शिक्षणातून वैज्ञानिक दृष्टिकोन

अनिल चव्हाण -

‘वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे’ हे कर्तव्य असल्याचे भारतीय संविधानाने नागरिकांना सांगितले आहे. कलम ५१ क (मूलभूत कर्तव्य)/ज)मध्ये म्हटले आहे की, ‘विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे, हे नागरिकांचे मूलभूत कर्तव्य आहे.’

संविधानाला अभिप्रेत असणारा सुजाण नागरिक घडवणे, हे शिक्षणाचे काम आहे. त्यामुळे ‘वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे’ हे उद्दिष्ट शिक्षणामध्येही ठेवण्यात आले आहे.

दृष्टिकोन म्हणजे काय?

व्यक्तीचे वर्तन नियंत्रित करणारे तत्त्वज्ञान म्हणजे तिचा दृष्टिकोन होय. दृष्टिकोनामुळे व्यक्तीचे वर्तन नियंत्रित होते; वर्तन ठरते.

समतावादी तत्त्वज्ञानातून स्त्रियांकडे पाहण्याचा समतावादी दृष्टिकोन तयार होईल. अशी व्यक्ती स्त्रियांचा आदर करेल, विधवा विवाहाला प्रोत्साहन देईल. असे घडले तरच ‘त्या व्यक्तीमध्ये स्त्री-समानतेचा दृष्टिकोन तयार झाला’ असे म्हणता येईल.

वैज्ञानिक दृष्टिकोन तयार झालेली व्यक्ती मांजर आडवे गेले म्हणून पाच पावले मागे जाणार नाही किंवा कावळा ओरडला म्हणून पाहुण्यांची वाट पाहत बसणार नाही.

एखाद्याने वैज्ञानिक दृष्टिकोनावर खूप छान व्याख्यान दिले किंवा निबंध स्पर्धेत भाग घेऊन पहिला क्रमांक मिळवला, एवढ्याने ‘त्या व्यक्तीमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला आहे’ असे म्हणता येणार नाही. ‘तिला वैज्ञानिक दृष्टिकोनाची माहिती झाली आहे’ एवढेच म्हणता येईल.

‘दृष्टिकोन’ हा वर्तनातून समजतो.

‘दृष्टिकोन’ हा जीवनाचा भाग असतो. योग्य दृष्टिकोन व्यक्तीच्या जीवनाला दिशा देतो, तर चुकीचा दृष्टिकोन जीवनाची दशा करतो!

लहानपणापासून आलेले अनुभव,आई-वडिलांची- समाजाची शिकवण यांतून दृष्टिकोन घडत जातो. ‘चांगला  आणि सुजाण समाज घडवायचा असेल, तर व्यक्तीचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे’ या विचारातून संविधानामध्ये ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ हे कर्तव्य सांगितले आहे.

‘वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे’ हे विज्ञान विषयातील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. त्याबरोबरच एकूण शिक्षण व्यवस्थेमध्येही या उद्दिष्टाला महत्त्वाचे स्थान आहे.

‘वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेल्या व्यक्तीमध्ये कोणते वर्तन-बदल अपेक्षित आहेत’ याची नोंद शिक्षणशास्त्राच्या पुस्तकातून केलेली आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झालेली व्यक्ती..

१) निष्कर्ष काढताना, मत बनवताना पूर्ण माहिती घेईल; अपुर्‍या माहितीवरून निष्कर्ष काढणार नाही.

उदाहरणार्थ – ‘पाप वाढले, त्यामुळे निसर्गचक्र बदलले, पाऊस कधीही पडतो आहे.’ किंवा ‘मुली शिकू लागल्या, म्हणून पाऊस कमी झाला.’ अशी विधाने करणार नाही.

२) भोळसर समजुतीवर विश्वास ठेवणार नाही व अशा समजुती तपासेल.

उदाहरणार्थ – ‘मांजर आडवे गेले म्हणून काम होत नाही’ किंवा ‘तीन तिघाडा काम बिघाडा’ इत्यादी.

३) पूर्वग्रहदूषित दृष्टी  न ठेवता नवीन कल्पनांचा विचार करेल.

