सुषमा देशपांडे -

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आषाढी एकादशीच्या निमित्ताने ‘वारी विवेकाची’ या व्याख्यानमाले अंतर्गत ‘वारकरी संत महिलांची अभिव्यक्ती’ या विषयावर सुषमा देशपांडे यांच्या व्याख्यानाचे हे शब्दांकन…!
तुकाराम, ज्ञानदेव, एकनाथ, नामदेव या सर्वांचे अभंग आपण वाचत आहोतच. पण बरीच वर्षेमहिला संतांच्या साहित्याची दखल आपल्याकडे घेतली जात नव्हती. सातशे वर्षांपूर्वी महिला संतांनी रचलेले अभंग आपल्यापर्यंत पोचले आहेत, हे विशेष आहे. महिला जवळपास वर्षभर काम करतच असतात. त्यामुळे महिलांना वारीचा एक महिना विश्रांतीचा मिळतो. वारीत पुरुष स्वयंपाकाची कामे करतात, मोकळे संवाद होतात. या बायका चालतात, नाचतात. संत स्त्रियांना वेगळं काय वाटलं होतं? विठ्ठल हे महिला संतांचं व्यक्त होण्याचं माध्यम होतं. सर्व संत जसं म्हणतात, त्याप्रमाणे महिला संत सुद्धा त्यांची भावना व्यक्त करतात :
विठ्ठल माझा देव| विठ्ठल माझा भाव|
विठ्ठल माझा गुरू| विठ्ठल माझा तरू॥
महिला संतांनी लिहिलेले अभंग हे पुरुष संतांनी लिहिले, असा आक्षेप होता; पण मी शोध घेतला. मला असं कळलं की, या सर्व महिला संत विठ्ठलाच्या माध्यमातून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या बाहेर पडू इच्छितात.
संत मुक्ताबाई (ज्ञानदेवांची धाकटी बहीण, निवृत्तिनाथ तिचे गुरू होते) सर्व महिला संत गुरूंना अपार महत्त्व देतात. मुक्ताबाई म्हणतात –
मी सद्गुरूची लेक, भाव एक |
बाई मी निसंग धांगडी, फेकिली प्रपंच लुगडी |
नाकी नाही नथकडी॥
माझे नाव म्हणते आवडी, जग भुलवी ॥
दुसर्या एका अभंगात मुक्ताबाई म्हणतात –
सद्गुरू माझा चंद्रमौळी, माझ्या काखेत देऊन झोळी |
मज हिंडवी आळोआळी, जन म्हणती सुकाळी, होते बहु सुख ॥
पुढे त्या म्हणतात,
गुरूने मज पाजीली भांग|
मग घडला संत संग॥
गुरू मजला मग सांगे मारुनी हाक |
ऐसी म्हणे मुक्ताबाई, जागे शरण गुरू पायी |
जन्ममरण नाही, ऐसी भाग ॥
आता आपण निर्मळा आणि सोयराबाई; ज्या स्वतःला नेहमी चोखा मेळ्याची महार म्हणून सांगत असे, त्यांच्याबद्दल समजून घेऊ. निर्मळा ही तिची नणंद आहे आणि निर्मळाचे सांसारिक आयुष्य चांगले नव्हते. त्यांचं जे आयुष्य आहे ते स्वतःच्या अनुभवातूनच आलं आहे. ती म्हणते –
चहूकडे देवा, दाटला वणवा|
का न कळवळा, तुज लागे |
सापडले संधी, संसाराचे अंगी|
सोडवी लागबगी मायबाप ॥
बहु मज उबग आला असे देवा |
धावे तू केशवा, लवलाही ॥
तुजविण मज कोण गणगोत|
तूच माझा हितकर्ता ॥
निर्मळा म्हणोनि, पायी घाली मिठी,
परतोनी ना लोटी, मायबापा ॥
ती खूप एकटी पडलेली आहे आणि ती म्हणते –
देह चित्त मन, करी तळमळ |
न चालेची बळ काय करू ॥
