सुभाष थोरात - 9869392157
थोर उर्दू कवी डॉ. राहत इंदौरी यांचे हृदयविकार आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आकस्मिक निधन झाले. त्याबद्दल पुरोगामी जगतात दुःखाची भावना तीव्रपणे व्यक्त झाली. तसेच सोशल मीडिया असो, प्रिंट मीडिया किंवा इतर प्रसार माध्यमे; सर्व पातळीवरून त्यांच्या निधनाची दखल घेतली गेली.
एखाद्या कवीच्या मृत्यूनंतर अशी भावना सार्वत्रिक पातळीवर पहिल्यांदाच पाहावयास मिळाली. यातून भारतात आणि भारताबाहेर ते किती लोकप्रिय होते, हे दिसून येते. इतकी लोकप्रियता अलिकडच्या काळात फारच थोड्या लोकांच्या वाट्याला आलेली आहे. त्यात आपण काही दिवसांपूर्वी निधन पावलेल्या अभिनेता इरफान खान यांचा उल्लेख करू शकतो. राहत इंदौरी यांच्या लोकप्रियतेचे रहस्य अर्थातच त्यांच्या जादुई शायरीत होतं, जी जनसामान्यांच्या दुःखाचा आवाज होऊन प्रगट होत असे.
कवी आणि चित्रकार असणार्या राहत इंदौरी यांचा जन्म 1950 मध्ये मध्य प्रदेशातील इंदौर येथे एका कामगार कुटुंबात झाला. त्यांचे वडील गिरणी कामगार होते. त्यामुळे लहानपणापासूनच शोषणाची, दारिद्य्राची ओळख होती, अनुभव होता. तोच त्यांच्या शायरीमध्ये उतरलेला दिसून येतो. हा जीवनातील तळागाळाचा अनुभव आणि उर्दू शायरीची पुरोगामी परंपरा यांच्या संयोगातून राहत इंदौरी यांचे व्यक्तित्व आकाराला आले.
त्या-त्या काळच्या सत्ताधार्यांच्या आणि धर्मांधांच्या विरोधात निर्भीडपणे उभे राहून जनतेच्या दुःखाची दखल घेणारी शोषणाला विरोध करणारी पुरोगामी शायरांची उर्दू भाषेत मोठी समृद्ध परंपरा आहे. महाकवी मिर्झा गालिब हे एकच नाव घेतले तरी त्याची प्रचिती येते. त्या काळी मार्क्स यांनी, अनुवाद झालेल्या गालिब यांच्या रचना वाचून प्रभावित होऊन त्यांना पत्र पाठवले होते. त्यांच्या शायरीचे कौतुक केले होते. उत्तरादाखल गालिब यांनी मार्क्सला आभाराचे पत्र पाठवले होते. दोन्ही पत्रे आज ब्रिटीश ग्रंथालयांमध्ये उपलब्ध आहेत, म्हणजे त्या काळात गालिब यांची प्रसिद्धी सातासमुद्रापलिकडे गेली होती. तसेच सारे ‘जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा…’ लिहिणारे मोहम्मद इक्बाल, ‘सब ताज उछाले जायेंगे सब तख्त गिराये जायेंगे’ असे म्हणणारे फैज अहमद फैज अथवा ‘ये दुनिया मिल भी जाए तो क्या है’ असे म्हणणारे साहीर लुधियानवी अथवा ‘औरत’सारखी स्त्रीमुक्तीचा पुकारा करणारी कविता लिहिणारे कैफी आजमी असोत, या सर्वांची पुरोगामी परंपरा राहत इंदौरी यांनी पुढे चालवली, समृद्ध केली. वरील नावे सर्वसामान्य जनतेला माहीत आहेत; परंतु असे कितीतरी छोटे-मोठे उर्दू शायर होऊन गेले आहेत की, ज्यांनी मानवी जीवनातील सत्याला भिडणारी, सर्वसामान्य जनतेची बाजू घेऊन सत्ताधार्या विरोधात उभी राहणारी कविता लिहिली.
