अंनिवा -
दि. 26 डिसेंबर 2019 रोजी दक्षिण भारतातून दिसलेल्या कंकणाकृती आणि महाराष्ट्रातून दिसलेल्या खंडग्रास सूर्यग्रहणाचा वेध राज्यातील बहुसंख्य शाखांनी शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच सर्वसामान्यांना दिला. जवळपास तीस हजार सौर चष्मे यानिमित्ताने शाखांनी वितरीत केले. ‘अंनिस’च्या माध्यमातून जवळपास दोन लाख विद्यार्थी व इतरांनी ग्रहणाची अनुभूती घेतली. ग्रहणाची पूर्वतयारी म्हणून ‘अंनिस’च्यावतीने नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्यस्तरीय कार्यशाळासुध्दा घेण्यात आलेली होती. या कार्यशाळेतून प्रशिक्षित झालेल्या कार्यकर्त्यांनी आपआपल्या ठिकाणी कार्यशाळा तर घेतल्याच; परंतु ग्रहणाच्या दिवशी प्रचंड प्रमाणामध्ये जनजागृतीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. विविध शाखांनी घेतलेल्या कार्याचा आढावा घेणे उचित ठरेल.
अंबाजोगाई
अंबाजोगाई व परिसरातून जवळपास 20,000 पेक्षा जास्त विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्गाने सौर चष्म्यांच्या सहायाने सूर्यग्रहणाचे निरीक्षण केले. ग्रहणकाळात खिचडी खाऊन अंधश्रध्देला मूठमाती देण्यात आली. योगेश्वरी नूतन विद्यालय, ‘गोंकुयो’ कन्या विद्यालय, सोमेश्वर कन्या प्रशाला, घटनांदूर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंबेफळ, जयप्रभा माध्यमिक विद्यालय, कुंबेफळ, मोहा माध्यमिक विद्यालय, सांडेश्वर विद्यालय, चनई, संभाजीराव बडगिरे विद्यालय ममदापूर, वेणूताई चव्हाण विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय, जिजामाता माध्यमिक व उच्च माध्य विद्यालय धर्मापुुरी आदी शाळांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला. डॉ. सुरेश खुरसाळे, प्रदीप चव्हाण, प्रा. मनोहर जायभये, गणेश कदम, श्रीमती चंद्रकला देशमुख, नीळकंठ जिरगे, राजेसाहेब चव्हाण, राजेसाहेब किर्दंत, बबन मस्के, सेापेश्वर जाधव, सुनील नरसिंगे, व्यंकटेश जोशी, विकास सातपुते, प्रा. हनुमंत मुढे व हेमंत धानोरकर यांनी आयोजनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.
बीड
सकाळी 7.45 ते 10.30 वाजेपर्यंत चार शाळामंध्ये जाऊन जवळपास 3500 विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाचा आनंद कार्यक्रमाव्दारे देण्यात आला. प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी ग्रहणाबद्दल माहिती दिली व अंधश्रध्दा दूर करण्याचा प्रयत्न केला. मधुकर जावळे, विजय घेवारे व प्रशांत दगडखैर यांनी संयोजन केले होते.
सातारा
सातारा येथील चार भिंती परिसरात सकाळी 8 वाजल्यापासून ग्रहणाविषयी उध्दव शिंगटे व प्रशांत पोतदार यांनी उपस्थितांना प्रबोधन केले. गर्भावर ग्रहणाचा कोणताही अनिष्ट प्रभाव पडत नसल्याचे प्रतिपादन वंदना माने यांनी केले. नीलेश पंडित हे दांपत्य व सातारमधील नागरिक उपस्थित होते. प्रकाश खटावकर, जयप्रकाश जाधव, दशरथ रणदिवे, भगवान रणदिवे दांपत्याने कार्यक्रमाचे संयोजन केले. ढगाळ वातावरणामुळे काही वेळ निराशा जाणवली होती. परंतु ती क्षणार्धात दूर होत होती.
इस्लामपूर
सूर्यग्रहणाच्या पूर्वतयारीच्या निमित्ताने कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सहकार्याने एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा, दोन शिक्षक कार्यशाळा आणि सहा विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यशाळा आयोजित केलेल्या होत्या. या शिबिरांमध्ये सूर्यग्रहण, अंधश्रध्दा आणि सूर्याशी संबंधित वैज्ञानिक प्रयागांचे विवेचन करण्यात येत होते. जवळपास 400 शिक्षक आणि पाच हजार विद्यार्थ्यांना शिबिराव्दारे संपूर्ण माहिती देण्यात आलेली होती. राज्यस्तरीय कार्यशाळेसाठी ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचे डॉ. विवेक माँटेरो व गीता महाशब्ध्दे यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीस विद्यार्थ्यांच्या टीमचे शिबिरासाठी मोलाचे योगदान राहिलेले आहे. संजय बनसोडे, डॉ. नितीन शिंदे, राहुल थोरात, डॉ. संजय निटवे, डॉ. प्रमोद दुर्गा, मयुरी जाधव, प्रा. प. रा. आर्डे, प्रज्ज्वल पाटील, शिवानी चौगुले, दीपक सुतार, संपदा कदम, वैष्णवी घारे यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी महत्त्वाचे सहकार्य केले आहे.