आजकाल खेडोपाडी किंवा शहरात खूप बायका एकट्या पडलेल्या असतात, त्या बोलू शकत नाहीत. पण निर्मळा बोलते. आणखी एका ठिकाणी ती म्हणते –
मज नामाची आवडी| संसार केला देशधडी ॥
सापडले वर्म सोपे| विठ्ठलनाम मंत्र जपे |
नाही आणिक साधन| सदा गाई नारायण ॥
निर्मळा म्हणे मना| छंद एवढा पुरवावा|
सोयराबाईर्ंचा एक अभंग स्त्रियांच्या मासिक पाळी धर्माविषयी सुद्धा बोलतो. आजही हा अभंग खूप महत्त्वाचा आहे. महिन्याच्या या काळात स्त्रियांवर अनेक बंधने येतात. त्यावर त्या बोलतात –
देहासी विटाळ म्हणती सकळ |
आत्मा तो निर्मळ शुध्दबुद्ध ॥१॥
देहिंचा विटाळ देहिंच जन्मला |
सोवळा तो झाला कवण धर्म ॥२॥
विटाळावाचोनी उत्पत्तीचे स्थान |
कोण देह निर्माण नाही जगीं ॥३॥
म्हणुनी पांडुरंगा वानितसे थोरी |
विटाळ देहांतरी वसतसे ॥४॥
देहाचा विटाळ देहिंच निर्धारी |
म्हणतसे महारी चोखियाची ॥५॥
हे सोयराबाईंनी कितीतरी आधी सांगून ठेवलं आहे, तरी आजच्या आधुनिक जगात, सुशिक्षित लोक सुद्धा या विषयावर गैरसमज बाळगून आहेत, हे खेदजनक आहे. ही सोयरा संसारावर सातत्याने भाष्य करते –
अवघे सुखाचि सांगाति |
दु:ख होतां पळतीं आपोआप ॥१॥
भार्या, पुत्र, भगिनी, माता आणि पिता |
हे अवघे सर्वथा सुखाचेचि ॥२॥
इष्ट आणि मित्र स्वजन सोयरे |
सुखाचे निर्धारिं आप्तवर्ग ॥३॥
अंतःकाळी कोण नये बरोबरी |
म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥
सोयरा तक्रार करते की, विठ्ठल मला भेटला नाही. मैत्रीची भावना तिला त्याच्यात दिसते. त्याबद्दल ती म्हणते –
बैसोनी एकांती बोले गुजगोष्टी |
घालोनियां मिठी चरणासी ॥१॥
बहु दीस झाली वाटतसे खंती |
केधवां भेटती बाई मज ॥२॥
तुम्हांसी तों चाड नाहीं आणिकाची |
परी वासना आमुची अनिवार ॥३॥
सोयरा म्हणे चला जाऊं तेथवरी |
गुजगोष्टी चारी बोलुं कांही ॥४॥
आता आपण नामदेवांकडे जाऊ या. नामदेवांची आई गोणाई आणि बायको राजाई यांना सुद्धा संतस्त्रिया म्हणून ओळखले जाते. गोणाईचा मुलगा नामदेव सगळीकडे ‘विट्ठलऽऽ विठ्ठलऽऽ’ करत फिरत असतो. यामुळे तिला फार राग येतो. ती विठ्ठलाशी पण भांडते. ती एका ठिकाणी ठामपणे म्हणते –
जन्मासी येऊनी पराक्रम धरी |
कां होशी संसारीं भूमिभार ॥
आणिकांचीं मलें संसारिक कैसी |
तूं मज झालासी कुलक्षण ॥ १॥
केसी नाहीं तुज या लोकांची लाज |
हेंचि तों मज नवल वाटे ॥
अभिमान, अहंकार सांडोनियां जगीं ॥
नाचतोसी रंगीं गीत ॥
ये विठोबा, पाहे मजकडे |
का गा केले वेडे बाळ माझे?॥
तुझे काय खादले? त्वा काय दिधले?|
भले दाखवले देवपण॥
आम्ही म्हणु तु रे कृपाळू असशी|
आता तु कळलासी, पंढरीराया॥
का रे देवपण आपुले भोगू पै जाणावेय
भक्ता सुख द्यावे हेळामात्रे॥
देव, देव होऊनिया अपेश का घ्यावे?|
माझे का बिघडावे, एकुलते बाळ॥
राजाई ही नामदेवांची बायको. राजाई आणि नामदेवांची आई गोणाई यांचं सासू-सुनेचं नाते फार रोचक आहे. राजाई म्हणते –