जनकवींची इतकी समृद्ध परंपरा इतर भाषांत अभावानेच आढळते. राहत इंदौरी यांनी या परंपरेत स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. आपण नेहमी म्हणतो की, कलेने सत्य सांगितले पाहिजे; तसेच वर्तमान वास्तव कलात्मक पद्धतीने आविष्कृत करताना वास्तवाच्या गतिशीलतेचे भान ठेवून भविष्याचे सूचन केले पाहिजे. कवी हा द्रष्टा असतो आणि विचारवंतही; त्यामुळे भविष्यात काय होईल, काय होऊ शकते, याची जाणीव वास्तवाच्या गतिशीलतेच्या आकलनामुळे कवीला असते. राहत इंदौरी यांची शायरी या कसोटीला पुरेपूर उतरते. त्यांनी तीस-पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेली शायरी आजच्या वर्तमान काळात एकदम प्रासंगिक ठरते, ती त्यामुळेच. त्यांचे दोन शेर पाहा, जे त्यांनी पस्तीस वर्षांपूर्वी लिहिले होते आणि आज सर्वांना माहीत आहेत, ते आपण पुन्हा इथे उधृत करू – ‘सबका का खून है सामील यहाँ कि मिट्टी में! किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है।’ किंवा ‘मेरी निगाहों में ओ शक्स आदमी ही नहीं है! जिसे लगा है जमाना खुदा बनाने में!’ हे आज कोणाला लागू पडते, हे सांगायची गरज नाही. त्यामुळेच त्यांच्या शायरीला आज मोठ्या प्रमाणात दाद मिळत आहे. त्यांच्यात दोन ओळींच्या शेरमध्ये आजच्या राजकीय परिस्थितीवर समग्रपणे भाष्य करण्याची क्षमता होती. असे हजारो शेर सोशल मीडियावर उपलब्ध आहेत. सत्ताधार्यांच्या विरोधात लिहिण्यात मोठे धाडस, प्रामाणिकपणा आणि मूल्यांबद्दलची निष्ठा लागते. राहत इंदोरी यांच्याकडे या गोष्टी होत्या. एका शेरमध्ये त्यांनी म्हटले आहे – ‘मेरे अंदर से सब कुछ हो गया रुकसत! मगर एक चीज बाकी रही जिसे इमान कहते है!’ वरील गोष्टी असल्याशिवाय कुठलाही कवी, कवी होऊ शकत नाही. त्याच्याजवळ सत्ताधार्यांच्या विरोधात उभं राहण्याचं बळ येत नाही. परत आजचे सत्ताधारी साधेसुधे नाहीत, ते फॅसिस्ट आहेत, त्यांना कसली नीतिमत्ता नाही; शिवाय मुस्लिमद्वेषी. अशा लोकांशी दोन हात करणे सोपे नसते आणि तेही मुस्लिम असून. अर्थात, ते स्वतःला इतक्या सीमित पद्धतीने पाहत नसत. ते स्वतःला हिंदुस्तानी म्हणून घेत. म्हणून जेव्हा त्यांना कोणीतरी ‘जिहादी’ म्हटलं होतं, त्याला उत्तर देताना त्यांनी विनोदी पद्धतीने म्हटले आहे – ‘माझे वय आता 70 च्या आसपास आहे. परंतु आजपर्यंत मला माहीतच नव्हतं की, मी ‘जिहादी’ आहे. या पार्श्वभूमीवर त्यांचा सुप्रसिद्ध शेर आहे, जो आजकाल सर्वत्र उधृत केला जातो – ‘मेरे निधन के बाद मेरी अलग पहचान लिख देना! मेरे पेशानी पर हिंदुस्तान लिख देना!’