‘पृथ्वीभोवती सूर्य, तारे आणि ग्रह फिरतात’ असा एके काळी समज होता. दुर्बिणीतून पाहिल्यावर पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याचे लक्षात आले, तेव्हा शास्त्रज्ञांनी पूर्वग्रह बाजूला ठेवले आणि सत्य सांगितले, पण इतरांना ते पटले नाही.

४) एखादी गोष्ट प्रयोगांनी सिद्ध झाली, तर आपण आपली मते बदलतो; प्रयोगाने सिद्ध झालेल्या गोष्टीवरच विश्वास ठेवतो.

साप चावल्यावर विष उतरवण्यासाठी मंत्रतंत्रांचा उपयोग होत नाही; योग्य इंजेक्शन घ्यावे लागते. कुत्रे चावल्यावर अँटी रेबीज इंजेक्शन घेणे आवश्यक आहे. रोगाची साथ आली, तर मरीआईचा गाडा उपयोगी पडत नाही; लसीकरण करावे लागते… अशा गोष्टी प्रयोगाने लक्षात आल्या. त्याप्रमाणे समाज बदलत आला.

५) पुरेसा आधार नसेल, तर थोरांचे मतही स्वीकारू नये.

सिनेनट किंवा सुप्रसिद्ध क्रिकेटीयर यांना समाजात श्रेष्ठ समजले जाते. खूप वेळा ते अतिरंजित जाहिराती करतात. त्यांना सर्वसामान्य लोक भुलतात. ‘मोठ्या माणसाचे मतसुद्धा तपासून घेतले पाहिजे’ अशी सवय लागली, तर लोक फसणार नाहीत.

एक योगीबाबा,”योगाने कॅन्सर बरा करतो, ब्लड प्रेशर किंवा डायबिटीस बरा करतो!” असे दावे करतात. हे दावे तपासले पाहिजेत. ‘किती लोकांच्या वर हा प्रयोग झाला’, ‘रोग बरे होण्याचे प्रमाण किती आहे’ अशा तर्‍हेची आकडेवारी मागितली पाहिजे.

‘आमच्या औषधांना साईड इफेक्ट नाहीत’ अशी जाहिरात केली जाते. तिच्यावर तपासूनच विश्वास ठेवावा.

६) घटनेचा अभ्यास करताना कार्यकारण भाव तपासतो.

‘पुत्रलाभ झाला आणि नोकरीत बढती मिळाली’ असा शुभशकुन किंवा ‘नोकरीत अडचण आली’ असा अपशकुन मानला जातो. कार्यकारणभाव तपासला, तर असे होणार नाही.

‘मुलाचे लग्न झाले आणि सासू आजारी पडली’ किंवा ‘शेती पिकली नाही’ असे झाल्यास नववधूला ‘पांढर्‍या पायाची’ म्हणून हिणवले जात असे. ‘आजारी पडण्याचे कारण रोगजंतू आहेत’ किंवा ‘शेती पिकण्यामागे बी-बियाणे, खते, आणि पाऊस-पाणी या गोष्टी कारणीभूत आहेत’ हे समजून घेतल्यास नववधूबाबतची चुकीची विधाने केली जाणार नाहीत.

७) वैज्ञानिक पद्धतीने मिळालेल्या निष्कर्षावरच विश्वास ठेवेल.

 निरीक्षण करणे, त्यावरून काही अडाखे बांधणे, त्यानुसार प्रयोगाचे नियोजन करणे, नियंत्रित परिस्थितीत प्रयोग करून आपले निष्कर्ष तपासणे… पुन्हा पुन्हा प्रयोग करून नियम शोधणे, त्यांचे सार्वत्रिकरण करणे आणि पुन्हा पुन्हा तपासत राहणे ही वैज्ञानिक पद्धती आहे.

‘उसाचे पाचट जाळले, तर गवताचे बी जळून जाते आणि जमिनीला राखेचे खत मिळते’ असा समज होता. त्याऐवजी ‘उसाचे पाचट सरीत घातले, तर तण उगवत नाहीत, पण पाणी धरून ठेवले जाते आणि पाचट जमिनीत गाडले जाऊन जमीन सुपीक बनते’ हे लक्षात आल्यावर त्याप्रमाणे शेतकर्‍यांनी शेती करण्यात बदल केले.