शिकविती ऐेसें तुझी नाइका |
नाहीं भय शंका लोकि– कांची ॥
लावोनी लंगोटी झालेती गोसावी |
आमुची ठेवाठेवी कोण ॥
राजाई ही विठ्ठलाशी नाही, तर रखुमाईशी संवाद करते. ती म्हणते –
दोन प्रहर रात्र पाहोनी एकांत |
राजाई वृत्तांत सांगे मातें ॥
अहो रखमाबाई विठोबासी सांगा |
भ्रतारासी का गा वेडे केलें ॥
वस्त्र पात्र नाहीं खाया जेवायासीं |
नाचे अहर्निशी निर्लज्जसा ॥
चवदा मनुष्ये आहेत माझे घरी |
हिंडतां दारोदारी अन्नासाठी॥
बरा मार्ग तुझी उमजोनी सांगा |
नामयाची राजाई भली नव्हे ॥
या सर्व स्त्रिया भिन्न-भिन्न जातीमधील आहेत. बहिणा या ब्राह्मण जातीमधील आहेत. वाईट ब्राह्मण्याबद्दल सुद्धा ती बोलते. ती तुकोबांना आपला गुरू मानते. त्या दोघांचा संवाद असावा अशा तिच्या अभंगात ती म्हणते –
मच्छ जैसा जळावांचोनी तडफडी |
तैसीच आवडी तुकोबाची ॥
अंतरींचा साक्षी असेल जो प्राणी |
अनुभवें मनीं जाणेल तो॥
स्त्रियेचे शरीर, पराधीन देह|
न चाल उपाव, विरक्तीचा॥
भ्रतार तो मज, वेढतो येकांती
भोगावे मजसी, म्हणोनिया॥
हा बुडावा जैसा डोहाआंत |
न फुंटतां ओतप्रोत पाणी ॥
बहिणी म्हणे तैसें झालें माझें मना |
तुकाराम खुणा ओळखी त्या ॥
अशी तुकारामांबद्दल तिला आपुलकी होती. तिला एक वेगळी शक्ती यातून मिळते. ती याबद्दल पुढं म्हणते –
सोडूनि लाज झाले निर्लज्ज, डौर घेउनी हाती |
प्रेम करुनि नाचे, अविद्या करुनि परती ॥
तिच्या अनुभवांनी, जे तिला समजते तशा बायका बदलत जातात.
अठराव्या शतकातील विठाचे अभंग ऐकून मी वेडी झाले होते. संसाराच्या फेर्यात ती अडकली होती.
ती म्हणते –
भ्रतार हो मजसी, ओढतो एकांती
भोगावे मजसी म्हणोनिया
ओढुनीया बहुत मारी तो मजसी
मध्य रात्री जाणा समयासी ॥
अस्वस्थ होऊन ती विठ्ठलाला साद घालते.
पुढे ती म्हणते –
करुणा येऊ दे आई
तुझे मी लेकरू
परदेशी करून टाकलेसी ॥
त्या काळात विठ्ठल तिचा आधार बनला. शेवटी ती तिचं घर सोडते. ती एका दिंडीत सामील होते. कुंदगोळ गावात जाते. तिथे ती चिदंबर स्वामींच्या मठात ती सामील होते. त्या स्वामींमध्ये तिला विठ्ठल दिसतो. त्यानंतर ती स्वतः आपल्या नवर्याला म्हणते –
तुझी सत्ता आहे देहावर समज,
माझेवरी तुझे किंचित नाही |
माझ्यावर तुझी सत्ता नाही, असं म्हणण्याची किती बायकांत आज हिम्मत आहे?
गोदा ही अशीच एक एकोणिसाव्या शतकातील कोल्हापूरची स्त्रीसंत आहे. ती सातव्याच वर्षी विधवा झाली. तिने स्वतःला दासी कधी म्हणवले नाही. आजच्या संदर्भात त्या काळात तिने स्वतःला विठ्ठलाचा दास म्हणवलं आहे.
पडिले स्त्री देहाचे बुंथी | स्वतंत्र फिरता न ये जगती ॥
त्याचे नि ते कृपामूर्ती| दर्शन होती तै सरे ॥
गोदा मुक्तीचा प्रचार, प्रसार करते आणि त्याबाबतची ठाम भूमिका घेते.