ग्रहणादिवशी कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात प्रा. प्रताप पाटील, प्रा. विष्णू होनमोेरे व प्रा. विश्वास सुतार यांनी सूर्यग्रहणाचे कॅमेर्याव्दारे थेट प्रक्षेपण; तसेच चॅनेलवरील थेट प्रक्षेपण प्रदर्शित केले होते. सौर चष्म्याव्दारे सुध्दा सूर्यग्रहणाचा आनंद जवळपास 2000 विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी घेतला. ग्रहणाबद्दलची माहिती प्रा. प्राजक्ता विभ्ाूते व डॉ. प्रमोद दुर्गा यांनी दिली. गीता चव्हाण, प्रा. ए. बी. कुलकर्णी, सोनम पाटील, प्रा. अक्षय डवंग यांनी संयोजन केले. ग्रहणकाळात अन्न ग्रहण करू नये, ही प्रथा दूर करण्यासाठी सामुदायिकरित्या भोजनाचा आस्वाद घेण्यात आला. शाखेच्या वतीने जवळपास अठरा हजार सौर चष्म्ये वितरीत करण्यात आले होते.
नवेखेड
अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी विद्यालयामध्ये जवळपास 500 विद्यार्थ्यांनी सौर चष्म्याव्दारे सूर्यग्रहणाचा आनंद घेतला. तसेच ग्रहणविषयक अंधश्रध्दा दूर करण्यात आल्या. प्रा. माळी यांनी या कार्यक्रमाचे संयोजन केले होते. तसेच पार्वती खेमचंद विद्यालय, ताकारी येथे विक्रम पाटील सरांनी जवळपास 400 सौर चष्म्यांच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाच्या आविष्कारची अनुभ्ाूती दिली.
जळगाव
दिगंबर कट्यारे, दिलीप भारंबे, हेमांगी टोक यांनी नूतन मराठा महाविद्यालय, जळगाव येथे जवळपास 500 विद्यार्थ्यांना सौर चष्म्यांव्दारे सूर्यग्रहणाविषयी माहिती दिली. तसेच सूर्यग्रहणाविषयी असलेल्या अंधश्रध्दांचा ऊहापोह करण्यात आला.
वर्धा
स्वावलंबी विद्यालय, वर्धाच्या मैदानावर व रामनगर येथे सौर चष्म्यांव्दारे सूर्यग्रहणाचा उपक्रम राबवण्यात आला. गजेंद्र सुरकार, प्रकाश कांबळे यांनी उपस्थितांना सूर्यग्रहणाविषयक माहिती दिली.
अकोला
‘अंनिस’चे राज्य सरचिटणीस बबनराव कानकिरड व डॉ. संजय तिडके यांनी श्री शिवाजी महाविद्यालयातील ‘विवेक वाहिनी’ व राष्ट्रीय सेवा योजनेच्या सहकार्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सूर्यग्रहणाबद्दल मार्गदर्शन केले. उपप्राचार्य डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. अस्मिता ढोले, सौ. म्हळसणे, प्रा. नायसे यांनी संयोजन केले. दोन हजार सौर चष्म्यांव्दारे विद्यार्थ्यांनी सूर्यग्रहणाचा आनंद लुटला.
कोल्हापूर
वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पाच्या राज्य सहकार्यवाह सुजाता म्हेत्रे, संजय कळके, किरण गवळी, यश आंबोळे यांनी विविध शाळांमधून सूर्यग्रहणापूर्वी, प्रबोधनात्मक शिबिरांचे संयोजन केले होते. किरण गवळी यांनी वृत्तपत्रातून लेख लिहिले, तर सुजाता म्हेत्रे यांची ‘रेडिओ सिटी’वर मुलाखत प्रसारित झाली होती.
लातूर
राजर्षी शाहू कॉलेजमध्ये ग्रहणाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने अंबाजोगाईचे हेमंत धानोरकर यांनी एकदिवसीय कार्यशाळेमध्ये बहुमोल मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. महादेव गवाणे, डॉ. ओ. व्ही. शहापूरकर, माधव बावगे प्रमुख उपस्थित होते.