८) आपली मते वारंवार तपासतो आणि चूक आढळल्यास  बदलतो.

शिक्षणशास्त्र, आरोग्यशास्त्र, शेतीशास्त्र इत्यादींमध्ये नवे संशोधन होत आहे. पूर्वीचे निष्कर्ष पुन्हा पुन्हा तपासले जातात आणि त्यांमध्ये काही चूक आढळली, तर ते बदलले जातात. विविध शास्त्रांमध्ये आज झालेली प्रगती ही प्रयोग करणे, निरीक्षण करणे, चुका शोधणे आणि दुरुस्त करणे या मार्गाने झाली आहे.

कोरोना रुग्णांना सुरुवातीला रेमंडेसीवर औषध मोठ्या प्रमाणात वापरले गेले, पण ते वापरणे योग्य नसल्याचे लक्षात आल्याबरोबर जागतिक आरोग्य संघटनेने त्यावर बंदी घातली आणि आपली चूक सुधारली.

९) ‘माझेच खरे’ असा हेका धरत नाही, ‘खरे ते माझे’ म्हणतो.

आपण सांगितलेल्या मुद्द्याचा काही जण आग्रह धरतात. नंतर त्यांच्या लक्षात येते की, ‘आपण सांगितले ते चूक होते’, पण तरी ते आपला आग्रह सोडत नाहीत. अशाने खूप वेळा इगोचा प्रश्न तयार होतो.

महात्मा गांधींच्या जीवनात असे प्रसंग आल्याचे त्यांनी वर्णन केले आहे; पण आपली चूक लक्षात आल्याबरोबर त्यांनी ती दुरुस्त तर केलीच, पण आपल्या चुकीला त्यांनी ‘हिमालयाएवढी चूक’ असे म्हटले आहे.

१०) कितीही मोठ्या व्यक्तीने सांगितले, ग्रंथात लिहिले आहे, वृत्तपत्रात छापले आहे, तरी अशी मते तपासूनच स्वीकारतो.

थोरांना अनुभव मोठा असतो, त्यामुळे त्यांची मते बर्‍याच वेळा बरोबर असतात. तीच गोष्ट ग्रंथांची आहे. ग्रंथकर्ता अभ्यासपूर्वक लिखाण करत असल्यामुळे त्याची मते बरोबर असण्याची शक्यता जास्त असते, पण हे नेहमीच खरे असेल, असे नाही. म्हणून कितीही मोठ्या व्यक्तीने सांगितले किंवा ग्रंथात लिहिले असले, तरी ते तपासूनच घेतले पाहिजे. ‘टीव्हीवर दाखवलेले, सिनेमांमध्ये दाखवलेले किंवा वृत्तपत्रात छापलेले बरोबरच आहे’ असा एक समज असतो, पण अशा मीडियामधून आलेल्या गोष्टीसुद्धा तपासल्याशिवाय स्वीकारू नयेत. अलीकडे तर ‘गोदी मीडिया’ असा शब्दप्रयोग तयार झाला आहे. आपल्याला हवे तसे लोकमत तयार करण्यासाठी सत्य, असत्य, भडक बातम्या दिल्या जातात; प्रत्येक बातमीची सत्यता तपासल्याशिवाय तिच्यावर विश्वास ठेवू नये.

११) इतरांची मते शांतपणे ऐकून घेतो. त्यांबद्दल आदर दाखवतो.

इतरांची मते ऐकून घेतल्याशिवाय आपल्याला नवे ज्ञान मिळणार नाही. खरेखोटे ठरवायचे असेल, तर प्रथम ऐकून घेतले पाहिजे; माहिती करून घेतली पाहिजे. अनेक वेळा गैरसमजातून लोक दुरावले जातात.

१२) चिकाटीने काम करतो.