मुक्ताचिया डोळा बद्ध नाही कोणी|
अवघे जनीं मनीं मुक्त सारे॥
मुक्त अवघे मनी, मुक्त अवघे देही|
अवघे एक मुक्त पाहे ब्रह्मरूप|
स्थिरचर पाषाण, देव नारायण॥
कैसे बद्ध कोण निवडावे?|
माथा हस्तकृपा सद्गुरूने केली॥
चिंता दग्ध झाली बद्धतेची|
झाले नि:संग भोग भोगाया हो|
परात्पर पुरुषासी रत झाले अर्पुनिया काया हो॥
सांडिली लाज सारा लौकिक हो|
परात्पर पुरुषासी निजसदनी दिधला थारा हो॥
तयाविण न गमे लव पळहि जाता वाया हो|
दूर्लभ हे सूख नरदेहावाचूनी नाही हो॥
कान्होपात्राचा जन्म नायकिणीच्या घरात झाला आहे. तिने रचलेल्या अभंगात एक विशेष आहे. इतर महिला संतांना संसार आहे. कान्होपात्रा मात्र स्वतःला यातली मानत नाही. ती स्वतःला खालच्या जातीतील समजते.
दीन पतित अन्यायी | शरण आले विठाबाई ॥१॥
मी तो आहे यातिहीन | न कळे काही आचरण ॥२॥
मज अधिकार नाही | शरण आले विठाबाई ॥३॥
ठाव देई चरणापाशी | तुझी कान्होपात्रा दासी ॥४॥
यामुळे ती आपली व्यथा मांडत राहते. तिच्या निवेदनात आर्तता आहे. ती म्हणते –
पतित पावन म्हणविसी आधी |
तरी का उपाधि भक्तांमागें ॥१॥
तुझे म्हणवितां दुर्जेअगसंग |
उणेपणा सांग कोणाकडे ॥२॥
यानंतरची स्त्रीसंत नामदेवाच्या घरची आहे. तिचं नाव आहे नागी. रा. चिं. ढेरे यांना तिचे अभंग सापडले होते. तिचं लहानपणीच लग्न झालं होतं. नामदेवांप्रमाणे तिच्या सासरच्या घरी विठ्ठलाचे वातावरण नाही. तिच्या संपूर्ण अभंगात आर्तता आहे.
वाटुली पाहता उत्कंठीत मनी|
गेली विसरून तहान–भूक॥
प्राण व्याकुळ माझा होये कासावीस|
दिसती उदास दाहीदिशा॥
केले मनोरथ नव्हती होई पूर्ण|
तळमळीत मन चिंतातूर॥
म्हणतसे नागी काय करू|
जीवांना ना धरे धीर ॥
ती खूप अस्वस्थ झाली आहे. ती विठ्ठलाच्या देवळाकडे जाते.
सकळही संतजन पाहती विचारून
हे तव उन्मनी भोगीत असे, नेणे दुःखभाना नाठवीं
विगुंतले केशवि चित्त येथे ॥
जनाबाई ही नामदेवांकडे काम करणारी स्त्री आहे. तिचा विठ्ठल तिच्याबरोबर असतो, असं ती म्हणते.
स्त्रीजन्म म्हणुनी न व्हावें उदास |
साधुसंता ऐसे केले जनी|
संतांचे घरची दासी मी अंकिली |
विठोबाने दिली प्रेमकळा|
झाडलोट करी जनी| केर भरी चक्रपाणी॥
पाटी घेऊनियां शिरी| नेऊनियां टाकी दुरी॥
ऐसा भक्तिसी भुलला| नीच कामें करूं लागला॥
जनी म्हणे विठोबाला| काय उतराई होंऊ तुला॥
एके दिवशीं न्हावयास | पाणी नव्हतें विसणास ॥१॥
देव धांवोनियां आले | शीतळ उदक घे घे बोले ॥२॥
आपुल्या हातें विसणीं |
घाली जनीच्या डोयी पाणी ॥३॥
अरे विठ्या–अरे विठ्या | मूळ मायेच्या कारट्या ॥१॥
तुझी रांड रंडकी झाली | जन्मसावित्री चुडा ल्याली ॥२॥
तुझे गेले मढे | तुला पाहून काळ रडे ॥३॥
उभी राहूनी अंगणीं | शिव्या देत दासी जनी ॥४॥
ती चिडली तर विठ्ठलाशी कशी बोलते, हे यावरून आपल्याला कळेल.