ग्रहणादिवशी जवळपास 4000 सौरचष्म्ये उपलब्ध करण्यात आले होते. ज्ञानप्रकाश शाळा, हजरत सुरश्हावली उर्दू शाळा, राजर्षी शाहू कॉलेज, संस्कारवर्धिनी शाळा, नळेगाव, चाकूर, अहमदपूर तालुक्यातसुध्दा ग्रहण पाहण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. ग्रहणकाळात विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी भाज्या चिरल्या व जेवणाचा आस्वाद घेतला. कार्याध्यक्ष अनिल दरेकर, हरिदास तम्मेवार, बाबा हलकुडे, सुधीर भोसले, चंद्रकांत भोजने, शहर कार्याध्यक्ष डॉ. दशरथ भिसे, रमेश माने, विद्यासागर काळे, रूकसाना मुल्ला, बब्रुवान गोमसाळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
शहादा
ग्रहणविषयक असणारी मुख्य अंधश्रध्दा शाखेच्या सहकार्याने, कुलकर्णी रुग्णालयाच्या वतीने दूर करण्यात आली. डॉ. मालविका कुलकर्णी यांनी ग्रहणाचा दुष्परिणाम कोणताही गर्भावर होत नाही, असे केवळ प्रतिपादन न करता गरोदर महिलांना व नवजात बाळाच्या आईला देखील सौरचष्म्यांव्दारे ग्रहण दाखवले. विकास प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, शारदा कन्या विद्यालय, वसंतराव नाईक हायस्कूल, सातपुडा विद्यालय लोणखेडा, आडगाव येथील आदर्श हायस्कूल, तालुका शहादा उभ् जी??? शेतकी विद्यालय कळंबू, महावीर इंग्लिश मीडियम स्कूल, शहादा यांच्यासह अन्य शाळांमध्ये माहिती देण्यात आली.
जालना
मुख्याध्यपिका श्रीमती लता चव्हाण, ज्ञानेश्वर गिराम, अनंतकुमार शीलवंत, जनाबाई भ्ाुंबे, विमलताई काळे यांनी जिल्हा परिषद शाळा, सारवाडी येथे सौरचष्म्यांव्दारे सूर्यग्रहण पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली होती. गिराम सरांनी ग्रहणाविषयीची सविस्तर माहिती दिली. बराच वेळ असलेल्या ढगाळ वातावरणानंतर दिसलेला ग्रहणाचा आविष्कार विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित करून गेला.
नंदुरबार
चवरा इंग्लिश मीडियम स्कूल, डी. आर. हायस्कूल आणि पी. के. पाटील माध्यमिक विद्यालय, नंदुरबार; तसेच माध्यमिक विद्यालय कोकणीपाडा, जिल्हा परिषद केंद्र शाळा कोठली आणि रजाळे येथे 1200 सौर चष्म्यांव्दारे सूर्यग्रहणाचा अनुभव विद्यार्थ्यांना देण्यात आला.
मुंबई
डी. ए. व्ही. शाळा मालाड, मनपा शाळा दादर, प्रभादेवी संकुल, उपनगरीय चाळी, विदर्भ शाळा; तसेच मालाड रेल्वे स्टेशनवर सूर्यग्रहणाचा आनंद उपस्थितांना सौरचष्म्यांव्दारे देण्यात आला. रेल्वे पोलीस, कष्टकरी कामगार; तसेच सर्वसामान्यांना सूर्यग्रहण दाखवण्यात आले. ग्रहण पाहिल्यानंतर एका साधूचे गरोदर महिलांच्या विषयी असलेल्या अंधश्रध्देबाबत प्रबोधन केल्यानंतर, कार्यकर्त्यांना प्रणाम करून जात त्याने एक सुखद धक्का दिला. नंदकिशोर तळाशीलकर, विजय परब, संगीता पांढरे, सचिन थिटे, प्रतीक्षा शितोळे, शहाजी पातोडेकर, संदेश बालगुडे, प्रतिकेत, शुभदा निखार्ग, रूपेश शोभा शंकर व सुनीता देवलवार यांचा उपक्रमाच्या संयोजनामध्ये प्रमुख सहभाग होता. प्रभादेवी, दादर, गोरेगाव, मालाड, दहिसर, खार, घाटकोपर, फोर्ट या भागातसुध्दा सूर्यग्रहणाविषयी जागरूकता निर्माण करण्यात कार्यकर्त्यांना यश आले.
नवी मुंबई
‘सूर्यग्रहण समजून घेऊया आणि अंधश्रध्दांना फाटा देऊया’ या अभिनव उपक्रमाव्दारे प्रा मच्छिंद्रनाथ मुंडे आणि सुशीला मुंडे यांनी महानगरपालिका शाळा क्र. 104 व 15 रबाळे, शाळा क्र 101 व 15 शिरवणे, शाळा क्र 117 व 2 दिवा गाव, शाळा क्र. 1, 7 व 20 तुर्भेगाव येथील जवळपास 2500 विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि सौरचष्म्यांव्दारे सूर्यग्रहणाचा आनंद लुटण्यास मदत केली. ग्रहणकाळात अन्न-पाणी वर्ज असणारी अंधश्रध्दा दूर करण्यासाठी जाणीवपूर्वक जेवणाचा आस्वाद घेण्यात आला. भारती अनारे, प्रभावती क्षीरसागर, गवळी सर, पी. ए. पठारे, तुषार फाळके, विजय खरात, अमोलकुमार वाघमारे, गजानन जाधव, उत्तम रोकडे, सुगत पनाड व अशोक निकम यांनी संयोजन केले.
ठाणे
बाल विद्यामंदिर किसननगर, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय, नेहरूनगर ठाणे याठिकाणी सूर्यग्रहणाचे आयोजन करण्यात आले होते. टेलिस्कोप व सौर चष्म्यांच्या माध्यमातून प्रा. प्रकाश पारखे व प्रियंका पारखे यांनी सूर्यग्रहणविषयक माहितीव्दारे अंधश्रध्दांवर प्रकाश टाकला. अॅड. वैभव शिरमोळे, कार्याध्यक्ष अक्षिता पाटील, नमिता, आकाश क्षीरसागर, ़ॠषिकेश, अजय भोेसले व वंदनाताई शिंदे यांनी संयोजन केले होते.
अलिबाग
नितीन राऊत यांनी सौरचष्म्यांव्दारे उपस्थित विद्यार्थ्यांना सूर्यग्रहणाचा आनंद लुटण्यास मदत केली. ग्रहण आणि अंधश्रध्दा यावरील त्यांनी केलेले विवेचन विद्यार्थ्यांना मनापासून भावले.
गडहिंग्लज
हलकर्णी भाग हायस्कूल हलकर्णी, बी. एम. टोणपी विद्यालय, उर्दू प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, केंद्रशाळा हलकर्णीचे विद्यार्थी व ग्रामस्थ सूर्यग्रहण पाहण्यासाठी उपस्थित होते. सौर चष्म्यांव्दारे सूर्यग्रहणाचा आनंद उपस्थितांना देतच ग्रहणविषयक अंधश्रध्दांचे निर्मूलन करण्यात आले. शाखेचे कार्यवाह भास्कर सुतार, आर. एस. पाटील सर आणि बालाजी पवार सर यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
अंबरनाथ
शहराच्या मध्यभागी असलेल्या गावदेवी मैदान, शिवाजीनगर येथे डॉ. शामकांत जाधव व किरण जाधव यांनी संयोजन केले होते. अमोल चौगुले यांनी सूर्यग्रहणाविषयी माहिती दिली. जवळपास 170 विद्यार्थ्यांनी सौरचष्म्यांव्दारे सूर्यग्रहणाचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे रिक्षाचालकांनी देखील सूर्यग्रहण पाहण्याची संधी घेतली. नवलेनगर येथे अमोले चौगुले व बबन सोनवणे यांनी उपक्रमाचे नियोजन केले होते.
नागोठणे
स्व. बाळासाहेब ठाकरे बालोद्यान, राजिप कचेरी शाळा, नागोठणे येथे विवेक सुभेदार, मोहन भोईर, विजया चव्हाण, नरेश पाटील, सुनीता देशमुख यांनी सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केलेली होती. सूर्यग्रहणाची माहिती आणि सौरचष्म्यांव्दारे ग्रहण पाहण्याची सुविधा उपस्थितांना उपलब्ध करण्यात आलेली होती. ग्रहणकाळात खाण्या-पिण्याचे असलेले अंधश्रध्देचे बंधन तोडण्यासाठी चहापानाचे आयोजन जाणीवपूर्वक करण्यात आले होते.
औरंगाबाद
ज्ञानेश विद्या मंदिर शाळेत ग्रहण आणि अंधश्रध्दा या विषयावर शहाजी भोसले यांनी मार्गदर्शन केले. डॉ. सुषमा खुर्दे यांनी ग्रहण लागण्याची कारणमीमांसा स्पष्ट केली. भाऊसाहेब पठाडे, रंगनाथ खरात यांनी सौर चष्म्यांव्दारे सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था केलेली होती.
डोंबिवली
भागशाळा मैदानात; तसेच सरस्वती कॉलेजमध्ये सूर्यग्रहण पाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती. सुरेखा भापकर, किशोरी गरूड, मुकुंद देसाई, शाहीर शिंदे, रामदास देसाई, अविनाश रत्नपारखी, नीलेश कांबळे, निशिकांत विचारे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
संपादन : डॉ. नितीन शिंदे
संकलन : राहुल थोरात