विज्ञानाचे शोध चिकाटीने, कष्टाने, न कंटाळता काम करून लावलेले आहेत… निष्कर्ष मिळेपर्यंत पुन्हा पुन्हा प्रयोग करावे लागतात… समाजाचे निरीक्षण करावे लागते… निसर्गाचे निरीक्षण करावे लागते.

१३) नम्रतेने वागतो.

‘मला सर्व कळलेले आहे. आता काही कळण्याचे शिल्लक राहिले नाही. मी दिलेले उत्तर हे शेवटचे उत्तर आहे. ते सर्वांनी मान्य केले पाहिजे. हेच अंतिम सत्य आहे.’ हा धर्माचा दावा असतो.

पण विज्ञान नेहमी नम्र असते. ते कधी अंतिम सत्याचा दावा करत नाही. ‘मला आता एवढेच समजले आहे. सध्या उपलब्ध पुराव्यानुसार हे सत्य आहे. उद्या याहून वेगळे पुरावे मिळाले, तर मी माझे मत बदलीन!’ अशी विज्ञानाची नम्रतेची भावना असते.

१४) प्रश्न विचारतो.

आदिमानवाला प्रश्न पडले… पाऊस का पडतो? दिवस रात्र कसे होतात? सूर्य का उगवतो?… अशा प्रश्नांची उत्तरे त्याने निरीक्षणातून मिळवण्याचा प्रयत्न केला. खरी उत्तरे त्या वेळी मिळालीच, असे नाही; पण प्रश्न पडण्यातून मेंदूचा विकास झाला. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची सवय लागली पाहिजे; उत्तरे शोधण्याची सवय लागली पाहिजे.

अध्यात्मवादी म्हणतात, ‘प्रश्न विचारू नका, गुरूवर श्रद्धा ठेवा’ विज्ञान म्हणते, ‘प्रश्न विचारा’

१५) चिकित्सक वृत्ती प्रत्येक गोष्टीबद्दल शंका घेतो.

‘कुतूहल’ माणसाला प्रश्न विचारण्यासाठी प्रवृत्त करते. लहान मुलांना प्रत्येक गोष्टीबद्दल कुतुहूल असते. त्याला जास्तीत जास्त प्रश्न विचारण्याची संधी दिली पाहिजे. त्यातून चिकित्सक वृत्ती तयार होईल. चिकित्सा करत नसल्यामुळे समाजात अनेक गैरसमज पसरवले जातात.

‘मुस्लिमांची संख्या २८ टक्के झाली’ अशी एक पोस्ट व्हाट्सअ‍ॅप वर फिरत होती. लोक तिच्यावर लगेच विश्वास ठेवत होते; पण गेली पंधरा वर्षे जनगणनाच झालेली नाही. असे असताना ‘वरील आकडेवारी आणली कुठून?’ या प्रश्नाचे उत्तर संबंधितांना देता आले नाही. चिकित्सा केली, तर द्वेष पसरवणार्‍या अशा पोस्ट्ना आळा बसू शकेल.

थोडक्यात निरीक्षण, परीक्षण, वर्गीकरण, पडताळा, तर्क, अनुमान इत्यादींचा वापर करूनच वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती निष्कर्ष काढते. स्वतः अनुभव घेऊन मगच ती त्यावर विश्वास ठेवते; सर्व बाजूंनी विचार करते. हे विश्व स्वायत्त आहे. नियम डावलून विश्वामध्ये काही घडत नाही. प्रत्येक घटनेमागे कार्यकारणभाव असतो. तो आपल्याला शोधून काढता येतो. संपूर्ण सापडला नाही, तरी दिशा समजते; काही काळाने कार्यकारणभाव  सापडतो. त्यामधील त्रुटी दूर करता येतात. कितीही मोठ्या व्यक्तीचे मत असो, ते तपासून घेतले पाहिजे. आपल्याला पटलेले मत नम्रपणे आणि निर्भयपणे मांडले पाहिजे. अशी  कार्यकारणभावाची भूमिका असते.

विज्ञानाबरोबरच इतर सर्व विषयांमध्येसुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनाचा समावेश असतो. इतिहासाला वैज्ञानिक दृष्टिकोन लावला की तो ‘ऐतिहासिक दृष्टिकोन’ होतो.