जनीसाठी विठ्ठल कामात मदत सुद्धा करतो, अशी ती कल्पना करते.
तुळशीचे बनीं | जनी उकलीत वेणी ॥१॥
हातीं घेऊनियां लोणी | डोई चोळी चक्रपाणी ॥२॥
माझे जनीला नाहीं कोणी | म्हणुनी देव घाली पाणी ॥३॥
जनी सांगे सर्व लोकां | न्हांऊं घाली माझा सखा ॥४॥
देवाचं पदक चोरल्याचा जनाबाईंवर आरोप झाल्यावर ती म्हणते-
पदक विठ्ठलाचें गेलें | ब्राह्मण म्हणती जनीनें नेलें ॥१॥
अगे शिंपियाचे जनी | नेलें पदक दे आणुनी ॥२॥
देवासमोर तुझें घर | तुझें येणें निरंतर ॥३॥
म्यां नेलें नाहीं जाण | सख्या विठोबाची आण ॥४॥
धोतर झाडूनि पाहती | पडलें पदक घेऊनि जाती ॥५॥
जनीवरी आली चोरी | ब्राह्मण करिती मारामारी ॥६॥
धाविन्नले चाळीस गडी | जनीवरी पडली उडी ॥७॥
दंडीं लाविल्या काढण्या | विठो धांव रे धावण्या ॥८॥
चंद्रभागे रोविला शूळ | जनाबाईस आलें मूळ ॥९॥
हातीं टाळी वाजविती | मुखीं विठ्ठल बोलती ॥१०॥
विलंब लागला ते वेळीं | म्हणती जनीला द्यारे सुळीं ॥११॥
ऐसा येळकोट केला | जनी म्हणे विठो मेला ॥१२॥
तंव सुळाचें झालें पाणी | धन्य म्हणे दासी जनी ॥१३॥
विठ्ठलाशी नातं किती माणुसकीच्या पातळीवर आहे, हे सांगताना जनाबाई म्हणते –
धरिला पंढरीचा चोर, प्रेमें बांधोनियां दोर
हृदयी बंदिवान केला, आत विठ्ठल कोंडला ॥
पुढे ती म्हणते –
देव खाते, देव पिते |
देवावरी मी निजतें ॥१॥
देव देते, देव घेते |
देवासवें व्यवहारिते ॥२॥
देव येथें, देव तेथे |
देवाविणें नाहीं रीतें ॥३॥
जनी म्हणे विठाबाई |
भरुनि उरलें अंतरबाहीं ॥४॥
जनाबाईचा हा सगळ्यात लोकप्रिय अभंग सांगायलाच पाहिजे,
डोईचा पदर आला खांद्यावरी |
भरल्या बाजारीं जाईन मी ॥१॥
पंढरीच्या पेठे मांडियेले पाल |
मनगटावर तेल घाला तुह्मी ॥३॥
जनी म्हणे देवा मी झालें येसवा |
निघालें केशवा घर तुझें ॥४॥
असे ताकदवान अभंग रचणार्या या सर्व बायका. विठ्ठल या सर्व बायकांना काय वाटतो असा मला प्रश्न पडतो.
विठ्ठल माय, विठ्ठल बाप|
विठ्ठल बाळ, विठ्ठल काळ|
विठ्ठल दिशा, विठ्ठल आशा|
विठ्ठल सखा, विठ्ठल स्वतः|
विठ्ठल स्वतःला, स्वतः विठ्ठल ॥
याप्रकारे विठ्ठलाचा हा स्वतःतील शोध या सर्व स्त्रीसंतांनी स्वतः घेतला आहे. हे अभंग सर्वांपर्यंत पोचावेत, अशीच अपेक्षा!
श्रीनिवास गडकरी यांनी सूत्रसंचालन केले आणि व्यक्तिपरिचय केला. विनोद वायंगणकर यांनी
लहानपण देगा देवा, मुंगीसाखरेचा रवा ॥
जया अंगी मोठेपण, तया यातना कठीण॥
हा अभंग सादर केला. डॉ. अरुण बुरांडे यांनी प्रास्ताविक केले.
शब्दांकन : राहुल माने