एखाद्या देशात जेव्हा बहुसंख्याक, धर्मांध राष्ट्रवादाच्या, अंध राष्ट्रवादाच्या प्रभावाखाली येतात, तेव्हा त्या देशातील अल्पसंख्याकांच्या असुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ होते. या परिस्थितीच्या दोन प्रतिक्रिया अल्पसंख्याक समाजात उमटतात, एक ते धार्मिकतेकडे; पर्यायाने तेही धर्मांधतेकडे वळतात आणि दुसरी प्रतिक्रिया ते आपले राष्ट्रीयत्व सिद्ध करू पाहतात. कारण त्यांच्या राष्ट्रीयत्वाबद्दल, राष्ट्रप्रेमाबद्दलच शंका उपस्थित केलेल्या असतात. आजच्या भारतीय राजकीय परिस्थितीत आपल्याला हे ठळकपणे दिसून येते. एक तर या शतकाच्या सुरुवातीपासूनच हिंदू महासभा आणि ‘आरएसएस’ने कायम मुस्लिमांबद्दल खोटेनाटे प्रवाद पसरवले आहेत. त्यांनी पसरवलेल्या खोट्या प्रवादामुळे बहुसंख्य जनता मुस्लिमांकडे दूषित नजरेने पाहते. डॉ. राहत इंदौरी यांच्या शायरीमधून ही भावना दिसून येते. वर उधृत केलेला शेर त्यातूनच प्रकट झाला आहे. ही भावना इतर धर्मियांच्या मनात येणार नाही, मुस्लिम धर्मियांच्या मनात येते, ती वरील पार्श्वभूमीवर.
महान जर्मन नाटककार, कवी ब्रेख्त यांनी म्हटले आहे की, अंधार आहे म्हणून काय झाले? गाणे असेलच अंधाराबद्दलचे आणि जेव्हा अंधाराचा कालखंड संपेल, तेव्हा जनता विचारेल ‘तेव्हा आमचे कवी काय करत होते?’ म्हणजे कवींवर फार मोठी सामाजिक जबाबदारी असते. जर्मनीमधील नाझीवादाच्या काळात जो नंगानाच झाला, त्यानंतर अनेक साहित्यिकांनी, कलावंतांनी अशी भूमिका घेतली की, आम्हाला माहीतच नव्हते की ‘फॅसिझम’ काय असतो. त्यामुळे असे घडेल याची कल्पना नव्हती. आज लेखक आणि कलावंतांना अशी भूमिका घेता येणार नाही. कारण ‘फॅसिझम’ची रक्तरंजित तालीम त्यांनी पाहिली आहे हिटलरच्या जर्मनीमध्ये. त्यामुळे त्यांना आता कुठलीही सबब नाही, लढलेच पाहिजे. राहत इंदौरींनी कवी म्हणून असलेली आपली जबाबदारी पार पाडली आहे. राहत इंदौरी यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, कोणी लेखणी घेवो अथवा न घेवो; परंतु एक नागरिक म्हणून प्रत्येकाचे समाजाबद्दल कर्तव्य असते. परंतु लेखणी उचलल्यानंतर मात्र जबाबदारी मोठ्या प्रमाणावर वाढते. राहत इंदौरींनी ही जबाबदारी गांभीर्याने पार पाडली आहे. देशामध्ये जी हुकूमशाहीची परिस्थिती निर्माण केली जात आहे, धार्मिक द्वेष पसरवला जात आहे, या पार्श्वभूमीवर आज मोठे-मोठे कलावंत तोंड शिवून बसले आहेत अथवा सत्ताधार्यांच्या पायी लोटांगण घालत आहेत. या पार्श्वभूमीवर राहत इंदौरी यांच्या शायरीचे कार्य खूप महत्त्वपूर्ण आहे. अंधाराशी दोन हात करण्याचे सामर्थ्य आणि प्रेरणा त्यांची शायरी देते.
शाखांओं से टूट जाये, ओ पत्ते नही है
हम आंधी से कहे, औकात में रहे।
आज देशाला मध्ययुगीन काळोखाच्या दिशेने घेऊन निघालेल्या प्रतिगामी शक्तींना आम्ही राहत इंदौरी यांच्या भाषेत सांगू इच्छितो – औकात में रहे। थोर शायर डॉ. राहत इंदोरींना क्रांतिकारी अभिवादन!