इतिहासातील घटना आपोआप घडत नाहीत. ‘दुष्टांचे निर्दालन करावे’ असे ईश्वराला वाटले. ‘ग्रहतार्‍यांनी युती केली’, ‘एखाद्या व्यक्तीच्या मनात आले’, ‘नशिबाने घडले’ अशी कारणे इतिहासात चालत नाहीत; समाज इतिहास  घडवत असतो.

समाजात कोणकोणते वर्ग आहेत, त्यांचा उत्पादनाशी काय संबंध आहे, उत्पादित वस्तूंची मालकी कुणाची असते, त्यांचे वितरण कसे होते यांवरून ऐतिहासिक घटनांचा अर्थ लावता येतो.

‘जेवढा पुरावा तेवढाच विश्वास’ हा इतिहासातील महत्त्वाचा नियम असतो.

रक्ताचा रंग किंवा रक्त – गट, जाती, धर्म किंवा वर्ण यांवर अवलंबून नसतात. एका जातीच्या माणसाचे रक्त दुसर्‍या जातीच्या माणसाला चालते. यावरून राष्ट्रीय एकात्मता, धर्मनिरपेक्षता या गोष्टी वैज्ञानिक दृष्टीकोनाशी  सुसंगत असल्याचे लक्षात येते.

व्यसनामुळे शरीराची हानी झाल्याची उदाहरणे पाहिल्यावर वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली व्यक्ती व्यसनापासून दूर राहते. वैज्ञानिक दृष्टिकोन हा केवळ धार्मिक अंधश्रद्धांशी संबंधित नसून जीवनातील सर्व अंगांना स्पर्श करतो.

– अनिल चव्हाण

लेखक संपर्क : ९७६४१ ४७४८३


अंक

लेखक सूची

part: [ 1 ] [ 2 ] [ 3 ] [ 4 ] [ 5 ] [ 6 ] [ 7 ] [ 8 ] [ 9 ] [ 10 ] [ 11 ] [ 12 ] [ 13 ] [ 14 ] [ 15 ] [ 16 ] [ 17 ] [ 18 ] [ 19 ] [ 20 ] [ 21 ] [ 22 ] [ 23 ] [ 24 ] [ 25 ] [ 26 ] [ 27 ] [ 28 ] [ 29 ] [ 30 ] [ 31 ] [ 32 ] [ 33 ] [ 34 ] [ 35 ] [ 36 ] [ 37 ] [ 38 ] [ 39 ] [ 40 ] [ 41 ] [ 42 ] [ 43 ] [ 44 ] [ 45 ] [ 46 ] [ 47 ] [ 48 ] [ 49 ] [ 50 ] [ 51 ] [ 52 ] [ 53 ] [ 54 ] [ 55 ] [ 56 ] [ 57 ] [ 58 ] [ 59 ] [ 60 ] [ 61 ] [ 62 ] [ 63 ] [ 64 ] [ 65 ] [ 66 ] [ 67 ] [ 68 ] [ 69 ] [ 70 ] [ 71 ] [ 72 ] [ 73 ] [ 74 ] [ 75 ] [ 76 ] [ 77 ] [ 78 ] [ 79 ] [ 80 ] [ 81 ] [ 82 ] [ 83 ] [ 84 ] [ 85 ] [ 86 ] [ 87 ] [ 88 ] [ 89 ] [ 90 ] [ 91 ] [ 92 ] [ 93 ] [ 94 ] [ 95 ] [ 96 ] [ 97 ] [ 98 ] [ 99 ] [ 100 ] [ 101 ] [ 102 ] [ 103 ] [ 104 ] [ 105 ] [ 106 ] [ 107 ] [ 108 ] [ 109 ] [ 110 ] [ 111 ] [ 112 ] [ 113 ] [ 114 ] [ 115 ] [ 116 ] [ 117 ] [ 118 ] [ 119 ] [ 120 ] [ 121 ] [ 122 ] [ 123 ] [ 124 ] [ 125 ] [ 126 ] [ 127 ] [ 128 ] [ 129 ] [ 130 ] [ 131 ] [ 132 ] [ 133 ]