच्या विचारांचे विचार आणि आव्हाडांची विवेकनिष्ठा अंगात भिनलेल्या कार्यकर्त्यांनी कशालाच दाद दिली नाही. हा लढा अजून संपलेला नाही. पण आता त्या जातपंचायतीचा लोकांच्या मनावरचा प्रभाव निश्चितपणे कमी झाला आहे आणि तो कमी-कमी होत जाईल, अशी चिन्हे आहेत. घरीच बाळंतपण न करता सरकारी दवाखान्यात जाणे, मुलांना शाळेत घालणे, आरोग्याची काळजी नीट घ्यावी, चोर्‍या-मार्‍या न करता सन्मानाने जगावे, असे तिने आपल्या जमातीच्या लोकांना शिकवले आहे. तिला मानणारे लोकही तयार होत आहेत.

सुनीताचे खरे तर वय लहान आहे. ती आता जेमतेम चाळिशीची असेल. आता ती आपले बी. ए. करते आहे. खरे तर आत्मचरित्र लिहायचे हे तिचे वय नाही. पण यातून तिने आत्मजाणिवेच्या विकासाचा जो मार्ग आपल्यासमोर खुला केला आहे, तो खरोखरीच अतिशय वेगळा आणि परिणामकारक आहे. महाराष्ट्रातील स्त्रियांच्या आत्मचरित्रांच्या परंपरेत तिने एक अत्यंत मोलाची भर टाकली आहे आणि एक अत्यंत अंधारलेले, अविकसित, अन्यायग्रस्त जग तिने त्यातून उजेडात आणले आहे. याबद्दल तिचे फार कौतुक केले पाहिजे.

अख्ख्या भारतीय समाजाच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक जाणिवेतून हद्दपार झालेले जग तिने पटलावर आणले आहे. तिच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांची उमेद वाढवण्यासाठी प्रयत्न करणे, पृथक होत चाललेल्या लढ्यांना एका समान प्लॅटफॉर्मवर एकत्र आणणे, अंधश्रध्दांच्या विळख्यातून त्यांना बाहेर यायला मदत करणे हे आपल्या सार्‍यांचेच काम आहे. धर्माच्या नावाखाली, प्रथा-परंपरांच्या नावाखाली लोकांना लुबाडणार्‍या, नागवणार्‍या विचारांचा आणि व्यक्ती व राजकीय व्यवहारांचा मुकाबला करण्याच्या लढ्यात आपण त्यांचे साथी झाले पाहिजे. ते आपले उत्तरदायित्व आहे, या भावनेने सार्‍यांनी एकवटले पाहिजे. सुनीताच्या या कथनातून पारध्यांचे वास्तव आपल्यासमोर आले. पण अजूनही कितीतरी लोक परिघाबाहेरचे जीवन जगत आहेत. त्यांचे जगही उजागर व्हायला हवे. लोकशाही प्रक्रियेत त्यांनाही सामील होता आले पाहिजे. शिक्षण, मानवी हक्क, नागरी हक्क, राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य त्यांनाही मिळाले पाहिजे. हे आव्हान फार मोठे आहे. हिमनगाचे एक टोक पाण्याबहेर दिसावे. मात्र त्याचा सात अष्टमांश भाग पाण्याखाली असावा, तसे अनेकानेक जाती-जमातीचे जीवन आजही ‘अदृश्य’ आहे. ते दृश्य करायला हवे, जाती-पातीचे राजकारण सोडून न्याय्य हक्कांसाठी लढण्याचे या समाजाचे प्रयत्न फलद्रुप व्हावेत, यासाठी आपण जितके निष्ठेने काम करू, तितका आपला समाजही बळकट होईल. शेवटी देश नकाशावरील रेषांचा नसतो, तर हाडामांसाच्या माणसांचा असतो. देशातील बहुसंख्य माणसे जर असे अंध:कारयुक्त जीवन जगत असतील तर स्वातंत्र्य, समता, बंधुत्व आणि सामाजिक न्याय या त्यांच्यासाठी केवळ भोंगळ कल्पना राहतील. धर्माच्या नावावर बाजार भरवणार्‍यांचे दंगे करून गरिबांना एकमेकांशी झुंजवत ठेवण्याचे कारस्थान यशस्वी झाले तर मग सगळेच अवघड आहे!


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ]