-
दि. 25 मार्च, 2022 रोजी सकाळी प्रसिद्ध मार्क्सवादी विचारवंत सुधीर बेडेकर यांचे वयाच्या 76 व्या वर्षी अनपेक्षितरित्या निधन झाले. मराठी विचारविश्वातील एका महत्त्वाच्या व्यक्तिमत्त्वाचा अंत झाला.
1970 आणि 1980च्या दशकांमध्ये त्यांनी प्रथम ‘मागोवा’ व नंतर ‘तात्पर्य’ या वैचारिक मासिकांचे संपादन केले व त्यात विपुल लेखन केले. ‘निशासूक्त की सूर्यगर्जना?’ हा प्रदीर्घ लेख, ‘हजार हातांचा ऑक्टोपस’ हा निवडक लेखांचा संग्रह; तसेच ‘विज्ञान कला आणि क्रांती’ हे पुस्तक या त्यांच्या काही महत्त्वाच्या रचना. अलिकडेच त्यांनी आपले वडील, प्रसिद्ध मार्क्सवादी तत्त्वज्ञ दि. के. बेडेकर यांच्या अप्रकाशित साहित्याचे संपादन करून आपल्या प्रस्तावनेसह प्रकाशन केले होते. त्यांच्या विचाराला दोन घटकांनी आकार दिला होता, असे म्हणता येईल. अर्थकारण, राजकारण, कला, साहित्य, तत्त्वज्ञान, इतिहास – कोणतेही ज्ञानक्षेत्र त्यांना परके नव्हते. त्यावर ते अधिकाराने लिहीत. अनेक आंतरराष्ट्रीय वैचारिक प्रवाहांची; विशेषतः विसाव्या शतकाच्या मध्यकालातील नवमार्क्सवादी प्रवाहाची त्यांनी आपल्या लेखनातून ओळख करून दिली. महाराष्ट्राच्या दोनेक पिढ्यांना त्यांनी सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध केल्या, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
‘मागोवा’ मासिकामागे उभ्या असलेल्या ‘मागोवा’ गटाचे 1975 मध्ये विसर्जन झाल्यानंतर 1980च्या दशकात काही काळ ते मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सभासद होते व त्यानंतर सहानुभूतीदार. तसे असले तरी अनेक डाव्या प्रवाहांतील निरनिराळ्या व्यक्तींशी व जनआंदोलनांशी त्यांचे स्नेहबंध कायम होते. पुण्यातील समाजविज्ञान अकादमी व भगतसिंग हॉल त्यांच्या पुढाकाराने व योगदानानेच उभे राहिले व चालू राहिले. अकादमीच्या माध्यमातून त्यांचा पुढील पिढीशी सतत संबंध राहिला. त्यांचे साहित्य हे आजच्या पिढीलाही मार्गदर्शन करणारे ठरेल. ‘निशासूक्त की सूर्यगर्जना?’ हा त्यांनी ‘लिटल मॅगझिन’ चळवळीच्या निमित्ताने लिहिलेला प्रदीर्घ लेख आजच्या साहित्यालाही आव्हान देतो. ‘हजार हातांचा ऑक्टोपस’ हा त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह आजच्या व्यवस्थेलाही तितकाच लागू होतो. तेच त्यांच्या ‘विज्ञान कला आणि क्रांती’बद्दलही म्हणता येईल. त्यांचे सारे साहित्य सहजरित्या उपलब्ध करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने सुधीर बेडेकर यांना विनम्र अभिवादन!
– संपादक